भाषाव्यवस्थेची उचित शल्यचिकित्सा

book review
book review

प्रा. डॉ. केशव सखाराम देशमख यांचं "भाषा चिंतन' हे पुस्तक मराठी भाषेची वर्तमानस्थिती तपासून, बिघडलेल्या प्रकृतीसंदर्भात काही शल्यकर्म सुचवणारं आहे. "सकाळ'मधून वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या 43 लेखांचं हे पुस्तक मराठी भाषेच्या स्थिती-गतीवर नेमकेपणानं भाष्य करतं. विशेषत: मराठी भाषेच्या ढासळत्या प्रकृतीला जबाबदार घटक कोणते, त्यांचं कोणत्या प्रकारचं वर्तन जबाबदार आहे, या घटकांना कशा सुधारणा करता येतील, मराठीला पत आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी कोणते उपक्रम प्राधान्यानं हाती घ्यावे लागतील, यात सरकारची, सर्वसामान्य माणसांची, शिक्षक-प्राध्यापकांची भूमिका नेमकी काय आणि कशी असायला हवी या संदर्भातलं चिंतन देशमुख यांनी मांडलं आहे. सलगरित्या विवेचन मांडत विचारांची मांडणी करणारा असा हा ग्रंथ नाही, मात्र या सगळ्या लेखांमधून हाताशी लागणारी काही चिंतनसूत्रं निश्‍चितपणे दिशादर्शक ठरतात. केवळ तात्त्विक पातळीवरचे विचार न मांडता प्रत्यक्ष मातृभाषेचं (मराठीचं) उपयोजन, त्यातल्या त्रुटी, उपयोजनात होत असलेल्या गफलती यांचा मागोवा देशमुख घेतात, त्याचबरोबर उपाययोजनांतल्या नवप्रयोगांची दखलही घेतात आणि उपयोजनांच्या नवनव्या दिशांचं सूचनही करतात.
मराठी भाषेतल्या करिअरच्या संधींचा शोध घेत हे चिंतन सुरू होतं. विद्यापीठांनी आता मराठी एके मराठी आणि मराठीचा अभ्यास म्हणजे केवळ "वाङ्‌मयाचा अभ्यास' असा आग्रह सोडून द्यायला हवा, असं देशमुख यांचं म्हणणं आहे. मराठीला जोडून एक वा दोन परकीय भाषा शिकता यायला हव्यात, अशी व्यवस्था विद्यापीठांनी करायला हवी, असं ते सुचवतात. "मराठी आणि चित्रपट गीतलेखन', "मराठी आणि रंगभूमी', "मराठी आणि नाटक', "मराठी आणि पत्रकारिता', "मराठी आणि दूरचित्रवाणी वाहिन्या', "मराठी कादंबऱ्या आणि चित्रपट', "कविता-गीत आणि चित्रपट', "प्रकाशनविश्व आणि मराठी' असा क्षेत्रविस्तार सुचवला आहे. वाङ्‌मयाच्या बरोबर भाषेच्या अभ्यासाची आणि संशोधनाची महतीही देशमुख वर्णितात.
विद्यापीठीय पातळीवर होणाऱ्या वाङ्‌मयीन संशोधनाला प्रश्नांकित करून या संशोधनाच्या सामाजिक उपयुक्ततेबाबत आणि फलश्रुतीबाबत देशमुख चिंता व्यक्त करतात. त्याच त्या वाङ्‌मयीन विषयांवर संशोधन केलं जातं; पण भाषेसंबंधी मात्र फारसं संशोधन होताना दिसत नाही. तरुण अभ्यासक कष्टप्रद अशा भाषिक संशोधनाकडे वळत नाहीत, अशी तक्रार देशमुख करतात. "ग्रामबोलीच्या रक्षणाची निकड' देशमुख व्यक्त करतात. ते म्हणतात : "पिढीपालट आणि सद्य:काळ यांच्या गतिशील बदलांमुळे ग्रामबोलीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. गरजांमध्ये परिवर्तन, हातातील वापरण्याची साधनं, माहिती-तंत्रज्ञानानं घडवलेले अनिवार्य बदल अशा पुष्कळ बदलनिष्ठ गोष्टींचा ग्रामबोलीवर भयप्रद परिणाम झाला. एक चूल बदलली वा स्वयंपाकघराचा आराखडा बदलला अथवा खेड्यांतलं "घर' शहरात आलं, तरीही शंभरपेक्षा जास्त शब्द आणि उच्चार गमावून बसतो. हा धोका लक्षात घ्यायला हवा. एक बैलगाडी सर्व लवाजम्यासह ग्रामजीवनशैलीतून वजाबाकीत घातली, तर अफाट शब्दांचं अर्थपूर्ण धन गमावल्याचं भय आज वाढू पाहतं आहे.' (पृष्ठ 18) देशमुखांचं बोलींच्या अस्तित्त्वाबाबतचं हे भय अगदी वास्तव आहे; पण म्हणून कालचक्र उलटं फिरणं वा फिरवणं अशक्‍य कोटीतलं आहे. जीवन बदललं, की भाषा बदलणं अपरिहार्य आहे. जुनी जीवनपद्धती परत आणणं शक्‍य नाही, त्याची आवश्‍यकताही नाही. मात्र, भाषेच्या ऐतिहासिक वाटचालीची नोंद म्हणून वेळीच या शब्दांचं शब्दकोशांमध्ये सचित्र जतन व्हायला हवं. तसे काही प्रयत्न झालेलेही आहेत. गणेश देवी यांच्या या संदर्भातल्या कार्याचा उल्लेख पुस्तकात आलाच आहे.

मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी काय काय करता येईल याविषयीचंही काही महत्त्वपूर्ण चिंतन पुस्तकात आलं आहे. सन 2014 मध्ये भाषा सल्लागार समितीनं मराठी भाषेच्या विकासासाठी बनवलेला धोरणमसुदा यासाठी देशमुखांना महत्त्वाचा वाटतो. त्यासाठी ते जनसहभागाची आवश्‍यकताही प्रतिपादितात. मराठीकडे येणारे विद्यार्थी दिवसेंदिवस कमी होत आहेत. जे येतात ते समज आणि अभिव्यक्ती यांत कमी पडतात. या अशा विद्यार्थ्यांमधूनच पुढे मराठीचे शिक्षक-प्राध्यापक तयार होतात. मग त्यांनी केलेल्या संशोधनाचा दर्जाही त्यांच्या कुवतीनुसार तेवढाच राहतो. हे दुष्टचक्र देशमुख यांनी नमूद केलं आहे. मात्र, या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग तूर्तास देशमुखांनाही गवसलेला नाही.

"हिशेब मराठीच्या आयुष्याचा' या लेखात मात्र आपल्या एकूण चिंतनापेक्षा काहीशी वेगळी वाटावी अशी भूमिका देशमुख घेताना दिसतात. "मराठी ही देशातल्या जवळपास एक-दशांश लोकांची मातृभाषा आहे, आणि म्हणून ती मरणा नाही,' असं देशमुख काहीसं अभिनिवेशानं सांगतात. अभिनिवेशानं अपसिद्धांताच्या आहारी जाणं बरं नव्हे, कारण त्यामुळं आपला सूर आपल्याच विरोधी जाण्याची शक्‍यता असते. अर्थात हे सदरलेखन असल्यानं प्रत्येक लेख "स्वायत्त' असू शकतो; पण सापेक्षतेनं विचार करता हा विरोधाभास वाटतो. या एवढ्या एका विरोधाभासाचा अपवाद वगळता केशव देशमुख यांनी मांडलेल्या भाषा-चिंतनाचा प्रत्येक विद्यापीठानं आदर करायला हवा आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गांचा अवलंब करत मराठी भाषासंवर्धनास हातभार लावायला हवा असं वाटतं.

पुस्तकाचं नाव : भाषा चिंतन
लेखक : डॉ. केशव सखाराम देशमुख,
प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे
पानं : 160, मूल्य : 200 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com