टटाचु (राजीव तांबे)

राजीव तांबे me@rajivtambe.com
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

शंतनू म्हणाला : ‘‘आता या खेळात आणखी एक बदल करू या. मी तुम्हाला एक मस्त आयडिया दाखवतो. एकदम शंभरनंबरी आयडिया.’’ शंतनू उभा राहिला. आता सगळे त्याच्याकडं पाहू लागले. त्यानं सावकाश एक हात वर केला आणि डोक्‍यावर हलकेच एक टपली मारली. मग दोन टाळ्या वाजवल्या. नंतर तीन चुटक्‍या वाजवल्या आणि सगळ्यांकडं पाहत त्यानं विचारलं : ‘‘सांगा बरं, ही संख्या किती?’’ 

शंतनू म्हणाला : ‘‘आता या खेळात आणखी एक बदल करू या. मी तुम्हाला एक मस्त आयडिया दाखवतो. एकदम शंभरनंबरी आयडिया.’’ शंतनू उभा राहिला. आता सगळे त्याच्याकडं पाहू लागले. त्यानं सावकाश एक हात वर केला आणि डोक्‍यावर हलकेच एक टपली मारली. मग दोन टाळ्या वाजवल्या. नंतर तीन चुटक्‍या वाजवल्या आणि सगळ्यांकडं पाहत त्यानं विचारलं : ‘‘सांगा बरं, ही संख्या किती?’’ 

आ  ज सगळी गॅंग शंतनूच्या घरी जमणार होती. बाबांची आवराआवर सुरू असतानाचा वेदांगी, पार्थ, पालवी आणि नेहा झमझूम ओरडतच आले.
किंचित त्रासिक आवाजात बाबा म्हणाले : ‘‘अरे, किती ओरडताय?’’ त्याबरोबर पार्थ टाळ्या वाजवू लागला. उड्या मारत जोरजोरात टाळ्या वाजवू लागला. त्याला थांबवत आई म्हणाली : ‘‘अरे पार्थू, आज आपण टाळ्या वाजवायचाच खेळ खेळणार आहोत. थोड्या टाळ्या आपल्या खेळासाठीपण शिल्लक ठेव!’’
‘‘ऑ ! टाळ्या वाजवून कसं खेळता येईल? अगं आई, खेळणारे खेळतात तेव्हा बघणारे टाळ्या वाजवतात; पण जर खेळणारेच टाळ्या वाजवत बसले, तर मग काय बघणाऱ्यांनीच खेळायचं की काय?’’ ‘‘व्वा...व्वा ! पार्थचे प्रश्‍न म्हणजे अगदी शंभरनंबरी असतात हं...पण पार्थ, गंमत म्हणजे आज खेळणारेपण टाळ्या वाजवणार आणि बघणारेपण टाळ्या वाजवणार आणि तेही ‘शंभरनंबरी’ टाळ्या वाजवणार बरं.’’
‘‘फक्त टाळ्याच वाजवणार की आणखीही काही वाजवणार?’’
‘‘म्हणजे...?’’
‘‘अगं, म्हणजे तबला, पेटी, तंबोरापण वाजवणार का?’’
आता मात्र सगळेच खॉ खॉ हसू लागले.
बाबा म्हणाले : ‘‘मला सांग पार्थ, तुला जशा दोन हातांनी टाळ्या वाजवता येतात, तसं तुला एका हातानं काय वाजवता येतं?’’
पार्थ विचार करत होता तोपर्यंत उजव्या हातानं चुटक्‍या वाजवत नेहा म्हणाली ः ‘‘मला येते... मला येते चुटकी वाजवता.’’
‘‘अगं नेहा, हाच तर खेळ आहे...’’आईचं बोलणं थांबवत पार्थ म्हणाला : ‘‘अगं, पण मला सांग, चुटकी वाजवायला अंगठ्यासोबत पहिलं बोट घ्यायचं की दुसरं? कारण, माझी चुटकीच जर वाजली नाही तर मला खेळताच येणार नाही ना!’’
पार्थला समजावत आई म्हणाली : ‘‘असं नाही पार्थ, तुला चुटकीच काय; पण टाळी जरी वाजवता आली नाही, तरी हा खेळ खेळता येईल हो.’’
‘‘आधी तो खेळ काय आहे ते तर सांग...’’
‘‘समजा, मी एक टाळी वाजवली, तर त्याचा अर्थ १० म्हणजे एक दशक.’’
‘‘म्हणजे?’’
‘‘म्हणजे, १० बोटं एकत्र येऊन एक टाळी वाजते म्हणून एका टाळीची किंमत १० म्हणजेच एक दशक.’’
‘‘हां. आता कळलं.’’
‘‘आणि समजा, मी एक चुटकी वाजवली तर तिची किंमत एक म्हणजेच एक एकक. मी एकाच हातानं चुटकी वाजवतो म्हणून त्याची किंमत एक,’’ असं म्हणत बाबांनी तीन टाळ्या आणि दोन चुटक्‍या वाजवल्या आणि म्हणाले : ‘‘...तर ही संख्या किती?’’
पार्थ जोरात ओरडला : ‘‘तीन... तीन...’’
पालवी म्हणाली : ‘‘३२’’ आणि बाबा म्हणाले ः ‘‘शाबास.’’ शंतनू म्हणाला ः ‘‘तीन टाळ्या म्हणजे ३० आणि दोन चुटक्‍या म्हणजे दोन. हे दोन्ही मिळून ३२. एकदम सही.’’
पार्थ कुरकुरला : ‘‘आत्ता मला थोडंसं कळलं.’’
‘‘चला, आता हा खेळ गटात खेळू या. एका गटानं संख्या सांकेतिक भाषेत सांगायची आणि दुसऱ्या गटानं ती ओळखायची.
‘‘आधी मी सांगणार,’’ असं म्हणत वेदांगीनं सात टाळ्या आणि दोन चुटक्‍या वाजवल्या.
एक क्षण शांतता पसरली आणि नेहा म्हणाली : ‘‘७२’’
आई म्हणाली : ‘‘शाबास.’’
मग सगळ्यांनी वेगवेगळ्या भरपूर संख्या ओळखल्या. टाळ्या आणि चुटक्‍यांचा नुसता कलकलाट सुरू होता; पण खरं म्हणजे ‘गणिताचाच कल्ला’ सुरू होता.
बाबा म्हणाले : ‘‘आता खेळात थोडा बदल करू. आता खेळ खेळताना कुणीच बोलायचं नाही...’’
‘‘ऑ... बोलायचं नाही? मग काय घशातल्या घशात फक्त गुर्रगुर्र करायचं?’’
‘‘अरे पार्थ, माझं बोलणं पूर्ण तरी होऊ दे. मग तुझे प्रश्‍न विचार रे. तर आता नेहा, पार्थ, पालवी आणि आई एका गटात. मी, शंतनू आणि वेदांगी एका गटात. तुमच्या गटातल्या दोघांनी आपल्या सांकेतिक भाषेत एकेक संख्या सांगायची. आम्ही त्यांची बेरीज करू आणि उत्तरही आपल्या सांकेतिक भाषेतच देऊ. सगळ्यांना कळलंय?’’ हे ऐकताच सगळ्यांनी कटाकटा माना डोलावल्या.
पालवी ऐटीत उभी राहिली आणि तिनं दोन टाळ्या आणि तीन चुटक्‍या वाजवल्या. लगेचच नेहा उभी राहिली आणि तिनं तीन टाळ्या आणि पाच चुटक्‍या वाजवल्या.
बाबांनी वेदांगीला खूण केली. वेदांगीनं पाच टाळ्या आणि आठ चुटक्‍या वाजवल्या. मग बाबांनी वेदांगीच्या आणि शंतनूच्या कानात काहीतरी सांगितलं. दोघांनी माना डोलावल्या. वेदांगी उभी राहिली आणि तिनं दोन टाळ्या आणि सात चुटक्‍या वाजवल्या. मग शंतनूनं उभं राहून दोन टाळ्या आणि पाच चुटक्‍या वाजवल्या.
पालवी आणि नेहा मनातल्या मनात आकडेमोड करू लागल्या आणि नेहानं पटकन हात वर केला. नेहा उभी राहिली. शांतता पसरली.  आता नेहा काय करते, इकडं दुसरा गट लक्ष देऊन पाहू लागला.
नेहानं सगळ्यांकडं सावकाश पाहत पाच टाळ्या आणि दोन चुटक्‍या वाजवल्या आणि सगळेच ओरडले : ‘‘भले शाबास.’’
मग प्रत्येक गटानं न बोलता अशा आठ आठ बेरजा केल्या.
शंतनू म्हणाला : ‘‘आता या खेळात आणखी एक बदल करू या. मी तुम्हाला एक मस्त आयडिया दाखवतो. एकदम शंभरनंबरी आयडिया.’’
शंतनू उभा राहिला. आता सगळे त्याच्याकडं पाहू लागलं. त्यानं सावकाश एक हात वर केला आणि डोक्‍यावर हलकेच एक टपली मारली. मग दोन टाळ्या वाजवल्या. नंतर तीन चुटक्‍या वाजवल्या आणि सगळ्यांकडं पाहत त्यानं विचारलं :‘‘सांगा बरं, ही संख्या किती?’’ 
एकदम शांतता पसरली. सगळ्या मुलांचे चेहरे प्रश्‍नार्थक झाले. बाबा विचार करत होते. बहुधा आईला कळलं असावं, असं वाटत होतं. शंतनूनं आईला ‘बोलू नकोस’ अशी खूण केली. शंतनू एका जागीच नाचत म्हणाला : ‘‘सांगा...सांगा. लवकर सांगा. मी तुम्हाला एक क्‍लूपण दिलाय. तुम्हाला तोही समजला नसेल, तर मात्र तुम्ही सगळे हरले. लवकर...लवकर. बी फास्ट...’’
पालवी भीत भीत उभी राहिली. पुन्हा एकदा शांतता पसरली. ‘बोलावं की बोलू नये’ हे तिला कळत नव्हतं. कारण, चुकलं तर शंतनू चिडवून हैराण करणार; पण बाबांनी डोळ्यांनीच खूण केली : ‘बोल. काही काळजी करू नकोस.’
पालवी म्हणाली : ‘‘तुझी संख्या आहे १२३’’
दोन्ही हात उंचावत शंतनू आनंदानं ओरडला : ‘‘एकदम सही पालवी. एकदम सही. कसं काय ओळखलंस तू?’’
‘‘तूच म्हणाला होतास ना की, ‘ही ‘शंभर’नंबरी आयडिया आहे,’ तेव्हा मला नाही कळलं; पण जेव्हा ‘क्‍लू’चा विषय निघाला, तेव्हा असं वाटलं की ‘डोक्‍यावर एक टपली मारली की १०० म्हणजे एक शतक, असं असणार.’’ हे पालवीचं बोलणं पूर्ण होण्याआधीच पार्थ टुणकन उडी मारून उठला आणि म्हणाला :‘‘आत्ता कळलं मला. आता मीच सांगतो एक संख्या.’’ पार्थनं दोन टपल्या मारल्या आणि आठ चुटक्‍या वाजवल्या. वेदांगी त्याला हळूच म्हणाली : ‘‘पार्थू, टाळ्या का नाही वाजवल्यास?’’ पार्थनं वेदांगीकडं पाहत डोळे मोठे केले आणि वेदांगी गप्प बसली.
‘‘सांगा, सांगा, लवकर सांगा. नाहीतर ‘आम्ही हरलो’ असं तरी म्हणा...’’ पार्थ उड्या मारत ओरडू लागला.
वेदांगी पटकन उभी राहत म्हणाली : ‘‘तुमची संख्या आहे २०८’’ 
हाताच्या मुठी वळून दोन्ही हात उंचावत पार्थ म्हणाला : ‘‘शाबास, भले शाबास. मी टाळी वाजवलीच नाही; कारण दशकच नाही ना? म्हणजे शून्यच की !’’
‘‘आता तर दोनअंकीच नव्हे, तर तीनअंकी संख्यापण आपण ओळखू शकतो आपल्या ‘टटाचु’ खेळानं...’’ शंतनूचं बोलणं पूर्ण होण्याआधीच सगळे किंचाळले :‘‘का...य? ट...टा...चु...? हे काय विचित्र? असली का कधी नावं असतात?’’
‘‘अरे, ‘टटाचु’ म्हणजे ‘टपल्या-टाळ्या-चुटक्‍या’. कळलं का?’’ हे ऐकताच सगळ्यांनी आनंदानं एकमेकांना टपल्या मारल्या आणि एकमेकांकडून टाळ्या घेत चुटक्‍यांचा चुटचुटाट केला.
आई म्हणाली : ‘‘हाच ‘टटाचु’ खेळ आणखी किमान १० प्रकारे तरी खेळता येतोच आणि दरवेळी काही ‘टटाचु’च वापरायला नको तर...’’
आईला थांबवत शंतनू म्हणाला : ‘‘अगं आये, आता खूप वेळ झालाय. आता आमच्या पोटात ‘टाचू टाचू’  वाजू लागल्या आहेत. आपण पुढच्या वेळी...’’
आई चार टाळ्या आणि तीन चुटक्‍या वाजवत म्हणाली : ‘‘इतक्‍या इडल्या तयार आहेत. चला...’’

पालकांसाठी गृहपाठ
  काही लहान मुलांना चुटकी वाजवता येत नाही. अशा वेळी त्यांनी फक्त अंगठ्याला पहिलं बोट लावून सोडलं, तरी तो एक एकक झाला, असं समजावं.
  मुलांच्या आधी तुम्हाला उत्तर सुचलं तरी शांत राहा. उगाचच ‘मी सांगतो... मी सांगतो’ असं करू नका.
  उत्तर कितीही सोपं असलं, तरी बरोबर उत्तर देणाऱ्या मुलाचं कौतुक करा.
  ‘मुलांच्या चांगल्या कामाचं कौतुक करणारे चांगले पालक फारच दुर्मिळ असतात,’ ही चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल!

Web Title: Rajiv tambes article saptarang

टॅग्स