गाणे... अजर, अमर ! (पं. रघुनंदन पणशीकर)

गाणे... अजर, अमर ! (पं. रघुनंदन पणशीकर)

केवळ गुरूच नव्हे; तर माझी आईही!

माझे वडील प्रभाकर पणशीकर यांची नाटक कंपनी होती. तिच्यातर्फे ‘तुझी वाट वेगळी’ या नाटकाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा किशोरी आमोणकर यांना भेटलो होतो. या नाटकाचं संगीतदिग्दर्शन किशोरीताईंचं होतं. ‘पणशीकरांचा माणूस’ म्हणून मी असिस्टंट या नात्यानं काम करत होतो. शिवाय थोडंफार गाणंही मी जाणत होतो. त्यामुळं किशोरीताईंना मदत करणं, गाणं रेकॉर्ड करणं व त्यांना स्टुडिओमध्ये घेऊन जाणं अशा पद्धतीच्या कामांची जबाबदारी माझ्याकडं होती. ताईंचा हा सहवास मला जवळपास वर्षभर लाभला. त्यादरम्यान एकदा केव्हातरी त्या गाणं गात होत्या, तेव्हा त्यांच्या शिष्याला ते येत नव्हतं. त्या वेळी मी शेजारीच बसलेलो असल्यानं किशोरीताईंनी मला विचारलं ः ‘तू गातोस ना? मग, हे म्हणून दाखव बरं...’ त्या वेळी तरी ताईंचं दडपण माझ्यावर येण्याचं तसं काहीच कारण नसल्यानं मी ते ताडकन गाऊन दाखवलं आणि त्यांना ते खूप आवडलं. ‘तुझ्या आवाजात दर्द आहे, तू संध्याकाळपासून शिकायला ये,’ असं ताईंनी मला त्या प्रसंगानंतर सांगितलं. ‘तुझी वाट वेगळी’ हे जे नाटक होतं, ते माझीही वाट अशा प्रकारे वेगळी करून गेलं!
माझ्यासाठी गाणं शिकणं इत्यादी सगळं नवीन होतं. त्यात ताईंकडं गाणं शिकणं, हा प्रत्येक क्षणी नवीन अनुभव होता. मला आठवतंय की त्यांनी राग तोडीपासून सुरवात केली होती. त्याचे काही आलाप त्यांनी मला दिले होते. पहिल्यांदा त्यांनी माझ्याकडून आलाप करून घेतले आणि मग हळूहळू स्वरांची ओळख झाली व त्यानंतर अलंकार...मग सगळं एकेक करून शिकवायला सुरवात केली. त्यानंतर जयपूर घराण्याच्या बंदिशी व त्यांच्या स्वतःच्या बंदिशी त्यांनी मला शिकवल्या. सुरांचा अभ्यास व गायन या दोन्हींचा थोडा संगम त्या दिवसांत साधला गेला होता. त्यांनी मला निरंजनी तोडी राग, तसंच त्याची बंदिश शिकवली होती. माझ्याकडून ते म्हणताना गंधार व रिषभ थोडे वेगळे लागायचे...तर ताईंना हे एवढं आवडलं, की त्यांनी त्यांची मैत्रीण विभाताई पुरंदरे यांना मुद्दाम बोलावून घेतलं आणि ती बंदिश मला पुन्हा म्हणायला लावली. ‘याच्या आवाजात बंदिश वेगळी लागते आणि ऐकायला छान वाटते,’ असं त्या म्हणाल्या होत्या. खरंतर माझ्यासाठी ही शाबासकीच होती.

आम्ही ताईंचा चिकार ओरडा खाल्ला आहे. नव्वद टक्के वेळा तरी!  मात्र, त्यांना जे अपेक्षित असे, ते जर आमच्या गळ्यातून आलं नाही, तर ओरडा हा पडायलाच पाहिजे होता आणि तसा तो पडायचा. मी सुदैवी होतो. कारण, त्यांनी मला सांगितलं होतं, ‘जे माझ्या गळ्यातून येईल, ते तुझ्याही गळ्यातून तत्काळ यायला पाहिजे’. त्यामुळं मी तसं करण्याचा प्रयत्न करायचो. त्यात ‘तत्काळ म्हणायच्या’ प्रयत्नात हाच नाद मला लागला होता. त्या नुसत्या गुणगुणल्या तरी ते मला कळलं पाहिजे व म्हणता आलं पाहिजे, असा कटाक्ष मी ठेवला होता. असं होता होता आम्ही त्यांच्या सुरांमध्ये गाणं शिकलो. ताईंकडं शिकण्यासाठी सगळ्या मुलीच समोर बसलेल्या असायच्या (स्त्रियांचा सूर काळी पाच व पुरुषांचा सूर काळी दोन), त्यांच्यात मी आणि आणखी कुणी एखादा पुरुष असायचा; त्यामुळं सोलो गाणं गाण्याचा प्रसंग आम्हाला कमी आला. मुलींवर हे प्रसंग जास्त प्रमाणात यायचे आणि मुलींना जास्त ओरडा पडायचा. मात्र, मलासुद्धा ताईंचा भरपूर ओरडा खावा लागलेला आहे. गाणं बरोबर सुरात नाही गायलं गेलं तर ‘तुला जरा जास्त अक्कल आलीये...’ ‘जास्त कळायला लागलंय, असा तू वागतो आहेस...’ अशा शब्दांत त्या आमची कानउघाडणी करायच्या. ताई या ‘स्त्री-गायक’, तेव्हा त्यांच्यासोबत जास्त राहिल्यामुळं ‘पुरुष-गायकां’वरही त्याचा परिणाम साहजिकच होत असे. त्यामुळं माझा कधीतरी बायकी आवाज आला तर ताई लगेच ओरडायच्या. म्हणायच्या ः ‘तू पुरुष-गायक आहेस, तेव्हा तू पुरुषासारखंच गायलं पाहिजेस. तू बायकांसारखं गाऊ नकोस.’ त्यांच्या या अशा बजावण्यामुळं मला नेहमीच ‘ठिकाणा’वर ठेवलं, नाहीतर मी केव्हा बायकी पद्धतीनं गाऊ लागलो असतो, ते माझं मलाही कळलं नसतं.

ताईंकडं मी सदैव गुरू म्हणूनच पाहिलं; त्यामुळं त्या जे जे सांगतील, ते ते माझ्यासाठी प्रमाण होतं. त्यांनी जर मला सांगितलं ‘हा गंधार असा आहे, हा राग असा आहे’ तर तो तसाच माझ्या डोळ्यांसमोर यायचा. मी कधीच त्यासंदर्भात शंका घेत नसे. त्यांनी जे जे सांगितलं, ते ते मी खरं मानत गेलो. जरी त्या चार-पाच जणांना शिकवत असल्या, तरी ताईंच्या गळ्यातून येणारा तुकडा हा माझ्यासाठीच आहे, असंच मी समजत असे. गुरू-शिष्य असा हा आमचा प्रवास सुरूच होता. मात्र, मला नेहमीच असं वाटत आलं आहे, की गुरू तर त्या माझ्या होत्याच; पण त्यापेक्षाही त्या माझ्या आई होत्या. त्यांचं ‘माउलीरूप’ मला जास्त भावलं. त्यामुळं मी त्यांच्याकडं आई म्हणूनच पाहायचो. ‘त्या माझ्या आई आहेत आणि त्या जे काही सांगत आहेत, ते माझ्या भल्यासाठी,’ अशीच माझी भावना सतत असल्यानं त्या जे सांगतील ते मी काना-मात्रेचा वा इतर कोणताच बदल न करता तसंच म्हणायचो व त्यांच्या सांगण्याचं पालन करायचो.

आपल्या सगळ्याच शिष्यांच्या कल्याणावर त्यांचं अतिशय काटेकोरपणे लक्ष असायचं. म्हणजे असं, की जर शिष्य चांगला गात असेल, तर त्या त्याला शाबासकीही जरूर द्यायच्या, तसंच त्याचं वागणं चांगलं असेल, तर त्याचं कौतुकही करायच्या. त्यांच्याकडूनच मला सुरांचं प्रेम म्हणजे काय हे कळलं. सुरांवर प्रेम कसं करायचं, हे समजलं. ताई नेहमी सांगायच्या ः ‘सूर म्हणजे अगदी लहानग्या बाळासारखे असतात. त्यांना कुठंही त्रास होईल, असं कुणी वागू नका. त्यांचं जिवापाड जतन करा.’ सुरांविषयीचं ताईंचं ममत्व आम्हाला हे असं सारखं दिसायचं-जाणवायचं. ताईंसमोर जाऊन बोलणं मला कधी जमलंच नाही; पण एखादी गोष्ट प्रामाणिक असेल, तर मात्र आम्ही निःसंकोचपणे त्यांच्याकडं ती बोलायचो. ताईंचं एक वैशिष्ट्य होतं व ते म्हणजे गाण्यात-वागण्यात कुणाचं काही चुकत असेल, तर त्या तिथल्या तिथं ते दाखवून द्यायच्या आणि असं चुकीचं गाणं-वागणं हाणून पाडायच्या. तुम्ही कसं गायला पाहिजे व तुम्ही तुमची कुठली प्रतिमा कशा प्रकारे लोकांसमोर ठेवायला पाहिजे, या गोष्टी ताईंनी आम्हा शिष्यवर्गाला अतिशय बारकाईनं समजावून सांगितल्या आहेत. त्यामुळं त्यांची ही आदर्श शिकवण डोळ्यांसमोर ठेवूनच तीनुसारच आमची पुढची वाटचाल राहील. कुणी सरळपणे व प्रामाणिकपणे त्यांच्याकडं गेलं, तर तेवढंच भरभरून त्या बोलायच्या-सांगायच्या. त्या संबंधिताचं काम कसं मार्गी लागेल, याच्याकडं त्यांचं लक्ष असायचं. मात्र, कुणी मनात काही अप्रामाणिक हेतू ठेवून गेल्यास किंवा मनात काहीतरी वेगळंच असेल, तर त्या उलटून जवाब द्यायच्या. ‘सरळ माणसाशी सरळ आणि ठकाशी ठक’ असं त्यांचं इतरांशी वागणं असायचं. शिष्यांनी वेळा पाळण्याबाबत त्या खूप काटेकोर असायच्या. बेशिस्तपणा व वेळ चुकवणं या बाबी त्यांना अजिबात खपायच्या नाहीत. प्रभाकर पणशीकर यांचा मुलगा आहे म्हणून त्यांनी मला कधीच स्पेशल वागणूक दिली नाही; त्यांनी मला त्या दृष्टिकोनातून कधी पाहिलंच नाही. त्यांच्यासाठी मी इतरांसारखाच एक सर्वसाधारण शिष्य होतो...विद्यार्थी होतो.  

मी ताईंची जास्तीत जास्त गाणी ही घरीच ऐकलेली आहेत; त्यामुळं त्यांचे कार्यक्रम ऐकायला बाहेर जायचे प्रसंग जास्त आले नाही. एकदा कार्यक्रमाला देवकी पंडित आल्यानंतर मी स्टेजवर बसण्याची आवश्‍यकता नव्हती; मग त्या वेळी मी जाणीवपूर्वक श्रोत्यांमध्ये बसून त्यांचं गाणं ऐकलं होतं. त्या वेळी मला पहिल्यांदा कळलं, की रसिक-श्रोते ताईंवर एवढं प्रेम का करतात! माझ्यासाठी तो विलक्षण व वेगळा अनुभव होता.

ताई या अत्यंत प्रयोगशील होत्या. त्यामुळं बऱ्याच वेळा आम्ही एक राग घरी ऐकला असेल, तर प्रत्येक वेळी त्या रागाची नवीन छटा ऐकायला मिळायची. रंगांमध्ये जशा वेगवेगळ्या छटा असतात, तशा त्यांच्या गायनातही छटा दिसून यायच्या. कार्यक्रमाची तयारी त्या दीडेक महिन्यापासून करायच्या; मात्र त्या दीड महिन्याच्या त्या कालावधीत त्या जे करायच्या त्याहून वेगळं सादरीकरण कार्यक्रमात व्हायचं, अशी विलक्षण प्रतिभा त्यांच्याकडं होती. अशी अद्भुत बुद्धिमत्ता असणं ही खरोखरीच वेगळी बाब आहे. ताईंची सर्जनशीलता अत्यंत महत्त्वाची होती. प्रत्येक वेळी त्या श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्‍वात घेऊन जायच्या.   

ताईंकडून पुष्कळ गोष्टी शिकायच्या राहून गेल्या आहेत. २० वर्षांमध्ये सगळ्याच गोष्टी शिकल्या जाऊ शकत नाहीत. प्राथमिक ढाचा जो त्यांनी आमच्याकडून करून घेतला, तो पाया इतका पक्का करून घेतला आहे, की त्याच्यामुळं आम्हाला तेवढी अडचण येत नाही. त्यांच्याकडून खूप नवीन गोष्टी शिकायच्या होत्या. आता त्यांचं उपलब्ध रेकॉर्डिंग हाच एकमेव आधार आहे.  

गेल्या आठवड्यात त्यांचा दिल्लीला एक कार्यक्रम होता, तेव्हा आमची शेवटची भेट झाली होती. प्रत्येक वेळी त्या वेगळं चलन ठेवायच्या, त्यानुसार नेहमीच्या राग पूरिया धनाश्रीमध्ये त्यांनी असं काही चलन ठेवलं होतं, की पाठीमागं बसणाऱ्या आम्हा तिघांना साथ देण्याची संधी मिळाली नाही. एक राग पूरिया धनाश्री दीड तास, मग मध्यंतर आणि दुसरा राग कौशिकानडा सव्वा-दीड तास चालला व कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांची ही अशी सर्जनशीलता फारच अप्रतिम होती. त्यांचे आणखीही काही कार्यक्रम ठरलेले होते; पण, आता ते होऊ शकणार नाहीत. सुदैवानं मी त्यांच्या शेवटच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो व मागं स्वरसाथ करू शकलो. ताईंकडं गाणं शिकणं ही एक ‘प्रोसेस’ होती. ते काही एका दिवसाचं काम नव्हतं. वर्षानुवर्षं त्यांच्याकडं राहिल्यावर त्यांचं गाणं कशा पद्धतीनं चाललं आहे, याचा अंदाज येऊ शके. मला त्यांच्या गाण्याचा अंदाज यायला चार-पाच वर्षं लागली. त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त काळ राहणं व शिकणं हीच महत्त्वाची गोष्ट होती, असं मला वाटतं आणि ही गोष्ट आमच्यासारख्या शिष्यवर्गाला लाभली, याचा आनंद आहे. ताईंकडं शिकणं ही एक ‘नेव्हर-एन्डिंग स्टोरी’ होती. त्या प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गोष्टी दाखवत राहत. तेवढी क्षमता त्यांच्यात होती. ताईंनी आम्हाला जे काही शिकवलं आहे आणि आमच्यावर जे काही संस्कार केले आहेत, तीच आता आमची शिदोरी आहे. ताईंसारखी कलावती शतकातून एकदाच निर्माण होते आणि त्या कलावतीबरोबर राहण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं...

(शब्दांकन - तेजल गावडे, चिन्मयी खरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com