औटघटकेचं झांझीबार युद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

zanzibar city

‘सल्तनत-ए-झांझीबार’ हे नाव अरेबियन नाइटमधील एखाद्या काल्पनिक देशाचं नाव सर्वसामान्य माणसाला वाटल्यास नवल नसावं; परंतु झांझीबार नावाचा देश जगाच्या पाठीवर खरोखरच आहे.

औटघटकेचं झांझीबार युद्ध

- राहुल हांडे handerahul85@gmail.com

‘सल्तनत-ए-झांझीबार’ हे नाव अरेबियन नाइटमधील एखाद्या काल्पनिक देशाचं नाव सर्वसामान्य माणसाला वाटल्यास नवल नसावं; परंतु झांझीबार नावाचा देश जगाच्या पाठीवर खरोखरच आहे. दक्षिण आफ्रिकेतील टांगानिकाच्या किनाऱ्यापासून सुमारे ३१ मैलांवर हिंद महासागरात असेलला एक छोटा द्वीपसमूह म्हणजे झांझीबार. दोन मुख्य बेटं आणि अनेक लहान बेटं म्हणजे झांझीबारची भौगोलिक व्याप्ती. उंगजा व पेम्बा ही दोन मुख्य बेटं असली तरी ‘उंगजा’ हे बेट झांझीबार म्हणून ओळखलं जातं.

उंगजा बेटावर वसलेलं झांझीबार शहर देशाची राजधानी आणि तेथील जागतिक वारसा स्थळ ‘स्टोन टाउन’ यामुळे ओळखलं जातं. १९६४ च्या करारानुसार टांगानियासोबत ते टांगानियाचं संयुक्त प्रजासत्ताक बनलं आहे. आज सल्तनत-ए-झांझीबार अर्ध स्वायत्त राज्य म्हणून जगात ओळखलं जातं. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या झांझीबारची अर्थव्यवस्था प्रामख्याने तिथं पिकणारे मसाल्याचे पदार्थ, मासेमारी आणि पर्यटनावर अवलंबून आहे.

लवंग, जायफळ, दालचिनी व काळी मिरी यामुळे झांझीबारचा उल्लेख अनेकवेळा ‘स्पाइस बेटं’ असादेखील केला जातो. झांझीबारच्या सागरी परिसंस्थेमुळे तेथील मासेमारी आणि अल्गाकल्चरला लाभ मिळतो. हे दोन्ही झांझिबारी अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. तसंच ही परिसंस्था हिंद महासागरातील मत्स्योत्पादनासाठी मत्स्यालय म्हणून काम करते. दुर्मीळ झांझीबारी बिबट्यांची मूळ भू परिसंस्था म्हणूनदेखील झांझीबार ओळखले जाते. भारतातील काही महानगरांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या या देशाचा इतिहासही काही मोठा व देदीप्यमान नाही. असं असलं तरी, एक ऐतिहासिक विक्रम या देशाच्या नावावर जागतिक इतिहासात नोंदवला गेलेला आहे. युरोपियन देशांच्या वसाहतवादात झांझीबार सर्वप्रथम पोर्तुगिजांच्या आधिपत्याखाली होता. १४९९ मध्ये ओमानच्या सुलतानांनी पोर्तुगिजांना तेथून हद्दपार केलं. त्यानंतर १६९८ पासून त्यांनी आपलं नाममात्र नियंत्रण झांझीबारवर ठेवलं.

अखेर १८५८ मध्ये ओमानचा सुलतान माजिद बिन सैद याने ओमानपासून स्वतंत्र असलेलं एक बेट म्हणून झांझीबारला मान्यता दिली. दरम्यानच्या काळात इंग्लंडचा तत्कालीन महासत्ता म्हणून उदय झाला होता. दक्षिण आफ्रिकेवर ब्रिटिशांनी आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली होती. १८७३ मध्ये ब्रिटिशांनी झांझीबारवर गुलाम व्यापाराच्या बंदीची सक्ती केली. असं असतानाही १८८६ मध्ये त्यांनी झांझीबारचं सार्वभौमत्व आणि सल्तनत यांना मान्यता दिली होती. १८९६ मध्ये उंगजा बेटावर राजवाडा बांधून एक राजधानी म्हणून झांझीबार टाउनच्या निर्मितीस प्रारंभ करण्यात आला. हा राजवाडा म्हणजे ‘अल-अजाइब’ किंवा ‘हाउस ऑफ वंडर्स’ म्हणून ओळखला जातो.

पूर्व आफ्रिकेतील वीजपुरवठा करण्यात आलेली ही पहिली इमारत आहे. १९ व्या शतकात इंग्लंड आणि जर्मनी यांच्यात पूर्व आफ्रिकेतील व्यापार आणि भूभागावर नियंत्रण ठेवण्याची स्पर्धा सुरू झाली. ब्रिटनने प्रदीर्घकाळ झांझीबारशी मैत्रीपूर्ण संवाद आणि तेथील सुलतानांशी चांगले संबंध ठेवले होते. यामुळे झांझीबारचा कल कायम ब्रिटनकडे राहिला, जर्मनीशी त्याचं सख्य होऊ शकलं नाही.

जर्मन आणि झांझीबार यांच्यात अनेकवेळा संघर्ष झाला. झांझीबारच्या सत्ताधाऱ्यांना जर्मन सरकारकडून तिथल्या गुलाम व्यापाराला विरोध व अडथळा होता, हे संघर्षाचं मुख्य कारण होतं. एकदा झांझीबारचा ध्वज फडकवण्यास नकार दिल्यामुळे जर्मन-झांझिबार संघर्षात ‘टांगा’ इथे २० झांझिबारी नागरिक मारले गेले. त्यामुळे झांझीबारमधल्या जनतेच्या मनात जर्मनविरोध धुमसत असताना त्यांना नियंत्रित करण्याच्या कारवाईत ‘केतवा’ इथे आणखी १५० झांझिबारी मारले गेले. झांझीबारींचा हा जर्मनविरोध ब्रिटिशांच्या पथ्यावर पडत होता. झांझीबारचा सुलतान खलिफा याने ब्रिटिश ईस्ट आफ्रिका कंपनीला व्यापक व्यापार अधिकार दिले आणि जर्मनांच्या साह्याने त्याने गुलाम व्यापारावर बंदी आणण्यासाठी उपयोजना केली. त्याच्यानंतर सुलतान झालेल्या ‘अल बिन सैद’ याने देशांतर्गत गुलामांच्या व्यापारावर बंदी घातली, झांझीबारला ब्रिटिश संरक्षक राज्य घोषित केलं आणि ब्रिटिश अधिकारी लॉइड मॅथ्यूज याला त्याच्या मंत्रिमंडळात प्रधानमंत्री केलं. एवढंच नाही, तर भविष्यात झांझीबारचा सुलतान ठरवण्यात ब्रिटिशांना ‘व्हेटो’चे अधिकार दिले.

दरम्यान, ब्रिटिश व जर्मन यांच्यात ‘हेलिगोलँड-झांझिबार’ करार झाला. यामुळे पूर्व आफ्रिकेतील त्यांच्या स्वारस्याच्या क्षेत्रांचं त्यांनी सीमांकन केलं. यामध्ये झांझीबार ब्रिटिशांच्या वाट्याला आला. ब्रिटिशांनी या अधिकाराचा वापर झांझीबारमधील गुलाम प्रथा नष्ट करण्यासाठी केला, हे एक चांगलं काम म्हणता येतं. १८९३ मध्ये ब्रिटिशांच्या हातातील कळसूत्री बाहुली असलेला ‘हमाद बिन थुवैनी’ सुलतान बनला, त्यामुळे ब्रिटिशांचं वाढतं नियंत्रण, त्यांच्या नियंत्रणात असलेलं सैन्य, गुलाम व्यापार व प्रथाबंदी यामुळे होणारं मोठं आर्थिक नुकसान, स्वतःच्या सैन्याचं उच्चाटन इत्यादी कारणांनी झांझीबारमधल्या लोकांमध्ये ब्रिटिशांविरोधात अंसतोष होता. २५ ऑगस्ट १८९६ रोजी हमाद बिन थुवैनीचा अचानक मृत्यू झाला, त्याचा चुलत भाऊ ‘खालिद बिन बारघाश’ याने त्याच्यावर विषप्रयोग केला असावा, असा संशय होता. हमादच्या मृत्यूच्या काही तासांतच खालिदनं झांझीबारचा सुलतान म्हणून स्वतःला घोषित केल्याने हा संशय अधिक दाट झाला.

ब्रिटिशांच्या मुत्सद्दी अधिकाऱ्यांना हे धोकादायक वाटत होतं. त्यांनी खालिदला २७ ऑगस्टच्या सकाळपर्यंत राजवाडा खाली करण्याचा अंतिम इशारा दिला. खालिदने या अंतिम इशाऱ्याला भीक घातली नाही. आधीच्या सुलतानाला ब्रिटिशांच्या कृपेने केवळ एक हजार अंगरक्षक नेमण्याची सवलत होती, तिथं खालिदने तीन हजार सुसज्ज सैन्य उभं केलं. यासाठी त्याने ब्रिटिशांनी सुलतानांना दिलेल्या काही बंदुका आणि दोन तोफांचादेखील वापर केला.

ब्रिटिशांनी बंदर परिसरात तीन कूझर, दोन गनबोट्स, १५० मरिन आणि खलाशी आणि ९०० झांझीबारचे नागरिक एकत्र केले. २७ ऑगस्ट १८९६ रोजी सकाळी नऊ वाजता खालिद व ब्रिटिश यांच्यात युद्ध सुरू झालं. ब्रिटिशांनी तोफगोळ्यांचा मारा सुरू केला. नऊ वाजून दोन मिनिटांनी खालिदचा तोफखाना संपुष्टात आला. तेव्हाच खालिद आपल्या नोकरांना व सैनिकांना राजवाड्याचं रक्षण करण्यासाठी सांगून एकटा राजवाड्याच्या मागील बाजूने बाहेर पडला आणि जर्मन दूतावासात शरण गेला. नऊ वाजून चाळीस मिनिटांनी म्हणजे अवघ्या ३८ मिनिटांमध्ये हे युद्ध संपलं. ब्रिटिशांचा विजय झाला. झांझिबारचा राजवाडा लाकडी असल्याने आणि तिथं असलेल्या स्फोटकांमुळे तो धडाधडा पेटला आणि त्यामुळे अवघ्या ३८ मिनिटांच्या युद्धात सुमारे झांझीबारचे पाचशेजण मारले गेले. ३८ मिनिटांचं हे झांझीबारमधलं युद्ध जगाच्या इतिहासात सर्वांत अल्पावधीचं युद्ध म्हणून नोंदवलं गेलं आहे.

टॅग्स :Foreign Countrysaptarang