भलतेसलते उपयोग (राजीव तांबे)

भलतेसलते उपयोग (राजीव तांबे)

अन्वय म्हणाला ः ‘‘आता प्रत्येकानं आपल्याला आवडणाऱ्या एका वस्तूचं नाव तर लिहायचं आहेच; पण आपल्याला जमेल तसं त्या वस्तूचं चित्रही काढायचं आहे. करा सुरवात.’’ सगळ्यांनी वहीत डोकी खुपसली; पण त्यांच्या लक्षात आलं, की एकाच वस्तूचं नाव लिहिणं जरा कठीणच आहे; पण लिहायला तर हवंच...

आज सगळे अन्वयच्या घरी जमले होते. ‘आज आपण एक वेगळाच नवीन खेळ खेळणार आहोत,’ असं अन्वयनं आधीच सांगितलं असल्यानं सगळ्यांना फारच उत्सुकता होती. शंतनू, वेदांगी आणि पार्थ हे अगदी वेळेवर आले. पालवी आणि नेहा मात्र पळत पळतच आल्या. सर्वजण येताना वही-पेन घेऊन आले होते.
शंतनूनं घरात आल्याआल्याच किचनमध्ये डोकावत दीर्घ श्‍वास घेतला. डोळे बारीक करून भुवया उंचावत तो म्हणाला ः ‘‘व्वा! कुरडया, पापड्या आणि बटाट्याचे पापड तळल्याचा वास येतोय हं. आता होऊनच जाऊ द्या कुरकुरीत-चुरचुरीत, गरमागरम-झमझमीत.’’

हे ऐकताच बाकीच्यांनीही नकळत माना डोलावल्या. गरमागरम तळणीचे पदार्थ हादडून सगळे खेळायला बसले.
सगळे जणं कल्ला करत विचारू लागले ः
‘‘अरे, या खेळाचं नाव काय?’’
‘‘नवीन खेळ म्हणजे काय?’’
‘‘खेळासाठी वही कशाला?’’
‘‘वही-पेन म्हणजे खूप लिहायचं आहे की चित्रबित्र काढून चालेल?’’
‘‘तू हा खेळ आधी खेळला आहेस की आमच्यावरच ट्राय करतो आहेस?’’
‘‘तू जर आधी खेळला असशील तर मग हा खेळ नवीन नसून जुनाच आहे. नाही का?’’
वैतागून अन्वय म्हणाला ः ‘‘प्लीज, हा तुमचा कल्लाबल्ला थांबवा. आधी मला बोलू तर द्या.’’
सगळेच शांत बसून अन्वयचं बोलणं ऐकू लागले.
‘‘आता प्रत्येकानं आपल्याला आवडणाऱ्या एका वस्तूचं नाव तर लिहायचं आहेच; पण आपल्याला जमेल तसं त्या वस्तूचं चित्रही काढायचं आहे. करा सुरवात.’’
सगळ्यांनी वहीत डोकी खुपसली; पण त्यांच्या लक्षात आलं, की एकाच वस्तूचं नाव लिहिणं जरा कठीणच आहे; पण लिहायला तर हवंच.
आपल्या आवडत्या एकाच वस्तूचं नाव लिहायला मुलांना पाच मिनिटं लागली.
शंतून म्हणाला ः ‘‘तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे, की मला चमचमीत-झमझमीत पदार्थ खायला आणि खिलवायला खूप आवडतं. मी तर केटरिंगचा अभ्यास करून एक टकाटक हॉटेल सुरू करणार आहे आणि माझ्या हॉटेलचं नाव असणार आहे ‘झारा’. म्हणून माझी आवडती वस्तूपण झाराच.’’
वेदांगी सांगू लागली ः ‘‘तुम्ही माझी आवडती वस्तू ओळखलीच असणार. मी रोज पहाटे क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी आणि संध्याकाळी सरावासाठी मैदानावर जाते. महिला-क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं मी नेतृत्व करणार आहे. म्हणून माझी आवडीत वस्तू आहे - -’’
सगळे जण ओरडले ः ‘‘बॅऽऽऽट.’’
अन्वय काही बोलण्याआधीच सगळे म्हणाले ः ‘‘तुझी आवडती वस्तू आम्ही ओळखू शकतो.’’
‘‘सांगा बरं...’’
पुन्हा सगळे हसतच ओरडले ः ‘‘पुस्तक...पुस्तक’’ आणि अन्वयनं मान डोलावली.
पार्थनं विचारलं ः ‘‘माझी आवडती वस्तू ओळखाल का?’’
सगळेच डोकं खाजवत म्हणाले ः ‘‘अरे बाप रे! सगळ्यात कठीण प्रश्‍न.’’
पार्थ उड्या मारत म्हणाला ः ‘‘व्वा, व्वा... मी जिंकलो. तुम्हाला कुणालाच ओळखता आलं नाही. माझी आवडती वस्तू ‘टी शर्ट’. कारण, मला सारखा सारखा टी शर्ट घालायला आवडतो,’’ हे ऐकून सगळे जणं तोंड दाबून हसत होते.
‘‘मला चित्रकलेची आवड आहे, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. रोज चित्र काढल्याशिवाय मला चैन पडत नाही. सांगा पाहू, माझी आवडती वस्तू कोणती असेल?’’ पालवीचं बोलणं पूर्ण होण्याआधीच पार्थ म्हणाला ः ‘‘कागद...कागद.’’
पालवी दचकून म्हणाली ः ‘‘नाही...नाही! पेन्सिल.’’
आता सगळेजणं नेहाकडं पाहू लागले.
नेहा म्हणाली ः ‘‘तुम्हाला जरा ऐकायला विचित्र वाटेल; पण माझी आवडती वस्तू आहे ‘स्क्रू-ड्रायव्हर.’ आमच्या बिल्डिंगमधल्या सगळ्या मुलांची खेळणी आणि घरातले मिक्‍सर दुरुस्त करण्याचं काम माझ्याकडंच असतं. मला आईनं १९ प्रकारचे वेगवेगळे स्क्रू-ड्रायव्हर आणून दिले आहेत.’’

अन्वय सांगू लागला ः ‘‘आता खेळाचा मुख्य भाग ऐका. तुमची आवडती वस्तू तुम्ही ज्या कारणासाठी वापरता ती त्या कारणासाठी वापरायची नाही, असं ठरवलं तर ती आणखी कुठल्या कुठल्या कामासाठी वापरणं शक्‍य आहे, हे शोधून काढायचं आहे. उदाहरणार्थ ः तो टेबलावरचा पावडरचा डबा. तो आणखी कशासाठी वापरता येईल? तर फुलदाणी करण्यासाठी, खाली छिद्रं पाडून झाडांवर ‘पाऊसपाणी’ घालण्यासाठी, चित्रकलेचे उंच ब्रश किंवा पेनं ठेवण्यासाठी. तर तुम्हाला आवडत्या वस्तूचे वेगवेगळे १२ उपयोग लिहायचे आहेत आणि मला खात्री आहे, की ‘असा विचार तुम्ही याआधी कधीच केलेला नाही’, म्हणून हा खेळ नवीन आहे. वेगळ्या प्रकारे विचार करायला भाग पाडणारा हा खेळ आहे. तर...करा सुरवात.’’
आता सगळ्यांचेच चेहरे लंबेलांब झाले. १२ वेगळेच म्हणजे भलतेसलते उपयोग कसे काय शोधायचे? पावडरच्या डब्याकडं पाहत मुलं विचार करू लागली. हळूहळू त्यांना त्या ठिकाणी स्वतःची वस्तू दिसू लागली. सगळ्यांचे ‘आयडिया जनरेटर’ सुरू झाले.
‘आयडिया जनरेटर’मध्ये थोडा खाऊ आणि सरबत घातल्यावर त्याचा स्पीड वाढला. ३९ मिनिटांनंतर सगळ्यांकडं १२-१२ भलत्यासलत्या उपयोगांची यादीच तयार झाली.
***

वेदांगीची आवडती वस्तू आहे बॅट. ‘बॅट’चे भलतेसलते १२ उपयोग ः
  दोरीवर कपडे वाळत घालायला   भिंतीत खिळे ठोकायला.
  उंचावरच्या वस्तू सरकवायला   छोटे खड्डे खणायला.
  चालताना आधार म्हणून   मोठ्या डब्यातलं धान्य ढवळायला.
  कावड म्हणून   बॅट टांगून त्यावर कपडे वाळत घालणं.
  मुलांसाठी झोपाळा करता येईल.   व्यायाम करण्यासाठी.
  नाव वल्हवण्यासाठी वल्हं म्हणून.   एखाद्या मोठ्या फळीला मागून टेकू देण्यासाठी.
***

शंतून म्हणाला, ‘‘आता मी.’’ शंतनूच्या ‘झाऱ्याचे’ भलतेसलते १२ उपयोग ः
  झाऱ्यातून गोल गोल गोष्टी पाहायला.   वारा घेण्यासाठी पंखा.
  चाळणी म्हणून वापरता येईल.   दरवाजा ठोकायला.
  रांगोळीचे ठिपके काढायला.   माश्‍या हाकलायला.
  तेल ढवळायला.   गोल फिरवत खेळायला.
  टेबलावरचा पेन्सिल स्टॅंड.   भाजी परतायला.
  तव्यावरची आंबोळी उलथायला.   ताक घुसळायला.
***
पार्थ काही बोलण्याआधीच पालवी म्हणाली ः ‘‘पेन्सिल.’’
पालवीच्या ‘पेन्सिलीचे’ १२ भलतेसलते उपयोग ः
  पेन्सिल षटकोनी असते. तिच्या प्रत्येक कडेवर १ ते ६ याप्रमाणे छिद्रं पाडली तर ती फासा म्हणूनही वापरता येते.
  केस बांधून त्यांत खोचण्यासाठी.
  टोक करताना निघणारी सालं वापरून शुभेच्छापत्र करण्यासाठी.   ढवळायला   कागदाला छिद्रं पाडायला.
  सीडीमध्ये अडकवून भिंगरी.
  डब्यावर वाजवायला   कॅच कॅच खेळायला.
  कंपासपेटीत ठेवून खुळखुळा वाजवायला   पट्टी म्हणून.
  टकटक टकाटक करून इशारा द्यायला   कुंडीतल्या रोपांना आधार द्यायला.
***
आता मात्र पार्थ गप्प बसायला तयार नव्हता. उड्या मारत तो म्हणाला ः ‘‘आता मी म्हणजे...मीच.’’ पार्थच्या ‘टी शर्टचे’ भलते सलते १२ उपयोग ः
  बाजारातून भाजी आणायला   टेबल पुसायला.
  पडदा म्हणून   खेळताना झेंडा म्हणून.
  पाणी गाळण्यासाठी   जखम झाल्यावर बॅंडेज म्हणून.
  बाहुलीला कपडे शिवायला   डोक्‍यावर ठेवायला चुंबळ म्हणून.   बरणी आतून पुसायला
  गरम करून शेकायला.
***
आता अन्वयनं आपली वही उघडली. अन्वयच्या ‘पुस्तका’चे भलतेसलते १२ उपयोग ः
  डास मारायला   उन्हातून चालताना डोक्‍यावर धरायला.
  टॉवेलमध्ये गुंडाळून उशी म्हणून   वारा घेण्यासाठी.
  छोटा प्लास्टिक बॉल घेऊन क्रिकेट खेळण्यासाठी
  ट्रे म्हणून.   शेकोटीला वारा घालायला
  डोक्‍यावर ठेवून चालण्याचा खेळ.   माठावर झाकण
  बोटावर गरगर फिरवायला.   पुस्तकातली चित्र रंगवण्यासाठी   कोऱ्या जागेत लिहिण्यासाठी.
***
आता सगळेच नेहाकडं पाहू लागले. नेहाचं अजून लिहिणं-खोडणं आणि पुन्हा लिहिणं असं सुरूच होतं. नेहाच्या ‘स्क्रू-ड्रायव्हचे’ १२ भलतेसलते उपयोग ः
  कुंडीतली माती सैल करण्यासाठी
  बिजागरीत थेंब थेंब तेल सोडण्यासाठी.
  सरकणाऱ्या खिडक्‍यांची चॅनल्स साफ करण्यासाठी
  खरवडण्यासाठी.
  वाळत घातलेले कपडे सरकवण्यासाठी.   ठोकण्यासाठी.
  छिद्रं पाडण्यासाठी.   पातळ वायर तोडण्यासाठी.
  लहान छिद्रं मोठी करण्यासाठी.   काचेवर चरे पाडण्यासाठी.   काच फोडण्यासाठी.   मऊ लाकडाच्या कपच्या काढण्यासाठी.
***
सगळे जण जोरदार टाळ्या वाजवत ओरडले ः ‘‘ओके बोके पक्के काम शंभर टक्के.’’ आणि आतल्या खोलीत गप्पा मारत बसलेली मोठी माणसं दचकून बाहेर आली. मुलांचे भलतेसलते उपयोग ऐकून मोठी माणसं म्हणाली ः ‘‘ओह माय गॉड, हे ऐकल्यावर तर आम्हालाही आणखी भलतेभलते आणि सलतेसलते उपयोग सुचू लागले आहेत. सांगू का?’’
‘‘आमच्या पोटात भलतीच पोकळी निर्माण झाली आहे. त्यात काही भलतंसलतं न घालता जरा चांगलंचुंगलं, गोडधोड घाला होऽऽ’’ आता हे कोण बोललं असावं, हे तुम्ही ओळखलंच असेल!

पालकांसाठी गृहपाठ ः

  •   ‘वेगळा विचार करायला लावणारे’ खेळ मुलांसोबत जाणीवपूर्वक खेळा. काही वेळा मुलांची उत्तरं बालीश वाटतील; पण तेव्हा चिडू नका. त्यांना नावं ठेवू नका. अशा वेळी शांत राहा. कारण, या विचारांतूनच त्यांना पुढचा नवीन विचार सुचणार आहे, यावर विश्वास ठेवा.
  •   मुलं विचार करत असताना किंवा आपला विचार शब्दांतून मांडत असताना जर का आपण मध्ये हस्तक्षेप केला (किंवा आपलं शहाणपण चमकवलं) तर मुलांची विचारशृंखलाच खंडित होते आणि त्यांना पुढं बोलणं सुचत नाही.
  •   मुलांचं बोलणं पूर्णपणे ऐकून घ्या आणि त्यांनी विचारलं तरच तुमचं (अमूल्य) मत द्या. कारण, खूप वेळा तुम्ही फक्त ‘ऐकून घेणं’ इतकीच मुलांची गरज असते, हे समजून घ्या.
  •   हाच खेळ वेगवेगळ्या प्रकारे मुलांसोबत खेळा. निरनिराळ्या वस्तू वापरा.
  •   काही वेळा एखादं दृश्‍य पाहून त्यातून वेगवेगळे अर्थही काढता येतील.
  •   ‘जे पालक मुलांना गृहीत धरत नाहीत, त्यांच्याशीच मुलं भरभरून बोलतात, मनमोकळ्या गप्पा मारतात’ ही प्राचीन चिनी म्हण आपल्याला खूप काही शिकवते!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com