खुर्च्यांच्या भेंड्या (राजीव तांबे)

खुर्च्यांच्या भेंड्या (राजीव तांबे)

‘‘परवा मी एक ‘स्पेशल आजी-आजोबाखुर्ची’ पाहिली. दोन लाकडी खुर्च्या एकमेकींना बाजूबाजूला जोडल्या होत्या. म्हणजे दोन्ही खुर्च्यांचे डावे हात एकमेकींना जोडलेले होते. त्यामुळं एकमेकांसमोर बसून चहा पीत गप्पा मारता येतात आणि खुर्चीतून उठताना एकमेकांचा आधार घेऊन उठता येतं.’’

या  रविवारी वेदांगीच्या घरी धामधूम सुरू झाली. आज खेळ खेळायचा की गप्पा मारायच्या की कुठली वस्तू तयार करायची, यावर वेदांगीच्या घरातल्यांचं एकमत होत नव्हतं. गेल्याच महिन्यात तयार केलेलं ‘आपलं कॅलेंडर’ भिंतीवर चमकोगिरी करत होतं. तिकडं पाहत वेदांगी म्हणाली ः ‘‘असंच काहीतरी करू या ना.’’
‘‘अगं पण काय करू या...ते तर सांगशील...?’’
‘‘तेच तर सुचत नाहीए गं. बाबा, तुम्ही पटकन दोन मिनिटांत सांगा नं.’’
बाबा चिरचिरत म्हणाले, ‘‘कमाल आहे तुमची. अगोदरपासून तयारी करायला काय झालं होतं? तुम्ही आता तहान लागल्यावर पाण्याची पाइपलाईन टाकताय. दोन मिनिटांत सांगा म्हणजे...’’
बाबांचं बोलणं सुरू असतानाच आई वैतागून संगणकासमोरच्या खुर्चीवर धपकन्‌ बसली. ही पाच चाकं असणारी आणि गोलगोल फिरणारी खुर्ची आईला घेऊन या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात झुपकन्‌ गेली.
‘‘अगं, माझी खुर्ची मोडशील,’’ असं बाबांनी भिऊन ओरडताच आई म्हणाली ः ‘‘मिळाला खेळ... खेळ मिळाला.’’
हे बोलणं ऐकताच बाबा विस्कटलेच! ते चिडून म्हणाले ः ‘‘माझी खुर्ची म्हणजे तुम्हाला काय खेळणं वाटलं काय? माझ्या खुर्चीशी अजिबात कुणी खेळायचं नाही.’’
‘‘अहो, आम्ही खुर्चीशी खेळणार आहोत...पण तुमच्या नव्हे हो...’’ आईचं बोलणं पूर्ण होण्याआधीच पार्थनं विचारलं ः ‘‘म... कुणाच्या?’’
पदर खोचत आई म्हणाली ः ‘‘ते तुम्हाला सगळे जण आल्यावरच कळेल.’’
इतक्‍यात दारावरची बेल वाजली. सगळी गॅंग आत आली.
आल्या आल्या शंतनूनं विचारलं ः ‘‘वेदांगी, आजचा बेत काय आहे?’’
पार्थ गडबडून म्हणाला ः ‘‘तब्येत ना? सगळ्यांची ठीक आहे.’’ यावर मात्र सगळ्यांनीच हा हा हू हू केलं.
थोडासा खाऊ खाऊन वेदांगी, पार्थ, शंतनू, नेहा आणि पालवी समोरासमोर बसले. वेदांगीचे आई-बाबा पण त्यांच्यात मिसळले ः
‘‘आज आपण थोडा वेगळा खेळ खेळणार आहोत. हा खेळ आपण दोन गटांत खेळू या. या खेळात तुमच्या कल्पनाशक्तीला आणि कल्पकतेला प्रचंड ताण द्यावा लागणार आहे. या खेळात हार-जीत असं काही नाही. कारण, इथं महत्त्व आहे तुमच्या कल्पकतेला, जिंकण्याला नव्हे. आणि हा खेळ...’’ आईला थांबवत पार्थ म्हणाला ः ‘‘आता हा खेळ सुरू करू या आणि मी तुझ्या गटात.’’
पार्थला जवळ घेत आई म्हणाली ः ‘‘हो... हो. तुम्ही सगळ्यांनी अनेक खुर्च्या पाहिल्या आहेत. एकाच ठिकाणी पण वेगवेगळ्या कारणांसाठी, माणसांसाठी अगदी वेगळ्याच खुर्च्या तुम्ही पाहिल्या आहेत. काहीतरी अगदी चित्र-विचित्र, सुंदर आणि भीतिदायकसुद्धा! आज आपण अशाच खुर्च्यांच्या भेंड्या खेळणार आहोत.’’
हे ऐकताच सगळी मुलं किंचाळली ः ‘‘का...य? खु ऽऽ र्च्यांच्या... भें ऽऽ ड्या..? काहीतरीच काय?’’
‘‘आधी माझं बोलणं तर पूर्ण होऊ दे. आपण दोन गटांत बसू. मी, पार्थ आणि नेहा एका गटात. बाकी सगळे दुसऱ्या गटात. एक छोटासा क्‍लू देते आणि आपण खेळ सुरू करू. एका गटानं एक खुर्ची सांगितली, की दुसऱ्या गटानं त्यापेक्षा वेगळी खुर्ची सांगायची. एकाच ठिकाणच्या; पण दोन वेगवेगळ्या खुर्च्याही चालतील. म्हणजे उदाहरणार्थ...’’ आईला थांबवत पार्थ म्हणाला ः ‘‘मी सांगतो. संगणकासमोरची पाच चाकांची गोल फिरणारी खुर्ची.’’
पालवी म्हणाली ः ‘‘आमच्या घरातली पत्र्याची फोल्डिंगची खुर्ची.’’ नेहा म्हणाली ः ‘‘डायनिंग टेबलसमोरची प्लास्टिकची खुर्ची.’’
शंतनू म्हणाला ः ‘‘आमच्या घरातली हात असणारी प्लास्टिकची खुर्ची...’’ पार्थ चुळबुळत काही ओरडणारच होता; पण त्याला थांबवत शंतनू म्हणाला ः ‘‘अरे पार्थू, डायनिंग टेबलासमोरच्या खुर्चीला हात नसतात. कारण जेवताना हात ठेवून बसायचं नसतं ना. कळलं का?’’
पार्थला आतली खुर्ची दाखवत आई म्हणाली ः ‘‘भले शाबास.’’
‘‘एक खूप महत्त्वाची खुर्ची तुम्ही विसरताय,’’ असं म्हणत आईनं आपले दोन्ही हात प्रथम मोकळे सोडले आणि मग गोल गोल फिरवले. नेहाला ही खूण बरोब्बर समजली आणि ती म्हणाली ः ‘‘व्हीलचेअर’’
बाबांनी बसल्या बसल्या उजवा हात पुढं केला आणि गोल फिरवला. क्षणभर विचार करत शंतनू म्हणाला ः ‘‘दिव्यांग व्यक्तींना चालवण्यासाठी जी तीनचाकी सायकल असते, त्यातली खुर्ची.’’
पार्थ म्हणाला ः ‘‘भले शाबास.’’
आईनं पार्थकडं पाहत दातावर टिचक्‍या मारल्या आणि पार्थ म्हणाला ः ‘‘कळलं. डेंटिस्टकडची खुर्ची. बाप रे मला तर भीतीच वाटते तिची.’’
पालवी म्हणाली ः ‘‘बॅंकेतल्या कॅशियरची खुर्ची. किती उंच असते ती. मी तर एकदा बाहेरच्या खुर्चीवर चढूनच ती आतली खुर्ची पाहिली...’’
पालवीचं बोलणं पूर्ण होण्याआधीच नेहा म्हणाली ः ‘‘य्येस ! बॅंकेतल्या बसायच्या खुर्च्या. या तीन खुर्च्या एका रांगेत एकमेकींना जोडलेल्या असतात.’’
‘‘मोटारीमधली ड्रायव्हरची सीट म्हणजेच खुर्ची ही इतर सगळ्या खुर्च्यांपेक्षा वेगळीच असते. ही खुर्ची हातानं वर-खाली, पुढं-मागं करता येते,’’ हे वेदांगीचं बोलणं संपल्यावर पार्थ म्हणाला ः ‘‘अं...अं... वैमानिकाची म्हणजे पायलटची खुर्ची.’’
हे ऐकल्यावर शंतनू बोललाच ः ‘‘हॅ... ती पण वर-खाली आणि पुढं-मागंच होणार ना? म्हणजे काही ती वेगळी नव्हे.’’
पण त्याला खुणेनंच थांबवत नेहा म्हणाल ः ‘‘पार्थनं अर्धीच गोष्ट सांगितली आहे. पायलटची खुर्ची हाताने नव्हे, तर बटणानं ॲडजस्ट होते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या खुर्चीत आणखीही काही खुब्या असतात.’’
‘‘ठीकॉय. आगगाडीतली वातानुकूलित डब्यातली खुर्ची.’’
‘‘त्याच आगगाडीतल्या साध्या डब्यातल्या खुर्च्या.’’
‘‘सुमो गाडीतल्या मागच्या आडव्या खुर्च्या.’’
‘‘एसटीमधली शेवटची लंबेलांब खुर्ची.’’
‘‘थिएटरमधली मऊ, गुबगुबीत आणि पुढं ढकलली जाणारी खुर्ची.’’ ‘‘शाळेमध्ये मुख्याध्यापक बसतात ती खुर्ची.’’
‘‘काही परिषदांमध्ये किंवा काही कॉलेजमध्ये, खुर्चीच्या डाव्या हातावर फोल्डिंग पॅड असणाऱ्या खुर्च्या असतात, म्हणजे त्यावर वही ठेवून लिहिणं सोपं होतं.’’
‘‘माटे माटे, मेरे बाल काटे... अरे आपण विसरलोच की आपली सलूनमधली राजेशाही खुर्ची.’’
‘‘ओके बोके, काम पक्के... आमच्या टकाटक ब्यूटीपार्लरमधली फंडू-गुंडू खुर्ची.’’ बाबांनी आईकडं बघत उजव्या हाताची दोन बोटं हलकेच कपाळावर फिरवत, खाली गालावर सोडली. ही खूण आईलाच समजली.
‘‘लग्नात नवरा-नवरीला बसण्यासाठी स्टेजवर असणारी लालेलाल खुर्ची.’’ ‘‘आणि हो, त्याच लग्नात आम्हाला बसायला मात्र पांढऱ्या सिल्कचं गाऊन घातलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या.’’
‘‘आजोबांसाठी ऐसपैस लाकडी आरामखुर्ची.’’
‘‘परवा मी एक ‘स्पेशल आजी-आजोबाखुर्ची’ पाहिली. दोन लाकडी खुर्च्या एकमेकींना बाजूबाजूला जोडल्या होत्या. म्हणजे दोन्ही खुर्च्यांचे डावे हात एकमेकींना जोडलेले होते. त्यामुळं एकमेकांसमोर बसून चहा पीत गप्पा मारता येतात आणि खुर्चीतून उठताना एकमेकांचा आधार घेऊन उठता येतं.’’
‘‘ओए ओए... एक भन्नाट खुर्ची राहिलीच की. जत्रेतल्या आकाशपाळण्यातली, पोटात गोळा आणणारी खतरनाक खुर्ची.’’
‘‘आणि त्याच जत्रेतल्या गरगर फिरणाऱ्या मेरी गो राउंड मधली चक्करबक्कर खुर्ची.’’
‘‘आपल्याला सिनेमे दाखवणारी, गाणी ऐकवणारी विमानातली खुर्ची; पण गंमत म्हणजे, पुढच्या माणसाची खुर्ची मागच्या माणसाला सिनेमा दाखवते.’’
‘‘एका मोठ्या कातडी पोत्यात थर्मोकोलचे  ढीगभर मणी भरतात, की झाली बीन खुर्ची तय्यार ! बसल्यावर बक्कन्‌ आत जाणारी आणि सतत आपला आकार बदलणारी बीनची खुर्ची.’’
‘‘आता जरा थांबू या का? त्या बीन खुर्चीप्रमाणे माझ्या पोटाचा आकार तर बदललाच आहे; पण ते सारखे बक्कन्‌ आतही जात आहे; त्यामुळं आता माझ्या पोटाच्या पोत्यात काहीतरी भरावंच लागेल. नाहीतर...’’
यानंतर आईकडं पाहत सगळेच पोटावरून हात फिरवत म्हणाले ः ‘‘नाहीतर... नाहीतर... आम्हा सगळ्यांच्याच बीन खुर्च्या होतील हो... बीन खुर्च्या होतील...’’
‘‘तुमच्या बीन खुर्च्यांच्या पोत्यात भरण्यासाठी ढीगभर ढोकळा तयारच आहे.’’
असं आईनं म्हणताच सगळ्या बीन खुर्च्यांना हात फुटले आणि त्या दोन पायांवर उभ्या राहिल्या!

--------------------------------------------------------------------
पालकांसाठी गृहपाठ :

  •   फक्त मुलांना बोलतं करण्यासाठी नव्हे, तर त्यांची स्मरणशक्ती आणि निरीक्षणशक्ती तीव्र करण्यासाठी हा खेळ आहे. म्हणून तुम्ही मौनात राहून आवश्‍यक वाटल्यास खुणेनं क्‍लू द्या. हे मुलांना अधिक प्रोत्साहित करेल.
  •   खुर्चीप्रमाणेच पंखा, टेबल, घड्याळ, पुस्तक, वही, लेखणी किंवा पर्स अशा अनेकानेक गोष्टींचा उपयोग ‘भेंड्यांसाठी’ सहजी करता येईल; पण यासाठी तुम्ही पूर्वतयारी करा. कारण, खेळताना आपले पालक जर ‘तुल्यबळ’ असतील, तरच मुलांना कडकडीत आनंद होतो.
  •   ‘पूर्वतयारी न केलेले पालक मुलांना भुसभुशीत वाटतात,’ ही चिनी म्हण लक्षात ठेवा!

--------------------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com