स्वातंत्र्ययुद्धातील अलक्षित नायिका

सन १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण पैलू कायम दुर्लक्षित, अलक्षित राहिलेला आहे व तो म्हणजे, महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या युद्धात सहभागी झाल्या होत्या.
War of Independence
War of Independencesakal
Summary

सन १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण पैलू कायम दुर्लक्षित, अलक्षित राहिलेला आहे व तो म्हणजे, महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या युद्धात सहभागी झाल्या होत्या.

- राहुल हांडे handerahuk85@gmail.com

सन १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण पैलू कायम दुर्लक्षित, अलक्षित राहिलेला आहे व तो म्हणजे, महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या युद्धात सहभागी झाल्या होत्या. स्वातंत्र्याच्या या लढ्यात महिला पुरुषांच्या मागं नव्हत्या तर स्वतः रणभूमीत नेतृत्व करत होत्या.

सन १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील नायिका म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं नाव प्रामुख्यानं डोळ्यांसमोर येतं. लक्ष्मीबाई यांच्या व्यतिरिक्त इतर काही महिलांच्या कर्तबगारीविषयीही जाणून घेऊ या. यासाठी राणी लक्ष्मीबाई यांच्यापासूनच सुरुवात करावी लागेल. त्यांच्या सैन्यात मोतीबाई नावाची एक महिला तोफखान्यात गोलंदाज(तोपची) म्हणून काम करत होती. राणीचे प्राण वाचवताना मोतीबाई चार जून १८५८ रोजी हुतात्मा झाली, त्याचबरोबर शरीररक्षक म्हणून नेहमी राणीबरोबर असणारी एक मुस्लिम महिला होती मुंदर. झाशी, काल्पी आणि ग्वाल्हेर इथल्या लढायांमध्ये मुंदर हिनं तलवारीच्या धारेनं शत्रूला पाणी पाजलं. ‘कोटा की सराय’ इथल्या अखेरच्या संग्रामात लढता लढता राणीबरोबरच मुंदरनंदेखील रणभूमीवर देह ठेवला.

सन १८५७ च्या या रणसंग्रमातील आणखी एक नायिका म्हणजे अवंतीबाई लोधी. मध्य प्रदेशातील रामगढ संस्थानाच्या महाराणी असलेल्या अवंतीबाई यांनी स्वातंत्र्ययुद्धात स्वतःला झोकून दिलं होतं. ब्रिटिशांशी झालेल्या प्रत्येक लढाईत त्या यशस्वी ठरल्या.

हातात तलवार घेऊन, घोड्यावर स्वार होऊन लढाईत सहभागी होणाऱ्या अवंतीबाईंनी सुहागपूर जिंकलं आणि त्यानंतर आपला मोर्चा शाहपुराकडे वळवला. तिथं झालेल्या घनघोर युद्धात शेकडो ब्रिटिश सैनिक मारले गेले आणि ब्रिटिशांचा पराभव झाला.

एवढंच नव्हे तर, ब्रिटिश सैन्याचा सेनापती कॅप्टन वॉशिंग्टन याला जीव मुठीत धरून पळावं लागलं. पळून जाताना आपल्या छोट्या मुलाला सोबत नेण्याचंही भान त्याला राहिलं नाही. अवंतीबाईंनी त्या मुलाला सुरक्षितपणे आपल्या पित्याकडे पाठवलं.

अवंतीबाईंना वारंवार पराभूत करण्याच्या प्रयत्नांनी थकलेल्या ब्रिटिशांनी अखेर फंदफितुरीची चाल खेळली. एप्रिल १८५८ मध्ये देवहारगढ इथं अवंतीबाई आणि ब्रिटिश यांची लढाई सुरू असताना रामगढ संस्थानच्या शेजारील एका संस्थानिकानं ब्रिटिशांना मदत केली. त्यानं अवंतीबाईंच्या सैन्यावर पाठीमागच्या बाजूनं सैन्यासह अचानक हल्ला केला. ज्या रणरागिणीला ब्रिटिश सरळ युद्धात हरवू शकत नव्हते, तिला एका फितुरामुळे पराभव डोळ्यांसमोर दिसू लागला. तशाही परिस्थितीत अवंतीबाईंनी समर्पणाऐवजी बलिदान श्रेष्ठ मानलं. त्यांनी स्वतःच्या तलवारीनंच स्वतःचे प्राण देशासाठी अर्पण केले.

अशाच आणखी एका राणीनं ब्रिटिशांच्या दडपशाहीसमोर कधी हात टेकले नाहीत. ही राणी म्हणजे लखनौच्या बेगम हजरत महल. स्वातंत्र्ययुद्धातील प्रमुख सेनानी तात्या टोपे, अजीमुल्लाह खान, नानासाहेब पेशवे इत्यांदीसह हजरत महल यांनीही विद्रोहीपणाचं नेतृत्व केलं. कंपनी सरकारनं जेव्हा त्यांचं संस्थान खालसा केलं तेव्हा त्यांनी एक संयुक्त सेना तयार करून संपूर्ण अवध प्रांतात ब्रिटिशांपुढं मोठं आव्हान उभं केलं. हजरत महल यांनी १८५८ मध्ये स्वातंत्र्याचा एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. लखनौच्या लढाईत पराभूत झालेल्या हजरत महल यांनी हार न मानता शाहजहाँपूर इथं ब्रिटिशांशी लढत दिली. इथं पुवायाँ संस्थानच्या राजानं केलेल्या फितुरीमुळे पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला. मात्र, पराभवांनी खचून न जाता या राणीनं नेपाळच्या तराईक्षेत्रात नानासाहेबांसमवेत स्वातंत्र्याचा ध्वज हातात घेऊन लढा दिला. या दोघांनी त्या वेळी नेपाळनरेशाकडे सहकार्य मागितलं होतं; परंतु नेपाळनरेश ब्रिटिशांचा मित्र असल्यानं त्यानं स्वातंत्र्ययोद्धांना पकडून देण्यात अथवा त्यांना मारण्यात धन्यता मानली. तत्कालीन ब्रिटिश पत्रकार रसेल यांनी हजरत महल यांच्याबद्दल लिहिलं आहे, ‘बेगम ही मोठं सामर्थ्य आणि क्षमता असलेली महिला होती. मानसिकदृष्ट्या अत्यंत प्रगल्भ आणि समजूतदार होती, तसंच पुरुषांचं नेतृत्व करण्याची तिच्याच पुरेपूर क्षमता होती.’ अशा हजरत महल यांचा लढा १८७९ मध्ये त्यांच्या अखेरच्या श्वासाबरोबर संपला.

नेपाळमधील तराईक्षेत्रातील तुळशीपूरच्या राणीबद्दलही आपण अनभिज्ञ आहोत. त्यांच्या पतीला ब्रिटिशांनी लखनौला बोलावलं आणि दगा करून त्यांना कैदेत टाकलं. राणीनं ब्रिटिशांपुढं पदर पसरण्याऐवजी लढायचं ठरवलं. नानासाहेब, हजरत महल आणि गोंडाचे राजे देवीबख्क्ष सिंह यांच्यासह ती ब्रिटिशांच्या विरोधात रणमैदानात उतरली. या राणीला ब्रिटिश कधीही पकडू शकले नाहीत. भारताचा हा पहिला स्वातंत्र्यसंग्राम अशा असंख्य महिलांच्या बलिदानानं तेजोमय बनलेला आहे. धर्म-जात-पंथ यांचा विचार न करता या युद्धात जसे पुरुष लढत होते, तशाच महिलाही लढत होत्या. त्यांचं बलिदान व समर्पण वर्णनातीत आहे.

सन १८५७ ते १९४७ हा सुमारे ९० वर्षांचा कालखंड असंख्य महिलांच्या कथा आपल्यामध्ये सामावून उभा असलेला दिसतो. संधी मिळाल्यास एखादी महिला काय करू शकते, याचं प्रात्यक्षिकच जणू या कालखंडात पाहायला मिळतं. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्ययुद्धात केवळ पुरुषच नायक नव्हते, तर महिलाही नायकच होत्या, हे मान्यच करावं लागतं. असं असलं तरी देशासाठी पुरुषानं बलिदान केल्यास आपण त्याला ‘शहीद’ वा ‘हुतात्मा’ असं म्हणतो; परंतु बलिदान देणाऱ्या महिलेसाठी आजही आपल्या शब्दकोशात शब्द नाही. कोणत्याही भाषेत एका प्रकारे त्या त्या भाषकांचं समाजमानस प्रतिबिंबित होत असतं. दुसऱ्या भाषांचं सोडा; परंतु आपल्या भाषेत जर महिलेचं बलिदान व्यक्त करणारा शब्द नसेल तर आपण अजूनही पुरुषसत्ताकच आहोत हे मान्य करायला हवं. भाषेप्रमाणेच इतिहासही पक्षपाती आहे. तो नेहमीच राज्यकर्त्यांभोवती फिरत असतो; परंतु सर्वसामान्य माणसंही यथाशक्ती बलिदान देत असतात. अशाच काही सर्वसामान्य महिलांनी स्वातंत्र्ययुद्धात बलिदान केलेलं आहे. त्याविषयीची कथा पुन्हा कधी तरी...

(सदराचे लेखक धर्म, इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com