स्वयंपाकघरातले १००० (राजीव तांबे)

राजीव तांबे me@rajivtambe.com
रविवार, 3 सप्टेंबर 2017

‘‘प्रत्येक घरातल्या स्वयंपाकघरात वेगवेगळ्या भन्नाट क्रिया सुरू असतात. तुम्ही अदृश्‍यपणे इतरांच्या स्वयंपाकघरांत डोकावायचं आणि तिथं चालणाऱ्या क्रिया तुमच्या ‘ड्रोन कॅमेऱ्या’त रेकॉर्ड करायच्या आणि नंतर त्यांची यादी तयार करायची. तुम्ही सहाजणांनी मिळून स्वयंपाकघरांत होणाऱ्या ११९ क्रिया शोधायच्या आहेत...’’

आज सगळे पालवीच्या घरी जमले होते. नेहाच्या, पालवीच्या आणि वेदांगीच्या बाबांनी आज किचनची जबाबदारी सांभाळावी, असं ठरलं होतं. आज खरं म्हणजे शंतनूची फर्माईश होती, की ‘आम्हाला गरमागरम बटाटेवडे हवेत.’ वेदांगीच्या बाबांनी त्याला हसतच होकार दिला होता.

‘‘प्रत्येक घरातल्या स्वयंपाकघरात वेगवेगळ्या भन्नाट क्रिया सुरू असतात. तुम्ही अदृश्‍यपणे इतरांच्या स्वयंपाकघरांत डोकावायचं आणि तिथं चालणाऱ्या क्रिया तुमच्या ‘ड्रोन कॅमेऱ्या’त रेकॉर्ड करायच्या आणि नंतर त्यांची यादी तयार करायची. तुम्ही सहाजणांनी मिळून स्वयंपाकघरांत होणाऱ्या ११९ क्रिया शोधायच्या आहेत...’’

आज सगळे पालवीच्या घरी जमले होते. नेहाच्या, पालवीच्या आणि वेदांगीच्या बाबांनी आज किचनची जबाबदारी सांभाळावी, असं ठरलं होतं. आज खरं म्हणजे शंतनूची फर्माईश होती, की ‘आम्हाला गरमागरम बटाटेवडे हवेत.’ वेदांगीच्या बाबांनी त्याला हसतच होकार दिला होता.

पालवी, शंतनू, नेहा, पार्थ, वेदांगी आणि अन्वय सगळेच जमले. आजचा नवीन खेळ शंतनूच्या बाबांनी तयार केला आहे, हे कळताच शंतनू म्हणाला ः ‘‘बाबा काहीतरी खायचा-प्यायचा खेळ असू दे, म्हणजे खेळ जरा टेस्टी होईल!’’
यावर बाबा फक्त हसले; पण बोलले मात्र काहीच नाहीत.
बाबा म्हणाले ः ‘‘आता मी तुम्हा सगळ्यांना एक ड्रोन कॅमरा देणार आहे...’’
सगळी मुलं आनंदानं किंचाळली ः ‘‘ओ वॉव...ग्रेट. बाबा तुम्ही किती चांगले आहात...’’
‘‘मुलांना थांबवत बाबा म्हणाले ः ‘‘जरा थांबा...घाई करू नका. माझं बोलणं पूर्ण ऐकून घ्या. हं, तर मी तुम्हाला एक खोटा खोटा ड्रोन कॅमेरा देणार आहे आणि तुम्हाला खोटं खोटं ‘अदृश्‍य’ही करणार आहे...’’
पार्थनं भुवया ताणत विचारलं ः ‘‘पण का...का?’’
‘‘कारण, तुम्हाला ड्रोन कॅमेरा घेऊन अदृश्‍यपणे वेगवेगळ्या स्वयंपाकघरांत जायचं आहे...’’
‘‘क्कॉय...? स्वयंपाकघरात? कशाला? काय करायला?’’
‘‘आधी माझं बोलणं पूर्ण होऊ दे. मग विचारा हवे तेवढे प्रश्‍न. प्रत्येक घरातल्या स्वयंपाकघरात वेगवेगळ्या भन्नाट क्रिया सुरू असतात. तुम्ही अदृश्‍यपणे इतरांच्या स्वयंपाकघरांत डोकावायचं आणि तिथं चालणाऱ्या क्रिया तुमच्या ड्रोन कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायच्या आणि नंतर त्यांची यादी तयार करायची. तुम्ही सहाजणांनी मिळून स्वयंपाकघरांत होणाऱ्या किमान ११९ क्रिया शोधायच्या आहेत...’’
‘‘का..य? ११९ क्रिया? कसं शक्‍य आहे?’’
‘‘सहज शक्‍य आहे. जोपर्यंत तुम्ही शोधत नाही तोपर्यंत तुम्हाला सापडत नाही.’’
‘‘पण स्वयंपाकघरात तर जेवण तयार करतात आणि आपण जेवतो, तिथं १००० क्रिया होतात...१०००!’’
‘‘हो. पाहा की...समजा आपल्याला चहा करायचा आहे. त्या वेळच्या क्रिया मोजल्या आहेत तुम्ही? सुमारे १९ क्रिया होतात...काही वेळा एखाद्‌दोन कमी-जास्त.’’
‘‘हो. उदाहरणार्थ ः पातेलं घेणं. पाणी मोजून घेणं. कप घेणं. गॅस लावणं. साखर घालणं. ढवळणं, उकळणं...’’

‘‘बास.. बास. फक्त क्रियाच तर लिहायच्या आहेत; पण काही वेळा त्या क्रिया कशाशी जोडल्या आहेत तेही लिहिलंत तर समजायला अधिक सोपं जाईल. मला खात्री आहे, आता तुम्हाला खेळ कळला आहे. ११९ किंवा त्यापेक्षा जास्त क्रिया शोधण्यासाठी तुम्हाला वेळ मिळणार आहे फक्त ३८ मिनिटं. तो फिर ले लो ड्रोन आणि व्हा अदृश्‍य.’’
मुलांनी वही-पेन घेतलं. मग कल्पनेनं अदृश्‍य होऊन सगळेजण वेगवेगळ्या स्वयंपाकघरांत डोकावू लागले. दिसणाऱ्या क्रिया भराभर लिहू लागले. ३८ मिनिटं होण्याआधीच मुलं आनंदानं चित्कारली, ‘‘ओके बोके पक्के...काम शंभर टक्के. आम्ही सगळ्याची बेरीज केली तर आमच्या ११९ पेक्षा जास्त क्रिया झाल्या आहेत.’’
‘‘करा सुरवात.’’

 •   कणीक मळणं किंवा तिंबणं. मळलेल्या कणकेचे गोळे करणं. ते हातात घेऊन चेपणं. चारी बाजूंनी दाबणं, मग लाटणं.
 •   पोळी भाजणं.
 •   फुलका शेकणं. फुलका फुलवणं.
 •   पोळी तव्यावर उलथणं.
 •   भाजताना लक्ष नसेल तर करपणं.
 •   आणि करपतानाही लक्ष नसेल तर पेटणं.
 •   पेटल्यावरही लक्ष नसेल तर जळणं.
 •   नंतर जळून जळून राख होणं.
 •   पोळी फुगल्यावर किंवा फुलका फुलल्यावर त्याला निगुतीनं थोपटून त्यातली वाफ बाहेर काढणं.
 •   गरम पोळी किंवा फुलका डब्यात ठेवण्याआधी डब्याच्या तळाशी जुन्या मऊ सुती हातरुमालाची घडी पसरणं.
 •   मग पोळीवर तेलाचा किंवा तुपाचा हात फिरवून आणि फुलका मात्र तसाच डब्यातल्या घडीवर ठेवणं.
 •   काही वेळा दूध तापवण्यासाठी हलक्‍या तळाचं पातेलं असेल तर ‘दूध लागणं.’
 •   दूध ओतणं. दूध उकळणं. उकळताना लक्ष नसेल तर दूध उतू जाणं.
 •   दूध नासणं. दूध फाटणं. दूध विरजणं. दुध गाळणं. दुधावरची साय काढणं. साय विरजणं.
 •   साय घुसळणं. ताक करणं. लोणी काढणं.
 •   लोणी कढवून तूप करणं.
 •   पापड तळणं आणि भाजणं.
 •   नारळ सोलणं. नारळ हलवून पाण्याचा अंदाज घेणं. नारळ वाजवून पाहणं. नारळ फोडणं.
 •   नारळाची वाटी खवणं किंवा कातणं.
 •   शेंगदाणे भाजणं, नंतर शेकणं. सुपात शेंगदाणे भरडून मग पाखडणं.
 •   शेंगदाणे कुटणं.
 •   मिरच्या ठेचणं.
 •   पोळीचा कुस्करा करणं. कुस्करणं.
 •   कालवणं.
 •   मिसळणं.
 •   भाजी धुणं, भाजी निवडणं. भाजी साफ करणं.
 •   भाजी चिरणं. भाजी तोडणं. कापणं. बारीक तुकडे करणं.
 •   कढईत भाजी परतणं.
 •   भाजीत मसाला घालून भाजी चहूबाजूंनी परतली की खाली वाकून मसाल्याचा वास घेऊन, आवश्‍यक असल्यास आणखी मसाला घालणं.
 •   भाजी होत आली की चाखून पाहणं.
 •   भाजी चाखताना ती फारच गरम असेल तर ‘हाय...हुई’ करणं.
 •   भाजी आवडली तर मिटक्‍या मारणं.
 •   भाजी फारच तिखट झाली असेल तर उचकी लागणं. ठसका लागणं.
 •   भाजी व्यवस्थित शिजल्यावर झाकून ठेवणं.
 •   मसाला भाजीत मुरू देणं.
 •   भाजी व्यवस्थित ढवळून पानात उजव्या बाजूला वाढणं.
 •   भाजीत चुकून मीठ घालायला विसरलं असेल किंवा मीठ डबल घातलं असेल तर नंतर बोलणी ऐकणं किंवा एकदम अबोला सहन करणं.
 •   भाजी चांगली झाली असेल तर ‘व्वा, छान! मस्त भाजी! अगदी माझ्या आईनंच केल्यासारखी!’ अशी (दुर्मिळ) स्तुती ऐकणं.
 •   जेवणं झाल्यावर भाजी उरली असेल तर(च) ती लहान भांड्यात काढणं. भाजी काढताना ती न खरवडता व्यवस्थित निपटून घेणं.
 •   मग हे भांडं विसळून घेऊन स्वच्छं घासणं.
 •   कोरड्या फडक्‍यानं भांडं पुसून घेणं.
 •   पुसलेलं भांडं व्यवस्थित ठिकाणी ठेवणं.
 •   पाटा-वरवंटा घेऊन वाटणं.
 •   फळांचा रस काढणं.
 •   बटाटे धुणं. खसखसून घासणं. बटाटे उकडणं. उकडलेले बटाटे सोलणं.
 •   उकडलेले बटाटे चेचणं. एकजीव करणं.
 •   उकडलेल्या बटाट्यांचा चेचून लगदा तयार करणं.
 •   थालीपीठ किंवा भाकरी तव्यावर थापणं. खरपूस होण्यासाठी बाजूनं तूप किंवा लोणी सोडणं.
 •   इडली करण्यासाठी पीठ आंबवणं.
 •   कोशिंबीर करण्यासाठी गाजर किसणं.
 •   पचडी करण्यासाठी आधी काकडीच्या साली काढणं. मग काकडी कोचणं किंवा चोचणं.
 •   भरीत करण्यासाठी वांग्याला तेल लावून मगच भाजणं.
 •   वांग्याचं भरीत केल्यावर मध्ये पेटता कोळसा ठेवून त्याला धुरी देणं.
 •   मग कोळसा फुंकरणं आणि विझवणं.
 •   दम आलू करण्यासाठी छोट्या कच्च्या बटाट्यांना छिद्रं पाडणं, चिरा पाडणं किंवा टोचे मारणं.
 •   रुमाली रोटी हातात फिरवत वरती उंच भिरकावणं. नंतर गुंडाळून जवळच्या टोपलीत फेकणं.
 •   उसळ करण्यासाठी कडधान्य भिजवून त्यांना कोंब आणणं.
 •   स्वयंपाक करत असताना गाणी म्हणणं.
 •   रेडिओ ऐकणं.
 •   स्वयंपाक करत असताना ‘टिंग टिंग’ असा आवाज आला तर लगेच काम थांबवून, पदराला किंवा जवळच्या पडद्याला हात पुसून मोबाईलवर व्हॉट्‌सॅप चेक करणं.
 •   यू ट्यूबवर व्हिडिओ पाहत स्पेशल डिश तयार करणं.
 •   इअरफोन घालून आणि फोन कमरेला खोचून गप्पा मारणं.
 •   मध्येच मुलांना ओरडणं.
 •   ‘अभ्यास करा...अभ्यास करा. माझं लक्ष आहे’ असं मुलांना ओरडून सांगणं.
 •   ‘ ‘कुणीतरी’ तो पंखा बंद करा रे. सगळं मलाच पाहावं लागतं’ असं मध्येच ओरडणं.
 •   कूकर लावल्यानंतर घरातल्या इतरांना शिट्ट्या मोजायला सांगणं.
 •   ठराविक शिट्ट्यांनंतर गॅस बंद करायला सांगणं.
 •   संध्याकाळी सासू-सुनांच्या सीरियल बघत भाजी ढवळताना, ‘आमच्याच घरात पाहा...किंवा माझ्याच नशिबी...’’असं काहीसं पुटपुटत आणि नाकानं सूं...सूं...आवाज करत, डाव्या दंडाला नाक पुसणं.
 •   कॉमेडी सीरियल बघत पोळ्या लाटताना खॅखॅ फूफू खॅखॅ फूफू हसत पदराला डोळे पुसणं. डोळे पुसल्यावर मान हलवणं.
 •   लहान मुलाला कडेवर घेऊन भरवणं.
 •   लहान मुलाला भरवत असताना त्याला ‘आ कर’ असं सांगत असताना आपणच मोठा ‘आ’ करणं.
 •   भरवताना स्वतःच्या अंगावर सांडणं.
 •   अंगावर सांडल्याचा राग मुलावरच काढणं. (आणि याची मुलाला गंमतच वाटणं)
 •   ‘जेवढं जेवण मुलासाठी ताटलीत घेतलं आहे, तेवढं त्यानं खाल्लंच पाहिजे’ असं मनोमन वाटणं.
 •   भरवता भरवता मुलाच्या तोंडावर घास लिंपणं.
 •   त्याच्या तोंडात घास कोंबणं.
 •   खाण्यासाठी (म्हणजे खरंतर गिळण्यासाठी) त्याला भीती दाखवणं.
 •   भीती दाखवून पण मुलगा हसतमुख असेल तर संतापून ओरडणं.
 •   मुलाचा शेवटचा घास खाऊन होण्याआधीच त्याला खाली ठेवणं.
 •   उजवा हात चाटून मगच हात धुवायला पळणं.
 •   चहा करत असताना अर्धा चमचा साखर सहजच तोंडात टाकणं.
 •   भाजीत गूळ घालायचा असेल तर बरणीतला एक छोटासा खडा गट्टम्‌ करणं.
 •   स्वयंपाक करताना मध्येच गॅस गेला तर कुरकुरत किरकिर करत गॅस सिलिंडर बदलणं.
 •   गॅस सिलिंडर बदलताना ‘तुला आजच जायचं नडलं होतं का रे?’ असा प्रश्‍न त्या सिलिंडरलाच वैतागून विचारणं. (गॅसच संपल्यानं सिलिंडरनं उत्तर न देणं!)
 •   स्वयंपाक करताना आजूबाजूला पसारा वाढत जाणं.
 •   ‘आधी जेवू या; मग पसारा आवरू या’ असं नेहमीप्रमाणे ठरवणं.
 •   कढी केली असेल तर तिचे भुरके मारणं.
 •   तिखट लागून डोळ्यात पाणी येणं आणि मग थयथयाट करणं.
 •   जेवताना बोटं चाटणं.
 •   भात कालवल्यावर त्यात आमटी घेण्यासाठी भातात खळं तयार करणं.
 •   आमटी-भात, कढी-भात ओरपणं.
 •   अचानक पाहुणे आलेच तर आमटी वाढवणं (म्हणजे गरम पाणी घालून वाढवणं)
 •   खळबळवणं.   बुचकळणं.   निथळवणं.   सांडणं.
 •   पुसणं.   ठोकणं.   खलणं.   टोचणं.   तडकणं.
 •   तडका/-फोडणी देणं.   तुटणं.   फुटणं.   वापरणं.
 •   विचारणं.   फासणं.   पिळणं.   वाफवणं.   रांधणं.
 •   कांडणं.   पाखडणं.   झोडपणं.   बिघडणं.  कुजणं.
 •   चुरणं.   फुंकरणं.   आसडणं.   करवडणं.

बाबा म्हणाले ः ‘‘बास..बास. तुम्ही मुलांनी अगदी कहरच केला.’’

‘‘अहो बाबा, तुमच्यामुळंच तर केला...!’’

‘‘क्का..य? माझ्यामुळं...?

‘‘हो तर. तुम्ही दिलेले ड्रोन कॅमेरे एवढे पॉवरफुल होते, की आम्हाला बारीकसारीक गोष्टीही टिपता आल्या.’’

‘‘शाबास मुलांनो. मस्तच काम झालं.’’

शंतनू म्हणाला ः ‘‘आता हा ड्रोन कॅमेरा जरा आपल्याच घरातल्या किचनमध्ये पाठवू या. म्हणेजच...’’

आणि ‘गरमागरम चटाटेब चडेव तय्यार आहेत हो...’ अशी आरोळी स्वयंपाकघरात घुमली.

पालकांसाठी गृहपाठ

 •   आज पालकांना गृहपाठ नाही.
 •   ‘सुजाण पालक मुलांसमोर नव्हे, तर मुलांसोबत खातात,’ ही चिनी म्हण खूप काही सांगून जाते!
Web Title: rajiv tambe write article in saptarang