कुर्सी की पेटी बाँधे रखिये... (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
रविवार, 21 मे 2017

जगातल्या कुठल्याही प्रशिक्षण-शाळेत अपघाताचं थेट प्रात्यक्षिक शिकवत नाहीत. तो प्रसंग त्या क्षणीच निभावावा लागतो. तिथं गणित कामाला येत नाही; किंबहुना कुठलंही शास्त्र तिथं निरर्थक ठरतं. तिथं सत्कारणी लागतो तो अनुभव आणि मानवी सहावं इंद्रिय. संगणक तिथं पराभूत होतो. ‘सली’ या चित्रपटात नेमकं हेच अधोरेखित करण्यात आलेलं आहे.

जगातल्या कुठल्याही प्रशिक्षण-शाळेत अपघाताचं थेट प्रात्यक्षिक शिकवत नाहीत. तो प्रसंग त्या क्षणीच निभावावा लागतो. तिथं गणित कामाला येत नाही; किंबहुना कुठलंही शास्त्र तिथं निरर्थक ठरतं. तिथं सत्कारणी लागतो तो अनुभव आणि मानवी सहावं इंद्रिय. संगणक तिथं पराभूत होतो. ‘सली’ या चित्रपटात नेमकं हेच अधोरेखित करण्यात आलेलं आहे.

विमानात बसल्यावर रांगांच्या मध्ये उभं राहून ती हवाईसुंदरी तुम्हाला ‘कुर्सी की पेटी’ बांधून घ्यायला बजावते. ‘तुमच्या सीटच्या खाली लाइफ जॅकेट आहे...पाण्यावर उतरावं लागलं तर ते ‘असं असं फुगवा’ ’ वगैरे सूचना देते. आपत्कालीन दरवाजा कसा उघडायचा ते समजावून सांगते. ‘आगे दो द्वार है, पीछे की तरफ दो द्वार है...’ वगैरे. सराईत हवाईप्रवासी तिच्याकडं ढुंकूनही पाहत नाहीत. आपणही कशाला पाहा? कुर्सी की पेटी बांधण्याच्या आग्रहाला ‘काय कटकट आहे’ अशा नजरेनं मान तुकवण्यात धन्यता मानणं हा खरा हवाईधर्म! ‘तुमच्या पुढल्या सीटच्या मागल्या खणात सुरक्षाविषयक सूचनांचं कार्ड ठेवलेलं आहे, ते नीट वाचा’ असंही ती हवाईसुंदरी सांगत असते, त्या वेळी एखादा दाखलेबाज हवाईप्रवासी विमानात खानपान घ्यावं की न घ्यावं, याचा गांभीर्यानं विचार करत असतो. कुणाचं लक्ष खाण्या-पिण्यात तर पोटाचा वाढीव घेर आवरणाऱ्या एखाद्या प्रवाशाला ‘कुर्सी की पेटी’ बांधताना घाम फुटलेला असतो. एखादी आधुनिक आई पोराच्या किंवा पोरीच्या कानात कापसाचे बोळे कोंबण्याचा खटाटोप करत असते. कुणी गार पंख्याच्या खिट्ट्या पिरगळत असतं. कुणी आपले ‘मोबाइल एवं इलेक्‍ट्रॉनिक उपकरणी’ फ्लाइट मोडवर टाकत असतात. मोबाइल बंद करण्यापूर्वी एक तरी शेवटची सेल्फी बनती है! कुणी अर्ध्यामुर्ध्या खिडकीतून विमानाबाहेरची धावपळ टिपत असतं. ते धावते जिने, लांबलचक बसेस, गणवेशातली माणसं. मालगाडीसारखे डबे जोडून जाणारी उघडी वाहनं, भयानक वेगात उतरणारी आणि उड्डाण करणारी विमानं...
आपलं विमान हळूहळू उड्डाणस्थानी निघालेलं असतं...

जेट इंजिनाचा अक्राळविक्राळ घरघराट. पायाखालची थरथर. थडथडत निघालेलं विमान. अफाट वेगाचा परमोच्च बिंदू गाठल्यानंतर हलकेच नाक वर करत विमानाचं आभाळाकडं झेपावणं. आपलं वजन किंचित वाढल्यासारखं वाटणं. कानात दडे बसतात. बघता बघता शहरगाव ठिपक्‍यांसारखं दिसू लागतं. रस्त्यावरची वाहतूक ओहोळांसारखी दिसू लागते. डोंगरदऱ्या दिसू लागतात किंवा समुद्राचं पाणी...विमानासोबत तरंगणारे वेगवेगळ्या आकारांचे पांढरे ढग. जणू गादीकारखान्यातला पिंजलेला कापूसच. काही काळानं स्थिरस्थावर झाल्याची खूण वाजते : टुंग. ‘कुर्सी की पेटी बाँधे रखिए’ची खूण विझलेली असते. पट्टे सोडवत काही महाभाग लागलीच मागल्या-पुढल्या स्वच्छतागृहाकडं वळतात. पाच-दहा मिनिटांत लग्गेच ही वेळ का येते? पण ते जाऊ दे.

दरम्यान, आपण हवाईसुंदरीनं दिलेल्या सूचना कम्प्लीट विसरलेलो असतो.
आठ वर्षांपूर्वी १५ जानेवारी २००९ रोजी यूएस एअरवेजच्या विमानावर ती वेळ आली. पक्ष्यांचा थवा आपटून विमानाची दोन्ही इंजिनं निकामी झाल्यावर वैमानिक चेल्सी सलेनबर्गरनं क्षणात निर्णय घेऊन ते विमान सरळ मॅनहटनच्या हडसन नदीत उतरवलं. १५५ जणांचे प्राण वाचवले. ‘हडसनवरचा चमत्कार’ म्हणून या घटनेचं वर्णन केलं जातं. अनुभव माणसाला काय शिकवतो, याचं अनुपम उदाहरण म्हणजे सलेनबर्गरची ही रुपेरी कहाणी. नाव तेच ः ‘सली’.

सली सलेनबर्गर आजही उभ्या अमेरिकेच्या गळ्यातले ताईत ठरले आहेत. माध्यमांनी त्यांना डोक्‍यावर घेतलं. न्यू यॉर्कच्या मद्यालयांमध्ये ज्याच्या नावाची कॉकटेल्स विकली गेली, विख्यात बॅंड्‌सनी ज्यांच्या वीरोचित कृत्याखातर गाणी रचली, त्या सलेनबर्गर यांना मात्र या धाडसी कृत्याबद्दल तब्बल दीड वर्ष कठोर चौकशीला तोंड द्यावं लागलं. ‘सली, आर यू अ हीरो ऑर अ फ्रॉड?’ हा सवाल त्यांना जाहीररीत्या केला गेला. दीड वर्षांच्या थकवणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांनंतर त्यांची सन्मानपूर्वक प्रतिष्ठापना झाली. कॅप्टन सलेनबर्गर पुन्हा एकवार उड्डाणास सिद्ध झाले. यथावकाश दोनेक वर्षांनी निवृत्तही झाले. त्यांनी आत्मचरित्र लिहिलं. त्याचं नाव ‘ हाय्येस्ट ड्यूटी : माय सर्च फॉर व्हॉट रिअली मॅटर्स’ हे चरित्र वाचल्यानंतर एक नाणावलेला अभिनेता आणि दिग्दर्शक तडफेनं उठला, त्यानं थेट यावर चित्रपटच काढायचं ठरवलं. क्‍लिंट ईस्टवूड त्याचं नाव. सलेनबर्गरची भूमिका करण्यासाठी त्यानं थेट टॉम हॅंक्‍सलाच पाचारण केलं. पुढं जे काही घडलं, तो निव्वळ चित्रपट नव्हता. विमानप्रवास हा ज्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे, अशा तमाम अमेरिकनांच्या भावनांचा तो रुपेरी अर्क होता.
टॉम हॅंक्‍स आणि अफलातून तंत्रज्ञान दिमतीला असूनही ‘सली’ला ऑस्कर वगैरे नाही मिळालं; पण तरीही तो एक बेजोड चित्रपट आहे. कारण यंत्रज्ञान, भौतिकशास्त्र, हवामानशास्त्र, संगणकीय पुढारलेपण या सगळ्याला पुरून, मानवी अनुभव दशांगुळं कसा उरतो, याचा वस्तुपाठ म्हणजे ‘सली’ हा चित्रपट.
* * *

१५ जानेवारी २००८. लागार्डिया विमानतळ. न्यू यॉर्क. कॅप्टन चेल्सी सलेनबर्गर यांनी कॉकपिटमध्ये शिरत ‘यूएस एअरवेज फ्लाइट १५४९’ ची सूत्रं हाती घेतली. समोरच्या विविध काट्यांकडं सराईत नजर टाकली. शेजारी फर्स्ट ऑफिसर जेफ स्काइल्स होता. सलीपेक्षा कितीतरी लहान. अनुभवानं आणि वयानंही. सलीनं गेली ४२ वर्षं विमानं उडवली आहेत, उतरवलीही आहेत. विमान शार्लटला न्यायचं आहे. हवामानही चांगलं आहे. बर्फ पडून गेलं असलं तरी धावपट्टी क्‍लिअर आहे. आभाळातही काही गडबड नाही. कंट्रोल टॉवरकडून सूचना येताच सली सलेनबर्गर यांनी विमान पळवत उड्डाणस्थानी नेलं. टेक ऑफसाठी गिअर टाकला. इंजिनं धडधडली. अर्ध्या मिनिटात विमान आभाळात झेपावलं. दोनेक मिनिटं झाली असतील-नसतील, तेवढ्यात कॅनडियन ग्रे गूजचा एक थवा अचानक समोर आला.

‘‘बर्डस!!’’ सली ओरडले. थाड थाड आवाज होत दोन-चार पक्षी घरघरणाऱ्या इंजिनातच घुसले. दोन्ही इंजिनं निकामी झाली. हे सगळं जेमतेम अडीच हजार फुटांवर घडत होतं. पक्ष्यांचा थवा ओलांडून निघून गेला; पण विमानाच्या पंखातली जान हरवली होती. विमान वेगानं खाली येऊ लागलं.
खाली मॅनहटन दिसत होतं. हडसन नदी आणि नदीच्या पात्रातल्या बोटी दिसत होत्या. डावीकडं लागार्डिया विमानतळ होता. उजवीकडं टेंटरबरो विमानतळ. दरम्यान सलीनं बटण दाबून ऑक्‍झिलरी पॉवर युनिट सुरू केलं होतं. त्यांनी कंट्रोल टॉवरशी संपर्क साधला : मे डे, मे डे, मे डे...धिस इज कॅक्‍टस १५४९. बर्डहीटमुळं आमची दोन्ही इंजिनं बंद पडली आहेत. लॅंडिंगसाठी जागा शोधतोय. फ्लाइट कंट्रोलर गडबडला. फर्स्ट ऑफिसर स्काइल्सनं क्‍यूआरएच उघडलं होतं. क्‍यूआरएच म्हणजे क्‍विक रेफरन्स हॅंडबुक. बिकट प्रसंगी काय काय करायचं असतं, याची प्रोसिजर त्यात सोप्या भाषेत लिहिलेली असते.

बघता बघता विमान २७०० फुटांवर आलं. दोन्ही विमानतळ अवघ्या सात मैलांच्या परिघात आहेत; पण तिथवर पोचणंही जवळपास अशक्‍य दिसतंय.
‘‘मी हडसनवर विमान उतरवतोय!’’ सलीनं कंट्रोल टॉवरला सांगितलं. संपर्क तुटला.
...पुढं घडलं ते जबरदस्त होतं. हडसनवरच्या ऐतिहासिक जॉर्ज वॉशिंग्टन पुलाला जवळजवळ घासून एक प्रचंड बोइंग नदीत उतरताना लोकांनी पाहिलं.
‘‘धिस इज कॅप्टन स्पीकिंग...ब्रेस फॉर ॲन इम्पॅक्‍ट!’’ विमानातल्या पीए सिस्टिमचा ध्वनिक्षेपक उचलून सलीनं सूचना दिली.
ब्रेस ब्रेस ब्रेस...हेड्‌स डाऊन, स्टे डाऊन! ब्रेस ब्रेस ब्रेस...हेड्‌स डाऊन, स्टे डाऊन!
ब्रेस ब्रेस ब्रेस...हेड्‌स डाऊन, स्टे डाऊन!..एअरहोस्टेस ओरडत राहिल्या. हबकलेले प्रवासी माना खुर्चीत घालून प्रार्थना करत बसले.
थडाड...धाड...धक्‍क...अफाट वेगानं विमान पाण्यावर आदळलं. अर्धंअधिक बुडालं. जानेवारीचा महिना. हडसनच्या बर्फगार पाण्याचे लोंढे विमानात शिरू लागले. एअरहोस्टेसेसनी धीरानं प्रवाशांना सूचना देत आपत्कालीन दरवाजे उघडले. पाण्यावर तरंगणाऱ्या राफ्ट्‌स बाहेर काढल्या. विमानाच्या पंखांवर प्रवाशांना ढकललं. बायाबापड्या रडत-किंचाळत होत्याच, बाप्येसुद्धा टरकलेले. मृत्यू समोर दिसायला लागला की भले भले गळपटतात. इथं तर तो सोबतच खांद्यावर हात टाकून उभा होता.

सगळं मिळून अवघ्या साडेतीन मिनिटांचं नाट्य; पण तेवढ्या काळात आयुष्य पणाला लागलं. एका फेरीबोटीच्या कप्तानानं तत्परता दाखवत आपली बोट विमानाकडं पिटाळली होती. आपत्कालीन व्यवस्थापनाची बोटही आलीच. वेळ वाया न दवडता प्रवाशांना ओढून घेण्यात आलं...वैमानिक सली सलेनबर्गरसकट.
अस्वस्थ सलीनं विचारलं. किती जणांना वाचवता आलंय? उत्तर आलं १५५. म्हणजे एकूण एक. नो कॅज्युअल्टी. यू आर सुपरमॅन, सली. यू सेव्हड्‌ एव्हरीबडी.
सलीनं नि:श्‍वास सोडला.
** *

सली अमेरिकन हीरो ठरले; पण एनटीएसबी म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळानं या दुर्घटनेची चौकशी आरंभली आणि एका नायकाला भलत्याच लढाईला तोंड द्यावं लागलं. चौकशी. साक्षी-पुरावे. उलटतपासण्या. लॅब रिपोर्ट. ब्लॅक बॉक्‍समधला डेटा...तज्ज्ञांकडून पुन:पुन्हा अभ्यास...या सगळ्याच्या केंद्रस्थानी कॅप्टन सली सलेनबर्गर.
...विमानाची उंची, वाऱ्याची दिशा, इंजिनाची दशा आणि वेळ पाहता सली सलेनबर्गर यांना विमान लागार्डिया किंवा टेटरबरोच्या धावपट्टीवर नक्‍की उतरवता आलं असतं, हडसनवर विमान क्रॅश करण्याचा त्यांचा निर्णय आततायीपणाचा होता, असा प्राथमिक निष्कर्ष निघाला.    

अर्थात एनटीएसबीच्या समितीला चेल्सी सलेनबर्गरबद्दल कमालीचा आदर होता. त्यांची आजवरची बेदाग कारकीर्द अशा रीतीनं संपावी, असं कुणालाच वाटत नव्हतं. कॉम्प्युटर सिम्युलेशन्स हा वैमानिकांच्या प्रशिक्षणाचा अविभाज्य भाग असतो. कॉकपिटसारखं कॉकपिट. तस्सेच कंट्रोल्स. बटणं. खिट्ट्या. विमानोड्डाणाचा अचूक प्रोग्रॅम तिथल्या संगणकात भरलेला असतो. कॉम्प्युटर गेमसारखंच जवळपास. या संगणकाला सलेनबर्गरच्या फ्लाइटमधला सगळा डेटा फीड करण्यात आला. सिम्युलेशन्समध्ये दोन्ही विमानतळांवर व्यवस्थित उतरता आल्याचं दिसून आलं. मग सलेनबर्गरनं हा उद्योग कशासाठी केला? प्रसिद्धी? विक्षिप्तपणाचा झटका? हिरोगिरी? घातपात?
‘‘कॅन वी गेट सीरिअस नाऊ? आम्ही तिथं कॉम्प्युटर गेम खेळत नव्हतो. आभाळात बंद पडलेलं विमान अतिशय कमी उंचीवर उडवत होतो. ‘जस्ट डावीकडं वळा आणि लागार्डियाला दुधाची पिशवी घेऊन या’ हे सांगणं सोपं आहे; पण काय करायचं, याचा निर्णय घ्यायला माझ्याकडं फक्‍त ३५ सेकंद होते फार तर...सिम्युलेशन्ससाठी तुमच्याकडं तयार डेटा होता, माझ्याकडं तेव्हा नव्हता. मुख्य म्हणजे सिम्युलेशन पायलट मरणार नव्हता. प्रवासीही मरणार नव्हते. तुम्ही मानवी चूक शोधताय ना? मग या चौकशीत मानवी घटक कुठं विचारात घेतलाय? इफ यू आर लुकिंग फॉर ह्यूमन एरर, देन मेक इट ह्यूमन...’’ सलीनं बेधडक बोलायला सुरवात केली. समितीच्या तज्ज्ञांनी मानवी घटक म्हणून सिम्युलेशनच्या गणितात ३५ सेकंद वाढवले. पुढला निकाल धक्‍कादायक होता. संगणकाचं विमान साफ कोसळलं होतं.
कॅप्टन चेल्सी सलेनबर्गर खरोखरचे हीरो ठरले.
* * *

जगातल्या कुठल्याही प्रशिक्षण-शाळेत अपघाताचं थेट प्रात्यक्षिक शिकवत नाहीत. तो प्रसंग त्या क्षणीच निभावावा लागतो. तिथं गणित कामाला येत नाही; किंबहुना कुठलंही शास्त्र तिथं निरर्थक ठरतं. तिथं सत्कारणी लागतो तो अनुभव आणि मानवी सहावं इंद्रिय. संगणक तिथं पराभूत होतो. ‘सली’ या चित्रपटात नेमकं हेच अधोरेखित करण्यात आलेलं आहे. या चित्रपटाची जादू अशी, की सिनेमा संपला तरी मनात विचारांची विमानं उडायला लागतात. विख्यात अभिनेता टॉम हॅंक्‍सनं सलीची भूमिका साकारली आहे. ती अर्थातच भन्नाट आहे. केस, मिश्‍या पिकलेला पोक्‍त वैमानिक त्यानं असा काही पेश केला आहे, की हा खरंच विमान उडवेल, असं वाटायला लागतं. हा रोल करण्यापूर्वी दिग्दर्शक क्‍लिंट ईस्टवूडनं त्याला खऱ्याखुऱ्या चेल्सी सलेनबर्गरच्या बे एरियातल्या घरी पाठवलं. दुपारी एकची वेळ ठरली होती. टॉम हॅंक्‍सनं १२ वाजून ५८ मिनिटांनी सलीच्या दाराची घंटी वाजवली. सली त्याच्या प्रेमातच पडले. इतकंच नव्हे तर, संपूर्ण चित्रीकरणात त्यांनी टॉम हॅंक्‍सला साथ दिली, मार्गदर्शन केलं.

युनिव्हर्सल स्टुडिओच्या तलावात चित्रपटाचं बरंचसं शूटिंग झालं. जवळपास भंगारात गेलेली दोन विमानं चक्‍क विकत घेऊन निर्मात्यांनी ती इथल्या पाण्यात बुडवली होती. केवळ चित्रीकरणासाठी! क्‍लिंट ईस्टवूडचा तपशिलासाठीचा आग्रह बघून ते प्रचंड प्रभावित झाले. संपूर्ण चित्रपट तयार झाल्यावर तो सली आणि त्यांच्या पत्नीला दाखवण्यात आला. त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यावरच तो प्रदर्शित झाला.
सली आजकाल एका वृत्तवाहिनीचे हवाई वाहतूकतज्ञ सल्लागार म्हणून काम पाहतात. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिलेलं एक वाक्‍य मनावर कोरून ठेवण्याजोगं आहे. ते म्हणतात : ‘माझ्या कारकीर्दीत हरेक उड्डाणाबरोबर मी अनुभवाच्या बॅंकेत छोटी छोटी बचत करत गेलो, म्हणूनच बहुधा १५ जानेवारी २००९ रोजी मला माझ्या या खात्यातून खूप मोठी रक्‍कम काढता आली...’
हा चित्रपट पाहिल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही जेव्हा विमानात बसाल, तेव्हा ‘आगे दो द्वार है, और पीछे दो द्वार है’ छापाची सुरक्षाविषयक जानकारी देणाऱ्या एअरहोस्टेसचं म्हणणं नीट मन लावून ऐकाल. कुर्सी की पेटी आठवणीनं नीट बांधाल, याची गॅरंटी.

Web Title: pravin tokekar's article in saptarang