आणखी एक नास्तिक!

महावीरांच्या काळात तामिळनाडू राज्यातील त्रिचुपल्ली जिल्ह्यातील तिरुप्पोतुर या गावात मक्खली व भेंडा या दाम्पत्याच्या पोटी एका मुलाचा जन्म झाला.
makhali ghoshal
makhali ghoshalsakal
Summary

महावीरांच्या काळात तामिळनाडू राज्यातील त्रिचुपल्ली जिल्ह्यातील तिरुप्पोतुर या गावात मक्खली व भेंडा या दाम्पत्याच्या पोटी एका मुलाचा जन्म झाला.

- राहुल हांडे handerahul85@gmail.com

मानवाच्या भावजीवनातील धर्म, आध्यात्म व मृत्यूनंतरचं जीवन या संकल्पनांना आव्हान देणारं अथवा त्या संकल्पनांची नव्यानं मांडणी करणारं शतक, म्हणून इसवीसनाचं सहावं शतक जगाच्या इतिहासात ओळखलं जातं.

भारतात भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, ग्रीक साम्राज्यात सॉक्रेटिस, प्लेटो, अॅरिस्टॉटल, चीनमध्ये लाओत्से-कन्फ्युशिअस अशा महापुरुषांनी धर्म, आध्यात्म व मृत्यूनंतरचं जीवन यांची फेरव्याख्या या शतकात केली. हे सर्व महात्मे समकालीन होत. हादेखील एक योगायोग. बुद्ध-महावीर यांच्या काळातच एक आणखी संप्रदाय निर्माण झाला आणि चौदावं शतक येता येता विलुप्तही झाला. या संप्रदायाच्या संस्थापकाची आणि तत्त्वज्ञानाची माहिती घेण्यासाठी आपल्याला बुद्ध-महावीर यांच्या काळात जावं लागतं. बौद्ध-जैन या तत्त्वज्ञानांप्रमाणेच हा संप्रदाय वैदिक तत्त्वज्ञान नाकारणारा आणि त्याला आव्हान देणारा आहे. या नास्तिक तत्त्वज्ञानानं बौद्ध-जैन कालखंडातील श्रमणचळवळीत आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं होतं.

महावीरांच्या काळात तामिळनाडू राज्यातील त्रिचुपल्ली जिल्ह्यातील तिरुप्पोतुर या गावात मक्खली व भेंडा या दाम्पत्याच्या पोटी एका मुलाचा जन्म झाला. मक्खली हे ‘मंखा’ म्हणून गुजराण करत असत. मंखा म्हणजे देवाची प्रतिमा बरोबर घेऊन धार्मिक गाणी गात फिरणारा. तत्कालीन तामिळनाडूतील मंखा हा एक समाज होता असं सांगितलं जातं. मक्खली व भेंडा हे अत्यंत हलाखीचं जीवन जगत होते. उपासमारीनं त्रस्त व बेघर असलेलं हे दाम्पत्य सरवणा नावाच्या गावात पोहोचलं. भेंडा ही त्या वेळी गर्भवती होती. दोघांची स्थिती पाहून एका मित्रानं त्यांना आश्रय दिला. राहण्यासाठी त्यांना एका गोशालेत, म्हणजेच गोठ्यात, जागा देण्यात आली. भेंडा त्या ठिकाणी प्रसूत झाली. मुलगा झाला. गोशाळेत जन्मला म्हणून गोशाल/गोसाल आणि मक्खलीचा पुत्र म्हणून मक्खली. दोन्ही शब्द मिळून मुलाचं नाव ‘गोशाल मक्खली’ अथवा ‘मक्खली गोशाल’ असं पडलं. ‘मक्खली गोशाल’ हे भारताच्या महान तत्त्वज्ञानपंरपेरतील एक सुवर्णपान आहे. असं असलं तरी त्यांचे माता-पिता आणि जीवन यासंदर्भात निश्चित माहिती उपलब्ध नाही.

‘भगवती सूत्र’ आणि बौद्ध-विद्वान बुद्धघोष यांच्या नोंदीवरून मक्खली गोशाल यांच्या जीवनासंदर्भात अत्यंत अल्प माहिती मिळते. ‘भगवती सूत्र’ या ग्रंथानुसार, मक्खली गोशाल यांनी पित्याचा व्यवसाय स्वीकारला व तेही ‘मंखा’ बनले. बुद्धघोष यांच्या दाव्यानुसार, मक्खली गोशाल यांचा जन्म गुलामगिरीत झाला होता. एक दिवस काही कारणामुळे संतप्त झालेल्या मालकाच्या घरून ते पळून गेले. ते पळून जात असताना मालकानं त्यांची सर्व वस्त्रं काढून घेतली, असं सांगितलं जातं. मक्खली गोशाल यांच्याविषयीची ही सर्व माहिती समकालीन बौद्ध-वाङ्मयावरून आणि जैन-वाङ्मयावरून उपलब्ध होते. ‘एक प्रतिस्पर्धी तत्त्ववेत्ता’ म्हणून बौद्ध-साहित्यात आणि जैन-साहित्यात उपरोधानं ही माहिती आली असावी, असं काही अभ्यासक मानतात.

पाणिनी यांच्या मांडणीनुसार, मक्खली गोशाल यांचं खरं नाव ‘मस्करीन’ असं असावं. जैन प्राकृतात ते ‘मक्खली’ आणि बौद्ध प्राकृतात ते ‘मखली’ झालं. ‘मस्करीन’ या शब्दाचा अर्थ ‘बांबूची काठी घेऊन जाणारा’ (मस्करा) असं पाणिनी सांगतात, तसंच मस्करीनला ‘एकदंडिन’ असंही ते संबोधतात.

सॉक्रेटिस ज्याप्रमाणे अथेन्सच्या रस्त्यांवर फिरत फिरत ज्ञानदान करत, त्याचप्रमाणे मक्खली गोशाल हे आपल्या शिष्यांना ज्ञानदान करत. त्यांच्या या फिरत्या विद्यालयाला ‘मस्करीन’ अस म्हटलं जात असे. ‘भगवती सूत्रा’त म्हटलं आहे की, भगवान महावीरांनी तपश्चर्या सुरू केल्यानंतर तीन वर्षांनी मक्खली गोशाल आणि त्यांची भेट झाली. महावीरांचं शिष्यत्व पत्करून त्यांनी सहा वर्षं त्यांच्याबरोबर प्रवास केला. एके दिवशी महावीर आणि मक्खली गोशाल हे सोबत फिरत असताना एका झाडाजवळ आले. त्या वेळी मक्खली गोशाल यांनी महावीरांना विचारलं, ‘‘वनस्पती आणि त्यांचं बीज यांना नशीब असू शकतं का?’ महावीर म्हणाले, ‘वनस्पती फळाला येईल आणि बिया असलेल्या शेंगा त्या वनस्पतीला लागतील. त्या बियांमधून पुन्हा तशीच वनस्पती जन्माला येईल. हे चक्र असंच सुरू राहील.’

महावीरांचं भाकीत खोडून काढण्यासाठी मक्खली गोशाल त्या रात्री त्या वनस्पतीजवळ गेले आणि त्यांनी ती उपटून टाकली. मात्र, त्याच रात्री अचानक आलेल्या पावसानं वनस्पतीचं पुनरुज्जीवन झालं आणि ती पुन्हा रुजली. हा सर्व प्रकार त्यांनी महावीरांना सांगितला आणि, आपला कयास खोटा ठरला, अशी कबुली दिली. ‘आपण एखाद्याची नियती बदलू शकतो,’ या मक्खली गोशाल यांच्या तत्त्वाला या घटनेमुळे धक्का बसला.

पुनरुज्जीवन आणि नियती आपल्या हातात नाही, या तत्त्वानं मक्खली गोशाल प्रभावित झाले. त्यांनी भविष्यात आपल्या स्वतंत्र तत्त्वज्ञानाची निर्मिती याच तत्त्वाच्या पायावर केली...प्रत्येक सजीव अशा प्रकारे पुनरुज्जीवित होण्यासाठी सक्षम असतो आणि त्याची निश्चित असलेली नियती कुणालाही बदलता येत नाही. यामुळेच मक्खली गोशाल यांचं तत्त्वज्ञान ‘आजीविका तत्त्वज्ञान’ म्हणून ओळखलं गेलं.

सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचा पुत्र बिंबिसार आणि त्याची पत्नी यांनी ‘आजीवक संप्रदाय’ स्वीकारला होता असं सांगितलं जातं. ‘भगवती सूत्र’सारख्या जैन-वाङ्मयात मक्खली गोशाल यांच्या पुनरुज्जीवन-संकल्पनेचा संबंध पुनर्जन्माशी जोडण्यात आला.

महावीर आणि मक्खली गोशाल यांचे याच सिद्धान्तावरून मतभेद होऊन दोघं अखेर विभक्त झाले. यासंदर्भात जैन-वाङ्मयात काही कथा सांगितल्या गेल्या आहेत...एका कथेनुसार, महावीर आणि मक्खली गोशाल यांचं युद्ध झालं... त्यात मक्खली गोशाल यांचा पराभव झाला. कदाचित्, इथं तात्त्विक वाद-विवादात महावीरांनी मक्खली गोशाल यांचा पराभव केला, असं अपेक्षित असावं.

भारतातील पाचपैकी एका नास्तिक तत्त्वज्ञानाचे रचनाकार असलेले मक्खली गोशाल यांचं निर्वाण सन ४८४ मध्ये झालं, असं प्रख्यात इतिहासकार ए. एल. बॅशम यांनी ‘महावंस’ या ग्रंथाच्या आधारे सिद्ध केलं आहे. इसवीसनाच्या चौदाव्या शतकापर्यंत त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव कमी-अधिक प्रमाणात जाणवतो. त्यानंतर मात्र हे तत्त्वज्ञान विलुप्त झालं. असं असलं तरी मक्खली गोशाल यांचं ‘कृती करू नका, अलिप्त शांतता आणि एकान्त तुम्हाला इष्ट आहे,’ हे विधान जीवनात काही प्रसंगी तरी महत्त्वाचं वाटल्याशिवाय राहत नाही.

(सदराचे लेखक धर्म, इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com