खाऊचा खेळ (राजीव तांबे)

खाऊचा खेळ (राजीव तांबे)

‘‘शाबास पालवी. म्हणजे सगळी अक्षरं लक्षात ठेवून त्यांची मनातल्या मनात जुळवाजुळव करायची आणि त्यातून खरा शब्द शोधायचा. ही मस्त आयडिया आहे.’’ आईनं शाबासकी देताच पालवीचा चेहरा फुलला.

‘हा  रविवार शंतनूच्या घरी’ हे आधीच ठरलं होतं. नेहा, वेदांगी, पालवी आणि पार्थ वेळेवर हजर झाले. पार्थनं घरात पाऊल टाकताच तो सरळ किचनमध्येच गेला.
‘‘आज काय केलंय खायला? गोड की तिखट? की आंबट-गोड? कुरकुरीत की
लुसलुशीत? की...’’
पार्थला थांबवत शंतनूची आई म्हणाली ः ‘‘अरे पार्था, जरा धीर धर. आधी बाहेर जा पाहू...’’
‘‘पण का? आज काय खाऊ आहे ते तर सांग...’’
‘‘अरे पार्थू, आज आपण खाऊचाच खेळ खेळणार आहोत. कुठला खाऊ आहे हेच तर तुम्ही ओळखायचं आहे.’’ पार्थनं रडवेल्या सुरात विचारलं ः ‘‘म्हणजे...? मला खाऊ ओळखताच आला नाही तर मला खाऊ मिळणारच नाही का? अं...अं... असला खेळ नको मला. मला आधी खाऊ पाहिजे म्हणजे पाहिजेच...’’
पार्थला समजावत आई म्हणाली ः ‘‘अरे, आधी गरमागरम खाऊ, मगच खेळायला जाऊ. ओके?’’
हे ऐकल्यावर पार्थची कळी खुलली.
गरमागरम वाफाळलेले, लुसलुशीत कांदेपोहे आणि त्यावर कुरकुरीत लसूणशेव असा भक्कम नाश्‍ता करून सगळे खेळायला बसले.
पोटोबा शांत झाल्यानं आता कुणाचीच तक्रार नव्हती.
शंतनूचे बाबा म्हणाले ः ‘‘मला वाटतं, आपण हा ‘खाऊखेळ’ दोन गटांत खेळू या का? म्हणजे...’’बाबांना थांबवत नेहा म्हणाली ः ‘‘अहो पण आधी खेळ काय आहे ते तर सांगा.’’
बाबा हसतच म्हणाले ः ‘‘खरंय...पण सांगण्यापेक्षा मी खेळ खेळूनच दाखवतो ना! आता सगळ्यांनी माझ्या बाजूला बसा; पण पार्थ, तू मात्र माझ्याकडं पाठ करून उभा राहा.’’बाबांनी असं म्हणताच सगळ्यांनी आपापल्या जागा पकडल्या.

पार्थ गोंधळल्यासारखा बाबांकडं पाठ करून उभा राहिला. बाबांनी पार्थला जवळ ओढलं. पार्थ धडपडत बाबांजवळ सरकत किरकिरला ः ‘‘सगळे तिकडं मग मी का इकडं?’’ ‘‘कारण, मी तुझ्या पाठीवर लिहिणार आहे!’’असं बाबांनी म्हणताच पार्थ टुणकन्‌ उडी मारून पळाला. गयावया करत बाबांना म्हणाला ः‘‘नको...नको...प्लीज नको. शर्ट खराब झाला तर आई आधी माझी धुलाई करेल मग शर्टाची आणि नुसती धुलाईच नाही...तर चांगली आपट-धोपट धुलाई करेल आणि नंतर मस्त पिळून काढेल.’’
‘‘अरे पार्थू, मी तुझ्या शर्टावर म्हणजे पाठीवर माझ्या बोटानं लिहिणार आहे. कळलं का? तुझा शर्ट अजिबात खराब होणार नाही. डोंट वरी.’’
‘‘ओके बॉस.’’
‘‘आता मी पार्थच्या पाठीवर एका खायच्या पदार्थाचं नाव लिहिणार आहे. मी काय लिहीत आहे, हे तर तुम्हा सगळ्यांना कळेलच; पण पार्थला मात्र आपलं सगळं लक्ष स्पर्शावर केंद्रित करावं लागेल. मी लिहीत असताना त्याच्या मनात त्या शब्दांची मिरर-इमेज निर्माण होईल. त्यावरून त्यानं ‘तो पदार्थ’ ओळखायचा आहे. सगळ्यांना खेळ समजलाय की पुन्हा सांगू?’’
‘‘बाबा लिहा आता. कधी एकदा ‘पाठीनं चमचमीत पदार्थ पाठोपाठ खातो’ असं झालंय मला...’’
बाबांनी मूठ बंद केली आणि पहिलं बोट उघडलं. पार्थच्या पाठीवर चार अक्षरांचा एक शब्द लिहिला.
आणि कुणी काही बोलण्याआधीच पार्थ ओरडला ः ‘‘वडापाव.. वडापाव. हो की नाही? सांगा...सांगा...’’
गाल फुगवून डोळे बारीक करत पालवी म्हणाली ः‘‘...मला नाही आवडत नुसता वडापाव. मी कध्धीच खात नाही..’’
‘‘खोटं...खोटं, साफ खोटं. कालच आपण खाल्ला वडापाव...’’ एकच कल्ला झाला.
सगळ्यांना शांत करत पालवी म्हणाली ः‘‘काल आपण काय खाल्लं ते मी बाबांच्याच पाठीवर लिहिते म्हणजे तुम्हीच म्हणाल ‘एकदम खरं..एकदम खरं’.’’
आता पालवी बाबांच्या पाठीवर बसली. पार्थही धावतच मागं आला. पालवी बाबांच्या पाठीवर सावकाश लिहू लागली. पालवी जसजशी लिहू लागली तसतशी सगळी मुलं आनंदानं किंचाळत ‘ओ हो हॅ हॅ, ओ हो हॅ हॅ... हेच खाल्लं आपण.. ओ हो हॅ हॅ,’ असं म्हणू लागली.
बाबा पुरते गोंधळून गेले. मुलांचा कल्लकलकलाट आणि पार्थची मस्ती यामुळं बाबांना काही सुचेना. ते डोकं खाजवू लागले.

किचनमधून डोकावत पदराला हात पुसत आई म्हणाली ः ‘‘अहो, आता डोकं नको, पाठ खाजवा आणि ती झणझणीत गोष्ट खावा...’’
बाबांनी हा क्‍लू बरोब्बर ओळखला. दोन्ही हात उंच करून बाबा म्हणाले ः ‘‘कळलं...कळलं. वडापाव आणि लसूणचटणी. बरोबर ना?’’
सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.
लगेचच सगळ्यांच्या जोड्या जुळल्या. एकमेकांच्या पाठीवर वेगवेगळे खाद्यपदार्थ उमटू लागले. शंतनूचा पदार्थ करपला. म्हणजे शंतनू पालवीच्या पाठीवर पदार्थ वाढत असतानाच त्यात खूप बदल होऊ लागले. त्यामुळं पाठ चांगलीच तापली आणि पदार्थ करपला.
वेदांगीचा पदार्थ ऊतू जाऊ लागला. म्हणजे वेदांगी नेहाच्या पाठीवर पदार्थ पसरवत असताना त्याचे शब्द पाठीच्याही बाहेर जाऊ लागले.
बाबांच्या पाठीवर व्हेज पदार्थ लिहावा की नॉन व्हेज, हेच नक्की न झाल्यानं पार्थ बाबांच्या पाठीवर फक्त रेषा मारत बसला. आधी दोन-चार पदार्थांची सरमिसळ झाल्यावर मात्र सगळेजण पाठीवरचे पदार्थ ओळखू लागले.
‘‘आता काय...?’’ असा प्रश्न पडण्याआधीच पालवी म्हणाली ः ‘‘ओए...मला एक आयडिया सुचलीए.. आपण पाठीवर पदार्थच लिहू...पण...’’
‘‘आता पणबीण नको. काय ते सांग पटकन.’’
‘‘अं...मी खायच्या पदार्थाचंच नाव लिहिणार आहे; पण वेगळ्या प्रकारे...’’
‘‘म्हणजे...म्हणजे?’’
‘‘आधी पाहा मी काय करते ते,’’ असं म्हणत पालवीनं बाबांच्या पाठीवर ‘ळ, व, स, पा आणि मि’ ही पाच अक्षरं लिहिली.
वेदांगी चिडून म्हणाली ः ‘‘हॅ...चीटिंग. कुठलाच शब्द ळ पासून सुरू होत नाही.’’
पार्थ वेडावत म्हणाला ः ‘‘ ‘ळवसपामि’ हा कुठला विचित्र पदार्थ? तूच खा तो!’’
सगळे फॅ फॅ हसायला लागले तेव्हा नेहा म्हणाली ः ‘‘आपण सगळेच खातो हा पदार्थ. मी ओळखलाय तो...’’
‘‘कुठला गं, कुठला?’’
‘‘मिसळपाव. पालवीनं लिहिताना फक्त अक्षरांची अदलाबदल केली. मस्तच!’’
‘‘शाबास पालवी. म्हणजे सगळी अक्षरं लक्षात ठेवून त्यांची मनातल्या मनात जुळवाजुळव करायची आणि त्यातून खरा शब्द शोधायचा. ही मस्त आयडिया आहे,’’ आईनं शाबासकी देताच पालवीचा चेहरा फुलला.
‘‘व्वा! म्हणजे हा खेळ आपल्याला दोन प्रकारे खेळता येईल तर. तो फिर हो जाए शुरू...’’
थोड्याच वेळात हात वर करत शंतनू म्हणाला ः ‘‘आणखी एक आयडिया. आपण हा खेळ तीन प्रकारे खेळू शकतो. आपण फक्त चमचमीत आणि चटकदार पदार्थांचीच नावं लिहायची. म्हणजे बटाटेवडे, मिसळपाव, भेळ, पाणीपुरी, चायनीज भेळ, शेजवान डोसा...’’
‘‘अरे, थांब थांब...’’ नेहा त्याला थांबवत म्हणाली ः‘‘अरे, हा खेळ तीनच काय तर हज्जार प्रकारे खेळता येईल. आपल्या नातेवाइकांची, हीरो-हिरॉइनची, सिनेमांची, देशांची, प्राण्यांची, पक्ष्यांची अशी कुणाचीही नावं लिहिता येतीलच की. कुठली नावं लिहिणार ते आधी ठरवायचं आणि मग खेळ सुरू करायचा. मज्जाच मज्जा!’’ दोन हात उंचावत पार्थ ओरडू लागला ः‘‘मला बोलायचं आहे...मला बोलायचं आहे...’’
‘‘अरे, मग बोल ना. तुझं कुणी तोंड धरलंय?’’

‘‘हा... हा खेळ कुठल्याही भाषेत पण खेळता येईल की. म्हणजे कानडी माणसं कानडी भाषेत हा खेळ खेळतील, तर मराठी माणसं मराठी भाषेत.’’
‘‘शाबास पार्थ. आता हा खेळ मी माझ्या गुजराती मैत्रिणींसोबत गुजराती भाषेतही खेळीन.’’
आणि सगळे वेगवेगळ्या प्रकारे एकच खेळ खेळू लागले...

-----------------------------------------------------------------------
पालकांसाठी गृहपाठ :

 एखाद्‌वेळेस जर मुलाचं उत्तर चुकलं तर लगेच त्याला रागवू नका. किंवा "इतकी साधी गोष्ट तुला समजत नाही?' हा नेहमीचा "मंत्र' म्हणू नका; तर त्या मुलाला उत्तर शोधण्यासाठी आणखी संधी द्या.
 काही वेळा लहान मुलांना इतरांच्या पाठीवर जोर देऊन लिहिता येत नाही. अशा वेळी घशात काटा अडकल्याप्रमाणे गुरगुरत मुलाकडं पाहू नका किंवा ठसका लागल्याप्रमाणे ठसकू नका.
 "समजून घेणं म्हणजे आपल्या मुलाच्या अडचणी समजून घेऊन त्याला त्यांच्यावर मात करण्यासाठी वारंवार संधी देणं' ही लांबलचक प्राचीन चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा!
 आपल्यापेक्षा आपल्या मुलांना जास्त मार्क मिळावेत म्हणून चांगले पालक नेहमीच प्रयत्नशील असतात, हे तुम्ही ओळखलं असेलच.
-----------------------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com