नारा आत्मनिर्भरतेचा... 

नारा आत्मनिर्भरतेचा... 

पंतप्रधानांचा ‘आत्मनिर्भरते’चा नारा ऐकून अनेकांनी इथून पुढं चिनी लोकांचं काहीही वापरायचं नाही, असं ठरवलं. खरंतर हिंदी-चिनी ‘बाय बाय’ (किंवा डोन्ट बाय!) ही घोषणा काही नवीन नाही. प्रॉब्लेम काय आहे ना, आम्हाला कुठला माल कोणती कंपनी कुठे बनवते वगैरे माहीत नसतं. शाळेत असताना, कुठं किती टन बॉक्साइट तयार होतं हे घोकून घोकून पार डोक्याचा फर्नेस झाल्यामुळं, आता कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करणं आम्हाला अवघड जातं. 

हातातल्या मोबाइलमधले ॲप्स चिनी आहेत आणि ते लगेच काढले पाहिजे, अशी मोहीम सुरू झाली. मोबाइल फोनच्या दोन क्लिकनं क्रांती घडणार असेल तर ‘व्हाय नॉट!’ 

खरंतर स्वतःच्या मोबाईल मधल्या प्रत्येक ॲपची सविस्तर माहिती ऑनलाइन वाचून, कुठल्या चिनी कंपन्या काय काय करत आहेत, चीन देश काय करत आहेत आणि त्यांच्या तुलनेत भारतीय कंपन्या कशा प्रकारचे आणि दर्जाचे ॲप बनवत आहेत, या सगळ्यातून कोणाला किती नफा होतोय, टेक्नॉलॉजीत कोण किती पुढं आहे हे समजून घेण्याची चांगली संधी होती आम्हा देशभक्तांना. 

पण यातही आम्ही आळसच केला. ‘टिकटॉक’ नावाचं एकच अस्सल चिनी ॲप आम्हाला माहीत होतं आणि त्यावर आम्ही तुटून पडलो. आपल्याकडं सोशल मीडिया ॲपचीही वर्णव्यवस्था आहे. इंस्टाग्राम वापरणारे सगळ्यात हायफाय. फेसबुकवाले मध्यमवर्गीय. ग्रामीण किंवा तालुका प्लेसचे सगळे टिकटॉकवर. या आमच्या सोशल मीडिया आत्मनिर्भरतेचा फटका या ‘लो फाय’ लोकांना, खास करून तरुणांनाच बसला आहे. देशासाठी बलिदान द्यायचं असेल तर आम्ही मिडल/अप्पर क्लास पब्लिक बरंचसं बलिदान, असं औटसोर्स करतो. टिकटॉकचं देशी व्हर्जन बाजारात आलं ते ‘मित्रो’ या नावानं. आणि माझे पन्नास लाख ‘भाईयो और बहनों’ यांनी ते डाऊनलोड केलं. ते खरंतर मुळातलं पाकिस्तानी सॉफ्टवेअर आहे, असं नंतर लोकांच्या लक्षात आलं आणि तेही बारगळले म्हणे. 

‘टिकटॉक’ सोडल्यास आणखी कोण चिनी लपलाय आमच्या फोनमध्ये? याचा फार शोध आम्ही घेतला नाही. कारण ली का-शिंग नावाच्या हाँगकाँगकर काकांचा फेसबुकमध्ये छोटुसा हिस्सा आहे असं कुठं तरी आम्ही वाचलं, आणि हाँगकाँगच मुळात चिनी आहे का नाही, या ‘जिओ-पॉलिटिकल’ वादात आम्हाला पाडायचं नाहीये. कारण प्रत्येक क्लिकनंतर दहा बारा पानं वाचायची आम्हाला सवय नाही. आणि तसंही, ‘Remove China Apps’ नावाचं एक ॲप बाजारात आलं. त्यामुळं तर क्रांती अधिक सोपी झाली, पण त्यावरही बंदी आल्याचं मी तिसऱ्याच ॲपवर वाचलं. 

चिनी सोडा, कुठल्याही देशात तयार झालेलं ॲप तुम्ही वापरत असाल, की ते काढायला आणखी एका ॲपची गरज भासते. एकंदरीतच अवघड आहे, पण तो विषय वेगळा. 

आता अख्खाच्या अख्खा चिनी मोबाईल फोनच वापरायचं बंद करायचं म्हटलं तर मात्र आमची खूपच ओढाताण होईल. चिनी सोडल्यास आमच्या बजेटमध्ये चांगले फोन फार क्वचित मिळतात. तसंही अमेरिकन कंपनीचे फोनही चीनमध्येच बनवले जातात. भारतात भारतीय फोन बनवायचे म्हटलं, तर ते टिकटॉक व्हायरल डान्स व्हिडिओजपेक्षाही अवघड आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेड इन इंडिया’ यातला फरक समजावणार एखादा छान टिकटॉक व्हिडिओ बनवायचा माझा प्लॅन होता! असो. आपण आज जरी सुरुवात केली, तरी भारतीय फोन (किंवा इतर कुठलाही हाय टेक प्रॉडक्ट) बाजारात यायला अनेक वर्षं लागतील. 

तोपर्यंत एक आयडिया करता येईल. नवीन फोन घ्यायच्या ऐवजी आहे, तोच जुना फोन रिपेअर करूया. त्यानं आपले पैसे आपल्याच आसपासच्या टेक्निकल कारागिरांना मिळतील. किंवा जुने, सेकंडहॅन्ड फोन घेऊया, म्हणजे आपले पैसे आपल्याच लोकांना मिळतील. नवीन मोबाइल (किंवा कुठलीही वस्तू/सेवा) बनवायला प्रचंड ऊर्जा खर्च होते, जंगलं तोडली जातात आणि क्लायमेट चेंजचा प्रश्‍न अधिक तीव्र होत जातो. जुन्या फोन, टीव्ही, लॅपटॉप गाडीत बच्चन साहेबांच्या त्या फिल्ममधलं टायटल सॉंग डाउनलोड करून नक्की ऐका. ‘चिनी कम है, चिनी काम हैं, थोडी थोडी तुझमें है कम.... धीरे धीरे होले होले दूर दूर होगी प्रॉब्लेम!’ 

एका घावात आत्मनिर्भर आणि पर्यावरणप्रेमी बनायची आयडिया कशी वाटली? आवडली असणारच, आवडल्याशिवाय राहणार नाही. पण त्याची अंमलबजावणी खूप थोडी मंडळी करतील, कारण यात नुसतं सोशल मीडियावर क्लिक न करता, कृती करावी लागेल, छोटा का होईना, त्याग करावा लागेल. 

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com