इजिप्शियन डॉक्टर!

सामान्य सर्दी, पचन समस्या आणि डोकेदुखी यावर आपण उपचार करणार नाही असं आज एखाद्या डॉक्टरने जाहीर केलं, तर मोठा गहजब होऊ शकतो.
इजिप्शियन डॉक्टर!
Summary

सामान्य सर्दी, पचन समस्या आणि डोकेदुखी यावर आपण उपचार करणार नाही असं आज एखाद्या डॉक्टरने जाहीर केलं, तर मोठा गहजब होऊ शकतो.

- राहुल हांडे handerahuk85@gmail.com

सामान्य सर्दी, पचन समस्या आणि डोकेदुखी यावर आपण उपचार करणार नाही असं आज एखाद्या डॉक्टरने जाहीर केलं, तर मोठा गहजब होऊ शकतो. कारण आजकाल आपण आणि आपल्या भोवतालच्या सर्व लोकांच्या या सर्वांत मोठ्या समस्या आहेत. शांतपणे विचार केल्यास या तीन समस्यांवर आजही रामबाण उपचार उपलब्ध नाहीत. हे आपल्या सहज लक्षात येऊ शकतं. त्यामुळे आज काही अपवाद वगळता कोणताही डॉक्टर असं धाडस करण्याची शक्यता कमीच म्हणावी लागेल.

इसवी सनपूर्व चार हजार वर्षांपूर्वी हे धैर्य इजिप्शियन डॉक्टरांनी दाखवलेलं आहे. त्यांनी या आरोग्यविषयक तीन तक्रारींमध्ये डॉक्टर हस्तक्षेप करणार नाहीत, असं स्पष्ट सांगितलं होतं. याला एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे, त्या काळात इजिप्शियन लोकांनी वैद्यकशास्त्रात मोठी प्रगती केलेली होती.

इजिप्शियन लोकांनी आपल्या भटक्या जीवनाचा त्याग करून स्थिर जीवनास प्रारंभ केला, त्याचबरोबर त्यांच्या वैद्यकीय संशोधनाला चालना मिळाली. आरोग्य संकल्पनेची सुरुवातच इजिप्तमधून झाली, असा दावा काही अभ्यासक करतात. लिखित भाषा आणि गणित यांचा शोध लावलेला इजिप्शियन समाज एक संरचित समाज होता. गणना आणि नोंदी करण्याची सोय त्यांच्याकडे उपलब्ध होती. त्यामुळे त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाचं जतन व्यवस्थितपणे होऊ शकलं.

आज प्राचीन इजिप्तच्या वैद्यकीय ज्ञानावर प्रकाश टाकणारे ‘एबर्स पपायरस’सारखे ग्रंथ जगातील सर्वांत जुनं वैद्यकीय साहित्य म्हणून ओळखले जातात. प्राचीन इजिप्तमध्ये प्रारंभी मंदिराचे पुजारी वैद्यकीय उपचार करत. हे सर्व ‘सेखमेट’ या युद्ध, उपचार, शाप आणि धमक्यांच्या देवीचे उपासक होते. कदाचित त्यामुळेच इजिप्शियन आरोग्य संकल्पनेत प्रार्थनेला महत्त्व देण्यात आलं असावं.

तसंच, विज्ञानाप्रमाणेच उपचारांमध्ये मंत्र, जादू, ताबीज, टॅटू आणि पुतळे यांना इजिप्शियन वैद्यकीय क्षेत्रात कायम महत्त्वाचं स्थान राहिलं. प्राचीन इजिप्शियन लोक आरोग्य समस्यांवर उपाय म्हणून प्रार्थनेवर सर्वाधिक विश्वास ठेवत होते; परंतु त्यांच्याकडे औषधी वनस्पतींसारखे नैसर्गिक उपायदेखील होते. कोणत्याही रोगनिर्मितीत देव, भूत आणि आत्मे यांची महत्त्वाची भूमिका असते, असा या लोकांचा विश्वास होता. काळाच्या ओघात पुजाऱ्यांमधून वेगळं होत वैद्य अथवा डॉक्टर हा स्वतंत्र पेशा झाला. असं असलं तरी इजिप्तच्या प्रख्यात ममिफिकेशनचं काम पुजारीच करत होते, वैद्य ममिफिकेशन करत नव्हते. याकाळात इजिप्तमध्ये रुग्णालयं आणि वैद्यकीय महाविद्यालयं अस्तित्वात आली होती. विशेष म्हणजे, यामध्ये महिला डॉक्टरदेखील होत्या आणि काही महिला डॉक्टर ‘डीन’ अथवा ‘अधिष्ठाता’ म्हणून कार्यरत असल्याच्या नोंदी इसवी सनपूर्व २४०० पासून सापडतात.

इजिप्तचा सर्वदूर पसरलेला व्यापार तेथीलवैद्यकीय क्षेत्राच्या विकासास उपयुक्त ठरला. इजिप्शियन व्यापारी दूरपर्यंत प्रवास करून परतताना विविध देशांतून तेथील औषधी वनस्पती आणि मसाले घेऊन येत असत. मृतांच्या ममिफिकेशनमुळे मानवी शरीररचना आणि त्याचं कार्य अभ्यासायला संधी मिळाली. त्यामुळेच एक लांब आकड्यासारखं उपकरण नाकपुडीतून घालून मेंदू काढण्याचं तंत्र तेथील डॉक्टरांना विकसित करता आलं होतं. एबर्स पपायरससह अनेक ग्रंथांमध्ये याची नोंद असलेली आढळते. इजिप्शियन वैद्यांनी हृदयाचा अतिशय सखोल अभ्यास केलेला होता.

आजपासून चार हजार वर्षांपूर्वी त्यांनी हृदयाचं वर्णन करताना हृदय हे शरीराच्या रक्तपुरवठ्याचं केंद्र आणि शरीराचा प्रत्येक कोपरा रक्तवाहिन्यांशी संलग्न आहे, असं मत नोंदवलं होतं. हृदयासंदर्भातील त्यांचं अन्य विवेचन आज मात्र आपल्याला हस्यास्पद वाटू शकतं. त्यांच्या मते अश्रू, मूत्र, वीर्य हेदेखील रक्तवाहिन्यामधूनच वाहून नेलं जातं आणि हृदय हे त्यांचं मिलन-केंद्र आहे. असं असलं तरी, हृदय आणि रक्तवाहिन्यांचा त्यांनी केलेला अभ्यास आजही वैद्यकशास्त्रासाठी महत्त्वाचा आहे. विविध वैद्यकीय पपायरसमध्ये ७०० हून अधिक उपाय, काही जादुई सूत्रं आणि अनेक मंत्रांचा समावेश असलेला दिसतो, ज्यांचा उद्देश रोगाला कारणीभूत ठरलेल्या भुतांचं अथवा दुष्ट आत्म्यांचं निवारण करणे हा होता.

इजिप्शियन डॉक्टरांनी हाडांची संरचना, मेंदू आणि यकृत यांच्या अभ्यासातदेखील काही प्रगती केलेली होती, याचे पुरावे उपलब्ध आहेत. एका ममीच्या पायाला लाकडाचा कृत्रिम अंगठा लावलेला आढळून आलेला आहे. हा अंगठा आपल्या नैसर्गिक अंगठ्याप्रमाणेच काम करत होता, हेदेखील दिसून आलं आहे. पपायरस दस्तऐवजात स्मृतिभ्रंश आणि नैराश्य यांसारख्या मानसिक विकारांची कारणं, वैशिष्ट्यं व उपचार यांचं तपशीलवार वर्णन केलेलं दिसतं. अवरोधित रक्तवाहिन्या, दुष्ट आत्मे आणि क्रोधित देव यांच्या संयुक्त प्रभावामुळे मानसिक समस्या उत्पन्न होतात, असं मत नोंदवण्यात आलेलं आहे.

कुटुंब नियोजनासंदर्भात प्राचीन इजिप्शियन डॉक्टर विविध उपचार करत होते, ज्यामध्ये गर्भनिरोधक म्हणून योनीच्या प्रवेशद्वारात मगरीच्या शेणाचा प्लग टाकणे, गर्भावस्थेचं निदान करणे आणि इतर काही स्त्रीरोगविषयक समस्यांवर उपचार यांचा समावेश आहे. विविध देवतांचा उल्लेख या वैद्यकशास्त्रात करण्यात आलेला आहे. ‘हेका’ ही जादू आणि औषधाची देवता, ‘बेस’ ही देवता गर्भधारणेदरम्यान स्त्रियांची संरक्षक देवता, तर विंचू चावल्यास ‘सर्केट’ देवतेला आवाहन करायचं. होमिओपॅथीची प्रारंभिक संकल्पनादेखील इजिप्शियन डॉक्टरांनी मांडलेली दिसते. प्राचीन इजिप्शियन समाजात डॉक्टर हा अत्यंत सन्माननीय व्यवसाय होता. डॉक्टरकी करणारा माणूस साक्षर आणि शरीर व आत्मा यांनी स्वच्छ असला पाहिजे, हा महत्त्वाचा निकष होता.

इसवी सनपूर्व २७०० मध्ये असलेला इजिप्तचा राजा डायझर याच्या दरबारात असलेला ‘हेसीरा’ हा दंतवैद्य आणि डॉक्टरांचा प्रमुख इतिहासात नोंद असलेला सगळ्यात जुना डॉक्टर सांगितला जातो. याकाळी इजिप्तच्या रुग्णालयांमध्ये दंतचिकित्सक, प्रोक्टोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि नेत्ररोगतज्ज्ञ असे विशेषज्ञ होते. शहामृगाच्या अंड्यांचा वापर करून कवटीचं हाड जोडणारे शल्यचिकित्सक या वेळी होते; जे चिमटा, चमचे, करवत, जळत्या उदबत्ती, कंटेनर, हूक, चाकू इत्यादींचा वापर करत. समृद्ध असं इजिप्शियन वैद्यकशास्त्र आणि डॉक्टर यांच्या ज्ञानाचा उपयोग त्या वेळी देशविदेशांतील राजेरजवाड्यांनी करून घेतला. इजिप्शियन डॉक्टरांनी आपल्या अथक प्रयत्नांतून आधुनिक वैद्यकीय क्षेत्राच्या अनेक वाटांचा प्रारंभ केलेला दिसतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com