पारणं (पुष्पप्रभा बोकील)

पुष्पप्रभा बोकील
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

‘‘तर मंग आता माझंबी म्हन्नं ऐका! माझ्या गळ्यात सोन्याच्या मण्यांचे दोन पदर हायेत. ही जोंधळीपोत मला वडलांनी लग्नात दिलेली हाय. ती मोडा, म्हंजी मग तुमची गरज भागंल,’’ करडं विकण्याऐवजी एक वेगळा उपाय चंद्रानं महादूला सुचवला.

‘‘तर मंग आता माझंबी म्हन्नं ऐका! माझ्या गळ्यात सोन्याच्या मण्यांचे दोन पदर हायेत. ही जोंधळीपोत मला वडलांनी लग्नात दिलेली हाय. ती मोडा, म्हंजी मग तुमची गरज भागंल,’’ करडं विकण्याऐवजी एक वेगळा उपाय चंद्रानं महादूला सुचवला.

चंद्राचं सगळं अंग मोडून आलं होतं. अगदी मरगळलेल्या अवस्थेत ती कशीबशी उठली. आळस करून चालणार नाही, असं मनाला समजावत समोरच मातीच्या भिंतीत असणाऱ्या दोन खुंट्यांवरची परात तिनं काढून घेतली. चुलीतली लाकडं पुढं सरकवली. तवा चुलीवर ठेवला. जेमतेम चार-पाच भाकरी होतील एवढंच पीठ डब्यात निघालं. तेवढ्या भाकरी करून उरलेलं पीठ वाया जाऊ नये म्हणून परातीत हात धुतला. तेलाची बाटली तव्यावर पालथी करून निथळा काढला. चमचाभर भुरका अन्‌ मीठ टाकून त्यात परातीतलं पाणी ओतलं.
बबन अन्‌ राधी या तिच्या दोन्ही पोरांच्या तर भुकेची सोय या स्वैपाकातून झाली होती.
नवरा बघंल त्याचा तो...चंद्रा मनात म्हणाली आणि विचार करतच घोंगडं अंथरून घडीभरासाठी आडवी झाली. आज ती सारखी पदरानं डोळे पुसत होती.
दोन दिवसांपासून तिचं अन्‌ नवरा महादू यांचं भांडण सुरू होतं. दोघं एकमेकांशी बोलत नव्हते. एकमेकांपासून तोंड लपवण्याचंच धोरण दोघांनीही ठेवलं होतं. चंद्रा दोन दिवसांपासून जेवलीही नव्हती.
***

दारात दोन शेळ्या होत्या. त्यातल्या एकीला करडं झाली होती. ती विकून टाकून काही दिवस तरी तग धरता येईल, असं महादूला वाटत होतं आणि करडं अजिबात विकायची नाहीत, असं चंद्रा म्हणत होती.
महादू म्हणत होता ः ‘‘काय करायचंय करडं ठिवून? आपली नडच तशी हाय तं इकून टाकू.’’
चंद्राचं म्हणणं होतं ः ‘‘काय लागतंय वं शेरडा-करडान्ला? झाडपाला खाऊन जगत्यात. पोरंबी येता-जाता गवतपाला आनून घालत्यात. पैका-आडका काय लागतंय त्यांना? फुकटचं दूध मिळतंय ना आपल्याला?
‘‘आगं चंद्रे, आपल्याला पैशाची नड हाय. कितींदा सांगू तुला?’’
‘‘काय बी सांगू नका. किती पायापुरतं बघाव मान्सानं? गेल्या बारी बी असंच केलं व्हतं तुमी. घरच्या गाईला झाल्याला खोंड इकून टाकलासा. काय रुबाबदार व्हता दिवलिंग्या. घरच्या थोड्याफार शेतात  उपेगाला आला नसता का? ‘दिवलिंग्या’ ‘दिवलिंग्या’ करून दोन्ही पोरं किती रडली व्हती...’’
महादून खोंड विकल्यावर गायपण आटली होती. खोंड तर गेलं होतंच...दूधही गेलं होतं!
‘‘चंद्रे, आगं...किती बडबडतीयास? मला काय पिरेम न्हाय व्हय जित्राबांचं? पर येळंच तशी आलती तं काय कराव मान्सानं?’’
त्या वेळी किसनच्या शाळेची फी भरायची होती. सहा महिने ‘आज-उद्या’, ‘आज-उद्या’ अशी चालढकल करत कशीबशी त्याची समजूत काढली होती महादूनं. मात्र, पुढं त्याचे सर ऐकायला तयार नव्हते. रोज पोरगं रडत घरी यायचं. त्याचं शिक्षण थांबलं असतं तर मोठंच नुकसान झालं असतं.
महादू म्हणाला ः ‘‘ आपन घरात काय खातो ते बघाय कुनी येत नसतं; पर चार मान्सात कमीपना चांगला न्हाई, म्हून तर खोंड इकून शाळेचं पैसं भरलं. पोरं शिकली तर पुढं बरे दिस येत्याल,  हा इच्यार चुकीचा हाय का?’’
‘‘तव्हा पोरांसाठीच मीठाची गुळनी घिऊन गप ऱ्हायले व्हते मीबी. आता आजूक काय काय वाढून ठिवलंय म्होरं काय म्हाईत. दोन सोन्यासारखी पोरं हायेत; पर ना त्यांची हौसमौज व्हतीय, ना त्यान्ला चांगलंचुंगलं खायाला-प्यायाला मिळतंय...जीव तुटंतो माझा पोरांसाठी,’’ चंद्राच्या बोलण्यातून अगतिकता आणि दुःख व्यक्त झालं.
महादू म्हणाला ः ‘‘तू आई हायेस पोरांची म्हून बोलून दाखिवतीस...पर मीबी बापच हाय ना त्यांचा? का वैरी हाय त्यांचा न्‌ तुझाबी? परस्तितीनं नाडलंया आपल्याला...काय करनार?’’
‘‘तुमच्या तोंडातून सबुद फुटत नाय, जिथं फुटाया पायजे तिथं, म्हून नडतंय समदं. मी खरं बोलल्याव मंग राग येतो तुम्हास्नी,’’ चंद्रा अजून रागातच होती.
‘‘गेल्या वरसाला पाऊसपानी बरं झालं व्हतं. शेतबी बऱ्यापैकी पिकलं व्हतं. वाटलं, आता तरी बरे दिस येत्याल; पर तुमी सावकाराला दामदुपटीनं जवारी दिऊन टाकली,’’ चंद्राला गेल्या वर्षीचा प्रसंग आठवला.‘‘आगं चंद्रे, तुला वेव्हारातलं काय कळतच न्हाय. तव्हा मी किती बी बोललो तरी पालथ्या घड्याव पानीच म्हनायचं! सावकाराकून दुणीनं जवारी घेतली व्हती, त्याची दोन पोती द्यावी लागत्यात. एकदा वेव्हार ठरल्याव मागं फिरता येत नसतं. येक्‍यामिरीच्या इश्वासावर गावगाडा चालत असतोय. भरोसा हाच बंदा रुपाया!’’ महादूनं चंद्राला व्यवहार शिकवला!
‘‘त्ये तसलं काय सांगू नका मला. आपलं एक पोतं जवारी फुकट गेली. माझ्या पोरांची चार महिने भूक भागली असती, येवढंच मला समजंतय. उसनं म्हून एकच पोतं द्याया पायजे व्हतं त्याला,’’ चंद्रा तिच्या भूमिकेवर कायमच होती.
‘‘तू काय ऐकनाऱ्यातली न्हाईस. हेकट हायेस. सोताचंच खरं करनारी. काय अर्थच नाय तुला काय सांगन्यात...’’ असं म्हणत महादू तणतणत बाहेर निघून गेला.
चंद्रा रडत तशीच पडून राहिली. पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता; पण खाण्याची इच्छाच नव्हती. झालेला संवाद मनावर एकसारखा आघात करत होता. डोळे झरत होते.
दिवलिंग्याचं जाणं, गाईचं आटणं, किसनची फी, शेळीला झालेली करडं, सावकारानं नेलेली ज्वारीची पोती...सगळा चित्रपट चंद्राच्या डोळ्यांपुढून हलता हलत नव्हता. आपल्याच नशिबी हे का, याचं उत्तर मिळत नव्हतं. दारात दोन्ही करडं बागडत होती. बॅं बॅं करत जणू ती मालकिणीला सादच घालत होती. आपल्यामुळं घरात भांडणं सुरू आहेत, हे त्या मुक्‍या जीवांना काय माहीत! त्यांचा आवाज ऐकून चंद्राच्या पोटात कालवाकालव होत होती. बिचारी कोवळी लेकरं! ‘नका रं मला सोडून जाऊ. तुमच्या आईला बोलता येत नसलं तरी आईचंच काळीज हाय ते...भिरभिरून जाईल ती तुमी गेल्याव! शोधत फिरंल तुम्हा लेकरांना. तिचा बी पान्हा आटून जाईल तुमच्याबिगर. गाईसारखाच,’ चंद्रीच्या मनात हे असे विचार सुरू होते. ती बेचैन झाली होती. पोटात काही नसल्यानं तिच्या अंगात अवसान नव्हतं. तरी ती तशीच उठली. दारात गेली अन्‌ दोन्ही करडांना उचलून तिनं त्यांना छातीशी कवटाळलं. खूप मोठा आधार वाटला तिला.
‘काही झालं तरी करडं विकायची नाहीत...’ चंद्रानं मनाशी पुन्हा एकदा निश्‍चय केला.
***

शाळा सुटल्यावर पोरं घरी आली. भुकेजलेली होती. तव्यातल्या पाण्याबरोबर त्यांनी दोन-दोन भाकरी संपवल्या. एक भाकरी उरली. ती त्यांनी झाकून ठेवली.
दोन्ही पोरं अभ्यासाला बसली. उजेड आहे तोवरच अभ्यास उरकणं भाग होतं. कारण, घरात वीज नव्हती. दिव्यासाठी रॉकेलही नव्हतं. त्या दोन्ही लहान पोरांनाही आपल्या परिस्थितीची जाणीव होतीच. ना कसली मजा, ना कसला हट्ट. शहाणी होती दोघंही. अभ्यासातही हुशार आणि खेळातही तरबेज. शाळेतल्या सर्व उपक्रमांत सहभागी होऊन ती यशस्वी होत असत. गुणवत्तेतही वरच्या क्रमांकावर असत. घरी आल्यावर आईलाही घरकामात मदत करत. आई दमून झोपली असावी, असं दोघांनाही वाटलं; पण तिचं हे असं अवेळी झोपून राहणं त्यांना खटकलंही. तिला न उठवताच दोघं हळू आवाजात बोलू लागली.
‘‘काय झालं असंल गं आईला, राधे? का झोपली असंल? दुखत तं नसंन काही? आन्‌ तोंडावं पांघरून बी वढून घेतलंय तिनं...’’ बबननं राधीला विचारलं.
‘‘ तुला जे वाटतंय तेच मला बी वाटतंय. नको उठवायला. जाऊं दे...’’ राधी म्हणाली.
पोरांना त्रास नको म्हणून महादूनं व चंद्रानं त्यांना काहीच सांगितलं नव्हतं. शिवाय, मागच्या वेळी खोंड विकलं तेव्हा मुलांना खूप त्रास झाला होता. त्यांची समजूत घालता घालता नाकी नऊ आले होते.
महादू रात्री उशिरा घरी आला. अंगणात लख्ख चांदणं पडलं होतं. उघड्या दारातून चांदण्याची एक मोठी तिरीप घरातही गेली होती; मुलं चुळबुळत आहेत हे, त्या प्रकाशामुळं महादूच्या लक्षात आलं.
‘‘जेवला का रं पोरांनू?’ त्यानं मुलांना विचारलं.
‘‘व्हय तात्या. जेवलो आमी...पर आई झोपूनच हाय. तुमाला दोघान्ला बी जेवायचं आसंल ना? पर एकच भाकरी उरलीया...’’ पोरं म्हणाली.
‘‘आरं, उठवा ना मंग तुमच्या आईला. जिवून घे म्हनावं तिला!’’
‘‘आये, ऊठ ना जेवाया...तात्या आलेत. दोघं जेवा बाहेर चांन्यात...’’
खोल गेलेल्या आवाजात चंद्रा पोरांना म्हणाली ः ‘‘पोरांनू, मला काय भूक नाय. तुमच्या तात्यान्ला म्हनाव, घ्या जिवून तुमी. ती येक भाकर खावून घ्या.’’
‘‘पोरांनू, तुमच्या आईला सांगा...म्हनावं ‘मी काय इतका बी सवराती नाय की दुसऱ्याच्या वाट्याचं बी खाऊन टाकीन! कुनाला उपाशी ठिवून मी काय जेवनार न्हाय,’’ चंद्राला उद्देशून महादू पोरांना म्हणाला.
‘‘आवं, मी का जेवत न्हाय ते तुमास्नी चांगलं ठावं हाय. पोरांच्या म्होरं मला वाढीव बोलाया नका लावू...!’’ चंद्रा घुश्‍शातच म्हणाली. ‘‘ठीक हाय.... मंग दोघं बी उपाशी राहू,’’ महादू म्हणाला.
‘‘आसं काय करता? तुमचं म्हन्नं काय हाय ते तरी सांगून टाका...’’ चंद्रानं विचारलं.
‘‘मी एकटाच जेवनार न्हाय आन्‌ हेच माझं अखेरचं म्हन्नं हाय!’’ महादूनं उत्तर दिलं.
‘‘तर मंग आता माझंबी म्हन्नं ऐका! माझ्या गळ्यात सोन्याच्या मण्यांचे दोन पदर हायेत. ही जोंधळीपोत मला वडलांनी लग्नात दिलेली हाय. ती मोडा, म्हंजी मग तुमची गरज भागंल,’’ करडं विकण्याऐवजी एक वेगळा उपाय चंद्रानं महादूला सुचवला.
‘‘आगं, असं कसं चंद्रे? तुझ्या बानं दिलेली हाय तुला ती पोत. मी तं तुला एक बी डाग इकत घेतला न्हाय कदी आन्‌ आता तुझ्या गळ्यातलाच डाग मोडू? हे न्हाय जमायचं,’’ महादू म्हणाला.
‘‘म्हंजी, करडं इकायची, असं ठरल्यालंच हाय तर तुमचं! पर मी करडं इकू देनार न्हाय म्हंजी न्हाय. जोंधळीपोत काय शेळीवानी दूध देतीय काय?’’ बिनतोड प्रश्‍न विचारत चंद्री म्हणाली ः ‘‘शेळी आटली तं पोरांच्या तोंडचं दूध निघल, याचा तरी इचार करा जरा.’’
‘‘तुझा इचार मला पटलाय चंद्रे अन्‌ त्यावर उपायबी सापडलाय. करडं इकायची येळ  न्हाई यायची आता. तुझ्या मनासारखंच व्हनार हाय...’’
‘‘म्हंजी, असं घडलंय तरी काय...सांगा लवकर,’’ चंद्री म्हणाली.
महादू म्हणाला ः ‘‘ ऐक! काय उपायच सुचाना तव्हा मी पाटलांकडं गेलो. आपल्या दोघांचं भांडान त्यांच्या कानाव घातलं. त्यान्ला बी लई वाईट वाटलं. मला म्हन्ले ः ‘चंद्रा माझ्या लेकीसारखी हाय. ती तिचं म्हन्नं बिलकूल चुकीचं न्हाई. करडं अजिबात इकू नको, महादू. करडांच्या किमतीएवढं पैसं माझ्याकून घिऊन जा अन्‌ तुझी नड भागीव.’ ’’
‘‘ मी पाटलांना म्हन्लं ः ‘आसं उगीचच निसते पैसं कसं काय घिऊ?’ ’’ महादूनं चंद्राला सांगितलं.
‘‘मंग पाटलांनीच मला एक वाट दावली. ते म्हन्ले ः ‘मी दिल्यालं पैसं उसनं हायेत असं समज आन्‌ ते फिटेपत्तूर शेळीच्या दुधाचा रतीब घाल माझ्याकं. आता काय हरकत नाय ना?’ ’’ महादूनं सांगितलं.
हे ऐकताच चंद्राच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.
महादू पुढं सांगू लागला ः ‘‘मी लगीच तयार झालो आन्‌ हे बघ, पैसं बी घिऊन आलोय पाटलांकून. आता झालं का समाधान आमच्या चंद्राबाईचं? ‘करडं इकायची न्हाईत’ हे तूबी घरासाठीच म्हनत व्हतीस हे काय मला समजत नव्हतं व्हय?’’
‘‘पाटलांच्या रूपानं देवंच भेटला म्हनायचा आपल्याला,’’ चंद्रीच्या आवाजातला आनंद लपत नव्हता. चंद्रा महादूला म्हणाली ः ‘‘चला, आता दोघं बी एक्‍या भाकरीत उपास सोडू आपला.’’  
मग दोघांनी अंगणातल्या चांदण्यात एका भाकरीत पारणं  सोडलं. शेजारीच करडं दूध पीत शेळीला ढुसण्या देत होती. शेळी आळीपाळीनं त्यांना चाटत होती...शेळीच्या जवळ उभे राहून करडांचं ते दूध पिणं बबन-राधा हरखून जाऊन पाहत होते...आणि ते सगळं एकत्रित दृश्‍य बघून महादू-चंद्राच्याही डोळ्यांचं पारणं फिटलं होतं!

Web Title: pushpprabha bokil write article in saptarang