प्यार को प्यार ही रहेने दो...

हेमंत जुवेकर
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

गेल्याच महिन्यात घरात बायकोने एक पाऊच आणला... त्यात वेगवेगळी क्रीम आणि अशा अनेक गोष्टी होत्या ज्या सहसा मध्यममार्गी आणि मध्यमवर्गींयांच्या गेल्या पिढीने वापरल्या नसतील. ते म्हणे महालक्ष्मीचं व्रत होतं. या सोळा वस्तू सोळा जणांना वाटायच्या. त्यांनी आणखी सोळा जणांना....

​व्हॅलेंटाईन डे आला म्हटल्यावर व्हाॅटसअॅप, फेसबुकवर पडीक असलेल्यांकडून प्रेमाची आतषबाजी होणार हे नक्कीच होतं. झालीयच सुरू. पण पूर्वी नसलेले टेडी बिअर डे, प्राॅमिस डे, हग डे आणि कसले कसले 'डे'ही आलेत व्हॅलेंटाईनच्या सोबतीला. आता हे डे कशाशी खातात हे माहीत नसल्यानं काहीजण पुराणकाळात जमा करू पाहतील, ही आम्हाला... आम्हाला म्हणजे डे-टुडे च्या लढाईत हे सो काॅल्ड डे-कल्चर विसलेल्यांना... पण खात्रीने सांगतो असे खूप सापडतील...

त्यांना विचारा जरा, तेही हेच सांगतील, की आम्ही काॅलेजमध्ये असताना डे नव्हते असं नाही, पण इतकी मारामार नव्हती त्यांची. अर्थात नव्हती ते चांगलंच. कारण, पाॅकेटमनी इतका कमी असायचा की कटिंग चहामध्येही कपात करावी लागायची... मग हे टेडी-बिडी कुठून घेणार कसे? आणि ते हग वैगरे आजच्या इतके काॅमन नव्हते. `रोज डे` साठीच पंच-आठवडी योजना आखणारे आम्ही, आमच्या व्हॅलेंटाईनला अशा पद्धतीने (व्हॅलेंटाईन वीक साजरा करून) मन की बात सांगावी लागली असती तर 'मनरेगा'वर जावं लागलं असतं बहुतेक!  ह्रदयाने कितीही ठोके वाढवले तरी त्याचं एेकण्याआधी आम्हाला त्यावर असलेल्या खिशाचा सल्ला घ्यावा लागायचा... आणि आधीच वीक असलेल्या खिशाचा सल्ला एेकल्यामुळे, कितीक हळवे, कितीक सुंदर क्षण आमच्या आयुष्यातून दूर दूरच राहिलेत... काय सांगू आता... त्यामुळे व्हॅलेटाईन वीक सारख्या गोष्टी नव्हत्याच ते बरंच आहे. पण कदाचित आमच्या त्या जुन्या चष्म्यातून पहात असल्यामुळे असेल कदाचित, एक प्रश्न नेहमी उभा रहातो या काळात (नीट कळावा म्हणून थेट बोलगाण्यांच्या रुपात विचारू का हा प्रश्न.... घ्या)
हे व्हॅलेंटाईन वीक म्हणजे 
नेमकं असतं तरी काय, 
टेडी बिअर, हग, प्राॅमिस देऊन 
नेमकं मिळतं तरी काय 

ते तुम्हाला नाही कळायचं... हे सनातन उत्तर हे या प्रश्नाचं खरं उत्तर नव्हे. 
एक किस्सा सांगतो, कदाचित उत्तर सापडू शकेल.
गेल्याच महिन्यात घरात बायकोने एक पाऊच आणला... त्यात वेगवेगळी क्रीम आणि अशा अनेक गोष्टी होत्या ज्या सहसा मध्यममार्गी आणि मध्यमवर्गींयांच्या गेल्या पिढीने वापरल्या नसतील. ते म्हणे महालक्ष्मीचं व्रत होतं. या सोळा वस्तू सोळा जणांना वाटायच्या. त्यांनी आणखी सोळा जणांना....
मी म्हटलं अरे हे व्रत नाही मल्टी लेव्हल मार्केटिंग आहे...
त्यानंतर घरात काय झालं हे मी नाही सांगणार, पण महालक्ष्मीचेही उपास असू शकतात हा वैधानिक इशारा ध्यानात ठेवा...
तर आपला विषय होता व्हॅलेंटाईन वीक चा, त्यातही हा वीक शब्द जास्त प्रभावी ठरतोय हे लक्षात आणण्यासाठी हा किस्सा सांगितलाय. इंग्रजीतला नव्हे मराठीतला विक म्हणतोय...

खरंच, आजचे हे डे किंवा वीक (आणि आता ही व्रतं)  म्हणजे काहीतरी विक नी मार्केटिंग कर ची घोषणा आहे. कुणाला ती दिसते नी थांबते खिशापर्यंतच, पण असेही अनेक असतात ज्यांचे खिसे पार करून ती जाते थेट त्यांच्या ह्रदयापर्यंत. 
आणि कुण्या एकाचा बळी पडला की इतरांना फार पर्याय उरतो कुठे...
नाहीतर, त्याने टेडी बिअर दिला, तु कुठे दिलास असं म्हणून ती त्यालाच हग देत असेल, तर याला बियर टेढी करून ग्लासात ओतल्याशिवाय पर्याय  आहे का... अर्थात त्याने तो स्वीकारू नयेच, कारण हे सारं होतंय त्यामागे वीक मानसिकता आणि प्रभावी विक्रीतंत्र आहे हे ओळखायला हवंय त्याने आणि आपणही...  
शेवटी प्रेम ही भावना नेमकी असते काय हे कुणी ओळखलंय अजून... 
कुणी म्हणतील हे ईश्वराघरचं लेणं आहे, मानवजातीला देणं आहे, 
मार्केटिंगवाला म्हणेल हे गिफ्ट चं देणं - घेणं आहे
शास्त्रज्ञ म्हणतील वंशवाढीसाठी हे अटळ होणं आहे.

यातलं काय घ्यायचं हे आपल्या ह्रदयाला विचारून ठरावावं प्रत्येकाने. 
त्यासाठी मदत घ्या गुलजार नावाच्या शायराची....
तो म्हणतो...

हमने देखी है
इन आॅंखोकी महकती खुशबू
हात से छुके इसे
रिश्तोका इल्जाम ना दो
सिर्फ एेहसास है ये 
रुह से महेसूस करो
प्यार को प्यार ही रहेनो दो 
कोई नाम ना दो

Web Title: pyar ko pyar hi rehne do : velentine's day