प्रमुख पाहुणे (प्रिया जोग)

प्रिया जोग priyajog1971@gmail.com
रविवार, 24 फेब्रुवारी 2019

शाळेत वर्गातला मध्यम हुशार असा अनिकेत. थोडासा मस्तीखोरच होता तसा; पण गेल्या दहा वर्षांत कमालीचा फरक वाटत होता. आत्मविश्वास किती होता चेहऱ्यावर आणि भाव तरी किती सोज्वळ. त्याचं शिक्षण, नोकरी आणि सेवाभावी संस्थेतलं काम याविषयी भरभरून सांगत राहिला. हे तरुण एकत्र येऊन समाजहिताचे अनेक उपक्रम राबवत होते. याच तरुणाईच्या हातात देशाचं भविष्य उज्ज्वल होऊन सुरक्षित राहणार होतं, याचा सुनीताताईंना अभिमान वाटला. मध्येच भानावर येत त्या त्याला थांबवत म्हणाल्या ः ""अरे चहा-कॉफी नाही, तर सरबत तरी घे. आणि काय रे आज उपवास ना तुझा? मग खिचडी नको तर वडे आणते गरमागरम. बस जरा.''

शाळेत वर्गातला मध्यम हुशार असा अनिकेत. थोडासा मस्तीखोरच होता तसा; पण गेल्या दहा वर्षांत कमालीचा फरक वाटत होता. आत्मविश्वास किती होता चेहऱ्यावर आणि भाव तरी किती सोज्वळ. त्याचं शिक्षण, नोकरी आणि सेवाभावी संस्थेतलं काम याविषयी भरभरून सांगत राहिला. हे तरुण एकत्र येऊन समाजहिताचे अनेक उपक्रम राबवत होते. याच तरुणाईच्या हातात देशाचं भविष्य उज्ज्वल होऊन सुरक्षित राहणार होतं, याचा सुनीताताईंना अभिमान वाटला. मध्येच भानावर येत त्या त्याला थांबवत म्हणाल्या ः ""अरे चहा-कॉफी नाही, तर सरबत तरी घे. आणि काय रे आज उपवास ना तुझा? मग खिचडी नको तर वडे आणते गरमागरम. बस जरा.''

सुनीताताई एका प्रथितयश शाळेतल्या एक शिक्षिका. मुख्य शहराच्या उपनगरातल्या एका शाळेतल्या. खरंतर आता निवृत्त व्हायला पाचच वर्षं शिल्लक होती. तसं म्हटलं, तर ज्याला सतत काहीतरी करायची इच्छा आहे त्याच्यासाठी ही पाच वर्षंसुद्धा खूप होती. मुख्य शहराला लाभलेला सांस्कृतिक वारसा आणि खूप जुनं नाव. त्यामुळं अजूनही बरेचसे उत्तमोत्तम कार्यक्रम तिथंच होत. शालेय स्तरावरही काही मार्गदर्शन शिबिरं किंवा निवडक स्पर्धा परीक्षा मुख्य शहरातच होत. उपनगरातून शाळा सहभागी होऊन तिथं येत असत. सुनीताताईंना त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून कथाकथन आणि वक्तृत्व यांची खूप आवड. बोलण्यातून माणूस खूप प्रभावीपणे व्यक्त होऊ शकतो, समोरच्याला आपलंसं करू शकतो, आपले विचार पटवून देऊ शकतो, याचा त्यांना पूर्ण विश्वास आणि अनुभवही होता. म्हणून तर त्यांनी करिअर म्हणून शिक्षण क्षेत्र निवडलं. आठवड्यातून प्रत्येक वर्गाला त्या एक संस्कारक्षम तरी गोष्ट सांगतच होत्या. फक्त शालेय अभ्यासक्रम न घेता मुलांचं भावविश्व फुलून येईल असं अवांतर ज्ञान देण्याची एकही संधी त्या दवडत नव्हत्या.

जानेवारी महिना हा विविध स्पर्धांचा. कलागुणांना वाव देणाऱ्या खूप स्पर्धा या महिन्यात होतच असतात. त्यातल्या सुनीताताईंच्या आवडीच्या म्हणजे कथाकथन आणि वक्तृत्व स्पर्धा. मग मुख्य शहरात जावं लागलं, तरी त्या उत्साहात असायच्या. विषय कधी स्वतः निवडून द्यायच्या, कधी मुलांबरोबर चर्चा करून द्यायच्या, तर कधी मुलांना स्वतःच्या मनानं लेखन करू द्यायच्या. भरपूर सराव करून घ्यायच्या. स्पर्धा गाजवण्यात त्यांचा हातखंडाच होता. सात-आठ तरी शालाबाह्य बक्षिसं त्या मिळवून देतच होत्या. तसे प्रामाणिक कष्टच त्या घेत होत्या. शाळेच्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम! त्यासाठीसुद्धा शालांतर्गत स्पर्धा होत. त्याचीही जबाबदारी त्या स्वीकारत. यंदातर वर्धापनदिनाच्याच्या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन त्यांच्याचकडं होतं. खूप शिस्तबद्ध काम सुरू होतं त्यांचं.

गाडी बुक करून, स्वतः आठ मुलांची जबाबदारी घेऊन त्या आज स्पर्धेला गेल्या होत्या. पाचवी ते नववीतले सारे विद्यार्थी होते. स्पर्धेच्या दिलेल्या ठिकाणी त्या अगदी वेळेत पोचल्या. एका सेवाभावी संस्थेनं मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेचं हे दहावं वर्ष होतं म्हणून त्यांच्याहीतर्फे मोठं आयोजन होतं. लगेच दुपारी बक्षीस समारंभसुद्धा होणार होता. त्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणावर तयारी होती. कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. पंधरा-वीस तरुण कार्यकर्ते उत्साहात होते. तरुण आणि तरुणीही होत्या. समाजकार्यासाठी एकवटलेली अशी तरुणाई पाहून साहजिकच सुनीताताईही सुखावल्या. आपल्या भारताचं भविष्य ही तरुण पिढीच घडवणार आहे, असं आपण नेहमी म्हणतो. स्वतःचं कॉलेज किंवा नोकरी सांभाळून अशा एखाद्या विधायक कार्यासाठी जेव्हा ही तरुणाई एकत्र येईल, तेव्हाच काहीतरी चांगलं घडेल, असा विचार त्यांच्या मनात येत होता. स्पर्धेला आलेल्या शाळकरी मुलांसमोर हा तरुणाईचा आपोआपच आदर्श पाठ मांडला जात होता.

त्या धावपळ करणाऱ्या तरुणांत एकानं सुनीताताईंचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या हालचालीतला नेमकेपणा आणि चेहऱ्यावरचे प्रसन्न भाव. कुठंतरी पाहिलंय की काय असंही सारखं वाटत होतं त्यांना. आता इतकी वर्षं इतकी मुलं घडवलेली. नेमकं आठवावं तरी कसं? पण तो तरुण त्यांच्या नजरेसमोरच सतत असल्यानं विचारात मात्र राहिलाच. बघताबघता स्पर्धा सुरू झाली. शाळावार मुलांचे नंबर लावले असल्यानं सुनीताताईंच्या शाळेचं नाव पुकारलं तसं तो तरुणही आता आपल्याकडं पाहतोय असंच सुनीताताईंना वाटायला लागलं. त्याही थोड्या अस्वस्थ झाल्या. आता तर तो चेहरा नक्कीच ओळखीचा आहे याची खात्री पटली; पण काही केल्या नाव आठवायला तयार नव्हतं. त्या तरुणाचा सफाईदार वावर आणि सर्वांशी मनमिळाऊ वागणूक त्यांच्या मनात अगदी घरच करून बसली.

नेहमीप्रमाणं सुनीताताईंच्या सर्वच मुलांनी अत्यंत सरस कामगिरी केली होती. तासाभराच्या विश्रांतीनंतर लगेच बक्षीस समारंभ सुरू होणार होता. प्रत्येकानं घरून डबा आणलाच होता; पण सुनीताईसुद्धा मुलांसाठी एक आवडीच्या खाऊचा डबा सोबत आणत. आजही त्यांनी आणलाच होता. जानेवारी माहिना आणि हवेतला गारवा यामुळं गरमगरम चहा प्यावासा वाटत होता; पण मुलांना सोडून एकटीच कशी जाणार, अशा विचारात असताना त्यांच्या कानावर शब्द आले ः ""बाई, हा घ्या चहा.'' त्यांनी आश्‍चर्यानं पाहिलं, तर तो मघाचा तरुण चहाचा कप हातात घेऊन समोर उभा होता. ""तुम्ही मला कदाचित ओळखलं नसेल; पण मी तुमचाच माजी विद्यार्थी आहे. अनिकेत देशमुख! दहा वर्षांपूर्वीची दहावीची तुकडी माझी. ही सगळी आपल्याच शाळेची मुलं ना, खूपच चुणचुणीत दिसताहेत.'' त्यानं नाव सांगून ओळख दिली, तरी सुनीताताईंना पटकन्‌ काही आठवेना. शाळेच्या गणवेशात सारी मुलं सारखीच दिसतात. दहा वर्षांत खूप फरक पडतोच ना. एवढा वेळ ज्या तरुणानं त्यांचं लक्ष वेधून मनात घरच केलं होतं, तो आता ओळखच सांगत समोर उभा होता. त्या काहीतरी बोलणार इतक्‍यात त्यानं सुनीताताईंच्या हातात एक चिठ्ठी ठेवली आणि म्हणाला ः ""माझा नंबर आहे. कधीही फोन करा. मी बोलीन, भेटीन नक्की! समारंभाला सुरवात होतेय. मी पळतो.'' एवढं बोलून तो दिसेनासा झाला. सुनीताताईंच्या पाच मुलांना बक्षिसं मिळाली होती. आता वर्धापनदिनाच्याच्या समारंभात या मुलांची भाषणं निश्‍चित होती. अजून त्या कार्यक्रमाचं नियोजन बाकीच होतं. स्पर्धेतल्या यशामुळं सर्वचजण आनंदात घरी परतले. निघताना त्यांची नजर अनिकेतला शोधत होती; पण तो कुठं दिसलाच नाही.

घरी आल्यावर मागची आवराआवर झाल्यावर त्यांनी पर्समधून ती चिठ्ठी काढली. सुवाच्च अक्षरात अनिकेतनं त्याचं नाव आणि नंबर लिहिला होता. दुसऱ्या दिवशी उपवास होता. त्यामुळं सकाळचं काम थोडं लवकर आवरलं. नऊ वाजता त्यांनी अनिकेतला फोन केला. अत्यंत विनम्र आवाजात नमस्कार ""बाई,'' असं म्हणत तो बोलला. ""अरे, आज संध्याकाळी सहानंतर येशील का रे घरी? आपण निवांत बोलू. मला जाणून घ्यायचंय तुला. मग येशील ना.''
""हो येईन मी; पण सात वाजतील मला. चालेल ना?'' अनिकेत अत्यंत मार्दवतेनं म्हणाला.
""हो. चालेल की आणि हो आज उपवास आहे ना. मस्तपैकी साबुदाणा खिचडी करते भूक घेऊनच ये हं.''
""उपवास तर आहे माझा; पण मी खिचडी खात नाही हो. आपण फक्त भेटू आणि भरपूर गप्पा मारू. येतो हं मी.''

"खिचडी नको, तर गरमगरम वडे तळू,' असं म्हणून तयारी करूनच त्या शाळेला गेल्या. वर्धापनदिनाचं नियोजन करायचं होतं. प्रमुख पाहुणे फक्त ठरवायचे होते. आता कोणाला बोलवावं ठरत नव्हतं. चारला घरी आल्यावर आधी स्वयंपाकाची तयारी करून ठेवली. ""हो, उगीच गप्पांच्या नादात बाकीचे नको वैतागायला. गृहिणीपदाची जबाबदारी!...'' असं त्या मनाशी म्हणाल्या. बरोबर सात वाजता अनिकेत आलाच. कुर्ता-पायजमा अशा साध्या वेशातच. घरातल्यांशी जुजबी ओळख झाल्यावर मुख्य गप्पांना सुरवात झाली. शाळेत वर्गातला मध्यम हुशार असा अनिकेत. थोडासा मस्तीखोरच होता तसा; पण गेल्या दहा वर्षांत कमालीचा फरक वाटत होता. आत्मविश्वास किती होता चेहऱ्यावर आणि भाव तरी किती सोज्वळ. त्याचं शिक्षण, नोकरी आणि सेवाभावी संस्थेतलं काम याविषयी भरभरून सांगत राहिला. अगदी खळखळता जलप्रवाहच जसा. शहराच्या वाढत्या समस्या, पर्यावरण, प्रदूषण अशा एक ना हजारो गोष्टी. या सर्व बदलायला हव्यात, काहीतरी करायला हवं असं खूप जणांना वाटतं; पण करणारे थोडेच. जो तो आपल्या चौकटीत बंद. ती भेदून त्या पलीकडं जाऊन करायला वेळच नाही. अशाच जाणिवांचे हे तरुण एकत्र येऊन समाजहिताचे अनेक उपक्रम राबवत होते. देशावरचं त्याचं प्रेम आणि "आपला देश' ही भावना शब्दाशब्दातून व्यक्त होत होती. तो बोलतच राहिला. अठ्ठावीस वर्षांचा तो तरुण निश्‍चितच वेगळा होता. किती अनुभवांचं भांडार होतं. याच तरुणाईच्या हातात देशाचं भविष्य उज्ज्वल होऊन सुरक्षित राहणार होतं, याचा सुनीताताईंना अभिमान वाटला. मध्येच भानावर येत त्या त्याला थांबवत म्हणाल्या ः ""अरे चहा-कॉफी नाही, तर सरबत तरी घे. आणि काय रे आज उपवास ना तुझा? मग खिचडी नको तर वडे आणते गरमागरम. बस जरा.''

""खरं सांगू का, माझा उपवास आहे; पण तो खाण्या-पिण्याचा नाही, तर तो विचार आणि कृतीचा आहे. महिन्यात एक दिवस मी अगदी जाणीवपूर्वक हा उपवास करतो. या दिवशी एकही वाईट विचार मनात येणार नाही आणि अशी एकही कृती हातून होणार नाही, की ज्यामुळं कोणाचं मन दुखावलं जाईल.'' आता मात्र सुनीताताई अवाक्‌च! अनिकेत पुन्हा सांगायला लागला ः ""आपल्या आई-वडिलांचा आणि भावंडांचा मुख्य सहवास आपल्याला लाभतो. त्याशिवाय मित्र-मैत्रिणी आणि गुरुजन यांचा उप-वास लाभतो. आपण त्यांच्या संगतीतच घडतो. मला अजून तुम्ही वर्गात सांगितलेल्या क्रांतिकारक आणि समाजसुधारक यांच्या पाठ्यपुस्तकाबाहेरच्या गोष्टी आठवतात. गोष्ट ऐकायला मी अगदी तुमच्यासमोर बसायचो. कळत नकळत माझ्या मनावर खूप चांगले संस्कार झाले. मला ही अशी सेवाकार्याची आवड निर्माण झाली. त्यामुळं अशा सर्वांचा मी ऋणी आहे. असे सतत नवनवीन वळणावर भेटतच राहतील. मी त्यांना आवर्जून भेटतो. त्यांच्या सहवासाचा लाभ घेतो. काहीतरी चांगलं शिकतो. नकारात्मक असेल ते प्रयत्न करून बाजूला टाकतो. मला वाटतं हाच खरा उपवास!''
आता मात्र सुनीताताईंच्या डोळ्यात अश्रूच तरळले. सद्‌गदित झाल्या. पेरलेलं कुठंतरी चांगलं उगवलं होतं. ""बाई रवा लाडू असेल, तर तो मला द्या. वर्गात तुम्ही खाऊ म्हणून देत होतात ना तसाच हं.''

""आहे रे आहे, अजून आठवतो तुला?'' आश्‍चर्यचकित होत सुनिताताई उद्‌गारल्या. समाधानानं रवालाडू खाऊन नमस्कार करून अनिकेतनं निरोप घेतला. समाजातल्या प्रथितयश आणि मोठ्या पदावर असलेल्यांपेक्षा छोटया छोट्या गोष्टींतून मोठं स्वप्न साकारण्यासाठी धडपडणारा अनिकेत! ते स्वप्न तो स्वतःसाठी पाहतच नव्हता मुळी हे विशेष. त्यांच्या मनात वर्धापनदिनाचे प्रमुख पाहुणे निश्‍चित झाले. शाळेलाही अभिमान वाटेल असेच हे प्रमुख पाहुणे असणार होते.

Web Title: priya jog write article in saptarang