अल्-अंदलुसचं सुवर्णयुग

नैर्ऋत्य युरोपच्या आयबेरियन द्वीपकल्पात वसलेला सुंदर देश म्हणजे स्पेन. पोर्तुगाल आणि स्पेन यांना मिळून आयबेरिया असं प्राचीन काळी संबोधलं जात असे...
Rahul Hande writes about history of Spain country Muslim monarchy
Rahul Hande writes about history of Spain country Muslim monarchysakal
Summary

मुस्लिम राजसत्तांच्या आधीन राहिलेला युरोपातील हा एकमेव देश आहे. इस्लामचं युरोपातील आगमनच स्पेनच्या माध्यमातून झालं. मुस्लिम राज्यकर्त्यांनी स्पेनवर थोडंथोडकं नव्हे तर, ७५० वर्षं राज्य केलं.

- राहुल हांडे

नैर्ऋत्य युरोपच्या आयबेरियन द्वीपकल्पात वसलेला सुंदर देश म्हणजे स्पेन. पोर्तुगाल आणि स्पेन यांना मिळून आयबेरिया असं प्राचीन काळी संबोधलं जात असे. सध्या ९७ टक्के रोमन कॅथॉलिक ख्रिश्चनांची लोकसंख्या असलेला स्पेन आज ख्रिश्चनराष्ट्र म्हणून ओळखला जातो. मात्र, एकेकाळी स्पेन हा मुस्लिम राजसत्तांच्या आधिपत्याखाली होता. मुस्लिम राजसत्तांच्या आधीन राहिलेला युरोपातील हा एकमेव देश आहे. इस्लामचं युरोपातील आगमनच स्पेनच्या माध्यमातून झालं. मुस्लिम राज्यकर्त्यांनी स्पेनवर थोडंथोडकं नव्हे तर, ७५० वर्षं राज्य केलं.

इसवीसनाच्या सातव्या शतकात झालेल्या मुस्लिम आक्रमणांपासून ते पंधराव्या शतकातील ‘बॅटल ऑफ ग्रॅनडा’पर्यंत मुस्लिम राजसत्तांनी स्पेनवर शासन केलं. हा काळ स्पेनच्या इतिहासातील सर्वात वैभवशाली कालखंड मानला जातो. दहाव्या शतकात मुस्लिम उमायाद राजसत्ता स्पेनमध्ये शिखरावर होती. त्या वेळी स्पेन हे युरोपातील सर्वांत श्रीमंत व समृद्ध साम्राज्य होतं. कॉर्डोव्हा, ग्रॅनडा यांसारखी स्पॅनिश शहर विज्ञान, वैद्यकशास्त्र, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रांत उर्वरित युरोपपेक्षा खूप आघाडीवर होती. महाविद्यालयं-विद्यापीठं, भव्य ग्रंथालयं, काव्य, चित्रकला, वास्तुकला अशा विविध क्षेत्रांत या काळात स्पेन बहरला होता. त्यामुळे हा काळ स्पेनचा सुवर्णकाळ समजला जातो. एवढंच नव्हे तर, इस्लामी राजवटीत स्पेन हा ख्रिश्चन,ज्यू व मुस्लिम असा बहुधर्मी व बहुसांस्कृतिक देश होता. ज्यू आणि ख्रिश्चन यांच्यावर काही धार्मिक बंधनं निश्चितच होती. असं असलं तरी त्यांचं सहअस्तित्व शांततापूर्ण व सौहार्दपूर्ण होतं.

या धार्मिक सहिष्णुतेमुळेच ‘इस्लामिक स्पेन’ इतर साम्राज्यांपेक्षा स्थिर राहिला. अनेक इतिहासकार या काळाची तुलना रोमनकाळाशी व ‘रेनेसाँ’च्या काळाशीही करतात. सोळाव्या शतकात मात्र स्पेनला उतरती कळा लागली. स्पेनमध्ये मुस्लिम सत्तेचं पतन सुरू झालं. इथं प्रश्न निर्माण होतो की, स्पेनची रोमन संस्कृती व मुस्लिम संस्कृती यांचं एवढं यशस्वी अभिसरण कसं झालं? सन २५८ मध्ये वैभवशाली रोमन साम्राज्याची दोन शकलं झाली. पश्चिम युरोपात बेझन्टाईन साम्राज्य अस्तित्वात आलं. स्पेन हा पूर्व रोमन साम्राज्याचा भाग होता. सन ४७६ मध्ये पूर्व रोमन साम्राज्याचं पतन झालं. त्यामुळे आयबेरियन द्वीपकल्पात इसवीसन पाचव्या ते आठव्या शतकापर्यंत व्हिसिगॉथ जमातीच्या राजसत्तेनंं राज्य केलं. युरोपात या घडामोडी सुरू असताना,

महंमद पैगंबर यांच्या निधनानंतर (सन ६३२) इस्लामी साम्राज्यविस्तारासाठी अरबस्तानात ‘रशीदून खिलाफत’ची स्थापना झाली होती. रशीदून खिलाफत पूर्व युरोपपर्यंत पोहोचली. सन ६६१ मध्ये रशीदून खिलाफतीचा पाडाव होऊन ‘उमय्यद खिलाफत’ उदयाला आली. उमय्यद खिलाफत आयबेरियन द्वीपकल्पापर्यंत येऊन थडकली. तेव्हा हा भूभाग आयबेरियाऐवजी हिस्पानिया या लॅटिन नावानं ओळखला जात असे. या वेळी राजा रॉड्रिकचा अनियंत्रित राज्य कारभार आणि विविध जमातींचे कलह यामुळे हिस्पानियामध्ये यादवी माजलेली होती. स्पेनमधील विविध जमाती रॉड्रिकला सार्वभौम राजा म्हणून मान्यता देण्यास तयार नव्हत्या. ही परिस्थिती उमय्यदांसाठी संधी ठरली. त्यांनी हिस्पानियावर आक्रमण केलं आणि राजा रॉड्रिकचा पराभव केला. यासंदर्भात एक कथा अशाही सांगितली जाते की, राजा रॉड्रिकनं आपला एक उमराव ज्युलियन याच्या मुलीशी दुष्कर्म केलं होतं. याचा सूड उगवण्यासाठी ज्युलियननं उमय्यद साम्राज्याचा उत्तर आफ्रिकेतील गव्हर्नर मूसा याची मदत घेतली. मूसानं आपला सेनापती तारीक इब्न झियादला सात हजारांची फौज घेऊन पाठवलं. या वेळी हिस्पानियाची सर्व जनता आपापसातील वैर विसरून राजा रॉड्रिकच्या पाठीमागं उभी राहिली. दक्षिण स्पेनमधील ग्वॉदलेएत नदीकाठी तारीकनं सन ७१२ मध्ये रॉड्रिकच्या तीस हजार सैन्याचा पराभव केला. यात राजा रॉड्रिक मारला गेला. ही लढाई इस्लामी इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. इथपासून उमय्यद राजसत्तेचा अंमल हिस्पानियात सुरू झाला.

मूसा आणि तारीक यांनी हळूहळू संपूर्ण हिस्पानिया जिंकला. यादवीमुळे गलितगात्र हिस्पानिया या आक्रमणाचा मुकाबला करू शकला नाही. सन ७२० पर्यंत व्हिसिगॉथ राजसत्ता हिस्पानियामध्ये औषधालाही उरली नाही. आता हिस्पानियाचा कारभार उमय्यद साम्राज्याची राजधानी दमास्कस इथून नियंत्रित केला जाऊ लागला. हिस्पानियाला उमय्यद साम्राज्यात ‘अल्-अंदलुस’ असं संबोधलं जाऊ लागलं.

सन ७५० मध्ये उमय्यद साम्राज्यात यादवी माजली आणि उमय्यद घराण्याचं पतन होऊन अबासिद खिलाफत स्थापन झाली. उमय्यद घराण्यातील अब्दल अल् रहमान-प्रथम हाच एक शासक आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरला. सीरियामार्गे तो हिस्पानियाला पोहोचला. त्यानं तिथला राज्य कारभार हाती घेतला. कॉर्डोव्हा ही या नव्या उमय्यद राज्याची राजधानी होती. भूमध्य सागरावर उमय्यदचा कब्जा असल्यामुळे प्राचीन रोमन समुद्री मार्ग पुनरुज्जीवित करण्यात आले. या समुद्री मार्गांवरूनच हिस्पानियात समृद्धी पोहोचली. कॉर्डोव्हा हे तत्कालीन जगातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक बनलं. उर्वरित युरोपात अंधारयुग सुरू असताना स्पेन साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञान, कला इत्यादी क्षेत्रांत तळपत होतं. स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते बांधण्यात आले. एक बलाढ्य सैन्य उभारण्यात आलं. दहाव्या शतकात राजा अब्दल अल् रहमान-तृतीयपर्यंत स्पेन एक शक्तिशाली, धार्मिक, सहिष्णू, सभ्य-सुसंस्कृत आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध साम्राज्य म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्याची राजधानी कॉर्डोव्हा हिला ‘इस्लामी संस्कृतीचा हिरा’ असं संबोधण्यात येऊ लागलं. बाराव्या शतकात या ऐश्वर्याला ग्रहण लागण्यास सुरुवात झाली. युरोपातील ख्रिश्चन राजसत्ता मुस्लिम सत्तांविरुद्ध एकवटू लागल्या होत्या. आठव्या शतकात सुरू झालेल्या रिक्वाँटेस्टा(पुनर्विजय) या त्यांच्या धोरणानं पुन्हा उचल खाल्ली होती. उमय्यद साम्राज्य हे समर्थ नेतृत्वाचा अभाव व गृहकलह यांमुळे छोट्या छोट्या भागांमध्ये विभागलं गेलं. राजा अब्दल अल् रहमान-तृतीयचा मुलगा अल् हकाम हा अल्पायुषी ठरला. त्यानं आपल्या हयातीतच आपला बारा वर्षांचा मुलगा अल् हशीम याला आपला वारस नेमला. अल्पवयीन राजामुळे राज्य कारभार सल्लागार मंडळाद्वारे सुरू होता. इथूनच साम्राज्याची गाडी रुळावरून घसरण्यास सुरुवात झाली. सन १००९ मध्ये तर पगार न मिळाल्यामुळे साम्राज्याच्या सैन्यानंच कॉर्डोव्हा राजधानी लुटली. बाराव्या शतकापर्यंत अल्-अंदलुसभोवती अनेक नवीन ख्रिश्चन राज्ये निर्माण झाली होती. सन १०८६ मध्ये आफ्रिकेतील ॲल्मोराविद या मुस्लिम सत्तेची मदत घेऊन हिस्पानिया वाचवण्यात यश आलं. मात्र, ॲल्मोराविद राज्यकर्ते धार्मिकबाबतीत किंचितही सहिष्णू नसल्यामुळे ख्रिश्चन-मुस्लिम धर्मसंघर्ष हाच अल्-अंदलुसच्या पतनाचं कारण ठरला. त्याच्यानंतर उत्तर आफ्रिकेतील दुसरे मुस्लिम राजकर्ते अल् मोहाद आले. त्यांच्याही हातातून ही भूमी निसटत गेली. अखेर, त्यांनी स्पेनच्या दक्षिणेकडे एक छोटं राज्य ग्रॅनडा स्थापन केलं. सन १४६९ मध्ये ऑस्ट्रियाची राणी इसाबेला आणि ॲरागॉनचा (तुर्कस्तान) राजा फर्डिनंड यांनी विवाह केला. त्यांनी दोन्ही राज्यांचं एकत्रीकरण करून ‘किंग्डम ऑफ स्पेन’ची स्थापना केली. अखेर, सन १४९२ मध्ये ग्रॅनडाचा पराभव होऊन स्पेनमधील सात शतकांच्या मुस्लिम राजसत्तेचं पतन झालं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com