पुस्तकात लपलेला आशेचा किरण

न्यू मेक्सिकोमधील पत्रकार एल्जरनॉन डी’एमासा यांनी जगातील अनेक पत्रकारांप्रमाणे कोरोनाकाळात प्रचंड काम केलं. महामारीच्या काळातील इटलीतील घडामोडी त्यांनी आपल्या वृत्तांकनातून जगापर्यंत पोहोचवल्या.
पुस्तकात लपलेला आशेचा किरण
Summary

न्यू मेक्सिकोमधील पत्रकार एल्जरनॉन डी’एमासा यांनी जगातील अनेक पत्रकारांप्रमाणे कोरोनाकाळात प्रचंड काम केलं. महामारीच्या काळातील इटलीतील घडामोडी त्यांनी आपल्या वृत्तांकनातून जगापर्यंत पोहोचवल्या.

- राहुल हांडे handerahul85@gmail.com

न्यू मेक्सिकोमधील पत्रकार एल्जरनॉन डी’एमासा यांनी जगातील अनेक पत्रकारांप्रमाणे कोरोनाकाळात प्रचंड काम केलं. महामारीच्या काळातील इटलीतील घडामोडी त्यांनी आपल्या वृत्तांकनातून जगापर्यंत पोहोचवल्या. मास्क व सॅनिटायझरसह ते कामासाठी बाहेर पडत. तिसरीही गोष्ट घ्यायला ते विसरत नसत व ती म्हणजे एक छोटेखानी पुस्तक. आपल्या एका रिपोर्टमध्ये ते या पुस्तकाचा उल्लेख करतात, ‘महामारीची ती सुरुवात होती. सर्वत्र तणावाचं वातावरण होतं. शाळा-महाविद्यालयं बंद होत होती. सर्व समारंभ रद्द करण्यात आले होते आणि सामाजिक संपर्क ठप्प झाला होता. इटलीत परिस्थिती अत्यंत भयानक होती. शेकडो लोक रोज मरत होते. काम करत असताना एक दिवस माझा मित्र मला म्हणाला, ‘मला खूप भीती वाटत आहे. स्वतःचा राग येत आहे.’ त्या मित्राप्रमाणेच मीसुद्धा भय आणि अनिश्चितता यांचं वातावरण अनुभवत होतो, तशा मनःस्थितीतून जात होतो. मात्र, एका पुस्तकानं त्या काळात मला मोठाच आधार दिला.’’

एल्जरनॉन यांना आधार देणारं कोणतं होतं हे पुस्तक? आणि त्यात असं काय होतं? ज्यामुळे एल्जरनॉन भयाण वातावरणातून सावरू शकले? ते पुस्तक होतं ‘द एन्कायरिडियन.’

इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात लिहिलं गेलेलं हे पुस्तक आज एकविसाव्या शतकात कदाचित अधिक उपयुक्त ठरावं. जागतिक महामारीचा हा काळ एका अर्थानं वैश्विक उदासीचा काळ होता. या काळानं प्रत्येकाला सुरक्षित कोशातून बाहेर काढून समस्यांनी भरलेल्या वातावरणात आणून उभं केलं आहे. दुसऱ्या शतकात अशाच अवस्थेत महान स्टोइक तत्त्ववेत्ता एपिक्टिटस यानं हे पुस्तक लिहिलं आहे. त्याला गुलामाचं जिणं जगावं लागलं होतं. त्याचा

जन्म सन ५० च्या आसपास रोमन साम्राजातील फ्रिगिया प्रांतातील हिरापोलिस इथं झाला.

विद्यमान काळात हिरापोलिस म्हणजे पामुकेल आणि फ्रिगिया म्हणजे तुर्कस्तान. गुलामांना माणूस म्हणून कोणतेही अधिकार नसण्याचा तो काळ होता. एपिक्टिटस या नावावरूनही

आपण गुलामांची अवस्था समजू शकतो. एपिक्टिटस म्‍हणजे ‘मिळवलेला’,‘अधिग्रहित’ वा ‘विकत घेतलेला’. ‘प्लेटोन एपिक्टिटस’ या शब्दाची व्याख्या ‘एखाद्याच्या वंशपरंपरागत मालमत्तेत समाविष्ट मालमत्ता.’

पंधराव्या वर्षी एपिक्टिटसला रोमला नेण्यात आलं. तत्कालीन रोमन सम्राट नीरो पंचम याच्या सचिवाच्या घरी तो गुलाम म्हणून काम करू लागला. एपिक्टिटस गुलाम असल्यामुळे त्याला साधे मानवी हक्क नव्हते, तर विद्यार्जन कुठलं? तरी त्याला तत्त्वज्ञानाची तीव्र ओढ होती.

त्याचं नशीब बलवत्तरच म्हणावं लागेल. त्याचा मालक एपॅफ्रोडिटस याच्या उदारतेमुळे त्याला मुसोनियस रुफसच्या हाताखाली स्टोइक तत्त्वज्ञानाचा अभ्यास करता आला. शिक्षणामुळे त्याचा सामाजिक दर्जा उंचावण्यास मदत झाली. काही काळानं त्याला अपंगत्व आलं. मात्र, याबद्दल संशोधकांमध्ये मतमतांतरं दिसून येतात. याबाबत, मालकानं केलेल्या मारहाणीत त्याचा पाय अधू झाला, असं ओरिजननं लिहिलं आहे, तर तो लहानपणापासूनच अधू होता, असं सिम्पिलसिअसनं म्हटलं आहे.

एक मात्र खरं की एपिक्टिटस हा जीवनाच्या उत्तरार्धात एका पायानं अधू होता. इसवीसन ६३ मध्ये नीरो पंचमच्या मृत्यूनंतर एपिक्टिटसची गुलामगिरीतून मुक्तता करण्यात आली. गुलामीतून मुक्त झालेला एपिक्टिटस नंतर तत्त्वज्ञानाचा शिक्षक म्हणून उपजीविका करू लागला. ‘सर्व तत्त्वज्ञांना रोम शहरातून हद्दपार करावं,’ असा फतवा सन ९३ मध्ये रोमन सम्राट डोमिशिअननं काढला. त्यामुळे एपिक्टिटस हा निकोपोलिस शहरात वास्तव्याला गेला. त्यानं तिथं तत्त्वज्ञानाची शाळा म्हणजे अकादमी सुरू केली. अत्यंत साधेपणा ही त्याची जीवनशैली होती. अविवाहित असलेल्या एपिक्टिटसनं आयुष्याच्या शेवटी एका मित्राच्या मुलाला दत्तक घेतलं. या मुलाला असाध्य आजार होता. सन १३५ च्या दरम्यान एपिक्टिटसचा मृत्यू झाला. एपिक्टिटसचा सर्वात प्रसिद्ध शिष्य म्हणजे एरियन. सन १०८ च्या सुमारास त्यानं एपिक्टिटसच्या अकादमीत प्रवेश घेतला.

आपल्या गुरूचं तत्त्वज्ञान चिरंतन करण्याचं काम एरियननं केलं. एपिक्टिटसच्या मृत्यूनंतर एरियननं त्याचं तत्त्वज्ञान संकलित केलं. ही छोटी पुस्तिका आज जगात ‘द एन्कायरिडियन’ म्हणून ओळखली जाते. एपिक्टिटसच्या व्याख्यानांमधून एरियननं हे संकलन केलं आहे. असं असलं तरी एरियननं त्यातील अमूर्त व अलौकिक तत्त्वमीमांसेपेक्षा उपयोजित तत्त्वज्ञान संकलित केलं आहे.

एपिक्टिटसच्या दैनंदिन जीवनातील तत्त्वज्ञानाचं उपयोजन करण्याच्या दृष्टिकोनावर एरियननं भर दिलेला आहे. मानसिक स्वातंत्र्य आणि आनंद मिळवण्याचा मार्ग दाखवणारी ही पुस्तिका आहे. एरियननं आपल्या गुरूच्या तत्त्वज्ञानाची तुलना सॉक्रेटिसशी करण्याचा आग्रह धरला आहे. मध्ययुगात ग्रीक धर्ममंदिरात ‘द एन्कायरिडियन’चा अभ्यास केला जात असे. पंधराव्या शतकात लॅटिनमध्ये या पुस्तकाचं भाषांतर झालं. आधुनिक मुद्रणतंत्रज्ञानाच्या शोधानंतर अनेक युरोपीय भाषांमध्येही हे पुस्तक आलं. सतराव्या शतकात निओस्टोइसिझम चळवळीच्या काळात हे पुस्तक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलं. एपिक्टिटस याचं तत्त्वज्ञान हा खरं तर जीवनाचा मार्ग आहे. व्यक्तीनं सर्व बाह्य घटना-घडामोडींचा स्वीकार अत्यंत शांतपणे आणि वैराग्यपूर्वक केला पाहिजे; कारण, त्या घटना-घडामोडी आपल्या नियंत्रणाबाहेरच्या असतात. व्यक्ती केवळ आपल्या विचारांवर व कृतींवर नियंत्रण ठेवू शकते. कठोर आत्मपरीक्षणातून हे शक्य होऊ शकतं. एपिक्टिटस हा ज्या स्टोइसिझम परंपरेतील होता, त्यालाच आपण स्थितप्रज्ञावाद किंवा तितिक्षावाद असं संबोधतो. काही लोक ‘दैववाद’ म्हणून याची हेटाळणीही करू शकतात, तसंच ‘ठेविले अंनते तैसेचि राहावे’ एवढ्या थोडक्यातही याची व्याख्या करता येत नाही. मात्र, आज जीवघेण्या स्पर्धेच्या काळात स्टोइसिझमचा विचार काही स्तरांवर करावाच लागतो.

सर्व काही जिथल्या तिथं असूनही आज अनेक जण अस्वस्थता, निराशा, अनिश्चतता, वैफल्य इत्यादींचे बळी ठरताना दिसतात. अशा वेळी माणूस आपल्या सभोवतालच्या परिस्थितीमुळे नव्हे तर, स्वतःच्याच विचारांनी विचलित होतो. ‘परिस्थिती आपल्या कलानं करून घेण्यापेक्षा स्वतःला परिस्थितीनुरूप बदललं पाहिजे...,’ ‘स्वतःला बळकट करण्यासाठी आपत्तींचा सामना करावाच लागतो...’ एपिक्टिटसच्या स्टोइसिझममधील अशी अनेक तत्त्वं काही जण उघडपणे मान्य करतील, तर काही जण मनातल्या मनात मान्य करतील.

‘अमानवी यातना सोसण्याचं बळ आपल्याला एपिक्टिटसच्या ‘द एन्कायरिडियन’ दिलं,’ असं सन १९६५ च्या व्हिएतनामयुद्धात असामान्य शौर्य गाजवलेला व सात वर्षं युद्धकैदी असलेला जेम्स स्टॉकडेल यानं म्हटलं होतं. एखाद्याला निराशेत व वैफल्यात एपिक्टिटस निश्तितच आशेचा किरण ठरू शकतो.

(सदराचे लेखक धर्म, इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com