खाऊ-कार्ड (राजीव तांबे)

खाऊ-कार्ड (राजीव तांबे)

सात मिनिटं मुलं मन लावून मेनूकार्ड वाचत होती. आज त्यांनी प्रथमच पहिल्यापासून शेवटपर्यंत मेनूकार्ड वाचलं होतं. ‘‘कमालच आहे ! इथं १५८ पदार्थ मिळतात, हे मला माहीतच नव्हतं...’’ वेदांगी हे सांगत असतानाचा तिला थांबवत शंतनू म्हणाला ः ‘‘काहीतरीच काय? १६८ नव्हे तर १८९ पदार्थ मिळतात. ती मधली दोन पानं चिकटलेली असतील म्हणून तू मोजली नसशील.’’

आजचा रविवार म्हणजे मोठ्याच योगायोगांचा दिवस. म्हणजे आज नेहाच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस होता...शंतनूच्या आईचा वाढदिवस...आणि वेदांगीच्या बाबांचाही वाढदिवस. मग आज बाहेरच जेवायला जायचं, असं सगळ्यांनी ठरवलं.
‘बाहेरच जेवायचं आणि बाहेरच खेळायचं’ असं समजताच मुलं तर आनंदानं उसळू लागली.

हॉटेलात गेल्यावर टेबलाला टेबलं जोडून एक लंबेलांब टेबल तयार करण्यात आलं. मग सगळे बसले समोरासमोर. नेहाची आई मुलांना म्हणाली ः ‘‘काय खाणार?’’
डोळे मोठे करून भुवया उंचावत मुलं म्हणाली ः ‘‘काय खाऊ?’’ इतक्‍यात वेटरनं मेनूकार्डचा गठ्ठाच आणला. सगळ्या पाचही मुलांना एकेक मेनूकार्ड आणि मोठ्या माणसांना मिळून फक्त दोन.
हातात मेनूकार्ड पडताच, ‘आता काय काय खायचं?’ यासाठी शोधाशोध सुरू झाली. आता ‘हे खाऊ की ते खाऊ?’ असं मुलांना वाटत असतानाच नेहाची आई म्हणाली ः ‘‘थांबा! आजचा खेळ इथूनच सुरू होत आहे.’’

वेदांगी किरकिरली ः ‘‘म्हणजे? आम्ही काही खायचंच नाही वाटतं?’’ ‘‘ही चायनीज नावं वाचून माझी जीभ तर अशी खवळलीय ना...की आत्ता म्हणजे आत्ताच खायला हवं...’’ जिभल्या चाटत शंतनू म्हणाला.
‘‘अरे, ज्याला जे पाहिजे ते खायला तर मिळणारच आहे. आपण खात खात खेळू या आणि खेळत खेळत खाऊ या, का ऽऽ य?’’ असं आईनं म्हणताच सगळ्यांचे चेहरे फुलले.
‘‘आज आपल्याला कमीत कमी १० खेळ तरी खेळायचे आहेत...’’
आईचं बोलणं पूर्ण होण्याआधीच पार्थ कुरकुरला ः ‘‘पण म...१०-१० खेळ खेळतच बसलो तर मग खायचं कधी?’’
इतक्‍यात वेटरनं मुलांच्या समोर गरमागरम ‘हराभरा कबाब’ आणून ठेवले. मुलं आता त्यावर आक्रमण करणार होतेच, तेवढ्यात आई म्हणाली ः ‘‘हे हराभरा कबाब खास आपल्यासाठी तयार केलेले आहेत. ते लक्ष देऊन खा..’’
एक कबाब तोंडात कोंबत आणि हाय-हुई करत पार्थनं विचारलं ः ‘‘म्हणजे? खाताना कसं लक्ष देणार? ते तर तोंडात असणार ना?’’
हे ऐकताच बाबांना असा काही ठसका लागला की सगळेच हसू लागले.
आईही हसतच म्हणाली ः ‘‘अरे, हे कबाब खाल्ल्यानंतर मी तुम्हाला फक्त दोनच प्रश्‍न विचार आहे बरं.’’

वेदांगी आणि शंतनूनं कबाब गरम असल्यानं त्याचे तीन तुकडे केले आणि आतली वाफ बाहेर जाऊ दिली. पालवीनंही तीन तुकडे केले; पण ती आतला हिरवेपणा निरखून पाहत होती. नेहा मात्र शांत बसून कबाब थंड होण्याची वाट पाहत होती.
‘‘आता सांगा बरं, या हराभरा कबाबमध्ये काय काय हिरवं आहे आणि काय हिरवं नाही? हे तळलेले आहेत की तंदूरमधून शेकून काढलेले आहेत? तुम्ही जर चवीनं खाल्लं असेल तर तुम्हाला लगेचच सांगता येईल.’’
मुलं भराभरा बोलू लागली.
‘‘अं...यामध्ये पालक, कोथिंबीर, कोबी या हिरव्या गोष्टी असणार.’’
‘‘शेंगदाण्याचं कूट असणार.’’
‘‘आलं, लसूण आणि जिरेसुद्धा होते.’’
‘‘आणि तिखट-मीठ.’’
‘‘एक महत्त्वाचा पदार्थ राहतो आहे. त्या पदार्थाची चव तुम्हाला जिभेच्या मधल्या भागाजवळ कळते, तर काही वेळा गिळताना त्याचा वास आणि झणझणीतपणा कळतो. हा पदार्थ करणाऱ्याला मी आज मुद्दामहूनच त्यात ‘ते’ घालायला सांगितलं होतं. ओळखा पाहू.’’
‘‘काहीतरी क्‍लू दे ना गं आई...’’
‘‘हा पदार्थ आपल्या ‘मिसळण्याच्या डब्या’त असतो. कुठल्याही पदार्थात घालण्यापूर्वी तो थोडा हातावर भरडून घ्यावा लागतो...’’
‘‘कळलं. ओवा... ओवा.’’
आपले तेलकट हात दाखवत नेहा म्हणाली ः ‘‘ये तो तंदूर का हैही नही.’’

‘‘आता आपण १२ मिनिटं एक खेळ खेळू या. तोपर्यंत तुमच्यासाठी दुसरा पदार्थ तयार होत आहे. आता तुम्ही मेनूकार्ड पहिल्यापासून शेवटपर्यंत नीट वाचा. अधिकाधिक पदार्थांची नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.’’
हे ऐकताच मुलांनी माना डोलावल्या.
‘‘मग मी तुम्हाला चौघांना चार वेगवेगळी कामं देणार आहे.’’
‘‘हे चौघं कोण?’’
‘‘अरे, वेदांगी आणि पार्थ यांचा एक गट. आणि बाकी तुम्ही तिघं. आता संपूर्ण मेनूकार्ड वाचण्यासाठी तुम्हाला मिळतील सात मिनिटं. सात मिनिटांनी मी तुमच्याकडून मेनूकार्ड परत घेईन.’’
‘‘आँ...? म...आम्हाला काय मिळेल?’’
‘‘तुम्हाला एक वही-पेन मिळेल. त्याचं काय करायचं ते सात मिनिटांनी कळेल. आप का समय शुरू होता है अब.’’
सात मिनिटं मुलं मन लावून मेनूकार्ड वाचत होती. आज त्यांनी प्रथमच पहिल्यापासून शेवटपर्यंत मेनूकार्ड वाचलं होतं.
‘‘कमालच आहे ! इथं १५८ पदार्थ मिळतात, हे मला माहीतच नव्हतं...’’ वेदांगी हे सांगत असतानाच तिला थांबवत शंतनू म्हणाला ः ‘‘काहीतरीच काय? १६८ नव्हे तर १८९ पदार्थ मिळतात. ती मधली दोन पानं चिकटलेली असतील म्हणून तू मोजली नसशील.’’
‘‘अय्या, खरंच की !’’

आईनं खूण करताच सगळ्यांनी मेनूकार्डं बंद केली.
चारही गट वही-पेन घेऊन बसले.
‘‘आता तुम्हाला मिळणार आहेत फक्त पाच मिनिटं. या मेनूकार्डमधली जास्तीत जास्त नावं या पाच मिनिटांत तुम्ही लिहायची आहेत. जो जास्त लिहील, त्याला एक बक्षीस मिळेल. करा सुरू...’’
मुलं धडाधड लिहू लागली. पहिली दोन मिनिटं लिहिण्याचा वेग सगळ्यांचा सारखाच होता. नंतर मात्र चुळबुळ वाढली. हे आठवतंय तर ते विसरतंय, असं काहीसं होऊ लागलं.
पाच मिनिटं संपताच आईनं खूण केली. वेदांगीनं ३९, नेहानं ४१, पालवीनं ३५, तर शंतनूनं सगळ्यात जास्त म्हणजे ४३ पदार्थांची नावं लिहिली होती.
शंतनू म्हणाला ः ‘‘मला बक्षीस आत्ताच्या आत्ताच पाहिजे.’’
इतक्‍यात वेटरनं सगळ्यांच्या पुढ्यात पनीर चिली ड्राय आणून ठेवलं. ते इतकं गरम होतं की पार्थला काही लगेच खाता येईना. पार्थ म्हणाला ः ‘हे जरा निवलं पाहिजे गं. तोपर्यंत काहीतरी खेळ सांग ना...’’

‘‘नक्की. आता तुम्ही सगळ्या पदार्थांची नावं वाचलीच आहेत. प्रत्येक पदार्थाखाली एका ओळीत त्या त्या पदार्थाची माहितीही दिलेली आहे आणि ज्या पदार्थांखाली त्याची माहिती नसेल, अशा पदार्थांसाठी तुम्ही आमची मदत घेऊ शकता...’’
‘‘अगं, पण आम्ही काय करायचं काय? नवीन पदार्थबिदार्थ तयार करायचे की काय?’’
‘‘आधी ऐका नीट. या वेळीही तुम्ही चार गटांत काम करणार आहात. प्रत्येक गटाला एक टास्क असणार. यासाठी तुम्हाला वेळ मिळणार आहे फक्त १० मिनिटं. नेहानं दुधाचे पदार्थ, शंतनूनं पनीर असणारे पदार्थ, वेदांगी आणि पार्थनं तांदूळ असणारे पदार्थ आणि पालवीनं तळलेले पदार्थ शोधायचे आहेत. समोरची डिश खात खात हे काम केलंत तरी चालेल. तुमचा वेळ सुरू झाला आहे...’’

शंतनूला पुन्हा बक्षीस मिळवायचं असल्यानं त्यानं मेनूकार्डमध्ये लगेचच डोकं खुपसलं. बाकीचेही कामाला लागले. खात खात शोधताना मजा येत होती. शोधताना काही वेळा मुलं मोठ्या माणसांची मदत घेत होती.
वेदांगीचे बाबा म्हणाले ः ‘‘आज प्रथमच मी मेनूकार्ड इतक्‍या बारकाईनं वाचतो आहे. इतके पदार्थ असतात हेही मला माहीत नव्हतं.’’
यावर शंतनूची आई म्हणाली ः ‘‘हे तर खरंच आहे; पण नुसतं पनीर वापरून इथं १८ पदार्थ तयार केले जातात, हे तर मला आजच कळलं. कमालच आहे! या नुसत्या मेनूकार्डपासून खूप शिकण्यासारखं आहे हं.’’

१० मिनिटांत मुलांच्या याद्या तयार झाल्या. मुलांनी एकमेकांच्या याद्या पाहिल्या आणि त्यांना धक्काच बसला. शंतनूनं पनीरचे पदार्थ लिहिले होते; पण त्यातले अनेक पदार्थ पालवीनं ‘तळलेले पदार्थ’ म्हणून लिहिले होते. कुठलाच पदार्थ नुसता नसतो, तर त्यावर झालेल्या क्रिया आणि प्रक्रियाही समजून घ्याव्या लागतात, हे मुलांना नव्यानंच कळत होतं आणि ‘हॉटेलमध्ये इतके पदार्थ कसे काय मिळू शकतात?’ याचं कोडंही उलगडू लागलं होतं. मुलांनी केलेल्या याद्या पाहताना सगळ्यांची उत्सुकतेनं आणि उत्साहानं बडबड वाढली. इतक्‍यात सुग्रास जेवण समोर आलं आणि एकदम शांतता पसरली. कारण, आता सगळ्यांचीच तोंडं बंद झाली होती. नेहाचे बाबा ढेकर देत म्हणाले ः ‘‘हा वाढदिवस माझ्या नेहमी लक्षात राहील. कारण, आज मला खूप नवीन कळलं आणि समजून घेऊन नव्यानंच मी खूप खाल्लं !’’
पार्थ म्हणाला ः ‘‘बाकीचे खेळ कधी खेळायचे?’’
पाणी पीत शंतनू म्हणाला ः ‘‘आत्ता नको. माझं पोट भरलंय. आपण पुन्हा हॉटेलात जाऊ तेव्हा...’’

-------------------------------------------------------------------------------------
पालकांसाठी गृहपाठ ः

  •   हा खेळ खेळण्यासाठी हॉटेलातच गेलं पाहिजे असं नाही. आपल्या घरातल्या पदार्थांची यादी करून हा खेळ घरातसुद्धा खेळता येईल. इथं आवश्‍यक आहे ती पालकांची कल्पकता.
  •   हॉटेलमध्ये गेल्यावर मुलांनी मेनूकार्ड पाहायला मागितल्यावर त्यांच्यावर खेकसू नका. ‘तुम्हाला काय कळतंय यातलं?’ असं तर मुलांना अजिबात म्हणू नका. (तुम्हालापण त्यातलं सगळं कळत नसतं, हे मुलांना कळलेलं असतं!)
  •   मुलांसोबत मेनूकार्ड वाचा. वाचता वाचता त्यातल्या पदार्थांचा कल्पकतेनं आस्वाद घ्या. मुलांशी गप्पा मारा.
  •   ‘कल्पक पालकांची मुलं ‘सुपर-कल्पक’ असतात, तर टिंब टिंब पालकांची मुलं फक्त कल्पक असतात’ ही चिनी म्हण लक्षात ठेवा!

-------------------------------------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com