माझी गादी (राजीव तांबे)

माझी गादी (राजीव तांबे)

‘‘पण एक लक्षात ठेवा...ही माणसं कशीही असली तरी ती आपल्यावर प्रेम करतात. आपल्याला मायेनं सांभाळतात. तुमच्या आधीपासून खूप वर्षं मी या घरात आहे. आता माझं वय झालंय. मी आता पहिल्यासारखी गुबगुबीत नाही राहिले. फार काही मऊपण नाही मी आता. माझ्यावर खूप डाग पडलेत. कापसाच्या गुठळ्या झाल्यात आणि गाठी सुटल्यात. माझी खोळपण आता विरत चालली आहे; पण...पण...तरीसुद्धा...’’

आज सगळे पालवीच्या घरी जमले होते. अन्वय त्यांच्या शाळेतल्या नाटक-बॅंकेतून एक सरप्राइज गोष्ट आणणार होता आणि तो ती आणणार होता; कारण त्याच्या मागं एक गोष्ट आहे, असंही त्यानं सगळ्यांना सांगितलं होतं.
शंतनू, पार्थ, वेदांगी आणि नेहा आली; पण अन्वयचा पत्ताच नाही.
पार्थनं डोकं खाजवत विचारलं ः ‘‘त्या सरप्राइज गोष्टीच्या मागची गोष्ट काय असेल, हे कुणाला माहीत आहे का?’’
‘‘ती त्या एकपात्री नाट्याशी संबंधित असणार असं वाटतंय; पण आपण अंदाज करायला काय हरकत आहे?’’
‘‘मला वाटतं, तो त्यांच्या शाळेतल्या बॅंकेतली कुठली तरी हट के एकपात्रिका आणणार असेल.’’
इतक्‍यात धापा टाकत अन्वय आलाच.
तो काही बोलण्याआधीच पालवी म्हणाली ः ‘‘थांब जरा. आधी दम खाऊन घे. पाणी पी. मग बोल.’’
‘‘काय खाऊन घे...?’’ शंतनूनं जोरात विचारलं.
पालवी ठसक्‍यात म्हणाली ः ‘‘आधी चकाचक वाचणं, मग पकापक खाणं.’’
‘‘आता ती सिक्रेट गोष्ट सांग बुवा...’’
‘‘मागच्या सोमवारी शंतनूच्या नाटक-बॅंकेतली ‘माझं आवडतं झाड’ ही एकपात्रिका मी शाळेत घेऊन गेलो. बाईंनी वर्गात वाचून दाखवली. सगळ्यांना आवडली; पण किशोरनं आणि मंजूनं वेगळाच मुद्दा मांडला.’’
‘‘कुठला मुद्दा...?’’
‘‘ते दोघं म्हणाले, ‘आम्हाला स्टेजवर जायचंच आहे; तिथं जाऊन नाटक करायचंच आहे पण... आमची एकट्यानं जायची काही हिंमत नाही. एकट्यानं जायला भीतीच वाटते.’ बाई विचारात पडल्या, तेव्हा मंजू म्हणाली, ‘एकपात्रिकाप्रमाणे आपल्या बॅंकेत एखादी द्विपात्रिका आहे का हो? म्हणजे म...ती आम्ही एकमेकांच्या मदतीनं करू. बाई, प्लीज करा ना शोधाशोध बॅंकेत.’ ’’ तोपर्यंत नखं कुरतडत नीता उभी राहत म्हणाली, ‘बाई द्विपात्रिका नको.’
आता सगळाच वर्ग तिच्याकडं पाहायला लागला.
नीता पुढं म्हणाली, ‘द्विपात्रिका नको; त्रिपात्रिका हवी. म्हणजे म...मीही त्यांच्याबरोबर स्टेजवर जाईन. बाई, मला स्टेजवर जायला मदत कराच.’ आम्हाला थोडीशी शोधाशोध केल्यावर राजीव तांबे यांनीच लिहिलेली एक त्रिपात्रिका मिळाली. तीमध्ये गादी, उशी आणि पांघरूण हे एकमेकांशी गप्पा मारत असतात.’’
‘‘म्हणजे मग, गादीवर लोळत नाटक करायचं का?’’
‘‘तसं नव्हे. यात तीन व्यक्तिरेखा आहेत. गादी, उशी, पांघरूण.’’
‘‘अं...जी मुलगी गादीचे संवाद म्हणणार असेल ती गळ्यात ‘गादी’ असं लिहिलेला छोटा बोर्ड अडकवेल. म्हणजे लोकांना कळेल की आता ‘गादी’ बोलत आहे.’’
‘‘किंवा तिनं गळ्यात गादीचं चित्र अडकवायचं.’’
‘‘व्वा छान. असंही करता येईल.’’
‘‘जर का समोरची मुलं मोठी असतील तर त्रिपात्रिका सुरू होण्याआधीच तिघांनी आपापली मजेशीर ओळख करून द्यायची. उदाहरणार्थ ः मंजू म्हणेल, ‘मी दिसते लहान; पण आत्ता मी नाटकात गुबगुबीत गादी आहे बरं का आणि ही माझी मैत्रीण उशी. आता हे जे उभे आहेत ते कोण कळलं का? ते आहेत श्री. पांघरुण.’
‘‘हे तर एकदम मस्तम्‌ मस्त. फंडू का गुंडू.’’
‘‘वॉऽऽऽऽव. ही तर लई भारी कॉमेडी असणार. मघाशी पालवी म्हणाली ते खरंच आहे, ‘आधी बकाबक खाणं, मग टकाटक वाचणं; तर मग होऊन जाऊ दे टकाटक अन्‌ चकाचक वाचणं...’’
अन्वय सांगू लागला... ‘या त्रिपात्रिकेचं नावं आहे ः माझी गादी.
(पडदा उघडतो तेव्हा रंगमंचावर दोन मुली आणि एक मुलगा उभा आहे. यातलीच एक मुलगी एक पाऊल पुढं येते आणि थेट प्रेक्षकांशी बोलू लागते) ः
‘शनिवारी रात्री घरातल्या सगळ्यांनी ठरवलं की ‘आता भराभर जेवायचं आणि मस्त सिनेमाला जायचं आणि जाताना गाद्या घालून जायचं. म्हणजे मग रात्री घरी आलं की चपला काढायच्या आणि गादीवर उड्या मारायच्या. सगळे जण भराभरा जेवले, मग भराभरा कामाला लागले आणि सिनेमाला पळाले. थंडीचे दिवस होते म्हणून जाताना स्वेटरबिटर घालून गेले. आता घरात कुणी नाही, याचा अंदाज घरातल्या काही जणांना लागला. जमिनीवर उताण्या पडलेल्या गाद्या, त्यांच्या डोक्‍यावर बसलेल्या उश्‍या आणि त्यांच्या पायावर लोळणारी पांघरुणं आपापसात गप्पा मारू लागली. अं...आता तुम्हाला कळलं असेलच की...आम्ही तिघं कोण आहोत? तुम्ही नक्कीच ओळखलं असणार... कारण, हुशार प्रेक्षक आम्हाला लगेच ओळखता येतात. (रंगमंचावरची बाकीची मुलं माना हलवतात.)
...तर, मी आहे गादी. घरातले रात्रभर माझ्यावर लोळतात; मग मी दिवसभर विश्रांती घेते.
(दुसऱ्या मुलीकडं बोट करून) आणि ही आहे आमच्या कुटुंबातली धाकटी...म्हणजे उशी. रात्रभर माझ्या डोक्‍याशी असते.
(मुलाकडं बोट करून) अन्‌ हे उभे आहेत ते आहेत...श्री. पांघरूण. हे रात्रभर कुठंही असतात. माझ्यावर लोळणाऱ्या माणसांच्या अंगावर, अंगाखाली किंवा कुठंही. अहो, काही वेळा माणसं पांघरुणात गुरफटली आहेत की पांघरुणं माणसांत, हेही कळत नाही. हं, तर ते असो.
हं... तर आता आम्हाला जरा गप्पा मारू दे.
गादी ः ‘‘या घरातल्या माणसांचा सिनेमा म्हणजे आमचा तमाशा होतो हो!’’
उशी ः ‘‘आँ..? हे कसं काय बाई?’’
गादी ः ‘‘आता आम्ही मजेत निवांत कॉटवर पडून होतो. इतक्‍यात त्या सिनेमाचं खूळ निघालं. झालं! त्यांनी मला कसंतरी उचललं आणि जमिनीवर आपटलं. पडताना पाय दुमडला, मान मुडपली तर... तर त्या बाबांनी लाथेनंच मला सरळ केलं.’’
पांघरूण ः ‘‘याला म्हणतात सिनेमाची नशा...!’’
गादी ः ‘‘म्हणजे?’’
पांघरूण ः ‘‘अगं, ही माणसं त्या सिनेमात पाहतात हाणामारी; पण तशी त्यांना बाहेर करता येत नाही नां. कारण त्यांना माहीत आहे, मारामारी करायला गेलं तर त्यांचंच थोबाड फुटेल! म्हणून मग तुलाच जमिनीवर फेकतात आणि मारामारीच्या मोठ्या स्टाइलनं तुला लाथा हाणतात.’’
उशी ः ‘‘आणखी काय असतं हो त्या सिनेमात?’’
गादी ः (चिडून) ‘‘मरू दे तो सिनेमा. अगं या थंड फरशीवर उताणं पडलं की अगं धरतं माझं. पार गारठून जायला होतं. माझ्या कापूसगाठी अगदी बधीर होतात.’’
पांघरूण ः ‘‘कमालच आहे! एवढी जाडजूड तू; पण तुझ्याकड जरा म्हणून सहनशक्ती नाही. अगं, रात्रभर आम्हीच तुला झाकतो. त्या पंख्याचा भणभणता गार वारा आम्ही स्वतः खातो; पण त्याबद्दल तुला कधीतरी बोलतो? आम्ही बकबक न करता निमूटपणे सहन करतो.’’
गादी ः ‘‘धन्यवाद पांघरूणराव, धन्यवाद! आता तुम्ही सहनशक्तीचं बोललात म्हणून तुम्हालाच एक सांगते, उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी मला गच्चीवर नेतात. मग दिवसभर मला कडक उन्हात ठेवतात. दोन्ही बाजूंनी मला तापव तापव तापवतात, तेव्हा चांगले चरतरीत चटके बसतात मला...आणि हे कमी की काय म्हणून, मग संध्याकाळी मला काठीनं बडव बडव बडवतात!! पण त्या वेळी मी ‘हूं की चूं’ करत नाही म्हटलं. खोळ दाबून काठीचा मार सहन करते.’’
उशी ः ‘‘अं...तसं मी मध्ये बोलणं म्हणजे.. ‘उगाच कापूस पिंजल्यासारखंच आहे..’ ’’
गादी ः ‘‘बोल गं. इतकं काय सुक्‍या कापसासारखं भुरभुरतेस?’’
उशी ः ‘‘तो सिनेमा आणि त्या सिनेमातल्या मारामाऱ्या परवडल्या पण... ते WWF नको गं बाई!’’
गादी ः ‘‘आता हे काय नवीनच?’’
उशी ः ‘‘अहो गादीबाई, तुम्हाला काहीच माहीत नाही. WWF म्हणजे नुसती मारामारी नाही तर चक्क हाणामारी!’’
पांघरूण ः ‘‘हाणामारी म्हणजे...दोघांनी एकमेकांना हाणायचं, मारायचं, आपटायचं, धोपटायचं, उचलायचं, फेकायचं, बुकलायचं, लाथाडायचं...
गादी ः ‘‘बास...बास...बास! आता माझ्या कापसाचे दडे बसले आहेत. हे असलं करणाऱ्यांना माणूस म्हणायचं की राक्षस, हेच मला कळत नाहीए. पण मला सांगा उशीताई, तुमचा त्या WWF शी काय संबंध?’’
पांघरूण ः ‘‘अहो, दिवसभर तुम्ही घरात असलात तरी या घरात काय चाललंय, याचा तुम्हाला थांगपत्ता नसतो. कारण...ही दुष्ट माणसं दिवसभर तुम्हाला झाकून ठेवतात. रंगीबेरंगी जाड बेडशिटमध्ये तुम्हाला गुंडाळून ठेवतात.’’
गादी ः ‘‘ऊं...खरंय तुमचं!’’
उशी ः ‘‘अहो, टीव्हीवरच्या कुठल्यातरी चॅनलवर लागतो हा WWF चा रानटी प्रकार. नेहमी माझ्याशी प्रेमानं वागणारी, मला डोक्‍याशी घेणारी ही मुलं टीव्हीवर ते WWF सुरू झालं की बिथरतात. मग त्या मुलांच्या अंगात ते WWF चं भूत संचारतं. ती मला हवेत उंच उडवतात आणि मी खाली पडण्याआधीच ती मला लाथाडतात. मला पायाखाली चेचतात. हातात धरून बुकलतात. माझे हाल हाल करतात. माझा कापूस आतल्या आत पिंजून निघतो. माझ्या गाठी खिळखिळ्या होतात. काय करणार...? आता वय झालं. कापसाचा साका झाला, खोळ ढिली पडली.’’
पांघरूण ः ‘‘तरीपण तुम्ही भाग्यवान म्हणायच्या...! अहो तो राजेश...’’
गादी ः ‘‘कोण हो?’’
उशी ः ‘‘तो छोटा मुलगा...?’’
पांघरुण ः (वैतागून) ‘‘हो...हो, तोच तो...पाच वर्षांचा घोडा! अहो, एवढा पाच वर्षांचा झालाय तरी त्यानं मागच्या आठवड्यात माझ्या अंगावर रात्री आठ वेळा सू सू केली! आठ वेळा सू सू!!’’
उशी ः ‘‘अहो पांघरूणराव, तुमचं गणित कच्चं दिसतंय. एका आठवड्यात एकूण सातच रात्री असतात म्हटलं...’’
पांघरुण ः (रागारागानं)‘‘तोंडावर कापूस आहे म्हणून वाट्टेल ते बडबडू नकोस. काय गं...माझं अंग सू-सू मध्ये भिजतं तेव्हा तुला गणित सुचतं?’ अगं बये, एका रात्री त्या घोड्यानं दोनदा सू सू केली हे तुला माहीत आहे का? विश्‍वास बसत नसेल तर विचार गादीबाईंना.’’
गादी ः ‘‘रागावू नका पांघरूणराव. अगं उशे, राव काही खोटं बोलत नाहीत गं. तू असतेस डोक्‍याखाली आणि आम्ही असतो अंगाखाली...कळलं?’’
पांघरूण ः ‘‘त्या वेळी मला रोज सकाळी गरम गरम पाण्यात बुचकाळायचे. त्याच वेळी त्या पाण्यात विचित्र वासाचं चमचाभर औषध टाकायचे. त्या सू सूच्या आणि त्या औषधाच्या एकत्रित खतरनाक वासानं तर मला अगदी मळमळायला लागायचं. माझ्या सुंदर डिझाइनचा रंगसुद्धा फिका पडायचं. मग ते मला मशिनमध्ये गरागरा फिरवायचे. ड्रायरमध्ये गरगर घुमवायचे. नंतर दोरीवर उलटं टांगायचे. दिवसभराच्या शिक्षेनंतर मी सुकायचो. मग पुन्हा गादीवर पडून थोडा आराम करावा तर... हा घोडा मुतून, मला पुन्हा पुन्हा भिजवायचा. त्यामुळं रात्रभर सू सूमध्ये भिजून कुडकुडायचं आणि मग दिवसभर दोरीवर उलटं लोंबकळायचं! खरं सांगतो, त्या आठवड्यात माझं बॉर्डरवरचं डिझाइनसुद्धा उलटंसुलटं झालं हो!!’’
गादी ः ‘‘तरी मी म्हणेन... माझ्यापेक्षा तुमचं बरं आहे, पांघरूणराव. माझं मेलीचं कापडच फाटकं! अरे, माझ्यावर चहाचे, सरबताचे, कॉफीचे, औषधाचे, तेलाचे, हळदीचे, आमटीचे आणि त्या घोड्याच्या मुताचेसुद्धा इतके डाग आहेत की...’’
पांघरुण ः ‘‘की...भूगोल शिकवण्यासाठी ॲटलासची गरजच नाही! जगातल्या सगळ्या देशांचे आणि त्या देशातल्या सगळ्या राज्यांचे नकाशे इथं आहेतच!!’’
उशी ः ‘‘आणि आकाशातल्या ग्रह-ताऱ्यांची ‘आकाशगंगा’ माझ्याकडं आहे.’’
गादी ः ‘‘काय म्हणतेस काय...? खरं की का ऽऽ य?’’
उशी ः ‘‘अहो गादीताई, मी कशाला खोटं बोलू? या घरातल्या त्या अक्काबाई, रात्री डोक्‍यावर पचापचा तेल थापतात आणि तशाच झोपतात! त्यांच्या त्या चिकट सुगंधी तेलाचा थेंब थेंब अभिषेक माझ्यावर रात्रभर सुरू असतो. त्या तेलकट जीवघेण्या वासानं मला अगदी गुदमरायला होतं. तो अरुण अभ्यास करताना मला मांडीवर घेतो. माझ्यावर पुस्तकं ठेवतो. मला पेन्सिली टोचतो. शाई पुसतो. आता तर जेवतानासुद्धा मला तो मांडीवर घेतो. माझ्यावर ताट ठेवतो. म्हणजे त्यानं जेवायचं आणि मी भाजून निघायचं. जेवताना माझ्यावर भाजीचा रस्सा, आमटी, लोणचं सांडतो. कधी कधी तो आपले उष्टे हात हळूच माझ्या अंगाला पुसतो, तेव्हा तर अस्सा राग येतो... पण करणार काय? अशा वेळी कापूस गिळून गप्प बसते!!’’
गादी ः ‘‘पण एक लक्षात ठेवा...ही माणसं कशीही असली तरी ती आपल्यावर प्रेम करतात. आपल्याला मायेनं सांभाळतात. तुमच्या आधीपासून खूप वर्षं मी या घरात आहे. आता माझं वय झालंय. मी आता पहिल्यासारखी गुबगुबीत नाही राहिले. फार काही मऊपण नाही. माझ्यावर खूप डाग पडलेत. कापसाच्या गुठळ्या झाल्यात आणि गाठी सुटल्यात. माझी खोळपण आता विरत चालली आहे; पण...पण...तरीसुद्धा तो राजेश म्हणतो, ‘ही माझी गादी आहे. मला नको दुसरी गादी. मी हिच्यावरच झोपणार. माझ्या लाडक्‍या गादीवर!’ तेव्हा मला खूप बरं वाटतं. आनंद होतो. गाठी घट्ट होतात! आपण असे म्हातारे झाल्यानंतर, इतरांसाठी नावडते झाल्यानंतरसुद्धा घरातल्या लहानात लहान मुलाचे आपण ‘आवडते’ आहोत, याचा आनंद...कितीही कापूस पिंजला तरी सांगता येणार नाही.’’
***
‘‘व्वा, व्वा! एकदम फंडू का गुंडू. झंडू का फंडू.’’ सगळी मुलं एकदम ओरडली. पार्थ म्हणाला, ‘‘एकदम टॉपम्‌ टॉप. मी तर आता पांघरूणच होणार.’’
‘‘या वेळी आपल्या गॅदरिंगमध्ये आपण हा धमाकाच करू,’’ असं म्हणत सगळे हात उंचावत म्हणाले ः ‘‘ओके बोके पक्के तर काम शंभर टक्के.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com