शोध हत्येमागच्या राजकीय कटाचा

शोध हत्येमागच्या राजकीय कटाचा

जगात कुठल्याही राजकीय नेत्याच्या हत्येच्या घटनेनंतर त्याच्या तपासाबाबत आणि त्यात पकडण्यात आलेल्या आरोपीबद्दल वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. शिक्षा झालेले आरोपी आणि या प्रकरणात बळी गेलेल्या नेत्याच्या हत्येबद्दल वेगवेगळ्या गोष्टी ठामपणानं सांगितल्या जातात. या हत्येच्या तपासाबाबत ज्यांचं समाधान झालेलं नसतं, अशी मंडळी एकतर आपल्याकडची माहिती आणि उपलब्ध कागदपत्रांचा अर्थ लावून काही गोष्टी मांडत असतात. काही जण या हत्येमागचे प्रकाशात न आलेले पैलू कुठले आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करतात. जगात अनेक देशांमध्ये असं घडलंय. केनेडी यांच्या हत्येनंतरही अशी बरीच पुस्तकं आली होती. भारतातही काही राजकीय नेत्यांच्या हत्येनंतर अशा पुस्तकांची निर्मिती झाली आहे. त्यातलंच एक पुस्तक म्हणजे फराझ अहमद यांचं ‘राजीव गांधी हत्या... एक अंतर्गत कट’ हे होय.

पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरुंबुदुरला तमीळ अतिरेकी संघटनेनं म्हणजे ‘एलटीटीई’नं हत्या घडवली, या मुख्य गृहीतकालाच या पुस्तकात छेद देण्यात आलेला आहे. मंडल आयोगानं उच्च जातीच्या वर्चस्वाला धक्का बसल्यानं राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली, असा फराझ अहमद यांचा दावा आहे. देशात मंडल आयोगामुळं मागास आणि ओबीसी जातीतल्या मंडळींना देशाच्या मुख्य प्रवाहात चांगली संधी मिळाली, त्यामुळं उच्चवर्णीय गट धास्तावले व त्यांनी राजीव गांधी यांना बाजूला केलं, असा अहमद यांचा दावा आहे. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी, गांधी यांच्या हत्येचा तपास करणारे अधिकारी डी. आर. कार्तिकेयन व राधाविनोद राजू यांनी लिहिलेल्या; तसेच के. मोहनदास यांच्या कांदबरीचा, के. रागोथामन यांच्या पुस्तकाचा आधार घेतला आहे.
राजीव गांधी यांची हत्या ही अनेकांना संभ्रमात टाकणारी बाब असल्याचं अहमद सांगतात आणि आपल्या निष्कर्षाच्या आधारासाठी स्वामींचं पुस्तक, तसेच गुप्तचर खात्याचे त्या वेळचे संचालक एम. के. नारायणन यांच्या भूमिकेचा आधार घेतात. या पुस्तकात अनेक कागदपत्रं आणि नामवंत व्यक्तींनी लिहिलेल्या पुस्तकांचा; तसेच काही मान्यवरांनी दिलेल्या साक्षीचा, मग ती वर्मा आयोगापुढं किंवा जैन आयोगासमोर दिलेली असो, या सगळ्यांचा नेमकेपणानं वापर केलेला आहे. राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याच्या हत्येचा तपास करताना किती गोष्टी लक्षात घेतल्या जातात आणि किती छोट्या छोट्या बाबींना महत्त्व असतं ते या पुस्तकातल्या तपशिलावरून व या संदर्भातल्या कागदपत्रांवरून लक्षात येतं.

त्याचबरोबर तांत्रिक बाबा चंद्रास्वामी यांच्याबद्दलची माहिती कळते त्यांच्या संदर्भात आणि या खटल्याबाबात तपास करणारी खास स्थापन केलेली सरकारमधली एक यंत्रणाच कसं काम करत नव्हती, हे या पुस्तकातून कळतं. अहमद यांनी जवळपास १० पुस्तकं आणि हत्येच्या चौकशीसाठी नेमलेल्या दोन आयोगाच्या कागदपत्रांचा अभ्यास करून अनेक निष्कर्ष मांडले आहेत. त्यावर खरंतर चर्चा व्हायला हवी; पण राजकारणी आणि प्रशासनातल्या मंडळींनी या पुस्तकाकडं फारसं लक्ष दिलेलं नाही. किमानपक्षी या पुस्तकातल्या काही गोष्टींवर चर्चा झाली, तरी अनेक गुपितं उघड होऊ शकतील.

राष्ट्रीय राजकारणात अनेक शक्‍यता असतात, त्याचबरोबर वरवर जे दिसतं ते नेहमीच खरं असतं असं नाही. त्यामागं बरंचं काही घडलेलं असतं हेच खरं. ही गोष्ट या पुस्तकातल्या अनेक बाबी वाचून मनात अधिकच पक्की होते. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर त्यात आंतरराष्ट्रीय शक्तींचा सहभाग असल्याच्या बातम्या आल्या होत्या. लेखक वसंत वसंत लिमये यांनी ‘लॉकग्रिफीन’ही कादंबरी लिहिली होती. त्यातही सूचकपणे याच हत्येसंदर्भातल्या अनेक बाबींकडे लक्ष वेधण्यात आलं होतं. मात्र ती कादंबरी होती. त्यात कल्पनाविलास आणि काही गृहीतकं होती. इथं अहमद यांनी हत्येच्या तपासाबाबतची कागदपत्रं अभ्यासून आणि या तपासाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या काही पुस्तकातल्या संदर्भाचा वापर करून काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. अहमद यांचं हे पुस्तक नव्या चर्चेला बळ देतं. अवधूत डोंगरे यांनी या पुस्तकाचा अनुवाद ओघवता आणि क्‍लिष्टता टाळून केला आहे. हा विषय तसा तांत्रिक आणि गुंतागुंतीचा होता; पण त्यांनी योग्यपणे मराठीत आणला आहे. हे पुस्तक राजकारणातल्या एका ज्येष्ठ व्यक्तीच्या हत्येच्या तपासावर असलं, तरी राजकारणातल्या अनेक काळ्या गोष्टींवर झगझगता प्रकाश टाकतं, हेही खरं.

पुस्तकाचे नाव :
राजीव गांधी हत्या... एक अंतर्गत कट?
लेखक : फराझ अहमद
अनुवाद - अवधूत डोंगरे
प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे
(०२०- २४४८०६८६)
पृष्ठं - २८८  / मूल्य : २५० रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com