सुटीसाठी किल्ली आणि कुलुपं (राजीव तांबे)

राजीव तांबे me@rajivtambe.com
रविवार, 23 एप्रिल 2017

आता सगळे वेदांगीकडं पाहू लागले. ती सांगू लागली ः ‘‘माझा किल्ली-शब्द आहे ‘तयार करणं’. या किल्ली-शब्दाचा मी दोन प्रकारे विचार केला आहे. एक, आपण काहीतरी नवीन तयार करणं. आणि दुसरा, काहीतरी करण्यासाठी स्वतःला तयार करणं. आणि मग मी यातला दुसरा अर्थ निवडला...’’

आता सगळे वेदांगीकडं पाहू लागले. ती सांगू लागली ः ‘‘माझा किल्ली-शब्द आहे ‘तयार करणं’. या किल्ली-शब्दाचा मी दोन प्रकारे विचार केला आहे. एक, आपण काहीतरी नवीन तयार करणं. आणि दुसरा, काहीतरी करण्यासाठी स्वतःला तयार करणं. आणि मग मी यातला दुसरा अर्थ निवडला...’’

हा रविवार नेहाकडं ठरला होता. सुटी सुरू झाली असल्यानं इतके खेळ समोर दिसताहेत, की आज कुठला खेळ खेळायचा हेच तिला सुचत नव्हतं.
इतक्‍यात अन्वय, पालवी, शंतनू, वेदांगी आणि पार्थ आलेच. 
‘‘आज एक से बढकर एक, म्हणजे आपण सहाजण’’ पार्थनं असं म्हणत अन्वयला टाळी दिली.
नेहाचा बाबा म्हणाले ः ‘‘आजच्या रविवारचं मी जरा वेगळंच नियोजन केलं आहे आणि तेही दोन भागांत.’’
‘‘म्हणजे आम्हाला खाऊ कधी मिळणार? दोन्ही भागांत की मध्यंतरात?’’
‘‘तीन भागांत..!’’
‘‘आँ..? ते कसं काय?’’
इतक्‍यात आई सगळ्यांसाठी खाऊच्या बश्‍या घेऊन आली. ‘‘अरे, तीन भागांत म्हणजे, आत्ता, मग मध्यंतरात आणि घरी जाताना. तुला हवं असेल तर मी तुला चार भागांतपण खाऊ देईन..’’
‘‘नको, नको आई. बास बास. चार भागांत खाऊ म्हणजे माझे चार चौके वाजतील.’’
‘‘आता आपल्याला आपल्या सुटीचं नियोजन करायचं आहे. उगाच फालतू टाईमपास करण्यासाठी काही ही सुटी नाही. यासाठीच आपण एक खेळ दोन भागांत खेळू. मी प्रत्येकाला एकेक ‘किल्ली-शब्द’ देणार आहे. या किल्ली-शब्दाचा उपयोग करून तुम्ही नवनवीन आयडियांची कुलपं उघडायची आहेत..’’
‘‘बाबा, मला काहीच कळलं नाही.’’
‘‘ठीक आहे. सोपं करून सांगतो,’’ बाजूलाच ठेवलेल्या सहा चिठ्ठ्या बाबांनी घेतल्या. ‘‘या प्रत्येक चिठ्ठीत एक किल्ली-शब्द आहे. तुम्ही एकेक चिठ्ठी घ्या. मग मी पुढचं सांगेन.’’
सगळ्यांनी चिठ्ठ्या घेतल्या. त्या चिठ्ठ्यांमध्ये ‘प्रवास’, ‘कला’, ‘नवीन शिकणं’, ‘मदत’, ‘तयार करणं’ आणि ‘सोबत शिकणं’ असे सहा किल्ली-शब्द होते. हे किल्ली-शब्द अनुक्रमे अन्वय, नेहा, पालवी, शंतनू, वेदांगी आणि पार्थ यांना मिळाले होते. 
‘‘आता उदाहरणार्थ, आपण ‘प्रवास’ हा किल्ली-शब्द घेतला, तर या सुटीत तुम्हाला कुठं कुठं प्रवास करायचा आहे? का? आणि कसा? हे तुम्ही मला फक्त पाच ओळींमध्ये सांगायचं आहे.’’
‘‘अगदी सोपं. या सुटीत तुला कुणाच्या सोबत काय शिकायचं आहे? कसं शिकायचं आहे? आणि का शिकायचं आहे? कळलंय?’’
‘‘हो, हो’’ अशा माना हलवत सगळी मुलं हातात कागद-पेन घेऊन घरात वेगवेगळ्या ठिकाणी गेली. ज्यांना शंका होती, ते बाबांजवळ जाऊन खुसफुसू लागले.
दहा मिनिटं संपताच बाबांनी टाळ्या वाजवल्या. सगळी मुलं एकत्र जमली.
‘‘चला, अगदी थोडक्‍यात प्रत्येकानं सांगा.’’
हात वर करत पार्थ ओरडला ः ‘‘आधी मी. माझा किल्ली-शब्द आहे ‘सोबत शिकणं’ आणि या किल्लीनं मी चार कुलपं उघडली आहेत..’’
‘‘शाबास, कुठली कुलपं?’’
‘‘मला पॅंट शिवायची आहे..’’
‘‘क्का..य? तुझी पॅंट फाटली की काय?’’
‘‘अरे, कुठं फाटली पॅंट?’’
‘‘म्हणजे याची पॅंट ‘हवामहल’ झाली वाटतं?’’
‘‘वैतागून दोन्ही हात उंचावत पार्थ ओरडला ः ‘‘अरे, थांबा रे. माझी पॅंटबिंट काही फाटली नाहीए आणि ‘हवामहल’पण झालेला नाहीए...’’
‘‘अरे, तुझी पॅंट फाटलीच नाही तर शिवणार कशी...?’’
‘‘आधी माझं बोलणं पूर्ण होऊ दे. मला सरळ कापडापासून नवीन पॅंट शिवायला शिकायचं आहे. म्हणून मी या सुटीत आमच्या घराजवळच्या ‘स्टायलेक्‍स टेलर्स’कडच्या त्या काकांसोबत शिकणार आहे. मला कधीपासून कुतूहल आहे, की सरळ कापडापासून गोल पॅंट आणि चौकोनी शर्ट कसे काय शिवले जातात! सगळ्या टेलरमंडळींची मापं घेण्याची एक विशिष्ट पद्धत कशी काय ठरली? मापं घेऊन ते कापड कसं काय कापतात? हे मला त्यांच्यासोबत शिकायचंच आहे.’’
‘‘अरे, पण ही तर दोनच कुलपं झाली की. बाकीची दोन कुठली?’’
‘‘अरे हां..हां. राहिलंच सांगायचं. मला शिवणाचं मशिन चालवायलापण त्यांच्याकडून शिकायचं आहे. आणि...आणि...ते चौथं कुलूप कुठलं ते मात्र मी अजून ठरवलेलं नाहीय.’’
पार्थला शाबासकी देत बाबा म्हणाले ः ‘‘व्वा! किल्ली-शब्दांचा उपयोग करून पार्थनं त्याला हवी ती कुलपं उघडली आहेत. फारच छान.’’
हात वर करत अन्वय म्हणाला ः ‘‘आता मी. माझा किल्ली-शब्द आहे प्रवास. म्हटलं तर या किल्लीनं एकच कुलूप उघडेल किंवा हजारो कुलपं उघडतील. माहीत नसलेल्या ठिकाणी मला प्रवास करायचा आहे...’’
‘‘...माहीत नसलेल्या ठिकाणी प्रवास कसा करता येईल?’’
‘‘आणि प्रवास केला की सगळंच माहीत होईल की !’’
‘‘हो खरंय. मला असं म्हणायचं आहे, की मी अशा ठिकाणी जाणार आहे, की ज्या ठिकाणी मी कधीही गेलेलो नाही. मी एकट्यानंच जाणार आहे. कुठल्यातरी परक्‍या गावात जाऊन दोन दिवस राहायचं. कुठलं गाव माहीत नाही. कुणाकडं राहणार माहीत नाही. कसा राहणार माहीत नाही; पण मी हे करणार हे मात्र मला माहीत आहे! मी बसमधून जाताना किंवा ट्रेनमधून जाताना अनेक गावं पाहिली आहेत. त्या वेळी मला नेहमी वाटायचं, की एकदा तरी या कुठल्यातरी एका गावात गेलं पाहिजे, दोन दिवस राहिलं पाहिजे, गावातल्या लोकांशी ओळखी करून घेतल्या पाहिजेत आणि गावातल्या मुलांशी मैत्री केली पाहिजे. या सुटीत असंच करावं, असं मला वाटतंय. मला खात्री आहे, की जरी मी अनोळखी गावात गेलो तरी मी तिथं मिसळून जाईन.’’
‘‘व्वा, व्वा! फारच छान. हा तुझा प्रवास वेगळा आहे. खरं म्हणजे अनोळखी गाव नव्हे, तर हा स्वतःलाच शोधण्याचा प्रवास आहे. फार छान,’’ बाबांनी असं कौतुक करताच अन्वयला आनंद झाला.
नेहा बोलू लागली ः ‘‘माझा किल्ली-शब्द आहे कला. गंमत म्हणजे, मला हवा होता तोच किल्ली-शब्द मला मिळाला आहे. मला थोडीफार पेटी वाजवता येते; पण या सुटीत मला की-बोर्ड शिकायचा आहे आणि नुसतं वाजवायलाच नाही तर कवितांना, गाण्यांना चाली देणं आणि ते सगळं संगीतात बांधण हेही मला शिकायचं आहे. कारण ते माझं पॅशन आहे. ती माझी आंतरिक ओढ आहे आणि खरं सांगायचं म्हणजे, मी या सगळ्याला सुटी लागली त्याच्या पहिल्या दिवसापासूनच सुरवात केली आहे.’’
सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या.
‘‘आता मला बोललंच पाहिजे,’’ असं म्हणत शंतनू बोलू लागला. 
‘‘माझा किल्ली-शब्द आहे मदत. मीसुद्धा नेहाप्रमाणे सुरवात केली आहे. माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आदित्य हा दिव्यांग आहे आणि आमच्या सोसायटीत दीपा नावाची एक अंध मुलगी आहे. मी त्यांच्याशी खेळायला जातो. त्यांना गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवतो. दीपाला मी गोष्टीचीच नव्हे, तर अभ्यासाचीपण पुस्तकं वाचून दाखवतो. दोनदा ऐकलेलं तिच्या पक्कं लक्षात राहतं. ती खूप हुशार आहे. 
आदित्य तर बुद्धिबळ खेळण्यात फार हुशार आहे. त्यानं शाळेतली बुद्धिबळाची सगळी बक्षिसं जिंकली आहेत. तो शाळेचा चेस चॅंपियन आहे; पण या दोघांना ‘मदत’ हा शब्द आवडत नाही. त्यांना कुणाचीच मदत नको असते, किंबहुना ते कुणाची मदत घ्यायला तयारपण नसतात. त्यांना ‘मदत’ नव्हे तर ‘मैत्री’ हवी असते. म्हणून बाबा, माझा किल्ली-शब्द ‘मदत’च्या ऐवजी ‘मैत्री’ असा करू या. आणि खरंच ते माझे मित्रच आहेत. दीपाचा आवाज तर इतका छान आहे, की ती गाऊ लागली की कुणीतरी मोठी गायिकाच गात आहे, असं वाटतं. माझे काका गावाहून आले, की मुद्दामहून तिला बोलावतात आणि तिची गाणी ऐकतात..’’
आणि सगळी मुलं म्हणाली ः ‘‘ए...आम्हालापण भेटायचं आहे त्यांना. आम्हालापण त्यांच्याशी मैत्री करायची आहे. आम्हाला दीपाची गाणी ऐकायची आहेत...’’ मुलांचा कल्लाच सुरू झाला.
बाबा म्हणाले ः ‘‘शंतनू, तू ग्रेटच आहेस. तुझं एकदम बरोबर आहे. आपण शंतनूचा किल्ली-शब्द बदलून ‘मैत्री’ असा करू या. चला, आता आपण एक छोटसं मध्यांतर करून इटुकला-पिटुकला खाऊ खाऊ या.’’
पालवी आणि वेदांगी म्हणाल्या ः ‘‘हे काय? अजून आमच्या किल्ल्या तशाच पडून आहेत. तुमच्या इंटरव्हलमुळं आमच्या कुलपांना गंज येईल. इंटरव्हल कॅन्सल.’’
सगळे म्हणाले ः ‘‘ओके बोके पक्के, काम शंभर टक्के.’’
पालवी म्हणाली ः ‘‘माझा किल्ली-शब्द आहे नवीन शिकणं; पण याचा अर्थ ‘स्वतःहून नवीन शिकणं’ असा मी घेतला आहे. अगदी लहानपणापासूनच मला घड्याळाविषयी फार कुतूहल आहे. वेगवेगळ्या गतीनं काटे कसे फिरतात? आपण सांगू तेव्हाच गजर कसा होतो? वगैरे...मला तर लहानपणी वाटायचं, ‘आता पाच वाजलेत’ हे घड्याळाला कसं कळतं? आणि किती वेळ अगोदर कळतं...? गेल्या महिन्यात आमचं घड्याळ बंद पडलं, तेव्हा बाबा म्हणाले, ‘पालवी आता हे घड्याळ तुझं. आता ते तूच रिपेअर कर.’ आणि मी सुरवात केली. याशिवाय मला या सुटीत सगळ्या कपड्यांना इस्त्री करायलापण शिकायंच आहे; पण माझी मीच शिकणार बरं का.’’
‘‘आता घड्याळाचे ‘बारा वाजले’ असले, तरी लवकरच त्याची टिक टिक सुरू होऊन ते टकाटक होईल, याची मला खात्री आहे,’’ असं बाबांनी म्हणताच सगळ्यांनी टॅकटॅक टाळ्या वाजवल्या.
आता सगळे वेदांगीकडं पाहू लागले. माझा किल्ली-शब्द आहे ‘तयार करणं’. या किल्ली-शब्दाचा मी दोन प्रकारे विचार केला आहे. एक, आपण काहीतरी नवीन तयार करणं. आणि दुसरा, काहीतरी करण्यासाठी स्वतःला तयार करणं. आणि मग मी यातला दुसरा अर्थ निवडला...’’
‘‘सगळेच आनंदाने म्हणाले ः ‘‘व्वा! किती छान.’’
‘‘ही सुटी मी इंग्लिशच्या तयारीसाठी वापरणार आहे. मला इंग्लिश बोलताना किंवा लिहिताना थोडा त्रास होतो. कारण, मी खूप वेळा मराठीत विचार करते आणि मग ते इंग्लिशमध्ये मांडण्याच विचार करते आणि हे असं होतं, कारण माझी शब्दसंपत्ती कमी आहे. मला काय लिहायचं ते माहीत असतं; पण त्यासाठी शब्दच मिळत नाहीत. या सुटीत मी भरपूर इंग्लिश वाचणार आहे. माझ्या भाषेत इंग्लिशमध्ये लिहिणार आहे. न अडखळता इंग्लिश बोलण्याचा सराव करणार आहे. म्हणजे यासाठीच मी स्वतःला तयार करणार आहे.’’
‘‘शाबास वेदांगी, शाबास!’’
‘‘वेदांगी हे तर लई भारी.’’
बाबांनी सगळ्यांनाच शाबासकी दिली आणि म्हणाले :  ‘‘आता खेळाचा दुसरा भाग काय असेल, असं वाटतं?’’
वेदांगी म्हणाली : ‘‘मला पालवीसोबत घड्याळ रिपेअर करायचं आहे.’’
शंतनूला अन्वयबरोबर अनोळखी गावात जायचं आहे.
सगळ्यांनाच आदित्य आणि दीपाशी मैत्री करायची आहे.
सगळ्यांनाच इंग्लिश-मिंग्लिश करायचं आहे.
बाबा म्हणाले : ‘‘शाबास मुलांनो, हाच आहे या खेळाच दुसरा भाग.
शोधणं, शिकणं आणि यातूनच स्वतःला तयार करणं हे सहजी व्हायला हवं. यासाठीच तर आहे ही सुटी. कुठल्याही किल्लीनं कुठलंही कुलूप उघडायचं. म्हणजेच आपल्या किल्ल्या इतरांबरोबर शेअर करायच्या.’’
‘‘खरं म्हणजे, आता खाऊ शेअर करायची वेळ झाली आहे. पोटातली कुलपं किरकिर करताहेत. त्यांना जरा ‘चकलीच्या चाव्या’ लावू या. ही आयडिया कशी आहेय?’’
हे कोण बोललं असेल, ते तुम्ही ओळखलंच असेल.

पालकांसाठी गृहपाठ 
 हे वाचून अनेक पालकांना साक्षात्कार होण्याची शक्‍यता असल्यानं, आता आणखी गृहपाठ देत नाही.
 ‘सुटी ही नवीन चुका करण्यासाठी आणि चुकांमधून नवीन गोष्टी शिकण्यासाठीच असते, हे फक्त हुशार पालकांनाच माहीत असतं’ ही प्राचीन चिनी म्हण तुमच्या मुलांना अवश्‍य सांगा.

Web Title: rajiv tambe write about summer holiday