पसारा! (प्रा. माधवी खरात)

प्रा. माधवी खरात madhavidkharat@gmail.com
रविवार, 7 एप्रिल 2019

पसाऱ्यात काय काय आहे बरं अजून? मैत्रिणींचे फोटोंतले हसरे, खोडकर, बावरलेले चेहरे. इंदू, मंगल, अंजू...कुठं आहेत आज या साऱ्याजणी? फेसबुक, व्हॉट्‌सअपच्या आजच्या जमान्यात त्यांना शोधून काढणं अवघड नाही खरं तर! पण शुभा त्या कृष्ण-धवल फोटोंतल्या निरागस, कोवळ्या चेहऱ्यांतच रमून जाते...

पसाऱ्यात काय काय आहे बरं अजून? मैत्रिणींचे फोटोंतले हसरे, खोडकर, बावरलेले चेहरे. इंदू, मंगल, अंजू...कुठं आहेत आज या साऱ्याजणी? फेसबुक, व्हॉट्‌सअपच्या आजच्या जमान्यात त्यांना शोधून काढणं अवघड नाही खरं तर! पण शुभा त्या कृष्ण-धवल फोटोंतल्या निरागस, कोवळ्या चेहऱ्यांतच रमून जाते...

"किती जुना पसारा हा, मम्मी? घरात ना...तुझ्या या पसाऱ्यानंच बरीचशी जागा व्यापून टाकली आहे बघ...''
आपल्या बापाच्याच धर्तीवरचं वाक्‍य लेकीनंही उच्चारलं आणि बापानं किंचित हसत लेकीला साथ दिली.
""घरभर पुस्तकं तुझी. बेडरूममध्ये...स्टडीमध्ये. आणि आता तर काय, गच्चीतल्या कोपऱ्यात एक सुटकेसही नेऊन ठेवली आहेस. काय, ठेवलंयस तरी काय तू त्या जुन्या सुटकेसमध्ये..? किती जुन्या गोष्टी अजूनही सांभाळतेस गं?''
लेकीचं बडबडणं सुरूच होतं. खरंतर ती आठवड्याभराच्या सुटीसाठी घरी आली होती आणि नेमकं तेव्हाच शुभानंही रंगकाम काढलं होतं. तरी बरं, बराचसा पसारा, जुन्या साड्या, जुनी कागदपत्रं...अशी कितीतरी गोष्टींची विल्हेवाट शुभानं लेक यायच्याआधीच लावून टाकलेली होती. मात्र, पुस्तकं कशी काय टाकून द्यायची? काळाच्या, वर्षांच्या हिशेबानं पुस्तकं जुनी झाली असली तरी त्यांतल्या आशयाच्या, माहितीच्या, ज्ञानाच्या संदर्भात ती "जुनी' कशी बरं असू शकतात! आणि रंगकामामुळे बाहेर आलेल्या सुटकेसमधल्या गोष्टी म्हणजे "पसारा' कुठं होता? पण "फेकवतही नाहीत आणि ठेववतही नाहीत' अशा वर्गवारीतल्या काही गोष्टी म्हणजे लेकीच्या दृष्टीनं पसाराच होता मात्र!
काय काय होतं या पसाऱ्यात? शुभा विचारात, आठवणीत गुंगून गेली...
कॉलेजपासून घेतलेली पुस्तकं...जुनी शुभेच्छापत्रं, जुने कृष्ण-धवल फोटो, आई-वडील, भावंडं, नातेवाईक, जिवलग मैत्रिणी...असे कितीतरी जणांचे वेगवेगळ्या प्रसंगी काढले गेलेले फोटो...शाळा-कॉलेजातले काही ग्रुप फोटो, प्रगतिपुस्तकं, जुन्या डायऱ्या, वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या लेखांची कात्रणं...गच्चीतल्या त्या सुटकेसमध्ये अवघं जीवनच होतं शुभाचं! ते कसं काय फेकून देता येईल?
बालपण, तसंच कुमारवय आणि तारुण्य यांच्या धूसर रेषेवरचं ते निरागस चेहऱ्याचं सुंदर जीवन...कॉलेजच्या मोरपंखी आठवणी ज्यांत बद्ध झालेल्या आहेत ते सहलींचे फोटो...त्या फोटोंमधलं अजूनही जाणवणारं ते चैतन्य... वेगवेगळी प्रशस्तीपत्रं, ओळखपत्रं...नवा संसार सुरू झाला तेव्हा माहेरहून शुभानं जपून आणलेल्या या सगळ्या गोष्टी... वस्तूवस्तूनं संसार वाढत गेला तरी या सगळ्या गोष्टी आपली "सुरक्षित जागा' कुठं ना कुठं धरून होत्या आणि त्या पसाऱ्यात नवनव्या कडू-गोड आठवणींची भरही पडतच होती. मात्र, लेकीच्या लेखी हे सगळं काय होतं? तर "पसारा'!
***

""तुझ्या वस्तू, पुस्तकं, फोटो, मिळालेली बक्षिसं घेऊन जा बाई. उपयोगी पडतील तुला कधी ना कधी...'' लग्नानंतर आईनं लगेचच दिलेला हा आठवणींचा साठा शुभानं कौतुकानं सासरघरी आणला. शुभाच्या दृष्टीनं या पसाऱ्यातलं सगळंच मौल्यवान. तरीही दुसऱ्यांदा सासरी जाताना धाकट्या, शाळकरी भावानं साठवलेल्या पैशांतून, आई-बाबांकडून मागून घेतलेल्या काही रकमेतून विकत घेतलेली काचेच्या माशांची ती शृंगारपेटी...तेव्हाही आणि आजही तिला केवढी मोलाची वाटते ही पेटी! अत्यंत कलात्मक असलेली, आकर्षक रंगाची-आकाराची ही पेटी घेण्यासाठी भावानं केलेली यातायात आठवून शुभाच्या पापण्यांच्या कडा आजही ओलावतात. आज परदेशात आलिशान बंगल्यात राहणाऱ्या, दोन-तीन गाड्या सहजपणे वापरणाऱ्या या भावानं आपल्याला आजवर अनेकानेक उंची भेटी दिल्या; पण लग्नानंतरची त्यानं दिलेली ही पेटीची भेट आपल्याला आजही हळवं करून जाते...शुभा गतकाळात रमून गेली.
पसाऱ्यात काय काय आहे बरं अजून? मैत्रिणींचे फोटोंतले हसरे, खोडकर, बावरलेले चेहरे. इंदू, मंगल, अंजू...कुठं आहेत आज या साऱ्याजणी? फेसबुक, व्हॉट्‌सअपच्या आजच्या जमान्यात त्यांना शोधून काढणं अवघड नाही खरं तर! पण शुभा त्या कृष्ण-धवल फोटोंतल्या निरागस, कोवळ्या चेहऱ्यांतच रमून जाते.
मध्यंतरी इंदूची भेट झाली होती. तिच्या आईच्या आजारपणाच्या शेवटच्या दिवसांत ती पुण्याला आली होती. आईच्या मृत्यूचं विलक्षण दुःख, तेव्हाचं तिचं आतून आलेलं आईसाठीचं रडणं, चेहऱ्यावरचा तो असहाय्य, अगतिक भाव पाहून तिला शांतवताना शुभाही कातर होऊन गेली होती. प्रत्येक भेटीच्या वेळी आपल्याला चाफ्याची फुलं देणारी इंदूची आई. इंदूच्या गळ्यात पडताना क्षणभर तोच चाफा दरवळून गेला शुभाच्या मनात...! पुढच्या काळात इंदूची कधी भेट झालीच नाही. ती मुंबईहून नंतर इंदूरला गेली आणि तिथून पुढं नंतर तिचा पत्ताच लागला नाही.
***

आणखी काय काय आहे या पसाऱ्यात...?
अनेक शुभेच्छापत्रं...त्यातलं ते एक खास शुभेच्छापत्र! उंच आकाशात झेप घेणारा पांढरा-करडा पक्षी! त्याची चपळता, त्याचं ते विलोभनीय उडणं, आसासून विहरणं...त्या शुभेच्छापत्रावर छानपैकी चितारलं गेलं होतं ते. आतल्या पानांवर होतं "तुझ्यासाठी...माझ्याकडून'! असं आगळंवेगळं संबोधून कुणी बरं दिलं असेल हे शुभेच्छापत्र आपल्याला? आठवत कसं नाही अगदी? हा मैत्रिणींनी केलेला खोडकरपणा की "त्यानं'च दिलेल्या सूचक शुभेच्छा...? हे अनामिकत्व गेली 25-30 वर्षं शुभानं हळुवारपणे जपलेलं...काहीसं कुतूहल, काहीशी गंमत, उत्साह निर्माण करणारं! आजही ते शुभेच्छापत्र पाहताना हृदयात सूक्ष्मशी का होईना धडधड होतेच. नाही कशी! या शुभेच्छापत्राची गणना "पसाऱ्या'त करायची?
आयुष्याच्या या वळणावरही मनाला हुरहूर लावणाऱ्या या सगळ्याविषयी लेक विचारते ः "काय आहे या पसाऱ्यात...?'
आयुष्यात असे किती तरी क्षण येतात, जे जगायला बळ देतात ते मौनातूनच. या क्षणांना कुठलीच अभिलाषा नसते. या क्षणांचं कुठलंच मागणं नसतं. तुम्ही त्या क्षणांचे "कुणीतरी' असता. बस्स...एवढंच! केवळ एवढंच मैत्र पुरतं त्यांना. अशा "मौनक्षणां'चा केवढा तरी पसारा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात नसतो काय?
***

गच्चीतल्या तो पसारा शुभा उगाचच वर-खाली करत राहिली.
तिला वाटून गेलं, लेकीच्या तरी म्हणण्यात तसं काय अयोग्य आहे? जागेअभावी हा सगळा पसारा आता काढायलाच हवा होता. आता माहेर जवळजवळ संपलंच होतं. मित्र-मैत्रिणी कुठं कुठं विखुरलेले होते...सगळ्यांचंच जीवन अधिक वेगानं, अधिकाधिक वेगानं पुढं पुढं पळत होतं. यौवनांच्या सुंदर क्षणांनीही आता निरोपाची तयारी सुरू केली होती. प्रौढत्वाच्या खुणा देह-मनावर उमटू लागल्या होत्या. संसाराचा जोडीदार "आयुष्यभराचा भक्कम मैतर' म्हणून उभा ठाकला होता. मुलं झाली...वाढली, पंख पसरून क्षितिजाचा वेध घेऊ लागली. नंतरच्या काळातही नवनव्या मित्र-मैत्रिणी मिळत राहिल्या. काही जण टिकले...काही जण निसटले...काही जणांनी सावधपणे "मैत्रपण' जपलं! जीवन असं चहूबाजूंनी विस्तारतच गेलं की आपलं...
हे असं सगळं असलं तरीही शुभाला आजही त्या जुन्याच पसाऱ्यात रमावंसं वाटतं. गतकाळातले ते सारे सारे क्षण, पुस्तकांची जीर्ण-शीर्ण पानं, त्या वेळच्या आठवणी...या सगळ्याचा गंध तिला आजही हवाहवासा वाटतो. श्वासाश्वासात भरभरून घ्यावासा वाटतो.
नवऱ्यानं सुरवातीच्या दिवसांत चोरून, लपवून दिलेल्या भेटींची पाकिटं... संसारातले नव्या दिवसांमधले ते अटीतटीचे प्रसंग...मुलांची निरागसता... त्यांचा खोडकरपणा...त्यांची प्रगतिपुस्तकं...त्यांना मिळालेली बक्षिसं, त्यांचं तरुण होत जाणं...आई-वडिलांचं प्रौढपण... किती नि किती...!

आज यातल्या कितीतरी गोष्टी उडून गेल्या आहेत. राहिल्या आहेत केवळ आठवणी. अन्‌ त्या फेकून द्यायच्या...? शुभाचा जीव नुसत्या विचारानंच कासावीस झाला. घशाला शोष पडला. वाटलं, काहीतरी संपतंय...आयुष्याचा एक भाग कायमचाच नष्ट होतोय...या पसाऱ्याविना कशी जगू मी? हा तर माझा प्राणवायू, ही तर माझी चेतना...! तीच नष्ट करून टाकायची काय? तिचे डोळे भरून आले... आणि मग अचानकच तिचं मन एकदम हलकं हलकं झालं. तिला वाटलं, केवढ्या भांबावून गेलो आहोत आपण! घरातली जागा अडवणारा हा जुना, "विद्रूप' वाटणारा पसारा फेकून दिला तर, नष्ट केला तर फार फार तर काय होईल? तो घरातून नाहीसा होईल, सुटकेससह नष्ट होईल...पण आपल्या मनातून? आपल्या मनातून तो कसा काय हद्दपार होईल...? उलट दिसामाजी तो छान फुलेल. फुलतच जाईल. त्यात भर पडतच राहील. आठवणींच्या सुंदर क्षणांचे त्याला धुमारे फुटतील...
शुभाच्या मनाला आंतरमनातल्या पसाऱ्यानं समजावलं! एकदम मोकळी मोकळी झाली ती.
""काढूनच टाकते हा पसारा आता'' शुभा अचानकच मोठ्यानं म्हणाली.
तिच्या या तत्परतेनं नवरा सुखावला. लेकही आश्‍चर्यचकित झाली.
"आईला कशी शिस्त लावली!' म्हणून कदाचित आनंदूनही गेली असावी लेक! आणि शुभा...? खरं तर ती पसाऱ्यात अधिकाधिकच गुरफटली. मनातला पसारा कुरवाळत राहिली. मनातल्या पसाऱ्यात हरवून गेली. त्याच्या कुशीत विसावली. मनातला हा "पसारा' तिच्यापासून कुणीच दूर करू शकणार नव्हतं!

Web Title: prof madhavi kharat write friends photo article in saptarang