ओळखा पाहू...! (राजीव तांबे)

राजीव तांबे me@rajivtambe.com
रविवार, 27 ऑगस्ट 2017

सहा जण घरातल्या वेगवेगळ्या वस्तू आणायला धावले. प्रत्येकानं पाच पाच वस्तू आणून चटईवर ठेवल्या. एकूण ३० वस्तू जमल्या. आता तीन-तीन जणांचे असे दोन गट करण्यात आले. आता समोरच्या गटानं मनात धरलेली वस्तू एकमेकांना काही प्रश्‍न विचारून ओळखायची होती. खेळ सुरू झाला...

सहा जण घरातल्या वेगवेगळ्या वस्तू आणायला धावले. प्रत्येकानं पाच पाच वस्तू आणून चटईवर ठेवल्या. एकूण ३० वस्तू जमल्या. आता तीन-तीन जणांचे असे दोन गट करण्यात आले. आता समोरच्या गटानं मनात धरलेली वस्तू एकमेकांना काही प्रश्‍न विचारून ओळखायची होती. खेळ सुरू झाला...

हा  रविवार शंतनूच्या घरी दंगामस्ती करण्यासाठीच राखून ठेवण्यात आला होता. अन्वय, नेहा, पालवी, पार्थ आणि वेदांगी यांनी आल्या आल्याच ‘खाना-पीना, मस्ती करना, खाना-पीना, मस्ती करना’ असला मंत्र म्हणायला सुरवात केली.
‘‘आज काहीतरी वेगळंच करू या,’’ असं नेहा म्हणाली तेव्हा आनंदानं हात उंचावत शंतनू म्हणाला ः ‘‘हो...हो...नक्कीच काहीतरी वेगळं चरचरीत, चुरचुरीत, चटकदार, चटपटीत खायला करू याच. ही मस्त आयडिया आहे.’’

‘‘अरे देवा! मी काही खाण्याबद्दल म्हणत नव्हते...मी खेळण्याबद्दल म्हणत होते,’’ असं नेहाच्या आईनं म्हणताच शंतनू सोडून बाकीचे सगळे टरटरून हसले.
‘‘हं. आज आपण दोन गटांत खेळणार आहोत. तुम्ही सहा जण आहात. आता तुम्ही घरात फिरायचं. इकडं-तिकडं शोधायचं. प्रत्येकानं घरातल्या पाच पाच वस्तू आणायच्या...’’
‘‘अगं हो, पण त्या वस्तू आणून करायचं काय?’’ पार्थनं असं विचारताच नेहाची आई म्हणाली ः ‘‘करायचं काय म्हणजे? वस्तू आणायच्या आणि या इथं चटईवर ठेवायच्या.’’
पार्थनं करकरून विचारलं ः ‘‘अगं, पण नुसत्या ठेवून काय करायचं...असं विचारतोय मी.’’
आई हसतच म्हणाली ः ‘‘अरे आधी आणा तर...मग सांगते. चला सुटा...’’
सगळे जण घरात सैराटले.
प्रत्येकानं पाच पाच वस्तू आणून चटईवर ठेवल्या.
मनगटी घड्याळ, टीव्हीचा रिमोट, अंगाचा साबण, चष्मा, मोबाईल.
कात्री, सोंगटी, ताट, वाटी, भांडं.
काचेची बाटली, सुरी, पेन, टूथपेस्ट, चार्जर.
नेलकटर, पेन्सिल, सीडी, स्टीलची पट्टी, १०० रुपयांची नोट.
शेंगदाणे, रुमाल, टोपी, ओढणी, बूट.
टी शर्ट, जीन पॅंट, उशी, चॉकलेट, काडेपेटी.
अशा ३० वस्तू जमल्या.

‘‘आता खेळ समजून घ्या. आपण हा खेळ दोन गटांत खेळणार आहोत. अन्वय, नेहा आणि पार्थ यांचा एक गट. शंतनू, वेदांगी आणि पालवी यांचा एक गट. नेहाच्या गटानं समोरच्या ३० वस्तूंपैकी एक गोष्ट मनात धरायची. एका कागदावर ती लिहून ती चिठ्ठी खिशात ठेवायची. दुसऱ्या गटानं कमीत कमी प्रश्‍न विचारून ती वस्तू ओळखायची; पण या खेळातली मेख म्हणजे, उत्तर देणारा गट उत्तर फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ या स्वरूपातच देणार आहे. त्यामुळं प्रश्‍न विचारणाऱ्या गटानं ‘हो’ किंवा ‘नाही’ असंच उत्तर मिळणार आहे, हे लक्षात घेऊनच प्रश्‍न विचारायचे आहेत.
प्रत्येक गटाला २० प्रश्‍न विचारण्याची मुभा आहे; पण जो गट कमी प्रश्‍न विचारेल, त्याला जास्त मार्क मिळतील. म्हणजे समजा, पहिल्या गटानं सहा प्रश्‍नांत, तर दुसऱ्या गटानं आठ प्रश्‍नांत वस्तू ओळखली, तर पहिल्या गटाला २० वजा सहा म्हणजे १३ मार्क मिळतील, तर दुसऱ्या गटाला १२ मार्क मिळतील. आता काही शंका असतील तर विचारा...
त्या क्षणी पार्थचा हात वर झाला.
‘‘मी मनात वस्तू धरली आहे ती ओळखा पाहू?’’ पार्थचा हात खाली करत अन्वय त्याला म्हणाला ः ‘‘अरे, तू आमच्या गटात आहेस. आपण सगळ्यांनी मिळून एक वस्तू ठरवू या. मग त्या वस्तूचं नाव कागदावर लिहून ती चिठ्ठी तुझ्याच खिशात ठेवू या. ओके?’’
पार्थनं आनंदानं मान डोलावली.
अन्वय, पार्थ आणि नेहानं त्या ३० वस्तू थोडा वेळ नीट पाहिल्या. मग तिघं एका कोपऱ्यात गेले. आपापसात कुजबूज-खुसफूस करून त्यांनी एका वस्तूचं नाव कागदावर लिहिलं आणि चिठ्ठी पार्थच्या खिशात ठेवली.
‘प्रश्‍न कसे विचारावेत,’ याबाबत दुसऱ्या गटाची धुसधूस आणि फुसफूस सुरूच होती.
आता दोन्ही गट समोरासमोर बसले.
खिशावर हात ठेवत पार्थ म्हणाला ः ‘‘हं...विचारा प्रश्‍न. आम्हाला खूप खूप विचारा प्रश्‍न. २०-२० विचारा प्रश्‍न.’’
शंतनूनं पहिला प्रश्‍न विचारला ः ‘‘तुम्ही मनात धरलेली वस्तू धातूची आहे का?’’
पार्थ म्हणाला ः ‘‘होय.’’
सगळ्या वस्तूंकडं पाहत वेदांगी म्हणाली ः ‘‘जर ती वस्तू धातूची असेल तर ती कात्री, ताट, भांडं, सुरी, नेलकटर किंवा स्टीलची पट्टी यापैकी कुठली तरी असणार.’’
पालवीनं दुसरा प्रश्‍न विचारला ः ‘‘दुधाची पिशवी कापण्यासाठी हिचा उपयोग होतो का?’’
नेहा म्हणाली ः ‘‘नाही.’’
शंतनू म्हणाला ः ‘‘याचाच अर्थ ती वस्तू कात्री किंवा सुरी नक्कीच नाही. ती बहुधा ताट, वाटी, भांडं, नेलकटर किंवा स्टीलची पट्टी असू शकेल.’’
वेदांगीनं तिसरा प्रश्‍न विचारला ः ‘‘तुमच्या मनातली गोष्ट गोल आहे का?’’
अन्वय म्हणाला ः ‘‘नाही.’’
वेदांगी म्हणाली ः ‘‘याचा अर्थ ती वस्तू भांडं, नेलकटर किंवा स्टीलची पट्टी असू शकते.’’
शंतनूनं चौथा प्रश्‍न विचारला ः ‘‘आपण जेवताना ती वस्तू वापरतो का?’’
पार्थ टाळ्या वाजवत म्हणाला ः ‘‘नाही...नाही...’’
पालवी म्हणाली ः ‘‘आता फक्त दोनच शक्‍यता शिल्लक राहिल्या. नेलकटर किंवा स्टीलची पट्टी. मी थोडा धोका पत्करूनच एक प्रश्न विचारते. चालेल?’’
गटातल्या बाकीच्यांनी माना डोलावल्या.
पालवीनं पाचवा प्रश्‍न विचारला ः ‘‘तुमच्या मनातली गोष्ट ‘स्टीलची पट्टी’ आहे. बरोबर का?’’
तोंड पाडून पार्थ म्हणाला ः ‘‘हो.’’
शंतनूच्या गटानं वॅपू वॅपू चेपा चॅपू करत गोंधळ केला.
आता मनात वस्तू धरण्याची दुसऱ्या गटाची वेळ होती.
‘मनात ही वस्तू धरू या की ती वस्तू? ओळखायला कठीण कुठली वस्तू? नको, नको... हीच वस्तू; नाही, नाही...तीच वस्तू...’ असा त्यांचा घोळ सुरू होता.
नेहा वैतागून म्हणाली ः ‘‘कुठली तरी एक वस्तू चटकन मनात धरा; नाहीतर ‘आम्ही हरलो’ असं तुम्ही कबूल करा.’’
वेदांगी म्हणाली ः ‘‘आता मी सांगेन ते फायनल.’’
वेदांगीनं एक मिनिट इतरांबरोबर कुजबूज केली आणि एक गोष्ट कागदावर लिहिली. कागद शंतनूच्या खिशात ठेवला.
आता गट क्रमांक एक प्रश्‍न विचारायला सरसावून बसला.
अन्वयनं पहिला प्रश्‍न विचारला ः ‘‘तुमची गोष्ट आयताकृती आहे का?’’
वेदांगी म्हणाली ः ‘‘हो.’’
नेहा म्हणाली ः ‘‘याचा अर्थ ती वस्तू रिमोट, साबण, मोबाईल, चार्जर, १०० रुपयांची नोट, काडेपेटी, उशी किंवा चॉकलेट यांपैकीच असणार; पण स्टीलची पट्टी नसणार.’’
पार्थनं दुसरा प्रश्‍न विचारला ः ‘‘तुमची वस्तू इलेक्‍ट्रॉनिक्‍सशी संबंधित आहे का?’’
नाराजीनंच पालवी म्हणाली ः ‘‘हो.’’
पार्थ आनंदानं म्हणाला ः ‘‘याचा अर्थ ती वस्तू रिमोट, मोबाईल किंवा चार्जरच असणार. बाकीच्या सगळ्या गोष्टी आउट.’’

अन्वय, पार्थ आणि नेहानं आपापसात कुजबूज केली. तीनपैकी सरळ सरळ एकच गोष्ट विचारण्याचा धोका पत्करावा का? म्हणजे सरळ असंच विचारावं का, की तुमच्या मनातली गोष्ट ‘रिमोट’ आहे का? किंवा ‘मोबाइल’ आहे का? पण त्यांचा निर्णय काही होईना. पार्थ हळूच म्हणाला ः ‘‘मला तर असं वाटतंय, की सगळ्यांना मोबाइल आवडतो, म्हणून त्यांनीही मोबाइलच निवडला असणार.’’
शेवटी अन्वयनं तिसरा प्रश्‍न विचारला ः ‘‘तुमच्या मनातली गोष्ट टीव्हीशी संबंधित आहे का?’’
शंतनू कसंनुसं म्हणाला ः ‘‘हो.’’
पार्थ उड्या मारत नाचत म्हणाला ः ‘‘आम्ही जिंकलो...आम्ही जिंकलो... तुमचा रिमोट...तुमचा रिमोट...’’
नेहाच्या आईनं पार्थला शाबासकी दिली.
शंतनू म्हणाला ः ‘‘आपण हा खेळ पुन्हा खेळू या. म्हणजे, हा आत्ता झाला तो खेळाचा पहिला सेट झाला. किमान तीन सेट खेळल्यानंतर कोण जिंकलं आणि कोण हरलं, हे ठरवता येईल.’’
नेहा म्हणाली ः ‘‘तीन सेट करण्यापेक्षा मला आणखी एक आयडिया सुचते आहे. ज्या गटाचे सगळ्यात आधी २० मार्क होतील, तो गट जिंकला.’’
पार्थ हट्ट करत म्हणाला ः ‘‘पण मी जिंकलोय!’’
अन्वय पार्थला थोपटत म्हणाला ः ‘‘एकदाच खेळून कोण जिंकलं आणि कोण हरलं, असं काही ठरवता येणार नाही; त्यामुळं मला २० मार्कांची आयडिया जास्त बरी वाटते.’’
वेदांगी म्हणाली ः ‘‘खरं म्हणजे अध्येमध्ये वस्तूही बदलायच्या, म्हणजे आणखी मजा येईल.’’
शंतनू, पालवी आणि अन्वयचे बाबा हातात खाऊच्या बश्‍या घेऊन आले, तेव्हा पालवीची आई म्हणाली ः ‘‘चला, मी तुम्हाला ‘खाऊपाठ’ देते.’’
हातात बशी घेऊन तोंडात खाऊ कोंबत शंतनूनं विचारलं ः ‘‘म्हॉणजे कॉय?’’
‘‘अरे, घरी करतात तो गृहपाठ आणि खाता खाता करतात तो खाऊपाठ. कळलं?’’
शंतनूनं फक्त मान हलवली.
‘‘हा खेळ कमीत कमी ३९ प्रकारे खेळता येईल. खाता खाता शोधून काढा.’’
मुलं खाता खाता खाऊपाठ करू लागली.
नंतर सरबत पिता पिता पिऊपाठ करू लागली. मग हात धुता धुता धुऊपाठ करू लागली.

मुलं सांगू लागली ः
  वेगवेगळ्या देशांची पोस्टाची तिकिटं घेऊन हा खेळ खेळता येईल.
  फळभाज्या, फळं आणि ड्रायफ्रूट एकत्र करून घेऊन हा खेळ खेळता येईल.
  १ ते १०० अंकांचा तक्ता समोर ठेवून हा खेळ खेळता येईल.
  महाराष्ट्राचा, भारताचा किंवा जगाचा नकाशा घेऊनही हा खेळ खेळता येईल.
  वेगवेगळ्या अपूर्णांकांची मिसळ करून हा खेळ खेळता येईल.
  वेगवेगळ्या चमचमीत खाद्यपदार्थांची यादी करून (किंवा ते पदार्थच समोर ठेवून!) हा खेळ खेळता येईल.
  वेगवेगळ्या मिठाया, गोड पदार्थ यांची यादी करूनही हा खेळ खेळता येईल.
  मराठी महिने, १२ नक्षत्रं आणि वारांची नावं यांची मिसळ करूनही हा खेळ खेळता येईल.
  फक्त तांदळापासून बनणारे पदार्थ जरी घेतले, तरी या खेळाची लज्जत वाढेल.
  इंग्लिश-मराठी शब्दकोशाचा वापर करूनही हा खेळ खेळता येईल.
  इंग्लिशच्या तीन धड्यांतल्या विविध शब्दांचा उपयोग करूनही हा खेळ खेळता येईल.
  निरनिराळ्या बाईक्‍सची नावं किंवा त्यांचे फोटो समोर ठेवून हा खेळ खेळता येईल.
  पाठ्यपुस्तकातले लेखक आणि कवी यांची नावं घेऊनही हा खेळ खेळता येईल.
मुलांना थांबवत आई म्हणाली ः ‘‘बास...बास...बास... एकदम झकास! खरं म्हणजे, हा खेळ ३९ च कशाला, तुम्ही जर कल्पक असाल तर ९३९ प्रकारेसुद्धा हा खेळ सहजच खेळता येईल!’’ हे ऐकताच सगळे जण म्हणाले ः
‘‘ओके-बोके-पक्के, काम १०० टक्के.’’

पालकांसाठी गृहपाठ ः

  •   तुमच्या लक्षात आलं का? या खेळातून अनेक गोष्टी साध्य होतात...मुलांची निरीक्षणशक्ती तर वाढतेच; पण शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून वर्गीकरण करण्याची त्यांची क्षमताही विकसित होते. म्हणून वेगवेगळे प्रश्‍न तयार करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्या.
  •   सलग तीनदा खेळल्यावर वस्तू बदला.
  •   हा खेळ केवळ ‘घरातच’ खेळता येतो असं नाही, हा खेळ कुठंही खेळता येतो.
  •   हाच खेळ मुलांबरोबर प्रवासातही खेळा. समोर दिसणाऱ्या दृश्‍यातली एक गोष्ट त्याला मनात धरायला सांगा आणि ओळखा ती वस्तू.
  •   सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मुलांसोबत खेळताना आधी तुम्ही राज्य घ्या.
  •   हा खेळ खेळताना जर मुलांना कंटाळा आला, तर लगेचच थांबा. तुमच्या हौसेखातर मुलांना खेळवू नका! किंवा ‘तुम्ही जिंकत आहात म्हणून मुलांना कंटाळा आला असेल’ असला गैरसमज कधीही करून घेऊ नका.
  •   ‘मुलांसोबत खेळणारे आणि खेळता खेळता आपल्याच मुलांकडून हरणारे पालक आभाळाएवढे मोठे असतात,’ ही चिनी म्हण नीट समजून घ्या!
Web Title: rajiv tambe write article in saptarang