गॅदरिंगबिदरिंग आणि बॅंकाबिंका (राजीव तांबे)

राजीव तांबे me@rajivtambe.com
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

‘‘आईशप्पथ! तुमची शाळा लई भारी आहे रे. आम्हीही सुरू करणार अशाच बॅंकाबिंका आमच्या शाळेत.’’
‘‘खरं म्हणजे गावागावात, शहराशहरात सगळ्यांनीच सुरू केल्या पाहिजेत अशा बॅंका आपापल्या शाळेत. म्हणजे ‘शाळा परिसरात गेली आणि परिसर शाळेत आला,’ असं म्हणता येईल. मी उद्याच आमच्या मुख्याध्यापकांना ही आयडिया सांगतो. चांगल्या कामाला उशीर नको.’’

‘‘आईशप्पथ! तुमची शाळा लई भारी आहे रे. आम्हीही सुरू करणार अशाच बॅंकाबिंका आमच्या शाळेत.’’
‘‘खरं म्हणजे गावागावात, शहराशहरात सगळ्यांनीच सुरू केल्या पाहिजेत अशा बॅंका आपापल्या शाळेत. म्हणजे ‘शाळा परिसरात गेली आणि परिसर शाळेत आला,’ असं म्हणता येईल. मी उद्याच आमच्या मुख्याध्यापकांना ही आयडिया सांगतो. चांगल्या कामाला उशीर नको.’’

नोव्हेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला की शाळाशाळांतून गॅदरिंगबिदरिंग, स्पोर्टसबिर्टस, स्पर्धाबिर्धा यांचा डंका वाजू लागतो.
कुठलं नाटक करायचं, कुठला नाच करायचा, कुणाची मदत घ्यायची, स्पर्धांसाठी सराव कधी आणि कुठं सुरू करायचा, याची खलबतं वर्गावर्गात मुलांमध्ये सुरू होतात.
मग नाटकांची, एकपात्रिकांची शोधाशोध सुरू होते. नाटक किंवा एकपात्रिका सादर करण्यासाठी लेखकांची परवानगी मिळवावी लागते. त्यानंतर नाटकासाठी दिग्दर्शक, वेशभूषा, मेकप्‌ यासाठी पळापळ सुरू होते.

खरं नाटक सुरू होतं ते नाटकासाठी आणि नाचासाठी मुलं निवडताना.
नाटकात सगळ्यांनाच हीरो व्हायचं असतं आणि नाचात सगळ्यांनाच पुढच्या रांगेत नाचायचं असतं; तरीपण सगळ्यांना मिळूनच कार्यक्रम सादर करायचा असतो. शंतनू, नेहा, पालवी, पार्थ, अन्वय आणि वेदांगी यांच्या शाळेत आणि वर्गांत यापेक्षा काही वेगळं घडत नव्हतं.
त्यामुळं आज सगळेजण पालवीच्या घरी जमले, तेव्हा गप्पांचा विषय ‘गॅदरिंगबिदरिंग’ हाच होता.
चिवड्याचा बकाणा भरत शंतनू म्हणाला ः ‘‘मी तॉर दॉन गॅदरिंगबिदरिंगमध्ये भॉग घॅणॉर ऑहे.’’
‘‘म्हणजे एकदा गॅदरिंगमध्ये आणि मग नंतर बिदरिंगमध्ये का...?’’ असं पार्थनं विचारताच शंतनूला जोरदार ठसका लागला. नेहानं हसतच त्याच्या हातात पाण्याचा ग्लास दिला.

पाणी पिऊन ढेकर देत शंतनू म्हणाला ः ‘‘अरे पार्थू, मी शाळेच्या गॅदरिंगमध्ये तर भाग घेणार आहेच; पण आमच्या सोसायटीत नाताळच्या सुटीत मस्त सांस्कृतिक कार्यक्रम असतात. सोसायटीतली सगळी मुलं आणि मोठी माणसं मिळून वेगवेगळे कार्यक्रम बसवतात. खूप मज्जा असते. मी त्यातही भाग घेणार आहे.’’
‘‘गॅदरिंगमध्ये आपल्याला काय काय करता येईल?’’ नेहानं विचारलं.
‘‘का बरं?’’
‘‘आमच्या वर्गशिक्षिका म्हणाल्या, ‘तुम्हीच तुमचे गट बनवा आणि कार्यक्रम ठरवा,’ त्यामुळं थोडी गडबड झाली.’’
‘‘गडबड...का बरं?’’
‘‘अगं, आमचे गट तर तयार झाले; पण कार्यक्रम कुठले करायचे यावर एकमतच होत नाहीए ना. प्रत्येकाला वाटतंय, की आपलीच आयडिया भारी आहे. आता शेवटचे सतरा दिवस उरलेत, म्हणून टेन्शन!’’
‘‘हो, डिसेंबरलाच आहे; पण त्याआधी गटानं कार्यक्रम निवडून, त्याची तयारी करून तो गॅदरिंगच्या समितीसमोर सादर करायचा असतो. तिथं जर तो निवडला गेला, तरच तो कार्यक्रम गॅदरिंगला सादर करण्याची परवानगी मिळते.’’
‘‘आणि ते नियमही कडक असतात.’’
‘‘कडक असतात म्हणजे काय?’’
‘‘म्हणजे, कुठल्याही जाती-धर्माची टिंगलटवाळी करणारे किंवा निंदा करणारे उल्लेख, द्वयर्थी डायलॉग यांना परवानगी नाहीच; पण सिनेमातल्या गाण्यांवर रेकॉर्डडान्सला तर अजिबात परवानगी नाही. नृत्यच करायचं असेल तर कोळी-डान्स, वारली लोकांचं तारपा-नृत्य, गरबा, भांगडा, आसामी नृत्य, कथक, कुचिपुडी अशा पारंपरिक नृत्यांनाच फक्त परवानगी आहे.’’
‘‘व्वा मस्तच...पण मग तुम्ही तुमच्या नियमांत बसणारी नाटकं कशी शोधता? कोण मदत करतं तुम्हाला?’’
‘‘काही वेळा शाळेतले शिक्षक, तर काही वेळा आमच्या शाळेतले पालकच आमच्यासाठी छोटी छोटी नाटकं लिहितात.’’
‘‘आमच्या शाळेत अशा नाटकांची एक बॅंकसुद्धा आहे. या बॅंकेत आम्ही इतर शाळांमधली नाटकंही गोळा करून ठेवली आहेत आणि आमचीही नाटकं त्यांना दिली आहेत.’’

‘‘वॉव! ही आयडिया एकदम सही. तुमच्या शाळेत आणखी कुठल्या कुठल्या बॅंकाबिंका आहेत? नाही म्हणजे, आम्हीही त्यांचे मेंबर होऊ की...’’
‘‘आमच्या शाळेत एकूण तीन बॅंका आहेत. एक ‘नाटक’बॅंक, दुसरी ‘प्रवास’बॅंक. तिसरी ‘कोरा कागद’बॅंक.’’
‘‘नाटकबॅंकेविषयी तर कळलंच; पण ही प्रवासबॅंक म्हणजे काय? ही बॅंक प्रवासबिवास करते की काय?’’
‘‘नाही रे. बॅंक कशी काय प्रवास करेल? एका छोट्या कल्पनेतून ही बॅंक तयार झाली. सुटीत मुलं निरनिराळ्या ठिकाणी प्रवास करतात. काही जण देशात, तर काही जणं परदेशात. मागच्या सुटीत आम्ही सगळे काश्‍मीरला गेलो होतो. प्रवासात मी प्रत्येक गोष्ट टिपून ठेवत होतो. म्हणजे अशा गोष्टी की ज्यांचा इतरांना उपयोग होईल, मदत होईल..’’
‘‘म्हणजे? कळलं नाही. जरा नीट सविस्तर सांग पाहू.’’
‘‘हो, हो. मलाही नाही कळलं.’’
म्हणजे उदाहरणार्थ ः
  आपण आपल्या गावातून काश्‍मीरला कशा प्रकारे जाऊ शकतो?
  किती दिवस अगोदर तिकिटं काढावीत?
  प्रवासाला किती वेळ लागतो?
  प्रवासात सोबत घेण्याच्या वस्तू...
  प्रवासात घ्यायची काळजी...
  त्या विशिष्ट ठिकाणी जाण्याचा योग्य हंगाम कोणता?
  वेगवेगळ्या हंगामात आपण गेलो तर काय फरक पडू शकतो... उदाहरणार्थ ः काश्‍मीरला बर्फाची मजा लुटण्यासाठी कधी जावं, थंडी अनुभवण्यासाठी कधी जावं. आल्हाददायक वातावरणाची मजा घेण्यासाठी कधी जावं इत्यादी...
  तिथं आम्ही कुठल्या हॉटेलात राहिलो त्याचे फोन नंबर.
  काही इतर हॉटेलांचे फोन नंबर.
  तिथली आम्ही पाहिलेली प्रेक्षणीय स्थळं, तिथल्या सुविधा.
  विविध प्रेक्षणीय स्थळांपर्यंत जाण्यासाठी काय काय सोई आहेत...
  प्रेक्षणीय स्थळांची माहिती सांगण्यासाठी तिथं सशुल्क मार्गदर्शक असतात. त्यांचे फोन नंबर.
  खरेदी कुठं कुठं केली...त्या संबंधित दुकानांचे फोन नंबर.
आमच्या प्रवासबॅंकेत सध्या देशातल्या आणि विदेशातल्या मिळून एकूण १४९ ठिकाणांची तपशीलवार माहिती जमा आहे. आता आमच्या शाळेतल्या मुलांना, त्यांच्या पालकांना, त्यांच्या नातेवाइकांना किंवा त्यांच्या मित्रमंडळींना कुठंही जायचं असेल तर ते आमच्या ‘प्रवासबॅंके’ची मदत घेतात.’’
‘‘म...तुमच्या या प्रवासबॅंकेचं सभासद होण्यासाठी किंवा तिची मदत घेण्यासाठी काही फी आहे का?’’
‘‘हो, हो...आहे तर...’’
‘‘बाप रे! किती फी आहे?’’
‘‘तुम्ही तुमच्या प्रवासाचा तपशील दिलात की तुम्हाला ‘प्रवासबॅंके’चं आजीवन सभासदत्व आपोआपच मिळतं. प्रवासबॅंकेचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे, आता आमच्या शाळेतले पालक सहलीला जाण्यासाठी अन्य कुठलीही मदत न घेता एकमेकांच्या मदतीनं स्वतःच्या सहली स्वतःच आयोजित करतात. खूप पैसे वाचवतात आणि भरपूर मजा करतात.’’

‘‘वॉव! ही आयडिया मस्तच आहे; मीही होणार या बॅंकेचा मेंबर.’’
‘‘आणि...ती ‘कोरा कागद बॅंक’ हा काय प्रकार आहे?’’
‘‘खरं म्हणजे तुम्हाला नावावरूनच कळलं पाहिजे. वार्षिक परीक्षा संपली की आम्ही सगळी मुलं वहीतले उरलेले कोरे कागद फाडतो आणि बॅंकेत जमा करतो. मग शाळेत एक दिवसाची कार्यशाळा असते. दिवसभरात आम्ही या जमलेल्या कोऱ्या कागदांचे व्यवस्थित नियोजन करून त्यापासून १०० पानी आणि २०० पानी नवीन वह्या तयार करतो. ज्या मुलांना खरंच वह्यांची गरज असते, अशा मुलांना आम्ही त्या वह्या मोफत देतो.’’
‘‘आईशप्पथ! तुमची शाळा लई भारी आहे रे. आम्हीही सुरू करणार अशाच बॅंकाबिंका आमच्या शाळेत.’’
‘‘खरं म्हणजे गावागावात, शहराशहरात सगळ्यांनीच सुरू केल्या पाहिजेत अशा बॅंका आपापल्या शाळेत.’’
‘‘म्हणजे ‘शाळा परिसरात गेली आणि परिसर शाळेत आला,’ असं म्हणता येईल. मी उद्याच आमच्या मुख्याध्यापकांना ही आयडिया सांगतो. चांगल्या कामाला उशीर नको.’’
इतक्‍यात पालवीचे बाबा आणि नेहाची आई हे मुलांसाठी खाऊ घेऊन आले. अन्वयच्या आईनं विचारलं ः ‘‘मग...काही ठरलं का गॅदरिंगबिदरिंगविषयी? की नुसत्याच गप्पाटप्पा?’’
हे ऐकताच मुलांनी कल्ला केला.
पालवी म्हणाली ः ‘‘अगं, आम्ही गॅदरिंगबिदरिंगविषयी बोलायला सुरवात केली होती; पण आम्ही अचानक त्या ‘बॅंकाबिंकांच्या विलक्षण कल्पने’नं झपाटूनच गेलो. असली भन्नाट आयडिया आम्ही यापूर्वी कधी ऐकलीही नव्हती. त्यामुळं आम्ही सगळेच थ्रिल झालो ना...!’’
नेहा म्हणाली ः ‘‘मी एक विचारू का? म्हणजे आमच्या वर्गात घडवलेला प्रसंग तुम्हाला सांगते. आमच्या वर्गात गट तयार झाले. मात्र, खूप मुलं आणि मुली अशा आहेत, की त्यांना कुणीच गटात घेतलेलं नाही; पण त्यांना काहीतरी करायचं आहे...स्टेजवर जायचं आहे; पण केवळ ते कुठल्या गटात नाहीत म्हणून त्यांना संधीच मिळत नाही. तुमच्या नाटकबॅंकेत अशा मुलांसाठी काही आहे का?’’
‘‘हो तर! आहे म्हणजे आहेच.’’
‘‘काय आहे..?’’
‘‘खास मुलांसाठी म्हणून लिहिलेल्या दे धमाल एकपात्रिका. या एकपात्रिका फक्त आठ ते दहा मिनिटांच्या आहेत. त्या सादर होत असताना प्रेक्षक हसाहसी करत टाळ्या कुटत असतात. विशेष म्हणजे, या एकपात्रिका मुलांनी कशा सादर कराव्यात, याबाबत लेखकानं सविस्तर माहितीही दिलेली आहे..’’

‘‘आता जास्त काही सांगू नकोस. पुढच्या वेळी येताना तुमच्या नाटकबॅंकेतून एकपात्रिका घेऊनच ये. आपण सगळे मिळून वाचू या.’’
मग सगळेच आनंदानं हात उंचावत ओरडले ः ‘‘ओके बोके पक्के, तर काम शंभर टक्के.’’

Web Title: rajiv tambe write article in saptarang