ही ही शाळा.. ती ती शाळा...

राजीव तांबे me@rajivtambe.com
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

बाबा म्हणाले : ‘तुम्ही सगळेच शाळेत जाता. आम्हीपण शाळेत गेलो होतो. काहींना शाळा आवडते, तर काहींना नाही आवडत. काहींना दुसऱ्यांची शाळा आवडते; पण तरीही प्रत्येक मुलाला वाटतं, की आपल्या शाळेत ‘हे हे’ असतं आणि ‘ते ते’ असतं तर किती बरं झालं असतं? आज आपण या ‘हे हे’ आणि ‘ते ते’विषयीच गप्पा मारणार आहोत.’’

बाबा म्हणाले : ‘तुम्ही सगळेच शाळेत जाता. आम्हीपण शाळेत गेलो होतो. काहींना शाळा आवडते, तर काहींना नाही आवडत. काहींना दुसऱ्यांची शाळा आवडते; पण तरीही प्रत्येक मुलाला वाटतं, की आपल्या शाळेत ‘हे हे’ असतं आणि ‘ते ते’ असतं तर किती बरं झालं असतं? आज आपण या ‘हे हे’ आणि ‘ते ते’विषयीच गप्पा मारणार आहोत.’’

हा  रविवार पालवीच्या घरी ठरला होता. पालवीची आई नुसती सुगरणच आहे असं नव्हे, तर नवनवे पदार्थ करून इतरांना खाऊ घालायलाही तिला फार आवडतं. वेदांगी, पार्थ, नेहा आणि शंतनू हे सगळे वेळेवरच आले. आल्या आल्याच शंतनू म्हणाला ः ‘‘काल रात्री मी जेवलोच नाहीए. आता मी मस्त आडवा हात मारणार आहे.’’
‘‘अरे बापरे! म्हणजे तू टेबलाखाली लोळत खाणार की काय?’’ या पार्थच्या प्रश्‍नावर काहीच न बोलता शंतनू पाय आपटत किचनमध्ये गेला आणि भेळेचा बकाणा भरून बाहेर आला.
‘‘काय रे...मारलास का आडवा हात?’’ असं बाबांनी विचारताच शंतनू गुरगुरला : ‘‘नॉय ऑजून’’
पडद्याला हळूच हात पुसत पालवीची आई बाहेर येत म्हणाली : ‘‘आधी आपण भेळ खाऊ. मग थोड्या वेळानं शेव-पुरी खाऊ आणि सगळ्यात शेवटी पाणी-पुरी...’’
‘‘ओए ओए जल्दी खाए, ओए ओए भेळ-पुरी खाए’’ मुलांनी एकच कल्ला सुरू केला.
मुलांनी चमचमीत, चटकदार भेळ मजबूत हादडली आणि त्यावर थंडगार वाळासरबत रिचवलं. मग मात्र सगळेच जरा सुस्तावले. बसलेली मुलं हळूहळू सरकत लोळायच्या तयारीतच होती. इतक्‍यात बाबांनी विचारलं : ‘‘म...आता काय...? लोळायचं? खेळायचं? की आणखी काही खायचं?’’
‘‘अं...जरा जास्तीच खाल्ल्यानं अधिकच जड झालंय. आपण बसल्या बसल्या काहीही खेळू या,’’ असं एकानं बोलताच बाकीच्यांनी माना डोलावल्या.
आज आपण गप्पांचा एक वेगळाच प्रयोग करणार आहोत. म्हणजे सगळ्याच गोष्टी काही मी आत्ता सांगणार नाही; पण त्या तुम्हाला हळूहळू कळत जातील.
बाबा म्हणाले : ‘‘तुम्ही सगळेच शाळेत जाता. आम्हीपण शाळेत गेलो होतो. काहींना शाळा आवडते, तर काहींना नाही आवडत. काहींना दुसऱ्यांची शाळा आवडते; पण तरीही प्रत्येक मुलाला वाटतं, की आपल्या शाळेत ‘हे हे’ असतं आणि ‘ते ते’ असतं तर किती बरं झालं असतं? आज आपण या ‘हे हे’ आणि ‘ते ते’विषयीच गप्पा मारणार आहोत.’’
‘‘पण मला तर शाळेत खूप म्हणजे खूप खूपच गोष्टी असाव्यात असं वाटतंय. इतक्‍या खूप, की त्यासाठी लागणारे पैसे कुणाकडं नसतीलच. मग काय करायचं?’’
‘‘शाबास! चांगला प्रश्‍न विचारलास. तुम्ही अशी कल्पना करा, की तुम्हाला तुमच्या स्वप्नातली शाळा उभी करायची आहे आणि त्यासाठी तुमच्याकडं न संपणारा खजिना आहे. तर ती शाळा कशी असेल?’’
‘‘पण असं का करायचं?’’
‘‘हापण चांगला प्रश्‍न आहे. विमानाचा शोध लागण्याआधी कैक वर्षं ज्यूल व्हर्न यानं अशी कल्पना मांडली होती, की ‘आकाशातून उडत जाणारी बस असेल. त्या बसला पंख असतील. ती उडत उडत एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकेल.’ तेव्हा सगळे लोक त्याला हसले होते; पण ज्यूल हा काळाच्या पलीकडं पाहणारा कल्पक लेखक होता. असा थोडासा प्रयत्न आपणही करू या. ...तर चला, आपापल्या शाळांचं काम सुरू करा...तुमच्या शाळा काय काय करतील आणि शाळेत काय काय असेल ते सांगा.’’
‘‘अं... मी सांगतो; पण कुणी हसायचं नाही हं. मला शाळेत जाताना कधी कधी खूप भीती वाटते, तर कधी जाऊच नये, असं वाटतं; पण माझ्या शाळेत मुलांना यावंसं वाटेल, शाळा सुटली तरी थांबावंसं वाटेल आणि शाळेत आल्यावर त्यांना घरच्यासारखंच उबदार वाटेल.’’
‘‘आमच्या वर्गाचं वेळापत्रक जाम बोअर आहे. जेव्हा आम्हाला खूप उत्साह असतो, तेव्हा कुठला तरी रटाळ विषय घेऊन आम्हाला पिळून काढतात आणि दुपारी जेवल्यावर खेळायला पाठवतात. माझ्या शाळेत ‘आज काय काय अभ्यास करायचा आहे,’ एवढंच शिक्षक सांगतील आणि त्याचं वेळापत्रक मुलंच तयार करतील.’’
‘‘माझी शाळा फक्त शिकण्यासाटी आणि परीक्षा देऊन पास-नापास करण्यासाठी अजिबात नसेल. माझ्या शाळेत अनेक गमतीजमती असतील, अनेक गोष्टी असतील. म्हणजे माझ्या शाळेत सुतारकाम, लोहारकाम, शेती, संगणकशास्त्र, चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, नाटक, सिनेमा, विज्ञान, खगोलशास्त्र अशा विविध ८९ शाखांची दालनं असतील. एक वर्षभर किंवा मुलांना आपला सूर सापडेपर्यंत या दालनात मुलं रमतील आणि नंतरच आपल्याला जे पाहिजे तेच शिकतील. त्यात संशोधन करतील.’’
‘‘मला आपल्या देशाबद्दल जी काही माहिती आहे, ती सगळी पुस्तकीच आहे. मुलांनी वेगवेगळे अनुभव घेत स्वतःहूनच शिकलं पाहिजे आणि मदतीला ‘मित्र-शिक्षक’ असावेत. मुलांचे छोटे छोटे गट असतील आणि प्रत्येक गटासोबत मुलांनीच निवडलेला एक ‘मित्र-शिक्षक’ असेल. मुलं भारतभर फिरतील. गावागावात थांबतील. लोकांशी बोलतील. मुलांशी खेळतील. गावातल्या-शहरांतल्या वेगवेगळ्या स्थळांना, संस्थांना भेटी देतील. यातूनच ही मुलं भारताचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, पर्यावरण, विज्ञान, गणित, शेती, भाषा आणि संस्कृतीही शिकतील. ‘मित्र-शिक्षक’ यासाठी त्यांना मदत करतील. एका वर्षानं हे सगळे गट एकत्र येतील. आपापले अनुभव शेअर करतील. पुन्हा नव्यानं बाहेर पडतील. अशी शिक्षणयात्रा हवी, असं वाटतं.’’
‘‘अं...मला थोडं वेगळंच सांगायचं आहे. खरं म्हणजे शाळा बांधण्याची गरज नाही. जसे अनेक संगणक एका सर्व्हरला जोडलेले असतात, तशीच शाळेची रचना करता येईल. म्हणजे मुलांना शाळेत एकाच ठिकाणी आणि एकाच वेळी येण्याची अजिबात गरज नाही. मुलं त्यांना पाहिजे ते आणि पाहिजे तिथं शिकू शकतील आणि त्याच वेळी ते सर्व्हर-शाळेच्याही संपर्कात असतील. मुलांना काही अडचण आली किंवा त्यांना अधिक मदत हवी असली, तर गावातलं संसाधनकेंद्र आणि सर्व्हर-शाळा मिळून तो प्रश्‍न सोडवतील. म्हणजे मग मुलं त्यांच्या सोईनं कुठंही, केव्हाही, कधीही आणि काहीही शिकू शकतील. शिक्षणाचा उत्सवच व्हायला पाहिजे.’’
‘‘हं. ही चांगली कल्पना आहे; पण अधिक खोलात जाऊन ती विकसित करायला हवी.’’
‘‘मला आणखीच वेगळं वाटतंय. आम्ही शाळेत उगाचच फाफटपसारा शिकतो आणि जे आम्हाला नेमकं हवंय ते कधीच शिकत नाही. म्हणून प्रत्येक मुलानं स्वतःचा अभ्यासक्रम स्वतः ठरवला पाहिजे आणि तो किती वर्षांत पूर्ण करायचा, हेही ठरवलं पाहिजे. उदाहरणार्थ : ज्या गावात वीज नाही आणि चुलीवर स्वयंपाक करतात, त्या मुलांसाठी वेगळा अभ्यासक्रम असेल. म्हणजे कंदील साफ कसा करावा? कंदिलासाठी वाती कशा कराव्यात? सरपण कसं आणावं आणि साठवावं? लाकडाशिवाय आणखी कुठल्या गोष्टींचा उपयोग इंधन म्हणून करता येईल? तसंच शहरातल्या मुलांसाठी विजेची बचत, उपकरणांची दुरुस्ती, प्रदूषण कमी होण्यासाठी उपाययोजना असा वेगळा अभ्यासक्रम असेल आणि गंमत म्हणजे एकाचा ‘बेसिक अभ्यासक्रम’ हा दुसऱ्याचा ‘
ऍडव्हान्स अभ्यासक्रम' अभ्यासक्रम’ असेल. असं काहीसं करायला पाहिजे. म्हणजे सगळे विषय त्या त्या मुलांच्या दैनंदिन जीवनशैलीशी आणि त्यांच्या भवतालाशी जोडून घेतले, तर शिकण्याची प्रक्रिया इतकी सहज-सोपी होऊन जाईल, की आपण कधी शिकलो, हेही मुलांना कळणार नाही.’’
‘‘मी एक सुचवू का?’’
‘‘अगं, सांग की...’’
आई म्हणाली : ‘‘माझ्या खूप गोष्टी शिकायच्या राहून गेल्या आहेत; पण आता त्या मला शिकायच्या आहेत आणि तेही परीक्षा देण्यासाठी नव्हे, तर माझ्या आनंदासाठी. म्हणून मला तर वाटतं, की शाळा ही फक्त मुलांची नसावीच. ज्यांना कुणाला शिकायचं आहे, त्यांच्यासाठी असावी आणि शाळा एका जागीपण नसावी. शहरात, कॉलनीत, गावात, वस्तीत फिरणारी शाळा असावी. शाळा चार दिवस वस्तीत मुक्काम करेल, तेव्हा ‘त्या शाळे’ची सारी जबाबदारी ती वस्ती घेईल. मग चार दिवसांनी दुसरी शाळा वसतीला येईल. या फिरत्या शाळेत प्रत्येकाला जे हवं ते शिकता येईल. मग शाळा घरात जाईल आणि घर शाळेत जाईल.’’
‘‘व्वा, व्वा! या कल्पनेवरही खोलात जाऊन काम करायला पाहिजे; पण ही आयडिया लय भारी...’’ बाबा म्हणाले; पण त्यांना थांबवत शंतनूनं विचारलं : ‘‘बाबा, तुम्ही लय भारी म्हणालात की शेव-पुरी म्हणालात?’’
शंतनूला जवळ ओढत बाबा म्हणाले : ‘‘अरे, तू चुकीचं ऐकलंस. मी तर ‘पाणी-पुरी’ असं म्हणालो होतो.’’ यावर सगळेच ठो ठो हसले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajiv Tambe writes for parents