शून्य गुलाम (राजीव तांबे)

राजीव तांबे me@rajivtambe.com
रविवार, 25 जून 2017

आता सगळीच मुलं गोंधळली. पार्थनं भीत भीत विचारलं ः ‘‘आपण बेरीज करणार नाही. वजाबाकी करणार नाही. गुणाकार करणार नाही. भागाकार करणार नाही. म...म...काय, करणार तरी काय? मला काय कळतंच नाय...!’’ ‘‘आपण संख्यांचा खेळ खेळणार आहोत; पण आधी खेळ समजून घ्या. हा खेळ थोडा बदल केला तर वेगळ्या प्रकारेही खेळता येतो. म्हणजे कमीत कमी १८ प्रकारे तरी खेळता येतो. त्यातला पहिला प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. बाकीचे प्रकार तुम्ही शोधायचे आहेत.’’

आता सगळीच मुलं गोंधळली. पार्थनं भीत भीत विचारलं ः ‘‘आपण बेरीज करणार नाही. वजाबाकी करणार नाही. गुणाकार करणार नाही. भागाकार करणार नाही. म...म...काय, करणार तरी काय? मला काय कळतंच नाय...!’’ ‘‘आपण संख्यांचा खेळ खेळणार आहोत; पण आधी खेळ समजून घ्या. हा खेळ थोडा बदल केला तर वेगळ्या प्रकारेही खेळता येतो. म्हणजे कमीत कमी १८ प्रकारे तरी खेळता येतो. त्यातला पहिला प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. बाकीचे प्रकार तुम्ही शोधायचे आहेत.’’

या  वेळी सगळ्यांचा मुक्काम पालवीच्या घरी होता. पालवीची आई सुगरण असल्यानं आज नक्कीच काहीतरी चमचमीत चापायला मिळणार म्हणून शंतनू भलताच खूश होता. सकाळीच शंतनू, नेहा, वेदांगी, पार्थ आणि अन्वय हे पालवीच्या घरी पोचले. घरी आल्या आल्या शंतनूनं हळूच स्वयंपाकघरात डोकावून पाहिलं; पण तिथं त्याला कुणीच दिसलं नाही की कुठला मसालेदार वासही आला नाही. शंतनूचा जीव जरा तगमगला.
बाबा म्हणाले ः ‘‘आज पावसानं चांगलाच सूर पकडलाय. त्यामुळं घराबाहेर जाता येणार नाही आणि गच्चीत तर नाहीच नाही. आज आपण एक वेगळाच खेळ खेळू. या खेळासाठी आपण पत्ते वापरणार आहोत...’’

‘‘पण बाबा, पत्ते वापरून तर आपण मागंही एकदा खेळलो होतोच की. आता पुन्हा नको तो खेळ.’’
पार्थचं बोलणं ऐकून बाबा हसतच म्हणाले ः ‘‘अरे पार्था, पत्ते तेच असले तरी हा खेळ वेगळा आहे बरं. हा गणिताचा खेळ डोक्‍याला झिणझिण्या आणणारा आहे.’’
‘‘मग तर आपण खेळलाच पाहिजे,’’ नेहा ठसक्‍यात म्हणाली.
शंतनू म्हणाला ः ‘‘माझ्या डोक्‍याला तर मगाशीच झिणझिण्या आल्या...’’
‘‘आँ...? त्या कशा काय?’’ सगळेच म्हणाले.
‘‘स्वयंपाकघरात अगदीच शांतता आहे ना...! ना कुठला वास? ना कुठला आवाज? म...आज आम्ही उपोषणच करायचं की काय?’’
सगळेच ठासठूस हसू लागले.
पालवी म्हणाली ः ‘‘अरे, आज आमचा गॅस गेलाय...’’
‘‘ओये...हे ऐकून तर माझ्या पोटात भुकेचा गॅस पेटलाय...’’
‘‘अरे शंतनू, नीट ऐक तरी. घरातला गॅस गेलाय म्हणून आई शेजारच्यांकडं गेली आहे, आपल्यासाठी गरमागरम खाऊ करायला. तुझा ‘भुकेचा गॅस’ लवकरच विझवू आपण,’’ हे ऐकताच भुवया उडवत शंतनू म्हणाला ः ‘‘तर मग ठीक आहे.’’
बाबा सांगू लागले ः ‘‘मागच्या वेळी आपण पत्ते वापरून बोर्डावर बेरीज-वजाबाकीचा खेळ खेळलो होतो; पण या वेळी आपण बेरीज-वजाबाकी करणार नाही...’’
‘‘म...काय करणार? गुणाकार-भागाकार का?’’
‘‘अं...नाही.’’
आता सगळीच मुलं गोंधळली. पार्थनं भीत भीत विचारलं ः ‘‘आपण बेरीज करणार नाही. वजाबाकी करणार नाही. गुणाकार करणार नाही. भागाकार करणार नाही. म...म...काय, करणार तरी काय? मला काय कळतंच नाय...!’’

‘‘आपण संख्यांचा खेळ खेळणार आहोत; पण आधी खेळ समजून घ्या. हा खेळ थोडा बदल केला तर वेगळ्या प्रकारेही खेळता येतो. म्हणजे कमीत कमी १८ प्रकारे तरी खेळता येतो. त्यातला पहिला प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. बाकीचे प्रकार तुम्ही शोधायचे आहेत.’’
‘‘पत्ते पिसत पालवी म्हणाली ः ‘‘लवकर सांगा.’’
‘‘या खेळात आपल्याला ० ते ९ या संख्यांची गरज आहे. १ ते ९ या संख्यांसाठी आपण एक्का ते नव्वी हे पत्ते वापरणार आहोत. शून्यासाठी मात्र आपण जॅक किंवा गुलाम यांचा वापर करणार आहोत आणि हा खेळ आपण दोन गटांत खेळणार आहोत.
अन्वय, पार्थ आणि पालवी एका गटात. शंतनू, नेहा आणि वेदांगी दुसऱ्या गटात. प्रत्येक गटाकडं पत्त्याचा एकेक जोड असणार आहे. आता खेळ ऐका. किलवर म्हणजे एकक आणि बदाम म्हणजे दशक. मी जर म्हणालो ‘सोळा’ तर याचा अर्थ होतो एक दशक आणि सहा एकक. मग तुम्ही मला बदामचा एक्का आणि किलवरची छक्की दाखवायची आहे. कळलंय?’’
बाबांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच सगळ्यांचे हात वर झाले.
‘‘मी आणखी चार प्रकार शोधलेत.’’
‘‘मी तीन प्रकार..’’
‘‘मी तर चार प्रकार शोधलेत,’’ असा मुलांनी कल्लाबल्लाच केला.
बाबा त्यांना शांत करत म्हणाले ः ‘‘आपण दोन गटांत खेळायला सुरू तर करू या; पण या खेळातला एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा. एका गटानं संख्या सांगितल्यानंतर दुसऱ्या गटानं संख्या दाखवताना, आपण ज्या क्रमानं संख्या लिहितो, त्या क्रमानं दाखवायची आहे.
ज्या क्रमानं संख्या मोजतो, त्याप्रमाणे नव्हे...’’
‘‘म्हणजे...? आता हे कुठले दोन क्रम?’’ पार्थनं गोंधळून विचारलं.
‘‘पार्थच्या प्रश्‍नाचं उत्तर कोण देईल?’’

शंतनू त्याला समजावत म्हणाला ः ‘‘अरे पार्थ, आपण संख्या लिहिताना डावीकडून उजवीकडं लिहितो; पण मोजताना मात्र उजवीकडून डावीकडं मोजतो. म्हणजे समजा ३० ही संख्या दाखवायची असेल, तर आधी बदाम तिर्री आणि मग गुलाम दाखवला पाहिजे.’’
‘‘शाबास शंतनू. आता सगळ्यांनाच हा खेळ कळला असेल. आता आपण पहिल्याप्रकारे खेळण्यासाठी दोन्ही गटांनी समोरासमोर बसा. किलवरचे आणि बदामचे पत्ते तयार ठेवा.’’
नेहा म्हणाली ः ‘‘सत्तावन.’’
पालवी क्षणभर गोंधळली; पण लगेचच तिनं उजव्या हातात बदाम पंजी आणि डाव्या हातात किलवर सत्ती घेऊन दाखवली.
अन्वय म्हणाला ः ‘‘अठ्ठेचाळीस.’’
वेदांगी किलवर अठ्ठी हातात घेणारच होती, इतक्‍यात शंतनूनं खूण केली. वेदांगी समजली. वेदांगीनं उजव्या हातात बदाम चौव्वी आणि डाव्या हातात किलवर अठ्ठी घेतली.
दोन्ही गटांना सारखेच मार्क मिळाले.
‘‘दशकाची संख्या उजव्या हातात का घ्यायची? डाव्या का नाही?’’ असं वेदांगीनं विचारताच बाबा म्हणाले ः ‘‘या प्रश्‍नाचं उत्तर कोण देईल?’’
सगळ्यात आधी पालवीनं आणि नंतर अन्वयनं व नेहानं हात वर केले.
‘‘अगदी सोपं आहे. समोरच्या गटानं आपल्याला संख्या विचारलेली आहे. त्यामुळं ती त्यांना सुटसुटीतपणे वाचता येईल अशीच धरली पाहिजे. कारण ते वाचताना डावीकडून उजवीकडं वाचायचं आहे म्हणून!’’
उड्या मारतच पार्थ म्हणाला ः ‘‘मी...मी दुसरा प्रकार शोधला आहे. मी सांगणार... मी सांगणार...’’
पार्थला शांत करत बाबा म्हणाले ः ‘‘अरे, मग सांग की. उड्या कशाला मारतो आहेस?’’
‘‘किलवर म्हणजे एकक. बदाम म्हणजे दशक आणि चौकट म्हणजे शतक! हा... हा... हा आहे माझा शंभरनंबरी शोध!’’
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. वेदांगी म्हणाली ः ‘‘पार्थनं फारच मोठा शोध लावला आहे. हे आम्हा कुणालाच सुचलं नव्हतं. एकदम शंभर पे शंभरनंबरी..’’
पार्थ फसफसून लाजत म्हणाला ः ‘‘म्हणजे मी खरंच हुशार असणार ना?’’
हे ऐकल्यावर मात्र सगळेच खसाखूस ठसाठूस हसले.
‘‘आता मी सांगणार,’’ असं म्हणत पार्थ म्हणाला ः ‘‘तीनशे पाच.’’

शंतनूनं चौकट तिर्री हातात घेतली. मग त्याच्या बाजूला गुलाम आणि नंतर किलवर पंजी.
पार्थनं विचारलं ः ‘‘पण गुलाम कुठल्या रंगाचा किंवा कुठल्या चिन्हाचा घ्यायचा?’’
अन्वय म्हणाला ः ‘‘मी सांगतो...अरे पार्थ, या खेळात फक्त रंगाला महत्त्व नाही, तर चिन्हाला आहे, हे आधी समजून घे. जर आपण किलवर दुर्री घेतली तर तिची किंमत दोन होते; पण आपण जर बदाम दुर्री घेतली, तर तिची किंमत २० होते. असं होतं कारण प्रत्येक चिन्ह हे एक स्थान आहे. दोन्ही ठिकाणी आपण दुर्रीच घेतली; पण तरीही किंमत का बदलली? कारण स्थान बदललं म्हणून. आपण किंमत काढताना स्थानाची किंमत गुणिले त्या अंकाची किंमत असं करतो. किलवर दोन म्हणजे दोन गुणिले एक आणि बदाम दोन म्हणजे दोन गुणिले दहा...’’
‘‘हो. इथपर्यंत मला समजलंय; पण माझा प्रश्न त्या गुलामाविषयी आहे.’’
‘‘थांब मी सांगते. गुलाम कुठल्याही स्थानावर असला तरी त्याची किंमत शून्यच असणार ना?’’ वेदांगीनं असं म्हणताच पुन्हा पार्थच्या चेहऱ्यावर प्रश्‍नचिन्ह दिसू लागलं.
नेहा म्हणाली ः ‘‘आता मी सांगितल्यावर पार्थला समजलंच पाहिजे. कारण, पार्थ हुशार मुलगा आहे. समजा, आपण बदामचा गुलाम घेतला, तर त्याची किंमत काढण्यासाठी आपण काय करणार...?’’
‘‘स्थानाची किंमत गुणिले त्या स्थानावरच्या अंकाची किंमत.’’
‘‘अगदी बरोबर पार्थ. स्थानाची किंमत १० आणि गुलामाची किंमत शून्य. म्हणून दहा गुणिले शून्य बरोबर शून्यच की. काय...?’’
‘‘कळलं मला. आता ही चूक पुन्हा होणार नाही. आता मला कुठलीही संख्या विचारा...’’ पार्थनं असं म्हणताच लगेचच शंतनू म्हणाला ः ‘‘सातशे साठ.’’
अन्वयनं खुणेनंच पार्थला विचारलं ः ‘‘मदत करू का?’’
पार्थनं ‘‘ना ना’’ करत मान डोलावली. पार्थनं चौकट सत्ती घेतली; मग गुलाम घेतला व नंतर किलवर अठ्ठी घेतली. सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे पार्थला शाबासकी दिली. ‘‘आता चौथा प्रकार कुठला हे तुम्ही ओळखलंच असेल?’’ असं बाबांनी म्हणताच अन्वय आणि नेहा म्हणाले ः ‘‘विचारा त्या हुशार मुलाला...’’

पुन्हा एकदा हास्याचा खुसफुसाट झाला. पालवी म्हणाली तीन हजार सोळा. शंतनू तयारीतच होता. त्याने इस्पिकची तिर्री, एक गुलाम, बदामचा एक्का आणि किलवरची छक्की घेतली.
शंतनू म्हणाला ः ‘‘आता मी संख्या सागणार आणि ती पार्थनंच दाखवायची.’’
पार्थ म्हणाला ः ‘‘चलो करो शुरू. आपुन बी है गुरू.’’
शंतनू म्हणाला ः ‘‘नऊ हजार एक.’’
पार्थ क्षणभर थांबला. आता सगळेच त्याच्याकडं उत्सुकतेनं पाहू लागले.
पार्थनं इस्पिकची नव्वी घेतली; मग हलकेच केसावरून हात फिरवत दोन गुलाम घेतले आणि मग किलवर एक्का.
सगळ्यांनी जोरात हुश्‍श केलं. शंतनू म्हणाला ः ‘‘शाबास पार्थ...पण आता माझ्या पोटाचा गुलाम झाला आहे...’’
‘‘आता हे काय नवीनच?’’
‘‘म्हणजे...माझं पोट म्हणजे, आता एक मोठं शून्यच झालं आहे. लवकरात लवकर त्यात काहीतरी भरायला पाहिजे, नाहीतर ते...’’  ‘‘मोठं शून्य होईल!’’
‘‘कळलंय...कळलंय हो’’ असं म्हणत पालवीची आई हातात खाऊच्या बश्‍या घेऊन आली. शंतनूला दोन लाडू देत आई म्हणाली ः ‘‘बाळ शंतनू, हे घे २० लाडू. खा आता..’’
शंतनू किंचाळलाच ः ‘‘क्काय ? २० लाडू? मला तर दोनच दिसत आहेत...’’
‘‘अरे, पण तू कुठल्या स्थानावर बसला आहेस त्याचा विचार करून...’’
‘‘अस्सं काय? म...आता तर मी २० लाडू हाणणारच.’’
हे शेवटचं वाक्‍य कोण बोललं असेल, ते तुम्ही ओळखलं असेलच.


पालकांसाठी गृहपाठ ः

  •   ‘पत्ते म्हणजे वाईट’ असा अनेक पालकांचा (गैर)समज असतो; पण लक्षात ठेवा, कुठलीच गोष्ट ‘फक्त वाईट’ किंवा ‘फक्त चांगली’ नसते. तुम्ही त्या गोष्टीचा कल्पकतेनं कसा वापर करता, त्यावर तिचं वाईटपण आणि चांगलेपण अवलंबून असतं.
  •   पत्त्यांचा कल्पकपणे उपयोग करून तुम्हाला आणखीही वेगवेगळे खेळ मुलांसोबत खेळता येतील. (तुम्हाला सुचत नसतील तर मुलांना विचारा).
  •   खेळताना मुलांनी कुठलाही प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचा आणि त्या प्रश्नकर्त्या मुलाचा आदर करा. मुलांनी विचारलेला कुठलाच प्रश्न क्षुल्लक नसतो.
  •   मुलांना खेळताना प्रश्न पडले, तर लगेचच त्यांची उत्तरं तुम्ही देऊ नका. इतर मुलांनीच ती उत्तरं शोधावीत यासाठी त्यांना संधी द्या. यातूनच मुलांचं एक पाऊल पुढं पडतं.
  •   ‘जे प्रश्नांचा आदर करतात आणि प्रश्नांना चहूबाजूंनी भिडतात, तेच उत्तरांपर्यंत पोचतात’ ही चिनी म्हण खूप महत्त्वाची आहे!
Web Title: rajiv tambe write article in saptarang