राजीव गांधी : सर्वात तरुण पंतप्रधान; जाणून घ्या त्यांनी केलेल्या ५ उल्लेखनिय कामांबद्दल

टीम ई सकाळ
Thursday, 20 August 2020

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज जन्मदिवस. जेव्हा भारत इंग्रजांच्या गुलामीतून स्वतंत्र झाला त्यावेळी ते केवळ तीन वर्षाचे होते.

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज जन्मदिवस. जेव्हा भारत इंग्रजांच्या गुलामीतून स्वतंत्र झाला त्यावेळी ते केवळ तीन वर्षाचे होते. राजीव यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ रोजी झाला होता. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर १९८४मध्ये राजीव देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. या काळात त्यांनी केलेली कामे उल्लेखनिय आहेत. त्यांनी केलेल्या कामाचा गौरव आजही होतो. २१ मे १९९१ला त्यांची लिट्टे या दहशतवादी संघटनेकडून त्यांची हत्या करण्यात आली.

राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंडियन एअरलाइन्समध्ये वैमानिक होते. आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान असल्या तरी त्यांनी मात्र राजकारणातून दूर राहणे पसंत केले होते. अखेर इ. स. १९८० मध्ये भाऊ संजय गांधी याच्या निधनानंतर राजीव गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला. पुढे आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते देशाचे पंतप्रधान बनले. राजीव गांधीच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पुढे पहायला मिळाला.

Rajiv Gandhi's Foreign Policy: Diplomacy in Tough Times - Modern ...

राजीव गांधी यांनी केलेल्या ५ उल्लेखनिय कामांबद्दल...

१) संगणक क्रांती
राजीव गांधी यांनी संगणकयुगाची भारताला ओळख करून दिली. राजीव गांधी यांचे म्हणणे होते की, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय उद्योग विकास होणार नाही. म्हणून त्यांनी संगणक क्रांतीकडे आपले पाऊल टाकले. त्यांनी केवळ देशात संगणक क्रांती घडवून आणली नाही तर, भारतातील आयटी क्षेत्र विकसित करण्यातही राजीव गांधी यांचे योगदान मोठे आहे.

२) मतदान अधिकाराचे वय २१वरून १८ केले
राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळी मतदान करण्यासाठी २१ वर्षे वयाची अट होती. राजीव गांधी यांनी ती बदलून १८ वर्षे केली. १८ वर्षांच्या युवक आणि युवतींना मतदानाचा अधिकार देऊन राजीव गांधी यांनी देशाला सशक्त बनविण्याकडे पहिले पाऊल टाकले होते.

३) पंचायतीराज व्यवस्था
पंचायतीराज व्यवस्था मजबूतीकरणाचे श्रेयही राजीव गांधी यांना जाते. राजीव गांधी यांचे म्हणणे होते की, पंचायती राज व्यवस्था मजबूत नसेल तर देशातील सर्वात खालच्या स्तरातील लोकांना लोकशाहीचा अर्थ समजणार नाही. त्यांनी आपल्या कार्यकाळात पंचायतीराज व्यवस्थेचा संपूर्ण प्रस्ताव तयार केला. पण, त्यांची १९९१मध्ये हत्या झाल्यानंतर एक वर्षाने १९९२मध्ये ७३व्या आणि ७४ व्या घटनादुरुस्तीच्या आधारे पंचायतीराज व्यवस्था उदयाला आली.

४) नवोदय विद्यालयांची सुरुवात
ग्रामीण आणि शहरी भागात नवोदय विद्यालयांची सुरुवात राजीव गांधी यांनी केली. त्यांच्या कार्यकाळातच जवाहर नवोदय विद्यालयांची पायाभरणी झाली होती. नवोदय परिक्षा पास झाल्यावर विद्यार्थ्यांना सहावीपासून १२वी पर्यंत मोफत शिक्षण देण्यात येते. विद्यार्थी पाचवीला असताना ही परिक्षा घेण्यात येते.

५) टेलिकॉमच्या क्रांती
टेलिकॉमच्या क्रांतीची सुरवातही राजीव गांधी यांच्या धोरणांतून झाली आहे. संगणक क्रांतीप्रमाणेच टेलिकॉम क्रांतीतही राजीव गांधी यांचे योगदान खूप मोठे आहे. राजीव गांधी यांनी पहिल्यांदा ऑगस्ट १९८४मध्ये भारतीय दूरसंचार निगमसाठी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स (C-DOT)ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर १९८६मध्ये एमटीएनएलची स्थापना करण्यात आली, ज्यामुळे टेलिकॉम क्षेत्रात आणखीनच सुधारणा झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajiv Gandhi is still remembered for his achievements as prime minister