
कोकणात एक काळ असा होता की शेती म्हणजे इतर काही जमत नाही म्हणून करायचा उद्योग. त्यामुळं शेतीत नवीन काही घडत नव्हतं, मुंबईत राहत असलेला त्या घरातला तरुण मुलगा गावी आला की इथल्या व्यवस्थेकडं तुच्छतेनंच बघत होता. कालांतरानं शिक्षणाचं प्रमाण वाढू लागलं. दूरदर्शन, मोबाईल, सोशल मीडिया यांमुळे गावखेडी आणि शहर यातील अंतर खूपच कमी झालं.
कोकणात एक काळ असा होता की शेती म्हणजे इतर काही जमत नाही म्हणून करायचा उद्योग. त्यामुळं शेतीत नवीन काही घडत नव्हतं, मुंबईत राहत असलेला त्या घरातला तरुण मुलगा गावी आला की इथल्या व्यवस्थेकडं तुच्छतेनंच बघत होता. कालांतरानं शिक्षणाचं प्रमाण वाढू लागलं. दूरदर्शन, मोबाईल, सोशल मीडिया यांमुळे गावखेडी आणि शहर यातील अंतर खूपच कमी झालं. ग्रामीण सांस्कृतिकतेवरतीही हा खूप मोठा आघात होता. कोकण बदललं म्हणजे काय झालं याच कोकणात राजा दांडेकर यांनी वेगळा विचार कसा केला, इथल्या जीवनमानात बदल होण्यासाठी काही प्रयोग कसे केले हे तीन भागात ते सांगतील त्यातला हा पहिला भाग...
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या कोकणातील माणसं मनिऑर्डरवर जगत होती. पण आता काळ बदलला. पूर्वी कसं फक्त चाकरमानी मुंबईत जायचे. ते नोकरी उद्योग करून आपल्या मिळकतीतून गावाकडं मनिऑर्डर करायचे. बायको, मुलं आणि आई - वडील गावाकडंच असायचे आणि म्हणून कोकण मनिऑर्डरवर जगत होतं. कुटुंबापासून दूर राहिलेले तरुण व्यसनाधीन व्हायचे. शारीरिक, मानसिक कुचंबणा व्हायची. गौरी-गणपती आणि शिमग्याला काही दिवस सणासुदीला गावाकडं यायचे. त्यातच लग्नकार्य, मुलंबाळ होऊन संसार वाढू लागायचे. ते जेव्हा गावाकडं परत यायचे, तेव्हा व्यसनाधीनतेमुळं त्यांच्यातील क्रयशक्ती संपलेली असायची. संसार अर्ध्यावर सोडून या जगाचा निरोप घ्यायचे. पुन्हा त्यांची मुलं चौदा वर्षांची झाली की मुंबईचा रस्ता धरायची. हे कालचक्र वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या चालू होतं.
गावखेड्यातल्या बहुजन समाजासंदर्भात सांगायचं झालं तर ती माणसं मनिऑर्डरवर जगत होती, पण गावातील पांढरपेशा समाज किंवा परंपरेने गावाचे नेतृत्व करणारे खोत हे थोडेफार शिक्षित होते. त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर ते मुलांच्या बाबतीत काय विचार करायचे? तर दोन मुलगे असतील तर त्यातला बुद्धिमान शिक्षणात रस असलेला मुलगा (दादा) हा शहरात जायचा. उच्चशिक्षित होऊन नोकरीधंदा करायचा आणि देश-विदेशांत स्थायिक व्हायचा. आणि दुसरा बाळू हा अभ्यासात गती नसणारा, शिक्षणात रस नसणारा हा ‘फावडे मास्तर’ व्हायचा. म्हणजे गावाकडे राहून शेती करायचा. थोडक्यात सांगायचं झालं, तर बुद्धी नाही त्यानं गावाकडं राहून शेती करावी याचा अर्थ शेती करणे हे निर्बुद्ध माणसाचं काम आहे अशी गैरसमजूत होती. मुलींच्या बाबतीत तर बहुतांश मुली सातवी पर्यंत, मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेऊन लग्न करून परक्याच्या घरी जात असत. गावाकडं राहून शेती करणारा बाळू हा केवळ उपजीविकेचं साधन म्हणून परंपरागत शेती करत होता.
आणि कसाबसा घर संसार करत होता. शिक्षण नसल्यानं, प्रगत ज्ञान नसल्यानं त्याच्याकडं वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हता. म्हणूनच शेतीपूरक उद्योगांचा विचारही त्यानं कधी केला नाही. बुद्धिमान मुलं शहरात गेल्यामुळं खेड्याकडून शहराकडं ‘ब्रेन ड्रेन’ झाला होता. कालांतरानं पांढरपेशा समाजाकडील खोती लयाला गेली. राजनीतीतून अशिक्षित असलं, तरी नवीन नेतृत्व गावात उभी राहू लागलं, तेही एक खोतीचं नवीन स्वरूप होतं. ‘कसेल त्याची जमीन’ या कुळकायद्यानं खोताकडील शेती कुळांकडं गेली. मग न कसेल त्याचं काय? याचा विचार कोणीच केला नाही. लागवडीखालील जमिनीही ओस पडू लागल्या.
पांढरपेशा समाजामध्येच नव्हे, तर गावात भाऊबंदकी सुरू झाली. कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त झाली. गावाकडं असणाऱ्या तरुण पोरांनाही शहराचं ग्लॅमर खुणावायला लागलं. गावात रस्ते, वीज, टीव्ही, मोबाईल अशा भौतिक सुविधा जशा होऊ लागल्या तसतसं शहराचं ग्लॅमर वाढत गेलं. दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनंही खुणावू लागली. एकीकडं शहरात गेलेले दादा आणि काही शहरी मित्र गुंतवणूक म्हणून निसर्गसंपन्न असलेल्या खेड्यामध्ये जमिनी घेऊ लागले. आणि गावाकडील तरुण व्यसनाधीन होऊन आपल्या जवळच्या कुळकायद्यात मिळालेल्या जमिनी विकून बाइक्स, रिक्षा, जीप, कार अशा गाड्या घेऊ लागले. आता गावातही पानटपरीवर तंबाखूबरोबर गुटखा, सिगारेट मिळू लागली. भौतिक विकास म्हणजे हाच विकास अशीच जणू ग्रामीण विकासाची व्याख्या झाली. पिठाची गिरणी, किराणा मालाच्या दुकानाबरोबर बियर बार आणि ब्युटी पार्लरही गावागावांत सुरू होऊ लागली.
जमिनी विकून मिळवलेले पैसे भूमातेच्या विकासासाठी न वापरता ते छानछौकीकडं व व्यसनाधीनतेकडं खर्च होऊ लागले. जमिनींबरोबर गाड्याही विकायची वेळ आत्ता आली आहे. नव्यानं लागणार्या व्यसनाबरोबर कर्जबाजारीपणा आला. शेवटी होत्याच नव्हतं झालं, आणि हाती शून्य राहिलं.
कालांतरानं शिक्षणाचं प्रमाण वाढू लागलं. ग्रामीण भागातील मुलीही शिक्षित होऊ लागल्या. दूरदर्शन, मोबाईल, सोशल मीडिया यांमुळे गावखेडी आणि शहर यातील अंतर खूपच कमी झालं. याचे चांगल्याबरोबर वाईट परिणामही झाले. शहरात आलेली कोणतीही फॅशन गावाकडं लगेच येऊ लागली. ग्रामीण सांस्कृतिकतेवरतीही हा खूप मोठा आघात होता. तरुणांबरोबर गावाकडच्या तरुणींनाही आता शहराची ओढ लागली. गावाकडं राहणं हे गावच्या युवक-युवतींना कमीपणाचे वाटू लागलं. लग्न केल्यानंतर मुंबईत नेणार असशील तरच मी लग्न करेन, असा मुलींचा अट्टहास होता. शहरात कितीही गैरसोय असली तरी शहरात राहणं प्रतिष्ठेचं वाटू लागलं. मग चाकरमान्याबरोबर त्याची बायकोही शहराकडं गेली. आता संसार शहरात वाढू लागले, आणि खेडी ओस पडू लागली. गाव खेड्यांचं वृद्धाश्रम होऊ लागले. गावी फक्त म्हातारी माणसं, अशिक्षित, निर्बुद्ध, अपंग, अकार्यक्षम तरुण गावाकडं राहिले. शहरात संसार वाढू लागल्यापासून गावाकडं येणार्या मनिऑर्डरी बंद होऊ लागल्या आणि गावाकडची माणुसकीही कमी होऊ लागली. म्हातार्या आईबापांनाही मुंबईतून गावाकडं येणार्या चाकरमानी मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबाच कौतुक वाटू लागलं.
सणासुदीला गावाकडं येणारा तरुण जीन्स पॅंट, टी शर्ट, हातात मोबाईल, डोळ्यांना गॉगल, क्वचित सुटाबुटात गावाकडे येऊ लागला. सुना आणि मुलंही पार्लरला जाऊन पाश्चात्त्य/ आधुनिक वेष लेऊन गावाकडं येऊ लागले. गावाकडच्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या बोलण्या, चालण्या, वागण्यातून तुच्छतेचे भाव दिसू लागले. गावाकडं आल्यानंतर माणसांवरचं प्रेम आटलं होतं, तसंच गुराढोरांवरचंही आटलं होत. पूर्वी गावाकडं आल्यानंतर तिकडचा माणूस इथल्या माणसांबरोबर गुराढोरांचीही आस्थेनं चौकशी करायचा. आता मात्र गावाकडं आल्यावर गोठ्याकडं त्याचे पाय वळत नाहीत. ज्या गाईच्या दुधावरती त्याचा पिंड पोसला होता, त्या गाईच्या दुधाची ना त्याला जाण राहिली होती, ना आईच्या दुधाची आण राहिली होती.
Edited By - Prashant Patil