‘मिसफिट’ जीवनसंदेश

झांबियातील लुआंग्वा नॅशनल पार्क म्हणजे लाखो वन्य प्राण्यांचं हक्काचं घर. आफ्रिकी सिंहासाठीही हे पार्क ओळखलं जातं.
Leopard
LeopardSakal
Summary

झांबियातील लुआंग्वा नॅशनल पार्क म्हणजे लाखो वन्य प्राण्यांचं हक्काचं घर. आफ्रिकी सिंहासाठीही हे पार्क ओळखलं जातं.

- राहुल हांडे handerahul85@gmail.com

झांबियातील लुआंग्वा नॅशनल पार्क म्हणजे लाखो वन्य प्राण्यांचं हक्काचं घर. आफ्रिकी सिंहासाठीही हे पार्क ओळखलं जातं. कुटुंबसंस्थेच्या नियमांचं व शिस्तीचं पालन करून जगणारा ‘जंगलचा राजा’ म्हणजे सिंह. लुआंग्वामध्ये सिंहांचे काही ‘परिवार’ वास्तव्य करतात. त्यापैकी एका बलाढ्य परिवाराला वन्यजीव संरक्षक-संशोधक-संवर्धक मंडळी ‘एनसेफ्यू प्राईड’ (Nsefu pride) म्हणून संबोधतात. सन २०११ मध्ये या ‘प्राईड’वरच्या माहितीपटासाठी नॅशनल जिओग्राफिक चॅनलतर्फे चित्रीकरणाचं काम सुरू होतं.

त्या वेळी चित्रीकरण करणाऱ्या टीमचं लक्ष या परिवारातील एका नवजात छाव्यानं वेधलं. सन २०११ मध्ये एनसेफ्यू परिवारात सहा नवीन सदस्यांचं आगमन झालं होतं. त्यांच्यापैकी हा छावा जंगलच्या कायद्यानुसार जन्मतःच जगण्यासाठी अक्षम होता. नॅशनल जिओग्राफिक टीमनं त्याचं नामकरण ‘मिसफिट’ असं केलं आणि ‘मिसफिट’वरच एक विशेष भाग तयार करण्यात आला. आपल्या जीवनसंघर्षामुळे ‘मिसफिट’नं त्या वेळी जगाचं लक्ष स्वतःकडे वेधलं होतं. आपल्या भावंडांच्या तुलनेत अत्यंत दुबळा असलेला ‘मिसफिट’ सर्वाथानं जगण्यास असमर्थ होता. त्याच्या भांवडांनी त्याच्याशी दोन-चार वेळा मैत्री करण्याचा आणि खेळण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, हा आपल्या काही कामाचा नाही. दुबळा आणि आत्मविश्वाचा अभाव असलेला ‘मिसफिट’ त्यामुळे कायमच मागं राहू लागला. परिवाराबरोबर असूनही त्याला आपल्या एकटेपणाची जाणीव होऊ लागली होती. आफ्रिकेच्या जंगलात जगण्याची सर्वात मोठी कसोटी म्हणजे तिथला उन्हाळा.

उन्हाळ्यात शिकारीच्या व पाण्याच्या दुर्भिक्ष्याला तोंड देऊन जे प्राणी जगतात तेच पुढील जीवनाचा आनंद उपभोगू शकतात. ‘मिसफिट’च्या आयुष्यातील पहिला उन्हाळा त्याच्या समोर येऊन ठाकला. जगण्यास सर्वाथानं समर्थ प्राणी जिथं उन्हाळ्यात जगण्यासाठी घनघोर संघर्ष करताना दिसतात, तिथं ‘मिसफिट’चा टिकाव लागणं अशक्यच होते. हा त्याचा पहिला व अखेरचा उन्हाळा ठरण्याची शक्यताच अधिक होती.

एका रात्री आपल्या भुकेल्या परिवारासाठी ‘मिसफिट’ची आई आणि मावश्या शिकारीच्या शोधात दूरवर गेल्या होत्या. अचानक काही तरी गदारोळ झाला आणि एनसेफ्यू प्राईड विखुरला. रात्री ज्या ठिकाणी ‘मिसफिट’ आपल्या भावंडांबरोबर होता, तिथं सकाळी तो एकटाच असल्याचं आढळून आलं. त्याची दोन भावंडं दूरवर भरकटली होती. मात्र, ‘मिसफिट’च्या एका मावशीनं या तिघांना शोधलं आणि त्यांना परत घेऊन आली. अशा प्रकारे परिवार पुन्हा एकत्र आला. ‘मिसफिट’ला अद्याप कुणीही समवयस्क मित्र मिळालेला नव्हता. तो कधी कधी आपला पिता आणि काही किशोरवयीन सिंहांशी सलगी करण्याचा प्रयत्न करायाचा; परंतु कुणी त्याच्याकडे साधं लक्षही देत नव्हतं. एक दिवस ‘मिसफिट’ झोपला होता. आपला परिवार आपल्याला सोडून गेला आहे असं, जाग आल्यावर, त्याच्या लक्षात आलं.

‘मिसफिट’ त्यांचा शोध घेऊ लागला. आपल्या आईला हाका मारू लागला. अखेर दिवस ढळला आणि रात्र झाली. जंगलातील सर्व शिकाऱ्यांचा ‘कामकाजा’चा हा काळ. आता एकट्याच वावरणाऱ्या ‘मिसफिट’च्या जिवाला पावलापावलावर धोका होता. त्याच्या परिवाराचा शेजारी असलेला एका चित्ता अचानक ‘मिसफिट’च्या समोर उभा ठाकला. सिंहाची पिल्लं ही चित्त्यांची आवडीची शिकार. ‘मिसफिट’च्या रूपात ती या चित्त्यासमोर आयतीच आली होती. चित्ता ‘मिसफिट’वर झडप घालणार तोच एक हिप्पो शिकार आणि शिकारी यांच्या मध्ये आला. त्यानं चित्त्याला तिथून पिटाळून लावलं आणि ‘मिसफिट’ला वाचवलं. ‘मिसफिट’ आता काहीसा सुरक्षित होता. रात्रभर अथकपणे चालत असलेला ‘मिसफिट’ अखेर आपल्या परिवारापर्यंत पोहोचला. तिथं पोहोचल्यावर परिवारातल्या किशारेवयीनांनी त्याच्याशी अत्यंत क्रूरपणे वागायला सुरुवात केली. किशोरवयीनांच्या ‘रॅगिंग’मुळे ‘मिसफिट’च्या पायात किंवा कमरेत फ्रॅक्चर झालं होतं. त्यामुळे आधीच जीव जड असलेल्या ‘मिसफिट’ला चालणंही मुश्किल झालं. त्याच वेळी त्याच्यावर एक आणखी मोठा आघात झाला. त्याच्या आईनं त्याला दूध पाजण्यास नकार दिला. त्याच्या आईनं त्याला कायमचं त्यागलं होतं. एखादं पिल्लू जगण्यास अक्षम असेल तर त्याची माताच त्याला आपल्यापासून कायमचं दूर करतं.

आईनं त्यागलेल्या ‘मिसफिट’ला त्याच्या परिवारानंही पुन्हा एकदा त्यागलं. परिवार दूर निघून गेला. ‘मिसफिट’ही मागं रेंगाळला नाही. तो पाय ओढत त्यांच्या मागं चालत गेला आणि परिवाराला अखेर त्यानं गाठलंच. त्यांच्यात गेल्यानंतर त्यांनी त्याची दखलही घेतली नाही. त्याच्या आईनं त्याला दूध पाजणं दुसऱ्यांदा नाकारलं. उपासमारीमुळे मिसफिट अत्यंत अशक्त झाला होता. त्याला चालणं अशक्य झालं होतं. तो घेरी आल्याप्रमाणे जागेवरच गोल गोल फिरत होता. त्याचा परिवार पाणवठ्यावर पाणी प्यायला गेला तेंव्हा ‘मिसफिट’ मागं पडला होता. त्यामुळे तो चुकीच्या मार्गानं पाण्याजवळ जाऊ लागला. पाण्यातील मगरी शिकारीची वाट पाहत टपूनच होत्या. ‘मिसफिट’चा जीव धोक्यात आहे हे त्याच्या आईच्या लक्षात आलं. तिनं तिथं जाऊन ‘मिसफिट’ला आपल्या जबड्यात उचलेलं आणि त्याचे प्राण वाचवले. आईबरोबर ‘मिसफिट’ भरपूर पाणी प्यायला. परिवार पुन्हा मार्गस्थ झाला.

परिवाराच्या मागं ‘मिसफिट’ही पाय ओढत चालला होता. अचानक त्याचं एक भावंड थांबलं आणि मागं वळून त्याला आपल्याबरोबर येण्यास त्यांच्या पद्धतीनं खुणावू लागलं. ‘मिसफिट’च्या आनंदाला पारावार उरला नाही. थोड्या वेळानं त्याच्या आईनं त्याला दूधदेखील पाजलं. जणू काही आज ‘मिसफिट’ त्याच्या परिवारात ‘फिट’ ठरला होता. कारण, त्यानं प्रत्येक संकटात स्वतःला सिद्ध केलं होतं.

काही काळानं ‘मिसफिट’ किशोरवयाचा झाला. त्याच्या परिवाराचं नेतृत्व करणारे दोन्ही सिंह उपासमारीच्या परिस्थितीमुळे पळून गेले होते. शिकार मिळण्याची शक्यता लुआंग्वा नदीच्या पलीकडेच होती. मगरींनी भरलेली नदी ओलांडणं अत्यंत जोखमीचं होतं. ‘मिसफिट’च्या आईनं आपलं सर्व कौशल्य पणाला लावून परिवाराला नदीच्या पल्याड नेलं. जंगलाच्या त्या भागात तीन सिंहांचं राज्य होतं. आता परिवारात मूळचे दोन सिंह नसल्यामुळे ‘मिसफिट’चा परिवार कमजोर झालेला होता. शिकार मिळाली तरी तरसांपासून तिचं रक्षण करणं अवघड होतं. अशा वेळी ‘मिसफिट’नं परिवाराचं नेतृत्व केलं. एका जंगली रेड्याची शिकार करून त्यानं आपल्या परिवाराला उपासमारीपासून वाचवलं. एवढंच नव्हे तर, परिवाराला त्यानं नदीपलीकडे आपल्या भागात सुरक्षितपणे नेलं. ‘मिसफिट’ आता आपल्या परिवाराचा नेता झाला होता. आता तो एक बलाढ्य सिंह म्हणून तो लुआंग्वाच्या जंगलावर राज्य करणार होता.

सन २०१५ मध्ये एका जंगली रेड्यांच्या शिकारीत जखमी झालेला लुआंग्वाचा हा राजा ‘मिसफिट’ मरण पावला. जगण्यासाठी सगळेच फिट असतात. फक्त संघर्षाच्या प्रसंगी टिकण्याचं व स्वतःला सिद्ध करण्याचं धैर्य दाखवता आलं पाहिजे. जगण्यासाठी स्वतःला फिट करणारा कधीच मिसफिट राहू शकत नाही, हाच जीवनसंदेश ‘मिसफिट’सारख्या मुक्या प्राण्यानं मानवप्राण्याला दिलेला दिसतो.

(सदराचे लेखक धर्म, इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com