'गुण' प्रतिजैविकांचा (प्रा. डॉ. रेणू भारद्वाज)

prof dr renu bhardwaj,
prof dr renu bhardwaj,

प्रतिजैविकांच्या बेबंद वापरामुळं अनेक जीवाणू या प्रतिवैविकांना दाद देईनासे झाले आहेत. त्यामुळंच "अँटिबायोटिक-रेझिस्टन्स' ही जगभरातल्या वैद्यकीय तज्ज्ञांसाठी डोकेदुखी होऊन बसली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) 2019 या वर्षात हा "रेझिस्टन्स' हे दहा मोठ्या आव्हानांपैकी एक असेल असं नुकतंच जाहीर केलं आहे. नेमकं कशामुळं निर्माण होतो हा "रेझिस्टन्स', त्याचे तात्कालीक आणि दीर्घकालीन परिणाम काय, डॉक्‍टरांपासून सर्वसामान्य रुग्णांपर्यंत सगळ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आदी गोष्टींचा ऊहापोह.

प्रतिजैविकांचा शोध लागण्यापूर्वी मानवी जीवन कसं होतं, याची आता आपण कल्पनादेखील करू शकत नाही. कोणत्याही रोगाला सहज बळी पडून अनेक दिग्गजांचा मृत्यू झाल्याचं आपल्याला इतिहासात पाहता येतं. त्यामुळं आजारी पडूच नये, अशी जीवनप्रणाली प्राचीन काळात अंगीकारली जात होती; पण अशा स्थितीतही वेगवेगळ्या रोगांचं, जंतूंचं शरीरावर सातत्यानं आक्रमण होत होतं. अशा वेळी आहार, व्यायाम आणि नैसर्गिक प्रतिकारशक्ती हीच काय ती रोगजंतूंशी लढण्याची साधनं होती. एका बाजूला ही सामाजिक स्थिती असताना दुसरीकडे वैद्यकशास्त्र प्रगत होत होतं. विविध रोगांसाठी जबाबदार असणाऱ्या जंतू-विषाणूंचा शोध वृद्धिंगत होऊ लागला आणि जंतूंचा प्रतिकार करण्यासाठी रामबाण औषध विकसित करण्याचे प्रयोग सुरू झाले. बरोबर 90 वर्षांपूर्वी पेनिसिलिनच्या रूपानं पहिलं प्रतिजैविक माणसाच्या हातात आलं. ऍलेक्‍झांडर फ्लेमिंग यांनी 1928 मध्ये पहिल्या प्रतिजैविकाचा म्हणजे पेनिसिलिनचा शोध लावला.

फ्लेमिंगच्या या शोधामुळं अनेक शास्त्रज्ञांना वेगवेगळ्या आजारांवरची प्रतिजैविकं विकसित करण्याचं प्रोत्साहन मिळालं. विविध रोगांवर प्रभावी प्रतिजैविक शोधण्याचं संशोधन प्रयोगशाळांमधून होऊ लागलं. योग्य दिशेनं केलेल्या या संशोधनामुळं वेगवेगळी प्रतिजैविकं माणसाच्या हातात येऊ लागली. त्याच्या माध्यमातून विविध संसर्गजन्य रोगांना नियंत्रित करणं, त्यांना रोखणं शक्‍य होऊ लागलं. प्रभावी प्रतीजैविकांमुळं जखमा सहजतेनं बऱ्या होऊ लागल्या, तो माणूस पूर्ववत काम करू लागला. शस्त्रक्रियांमधला जंतूसंसर्ग कमी करता आला. त्या वेळेपर्यंत आपल्याला असं वाटत होतं, की प्रत्येक रोगजंतूवर आता आपल्याला प्रभावी उपाय मिळाला आहे. प्राणघातक रोगांना या प्रतिजैविकांच्या माध्यमातून सहज रोखता येईल, असा एक विश्‍वास माणसाला वाटू लागला.

वैद्यकीय प्रगती, नवीन शोध, प्रभावी प्रतिजैविकं माणसाच्या हाती आली, तरीही आपल्यापेक्षा जंतू नेहमीच "स्मार्ट' राहिले आहेत, असं आता इतक्‍या वर्षांनंतर आपल्याला कळून चुकलं आहे. शास्त्रज्ञ प्रयोगशाळांमधून एकेका जंतूंचा बीमोड करणारी प्रतिजैविकं शोधू लागले; पण डोळ्यांनाही न दिसणारे ते अतिसूक्ष्म जीव मात्र, माणसानं त्यांना मारण्यासाठी तयार केलेल्या प्रत्येक प्रतिजैविकांना प्रतिकार करू लागले. शास्त्रज्ञ एकापेक्षा एक "जनरेशन'ची प्रतिजैविकं विकसित करत गेले; पण या सगळ्याच्या पुढं एक पाऊल टाकून ते रोगजंतू या प्रतिजैविकांना प्रतिकार करण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करत गेले. त्यामुळं या पृथ्वीतलावर अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक वेळी या जीवजंतूंनी स्वतःत बदल केला आहे. जसजशी नवीन प्रतिजैविकं आपण विकसित करत गेलो, त्यावर ते सूक्ष्मजीव आपल्यापेक्षा जलद गतीनं त्याला प्रतिकार करत गेले.

का वाढला प्रतिजैविकांना प्रतिकार?
प्रतिजैविक हे रोगजंतूच्या विरोधातलं प्रभावी शस्त्र आहे, याचा विसर मानवाला पडला. त्याचा योग्य वापर केला पाहिजे, हे आपण विसरलो. त्यामुळे प्रतिजैविकांचा मनमानी वापर सुरू झाला. जो आजार बरा होण्यासाठी प्रतिजैविकांची अजिबात गरज नाही, अशा आजारातून बरं होण्यासाठी आपण प्रतिजैविकांचा वापर करत असतो. साधा सर्दी, खोकला आला तरीही त्यातून लवकर बरं होण्यासाठी प्रभावी प्रतिजैविकं आपण घेतो. त्यातून आपण प्रतिजैविकांचा अनिर्बंध वापर करू लागलो. त्या वापराबद्दल आपण कोणताच विचार करत नव्हतो. आपला रुग्ण लवकर बरा व्हावा, म्हणून काही वेळा डॉक्‍टरही अशी प्रतिजैविक सर्रास देऊ लागले. डॉक्‍टरांनी दिलेल्या चार-आठपैकी दोन-चार गोळ्या खाल्यानंतर रुग्णाला बरं वाटू लागतं, किंवा डॉक्‍टरांना पाच दिवसांच्या गोळ्या दिलेल्या असतात. त्यापैकी दोन-तीन दिवस रुग्ण औषधं घेतो आणि नंतर बंद करतो. "आता आपण खडखडीत बरे झालो आहोत,' असं म्हणत स्वतःच्या मनानंच पुढील औषधाच्या गोळ्या खाणं बंद करतो. त्यातून डॉक्‍टरांना दिलेला औषधाचा "कोर्स' अर्धवट राहतो. त्यामुळं शरीरातल्या रोगजंतूंना पूर्ण मारण्यासाठी, त्यांचा बीमोड करण्यासाठी जितक्‍या प्रमाणात प्रतिजैविकांची मात्रा आवश्‍यक असते, त्या प्रमाणात त्यांना ती मिळत नाही. या सर्वांचा परिणाम असा होतो, की शरीरातले रोगजंतू मरत नाहीतच, उलट त्यांच्यामध्ये त्या प्रतिजैविकांना प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते. त्या रुग्णांकडून औषधांना प्रतिकार करणारे असे रोगजंतू वातावरणात पसरतात. त्यातून सुदृढ व्यक्तींनाही प्रतिजैविकांना प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण झालेल्या रोगजंतूंचा संसर्ग होतो.

रुग्णाच्या रोगाचं निदान करून काही वेळा डॉक्‍टर प्रभावी प्रतिजैविकं रुग्णांना देत नाहीत; पण रुग्ण डॉक्‍टरांनी प्रभावी प्रतिजैविकं द्यावी, अशी मागणी करतात. आपल्याकडं तर औषध दुकानांमधूनही सर्रास अशा प्रतिजैविकांची विक्री होते. त्यातून प्रतिजैविकांचा प्रतिकार वाढत असतो, हे मात्र आपण सोईस्कर विसरतो.
गाई-म्हशींच्या दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी; चिकन, अंडी वाढविण्यासाठी आपण छोट्या-छोट्या प्रमाणात प्रतिजैविकांची मात्रा त्यांना देत असतो. हे पशू आजारी पडू नयेत, त्यांनी सतत दूध द्यावं, हा यामागचा आपला उद्देश असतो. त्यामुळं पशूंमधले कोणतेही जंतू मरत नाही; पण त्या प्रतिजैविकांना प्रतिकार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होते. आपली ही कृती प्रतिजैविकांचा प्रतिकार होण्यासाठी जास्त धोकादायक असते. कारण, असे प्रतिजैविकांना प्रतिकार करण्याची ताकद निर्माण झालेले जंतू पशूंच्या मल-मूत्रातून बाहेर पडतात. हवा, पाण्यातून त्या जंतूंचा मानवाला संसर्ग होण्याची शक्‍यता असते. त्यातून प्रतिजैविकांना प्रतिकार करणारे जंतू माणसाच्या शरीरात जाण्याचा धोका आता वाढत आहे.

प्रतिजैविकांचा प्रतिकार वाढण्यामागं औद्योगिक बेशिस्त हेदेखील एक महत्त्वाचं कारण असल्याचं समोर आलं आले. प्रतिजैविकांचं उत्पादन करणाऱ्या उद्योगांमध्ये वापरलेलं पाणी बेजबाबदारपणे बाहेर सोडलं जातं. या पाण्यात प्रतिजैविकं मिसळलेली असल्यास पाण्यातले जंतूदेखील त्या प्रतिजैविकांना प्रतिकार करू लागतात.

का वाढतोय धोका?
आधुनिक काळात कोणत्याही औषधनिर्माण कंपनीला प्रतिजैविकांच्या उत्पादनात स्वारस्य राहिलेलं नाही. कारण, एक प्रतिजैविक विकसित करण्यासाठी औषधनिर्माण कंपन्यांना कोट्यवधी रुपये आधी खर्च करावे लागतात. इतकी मोठी गुंतवणूक करून प्रतिजैविक बाजारात आणल्यानंतर हे सूक्ष्मजीव लगेच त्यालाही प्रतिकार करतात. त्यामुळं त्या प्रतिजैविकांची उपयुक्तता संपुष्टात येते. त्याचाच दुसरा अर्थ, की औषधनिर्माण कंपन्यांनी केलेली कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक निरुपयोगी ठरते. त्यामुळं आधुनिक काळात व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहता औषधनिर्माण कंपन्यांना प्रतिजैविकांच्या उत्पादनात फारसा रस असल्याचं दिसत नाही. त्यामुळं आपल्याकडं आता वेगवेगळ्या आजारांवर मात करण्यासाठी खूप मोठ्या संख्येनं प्रतिजैविकं नाहीत. सध्या आपल्या हातात सर्वांत प्रभावी प्रतिजैविक कॉलिस्टीन म्हणून आहे. पण, त्यालाही आता जंतू प्रतिकार करत असल्याचं दिसत आहे. सुदैवानं हे प्रमाण अजून कमी आहे. त्यामुळं हे प्रतिजैविकसुद्धा आपल्या हातातून गेल्यास आपल्याकडं काहीच राहणार नाही.

एकीकडे वैद्यकशास्त्रात आपण जोमानं प्रगती करत आहोत. मूत्रपिंड प्रत्यारोपणापासून ते हृदय प्रत्यारोपणापर्यंत वैद्यकशास्त्रात आपण बाजी मारली आहे; पण या सर्वांमध्ये एका जंतूनं जरी रुग्णाच्या शरीरात प्रवेश केला, तरी वैद्यकीय तज्ज्ञांनी आत्मसात केलेल्या प्रत्यारोपणाच्या कौशल्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण, तो जंतूसंसर्ग नियंत्रित करण्यासाठी आपल्याकडं प्रभावी प्रतिजैविकं असतील का, याचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आता आली आहे.
तंत्रज्ञानाच्या आधारावर विकसित होणाऱ्या वैद्यकशास्त्रापुढचं आता या प्रतिजैविकांचं संरक्षण हे सर्वांत मोठं आव्हान आहे. त्याशिवाय वैद्यकशास्त्रात आपण पुढं जाऊ शकणार नाही. भविष्यात कोणतंही औषध आपल्यावर प्रभावी ठरणार नाही, अशी वेळ येण्याचा धोका आता निर्माण होत आहे. याचा अर्थ ज्यावेळी आपल्या हातात कोणतंच प्रतिजैविक नव्हते, त्या वेळी आपली जशी अवस्था होती, तशा अवस्थेच्या जवळ आपण वेगानं जात आहोत. याला कारण म्हणजे आपण केलेला प्रतिजैविकांचा अमर्याद वापर हेच आहे.
क्षयरोग हे याचं उत्तर उदाहरण आहे. क्षयरोगाचा जंतू "मल्टिड्रग्ज रेझिस्टंट' (एमडीआर) झाला आहे. याचा अर्थ हा जंतू वेगवेगळ्या औषधांनाही जुमानत नाही. तो औषधांनी मरत नाही. त्यातून पुढं आता "एक्‍सटेंसिव्हली ड्रग्ज रेझिस्टंट' (एक्‍सडीआर) क्षयरोगाचे जंतू पसरत आहेत.

प्रतिजैविकांना प्रतिकार कसा?
रोगजंतू हे स्वतःमध्ये बदल करून घेतात. त्याला वैद्यकीय परिभाषेत "म्युटेशन' म्हणतात. तसंच, हे जंतू रोगप्रतिकार करण्याची जनुकं एकमेकांना देतात. रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिजैविकांचा वापर होत असतो. त्यामुळं अशा प्रतिजैविकांना प्रतिकार करणाऱ्या जंतूंची संख्या तिथं मोठी असते. ते एकाकडून दुसरीकडं सहजतेनं जातात. यामुळं आपल्या देशात मोठ्या प्रमाणात "अँटिबायोटिक्‍स रेझिस्टन्स'ची समस्या डोकं वर काढत आहे.
हवामानबदल किंवा प्रदूषण याचा प्रतिजैविकांच्या प्रतिकारावर कोणताही परिणाम होत नाही. आपण अयोग्य पद्धतीनं प्रतिजैविके वापरल्याचा हा परिणाम आहे. आपल्या देशात कोणत्याही औषधविक्रेत्याकडून आपण कोणतंही प्रतिजैविक सहजतेने खरेदी करू शकतो. अशी औषधविक्रीची पद्धत इतर देशांमध्ये नाही.
तुमच्या शरीरात असलेल्या रोगजंतूंना मारण्यासाठी तुम्ही घेत असलेलं औषध योग्य आहे का, याचा माहिती असल्याशिवाय आपण औषध घेत असतो. जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) प्रतिजैविकांचा अतिवापरावर निर्बंध घालण्यासाठी पाऊल उचललं आहे. आपल्या देशात प्रतिजैविकांच्या वापराबद्दलचं धोरणदेखील आहे; पण त्या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी होत नाही.

प्रतिजैविकांच्या वापराचं "ससून मॉडेल'
प्रतिजैविकांचा योग्य वापर करण्याबाबत पुण्यातल्या ससून रुग्णालयात गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं प्रयोग सुरू आहे. आपल्याकडं आलेल्या रुग्णाला खरंच त्या संबंधित प्रतिजैविकाची गरज आहे का, याची "सेन्सिटिव्हिटी टेस्ट' करणं आवश्‍यक असतं. त्यामुळं ससून रुग्णालयात "सेन्सिटिव्हिटी टेस्ट'च्या अहवालाशिवाय उच्च दर्जाची प्रतिजैविकं दिली जात नाहीत. रुग्णालयात आलेला रुग्ण गंभीर असेल, तर तो दाखल होत असताना त्याच्यावर तातडीनं उपचार करण्यासाठी प्रभावी प्रतिजैविकांचा वापर केला जातो. डॉक्‍टरांना योग्य वाटतील ती प्रतिजैविकं त्याला तातडीनं दिली
जातात; पण त्यानंतर रुग्णाच्या रक्ताचे नमुने सूक्ष्मजीवशास्त्र विभागाकडं पाठविले जातात. दिलेलं प्रतिजैविक पुढं चालू ठेवायचं की दुसऱ्या कमी प्रतिजैविकानंही रुग्णाचे जंतू नियंत्रणात आणता येतील, याची माहिती डॉक्‍टरांना दिली जाते. त्यात रुग्णाच्या रक्ताच्या नमुन्याच्या विश्‍लेषणावरून समजलं की, इतक्‍या मोठ्या प्रतिजैविकाची गरज रुग्णाला नाही, तर त्या आधारावर डॉक्‍टर पुढील प्रतिजैविकांचा वापर रुग्णाच्या उपचारात करतात. त्यातून रुग्णाचं हित जोपासलं जातं. असा हा पथदर्शी प्रकल्प इतर रुग्णालयांमधूनही वापरला गेला पाहिजे. त्यातून प्रतिजैविकांच्या अमर्याद वापरावर नियंत्रण आणला येईल, असा विश्‍वास वाटतो.
प्रतिजैविकांसारखं मौल्यवान साधन आपण भावी पिढीच्या आरोग्यासाठी सांभाळून वापरलं पाहिजे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

(शब्दांकन ः योगीराज प्रभुणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com