संगीताचा विद्यार्थीच राहायला आवडेल (पुष्कर लेले)

Pushkar Lele writes about his journey in field of music
Pushkar Lele writes about his journey in field of music

स्वतःचं गाणं, गुरूंचं गाणं आणि सर्वच गायक-वादक कलाकारांचं संगीत याकडं त्रयस्थपणे बघायचा प्रयत्न मी करतो. चांगल्या-वाईट दोन्ही गोष्टी पाहून त्यातल्या माझ्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशाच चांगल्या गोष्टी मी घेतो. आमच्या संगीतक्षेत्रात गुरूला परमेश्‍वर बनवण्याची शिष्यांना फार हौस! मग काय, ॲनॅलिसिस करायलाच नको... सगळं काही छान छान! पण अशा भाबड्या ‘भक्तां’ना संगीताचे विद्यार्थी कसं काय म्हणायचं?

मी साधारण तीन-साडेतीन वर्षांचा असताना माझी आत्या मंदा मोडक हिनं मला खेळातली दीड सप्तकाची पेटी (हार्मोनिअम) भेट दिली. तिच्यावर मी शाळेत शिकवलेली ‘नर्सरी ऱ्हाईम्स’ वाजवायचो. ती पेटी मी ज्या प्रकारे वाजवायचा प्रयत्न करायचो ते बघून माझ्या आईला वाटलं की या मुलामध्ये काहीतरी चांगला सांगीतिक गुण असावा.

पहिली ओळ व्यवस्थित वाजवायला जमल्याशिवाय मी दुसऱ्या ओळीकडं जायचो नाही. त्या काळात माझ्या बहिणीला गाणं शिकवायला मेधा गंधे नावाची एक मुलगी यायची. त्यांचं शिकवणं मी कान देऊन ऐकायचो. हळूहळू मी माझ्या बहिणीच्या गाण्यातल्या त्रुटी तिला दाखवू लागलो. ‘मेधाताईनं असं नाही, असं शिकवलं आहे’ वगैरे. मग मलाही गाणं शिकवावं, असं आईला वाटलं. हार्मोनिअमच्या भात्यावर बोटानं टिचकी मारून ताल देत मेधाताईनं मला बरीच गाणी, अभंग शिकवले. पुण्यात आमच्या घराजवळच्या कमला नेहरू पार्कच्या शेजारी असलेल्या दत्तमंदिरात मी माझा पहिला कार्यक्रम केला. वय वर्ष सात असलेल्या त्या लहान मुलाचं गाणं ऐकून सर्वच जण थक्क झाले. खूप कौतुक झालं माझं. शाबासकी, बक्षिसं आणि आशीर्वाद मिळाले. मग, आता याला शास्त्रीय संगीत शिकवायला हवं, असं आईला वाटलं. तिचा ‘सर्व्हे’ सुरू झाला. सर्वांनी एकच नाव सुचवलं ः गंगाधरबुवा पिंपळखरे. 

अप्पा बळवंत चौकातल्या त्यांच्या निवासस्थानी आम्ही त्यांना भेटायला गेलो. अंधाऱ्या जिन्यानं आम्ही दुसऱ्या मजल्यावरच्या त्यांच्या फ्लॅटजवळ पोचलो. दार उघडं होतं; पण पडदा होता. आतून गाणं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज ऐकू येत होता. अंदाज घेत आम्ही आत अगदी छोट्या खोलीत शिरलो. जमिनीवर बुवा गादीवर बसले होते. त्यांच्यासमोर तीन-चार विद्यार्थी. बुवांचा थोडासा त्रासिक चेहरा बघून मी घाबरलो. तेव्हा माझं वय आठ आणि त्यांचं ऐंशी असावं. ‘इतक्‍या लहान मुलांना मी शिकवत नाही. तुमच्या घराजवळ माझी एक विद्यार्थिनी राहते. तिच्याकडं घेऊन जा तुम्ही. ती शिकवेल याला,’ असं बुवांनी माझ्या आईला सांगितलं. थोडीशी निराश होऊन आईनं त्यांना विनंती केली ः ‘तुम्ही एकदा त्याचं गाणं ऐका. त्यानंतर तुम्ही म्हणाल तसं करू या’. मला जी काही गाणी येत होती ती मी त्यांना आत्मविश्वासानं गाऊन दाखवली. माझं गाणं ऐकून त्यांचा चेहरा प्रफुल्लित झाला. ते बघून मलाही हायसं वाटलं. आईकडं बघून ते म्हणाले ः ‘‘या मुलाला मीच शिकवणार. उद्यापासून क्‍लास सुरू!’

भिंतींच्या रंगाचे पोपडे उडालेले...तशाच भिंतीवर विनायकबुवा पटवर्धन यांची तसबीर. पिंपळखरे बुवांच्या आजूबाजूला संगीताची अनेक पुस्तकं. घरातलं हे सगळं टिपत असताना माझी नजर स्थिरावली ती त्यांच्या हातात असलेल्या पट्टीवर!

मी लहान आहे म्हणून गुरुजनांनी माझ्यासाठी कुठलीही गोष्ट सुलभ किंवा सोपी केली नाही. मी ज्या बॅचला शिकण्यासाठी जाऊ लागलो, त्या वेळी जो काही राग सुरू होता तोच राग त्यांनी मला शिकवला. ‘हमीर’ या रागानं माझ्या तालमीची सुरवात झाली. माझ्याबरोबर क्‍लासमध्ये माझ्या आईच्या वयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी असायच्या. बुवा जे त्या सीनिअर विद्यार्थ्यांना शिकवायचे तेच आणि तसंच ते मलाही शिकवायचे. काहीही फरक नाही. माझी आकलनशक्ती खूप चांगली असल्यामुळे मी पटापट शिकायचो. आज शिकवलेली गोष्ट पुढच्या क्‍लासपर्यंत सराव करून तयार असायची. त्यामुळे बुवाही खूष. 

त्यामुळे कुठल्याही रागाची किंवा तालाची भीती वाटली नाही; पण आमच्या बुवांचा स्वभाव तापट होता. त्यांच्या तरुणपणी तर ते खूपच तापट होते म्हणे; पण वयोमानानुसार आता स्वभाव थोडा मवाळ झाला होता खरा! संगीत हे बुवांचं टॉनिक होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत एकापाठोपाठ एक क्‍लासेस. प्रत्येक क्‍लासच्या दरम्यान एक छोटा कप चहा. बुवा अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीनं शिकवायचे.

स्वयंपाकघरात गुरुपत्नी (या शिक्षिका असल्यामुळे आम्ही त्यांना ‘बाई’ म्हणून संबोधायचो) गरीब घरातल्या मुला-मुलींची शालेय शिकवणी घेत असायच्या. बाहेरच्या खोलीत बुवांचा अखंड स्वरयज्ञ सुरू असे. अशी आठ वर्षं आठवड्यातले दोन-तीन दिवस मी बुवांकडं शिकलो. 

शालेय शिक्षण मी इंग्लिश माध्यमात घेत असल्यानं तेव्हा मला मराठी लिहिता-वाचता यायचं नाही. ऐकायचो मात्र अगदी बारकाईनं. म्हणूनच बहुधा मला गुरुजींनी शिकवलेली प्रत्येक बंदिश लक्षात आहे.  मी अनेक संगीतस्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. त्या काळात शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत आणि सुगम संगीत यांच्या स्पर्धा मुंबई, पुणे, सांगली, सातारा, इचलकरंजी, वाई अशा अनेक ठिकाणी व्हायच्या. मी त्यांत भाग घ्यायचो. सुगम संगीताच्या स्पर्धेसाठी आई माझ्याकडून सुधीर फडके, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे, किशोरी आमोणकर यांची अनेक अवघड गाणी बसवून घ्यायची. टेपरेकॉर्डवर त्या गाण्याची कॅसेट असंख्य वेळा रिवाइंड-फॉरवर्ड करून मी त्या गाण्यातली जागा न्‌ जागा गळ्यावर चढवायचो. ‘घननीळा लडिवाळा’ हे तर माझं ‘टॉप’चं गाणं होतं. या गाण्यावर मी अनेक पारितोषिकं पटकावली होती. नाट्यगीतं मला कुणीही शिकवली नाहीत. मी ऐकून ऐकूनच शिकलो. आई मला त्या नाट्यगीताची पार्श्‍वभूमी सांगायची. हे पद कुणी कुणाला उद्देशून म्हटलं आहे...त्या वेळचा नाटकातला प्रसंग काय आहे इत्यादी. भावसंगीताचाही अर्थ सांगायची. त्यामुळे मी ते गाणं किंवा पद आपलंसं करून, समजून गायचो. त्यामुळे पहिलं बक्षीस हे ठरलेलं असायचं. 

पुष्कर लेले स्पर्धेत सहभागी आहे, हे इतर पालकांना जेव्हा कळायचं, तेव्हा आपल्या पाल्याला दुसरं, तिसरं किंवा उत्तेजनार्थ बक्षीस मिळू शकतं असं ते समजून जायचे. 

आई मला प्रत्येक स्पर्धकाचं गाणं ऐकायला लावायची. ‘आपलं गाणं झालं की चालले’ असं नव्हतं. इतर काही स्पर्धक जेव्हा त्यांच्याबरोबर असलेले तबलावादक, पेटीवादक, आई-वडील, गुरू यांच्या इशाऱ्यांवर पाठांतर केलेली गाणी म्हणायचे तेव्हा मला फार गंमत वाटे. ‘आपण किती भाग्यवान’ हेही मला त्या वेळी जाणवायचं. माझ्या सुदैवानं माझ्या सर्व गुरूंनी मला ‘गाणं’ शिकवलं; पाठांतर नव्हे! अशाच एका स्पर्धेत विजय कोपरकर यांनी माझं गाणं ऐकलं आणि मला शिकवायची इच्छा माझ्या आईकडं व्यक्त केली. पिंपळखरे गुरुजी (बुवा) एक गुरू म्हणून फार मोठे होते; पण ते परफॉर्मिंग आर्टिस्ट नव्हते, तेव्हा ‘आता एका परफॉर्मिंग आर्टिस्टकडून शिकायला हवं’ असं आईला वाटू लागलं होतं; परंतु त्या वेळी स्वतः कोपरकर ME (Metallurgy) करत होते. बुवांकडं शिकत असताना छोटा गंधर्व यांचंही थोडं मार्गदर्शन मला मिळालं. माझ्या आजोबांचे पटवर्धन म्हणून स्नेही होते. त्यांच्याकडं आठवड्यातल्या एके दिवशी छोटा गंधर्व यायचे, तेव्हा आई मला तिथं घेऊन जायची. छोटा गंधर्वांकडून काही पदं, बंदिशी, ठुमरी वगैरे मला शिकायला मिळालं. त्यांचा आवाज नितळ, मुलायम, तिन्ही सप्तकांत सहज फिरणारा. स्वभाव साधा, सरळ, प्रेमळ आणि लाघवी. माझ्यावर त्यांचं विशेष प्रेम होतं. 

त्या काळी पुण्यात रात्रीच्या मैफली व्हायच्या. रात्री साडेनऊ ते एक-दीड वाजेपर्यंत त्या चालत असत. अशा अनेक मैफलींना आई मला घेऊन जायची. शास्त्रीय संगीत शिकत असलो तरी तेव्हा फारसं कळत नव्हतं. अनेक मोठ्या गायकांच्या मैफली मी ऐकल्या. दुसऱ्या दिवशी सात वाजताची सकाळची शाळा असायची; पण कंटाळा आलाय किंवा झोप आलीय म्हणून कधी मैफल अर्धवट सोडून आल्याचं मला आठवत नाही. एकदा कुमार गंधर्व यांचं गाणं लक्ष्मी क्रीडामंदिरात रात्री होतं. मला पुसटसं आठवतं आहे...पांढरास्वच्छ कुर्ता आणि अत्यंत ढगळ असा लेंगा घालून ते मंचावर येऊन बसले. त्या वेळी त्यांनी ‘शंकरा’ हा राग गायल्याचं मला आठवतंय.

बराच वेळ त्यांचं गाणं ऐकलं; पण काही कळेना. ‘काहीतरी वेगळं आहे हे गाणं’ एवढं मात्र समजलं. मात्र, आपल्याला शिकवलं गेलेलं गाणं आणि आत्ता ऐकत असलेलं गाणं यात काही समानता मला सापडेना. 

‘आपण घरी जाऊ या...हे गाणं काही मला कळत नाहीय’ असं म्हणत घरी जाण्याचा हट्ट मी आईकडं धरला. आज मागं वळून बघताना मला याची गंमत वाटते की ज्या कलाकाराचं गाणं सुरू असताना ती मैफल आपण एके काळी सोडून आलो होतो, त्याच गायकाच्या सांगीतिक विचारांचं अनुकरण भविष्यकाळात करण्याची योजना दैवानं माझ्यासाठी योजिली होती. 

साधारण १९९३-९४ पासून मी विजय कोपरकर यांच्याकडं शिकायला जाऊ लागलो. ते तेव्हा पेरूगेट पोलिस चौकीजवळ एका छोट्या वाड्यात राहायचे. काही काळानं ते अचानक धायरी गावात स्थलांतरित झाले. धायरी हे गाव कुठं आहे, हेदेखील तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं. पुण्याचा उपनगरीय विस्तार आत्ताच्या एवढा तेव्हा झालेला नव्हता. पीसीबी मशिन्स बनवण्याचं कोपरकरांचं वर्कशॉप धायरी फाट्याजवळ होतं. पुण्याच्या गजबजाटापासून त्यांना दूर जायचं होतं म्हणून त्यांनी धायरीच्या अगदी शेवटच्या टोकाला बंगला घेऊन राहायचं ठरवलं. मला वाहन चालवण्याचा परवाना मिळेपर्यंत आई मला तिच्या स्कूटरवरून धायरीला घेऊन जायची. तेव्हाचा सिंहगड रस्ता आताच्या तुलनेत एकतृतीयांश असेल. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वडा-पिंपळाची मोठमोठी झाडं होती. शिकवणी संपवून रात्री परत येत असताना रस्त्यावर दिवे नसायचे. रस्ताही सामसूम असायचा. परतीचा प्रवास तसा धोकादायकच असे. काही वर्षांनी मला जेव्हा वाहनपरवाना मिळाला तेव्हा मी स्वतंत्रपणे धायरीला जाऊ लागलो. गणेशमळ्याजवळ आमच्या एका स्नेह्यांच्या घरी मी माझी स्वयंचलित दुचाकी लावायचो आणि तिथून धायरी फाट्यापर्यंत बसनं किंवा अन्य खासगी वाहनानं कोपरकरांकडं जायचो. परत येताना पुन्हा हाच क्रम. त्यांच्या घराकडं जायला त्या वेळी कच्चा रस्तादेखील नव्हता. एक छोटी पाऊलवाट होती फक्त. पावसाळ्यात तिथं चिखल आणि राडा असायचा.  

मी कोपरकरांचा तसा पहिला शिष्य. त्यांच्याकडून अनेक राग व बंदिशी मला शिकायला मिळाल्या. रियाज कसा करावा, मांडणी कशी असावी, कार्यक्रमात रंग कसा भरावा, साथीदारांशी कसं वागावं अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. शनिवारी संध्याकाळी त्यांच्याकडं जायचं...रात्री तिथंच मुक्काम करून रविवारी सकाळची शिकवणी करून परत यायचं असंदेखील अनेक वर्षं मी केलं. 

अडचणी आल्या तरीही धायरीला जाण्याचा नियम मी कधी चुकवला नाही. याच काळात माझे वडील कर्करोगानं आजारी होते. दुर्दैवानं कर्करोग अखेरच्या टप्प्यावर असताना कळला. डॉ. अरविंद थत्ते अर्थात अरविंददादा यांचंही मला अनमोल मार्गदर्शन मिळालं. अरविंददादा अनेक वेळा आमच्या घरी येऊन माझा आळस झटकून मला रियाजाला उद्युक्त करायचे. त्यांच्या निकोप अशा बुद्धिवादी विचारसरणीचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. दहावी झाल्यानंतर मी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. मला सायन्स आवडायचं; पण बारावीनंतर पुढं काय करायचं याची फारशी स्पष्टता आताच्या मुलांसारखी तेव्हा माझ्यात नव्हती.

रामदास पळसुले इंजिनिअरिंग करून तबला करू शकतात...माझे गुरू विजय कोपकर हे त्यांचा कारखाना सांभाळून गाणं करू शकतात...डॉ. अरविंद थत्ते हे गणितात पीएच.डी. करून हार्मोनिअम करू शकतात...डॉ. अश्‍विनी भिडे-देशपांडे मायक्रोबायॉलॉजीत पीएच. डी. करून गाणं करू शकतात...तर आपण का नाही करू शकत, असं मला तेव्हा वाटायचं. त्यामुळे मीदेखील इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला; पण काही वर्षं इंजिनिअरिंग केल्यानंतर ‘हे काही आपलं क्षेत्र नव्हे’ हे मला कळून चुकलं.

संगीताच्या बाबतीतसुद्धा मला अडकल्यासारखं वाटत होतं. तसं बघायला गेलं तर माझं उत्तम चालू होतं. रियाज, कार्यक्रम वगैरे सुरू होते. सर्व काही छान...पण मला एका सीमित डबक्‍यात अडकल्यासारखं जाणवू लागलं. आपण करतोय ते संगीत चांगलं आहे; पण खरं संगीत या सीमेच्या पलीकडं कुठंतरी आहे, असं वाटू लागलं; पण तिथं जाण्याचा मार्ग काही सापडत नव्हता.

दरम्यान, माझ्या बाबांचं निधन झालं आणि त्यानंतर मी इंजिनिअरिंग सोडून देऊन पूर्णपणे गाणं करायचं असं ठरवलं. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात प्रवेश घेतला. या अवघड व धाडसी निर्णयात मला आईनं पूर्ण साथ दिली. या सर्व प्रतिकूल परिस्थितीत माझ्या वाचनात ‘मुक्काम वाशी’ हे पुस्तक आलं. वाशीमधल्या गांधर्व महाविद्यालयात कुमार गंधर्व यांच्या झालेल्या कार्यशाळेसंदर्भातलं ते पुस्तक होतं. कोपरकरांकडं शिकताना कुमारजींच्या काही बंदिशी मी शिकलो होतो. त्यांचं गाणंदेखील अधिक आवडू व समजू लागलं होतं; पण ‘मुक्काम वाशी’ वाचल्यानंतर संगीताचं एक नवीन दालनच जणू माझ्यासाठी उघडलं गेलं. संगीतामध्ये जे मला जाणवत होतं; पण आजवर सापडत नव्हतं, ते मला यानंतर गवसलं. मी कुमारजींच्या गाण्याचा ध्यास घेतला आणि ती गायकी शिकायची असं ठरवलं; पण कुमारजींचे सांगीतिक विचार आणि गायकी आपल्याला कोण  उलगडून सांगू शकेल असा प्रश्‍न पडला. पुन्हा एकदा मी अरविंददादांचा सल्ला घेतला आणि त्यानुसार माझे गुरू होण्याची विनंती विजय सरदेशमुख यांना मी केली. थोड्या संकोचानंतर ते तयार झाले. 

विजयदादांचा स्वभाव अत्यंत मवाळ, संकोची, विनयशील, मितभाषी आणि प्रेमळ. ते फार कमी पण नेमकं बोलत. ते बोलत असताना त्यांना एखादा शब्द आठवत किंवा सुचत नसला तर ते तो शब्द सुचेपर्यंत वाट पाहत...दीर्घ पॉज! पण एकदा का त्यांना तो शब्द आठवला की तो इतका अचूक असे की त्याला कोणताही पर्यायी शब्द असू शकायचा नाही. त्यांचं स्वर लावणंही असंच अचूक! त्यांच्याकडं शिकताना सुरवातीचे सहा महिने मला फार अवघड गेले. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ते ‘धर्मांतर’ करण्यासारखंच होतं. कधी कधी ‘लर्निंग’पेक्षा ‘अन्‌लर्निंग’ अवघड असतं. सोळा वर्ष गाणं शिकल्यानंतर पाटी पुसून कोरी, करून तिच्यावर नवीन अक्षरं कोरायची ही गोष्ट काही सोपी नव्हती. त्यातून कुमारांची गायकी अगदी वेगळी आणि अवघड. विजयदादांबरोबर मी संगीताच्या कोणत्याही विषयावर मोकळेपणानं चर्चा करू शकायचो. गुरूंबद्दल आदरयुक्त भीती जरूर असावी; पण त्यांची दहशत वाटू नये.‘मुक्काम वाशी’ हे पुस्तक त्यांनी मला एखाद्या कोड्यासारखं सोडवून दिलं! जवळजवळ सहा महिने त्यांनी मला फक्त ‘सा’ म्हणायला शिकवलं. त्यांच्या संयमाची मला कमाल वाटायची; पण तेव्हा मला प्रचंड प्रमाणात निराशाही यायची. असं वाटायचं की आपण इतकी वर्षं गाणं शिकलोय आणि आपल्याला साधा ‘सा’ लावता येत नाही! पण एकदा माझा ‘सा’ त्यांना अभिप्रेत होता तसा लागला आणि त्यांचा चेहरा असा काही फुलला म्हणून सांगू! त्या क्षणी माझ्या लक्षात आलं की इतक्‍या वर्षांत आपला स्वर कधी केंद्रबिंदूला लागलाच नव्हता. स्वर जर त्याच्या केंद्रबिंदूला लागला तर त्यात काय ताकद असते हे जसं कुमारजींना अंजनीबाई मालपेकरांकडून समजलं, तसंच ते मला समजलं विजयदादांकडून. याच्यानंतर शिकवणं सोप होऊन गेलं. It was almost like fish taking to water! पुढच्या चार-पाच वर्षांत ‘कुमारगायकी’चे अनेक पैलू मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले. पुढं ललित केंद्रातून एमए करत असताना मला सत्यशील देशपांडे यांचं मार्गदर्शन मिळालं. 

सत्यशीलजी हे विविध पैलू असणारं व्यक्तिमत्त्व. गायक, संगीतज्ज्ञ, अभ्यासक, लेखक, संगीतकार, भाष्यकार आणि संगीताकडं सर्वांगानं पाहणारे विचारवंत, रसिक. सर्व घराण्यांतल्या संगीतकारांकडं त्रयस्थपणे बघून त्यांच्यातला सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोन समजून घेण्याचा सत्यशीलजींचा स्वभाव मला फार भावतो. साहित्य, काव्य, चित्र, दृक्‌-श्राव्य माध्यम आणि अर्थात संगीत यांच्या सखोल व विस्तृत अभ्यासातून त्यांचं सृजन घडलं आहे. परंपरेचं ओझं न वाटून घेता स्वतंत्रपणे विचार करायला त्यांनी मला उद्युक्त केलं. ‘ॲनॅलिसिसला दयामाया नसावी’ असं कुमारजी म्हणायचे; त्यामुळे मी स्वतःचं गाणं, गुरूंचं गाणं आणि सर्वच गायक-वादक कलाकारांचं संगीत याकडं त्रयस्थपणे बघायचा प्रयत्न मी करतो. 

माझ्या गाण्याचा सर्वात मोठा टीकाकार मीच आहे. इतर गायक-कलाकारांच्या चांगल्या-वाईट दोन्ही गोष्टी पाहून त्यातल्या माझ्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशाच चांगल्या गोष्टी मी घेतो. आमच्या संगीतक्षेत्रात गुरूला परमेश्‍वर बनवण्याची त्यांच्या शिष्यांना फार हौस! मग काय, ॲनॅलिसिस करायलाच नको...सगळं काही छान छान! पण अशा भाबड्या ‘भक्तां’ना संगीताचे विद्यार्थी कसं काय म्हणायचं? डोळसपणे शिकण्यासाठीसुद्धा स्वतःशी आणि आपल्या कलेशी प्रामाणिक असणं आवश्‍यक असतं. कोण बोलतंय, यापेक्षा काय बोललं जातंय याला मी महत्त्व दिलं. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या या अजब दुनियेत मुशाफिरी करत असताना मला गंगूबाई हनल, पंडित भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर, गिरिजादेवी, जसराज, मालिनी राजूरकर, पु. ल. देशपांडे अशा कितीतरी थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद मिळाले. मानाचे अनेक पुरस्कारही मिळाले. देशातल्या अनेक प्रतिष्ठित व्यासपीठांवर माझं गाणं झालं. भारताबाहेर अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, नेदरलॅंड्‌स, बेल्जियम, सिंगापूर, इस्राईल अशा अनेक देशांत दौरे झाले. मी गायलेल्या अनेक रागांच्या व्यावसायिक पातळीवर सीडीज्‌ निघाल्या. अजून बरंच काही करणं बाकी आहे. रियाज करत असताना, ‘आपल्याला अजून बरंच काही येत नाहीय’ याची जाणीव होते. मला जे थोडंफार संगीत कळलं आहे ते मी नवीन विद्यार्थ्यांना शिकवतो. संगीताच्या मैफलींना जाणाऱ्या किंवा न जाणाऱ्या अनेक लोकांसाठी - ज्यांना शास्त्रीय संगीत आवडतं; पण कळत नाही- मी संगीतरसग्रहणाच्या कार्यशाळाही घेतो. मी जे काही थोडंफार संगीतक्षेत्रात कमावलं आहे, त्याचं श्रेय मी माझ्या आई-वडिलांना आणि सर्व गुरुजनांना देतो. शेवटपर्यंत मला संगीताचा विद्यार्थी म्हणूनच राहायला आवडेल.

(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com