खाण्याची आणि पाहण्याची चव (राजीव तांबे)

राजीव तांबे me@rajivtambe.com
रविवार, 16 एप्रिल 2017

गेल्या वर्षी मी ऑस्ट्रेलियाला माझ्या काकांकडं गेलो होतो. तिथं मी काही अद्भुत गोष्टी पाहिल्या. जशी आपल्याकडं संगीतात घराणी आहेत तशी तिथं चॉकलेटमध्ये आहेत! प्रत्येक चॉकलेट-घराण्याची व त्यांच्या कॅफेची खासियत भन्नाट वेगळी आहे.

गेल्या वर्षी मी ऑस्ट्रेलियाला माझ्या काकांकडं गेलो होतो. तिथं मी काही अद्भुत गोष्टी पाहिल्या. जशी आपल्याकडं संगीतात घराणी आहेत तशी तिथं चॉकलेटमध्ये आहेत! प्रत्येक चॉकलेट-घराण्याची व त्यांच्या कॅफेची खासियत भन्नाट वेगळी आहे.

आता परीक्षा संपल्यानं मुलं खुशमखूश होती. या वेळी सगळे जण अन्वयच्या घरी जमले. नेहामुळं अन्वय सगळ्यांच्या ओळखीचा होताच; पण आता तोही गॅंगमध्ये आला. अन्वयच्या घरी वेदांगी, पार्थ, नेहा, शंतनू आणि पालवी हे सगळे जमले. सुटी असल्यानं जमण्याची वेळ होती संध्याकाळची. घरात येताच शंतनूनं एकदम खोल श्वास घेतला आणि म्हणाला ः ‘‘हे काय? कुठलाच चमचमीत, चुरचुरीत किंवा मसालेदार सणसणीत वास येत नाहीए?’’
अन्वयची आई म्हणाली ः ‘‘येणारच नाही...’’
‘‘ऑ... म्हणजे? आज उपवास?’’
‘‘अरे, आज चमचमीत, चुरचुरीत आणि मसालेदार सणसणीत पण आहे; पण... त्याचा असा वास येणार नाही.’’
‘‘का? का वास येणार नाही?’’
‘‘कारण ते चटकदार आहे म्हणून. कळलं का आज काय आहे ते?’’
शंतनू डोकं खाजवत ‘चमचमीत, चुरचुरीत. चुरचुरीत सणसणीत. सणसणीत चमचमीत...’ असलं काहीसं गुणगुणू लागला. बाकीचे त्याच्या तोंडाकडं बघत होते.
तितक्‍यात न राहवून अन्वय म्हणाला ः ‘‘पांढरेशुभ्र कुरकुरीत कुरमुरे, पिवळीधमक चुरचुरीत शेव, मऊसर उकडलेला बटाटा, थोडंसं चटपटीत फरसाण, कडक कुरकुरीत पुऱ्यांचा कुस्करा, त्यात गोडूस खजूर आणि आंबट चिंच यांची आंबटगोड चटणी, लसूण आणि लाल मिरचीची चटणी, हिरव्या मिरच्यांचा खर्डा, त्यावर कुटलेल्या लवंगीच्या पाण्याचा हबका...हे सगळं एकत्र कालवून त्यावर लाल तिखट, कांदा, किसलेली कच्ची करकरीत कैरी, हिरवीगार कोथिंबीर आणि तळलेली, तिखट मसालेदार अशी चवीपुरती डाळ असलेली चटकदार भेळ आहे आज.’’

हे सगळं ऐकताच सगळे मिटक्‍या मारू लागले.
‘‘ओए, हा तर लई भारी बेत आहे. माझ्या तोंडाला पाणी सुटलं नाही, तर पाण्याच्या धारा लागल्या आहेत. आता आणखी कशाला वेळ, चला लगेचच खाऊ भेळ. मगच खेळू कुठलाही खेळ; पण आता फक्त भेळ आणि भेळ.’’
आता हे कोण बोललं, हे तुम्ही ओळखलं असेलच.
‘‘अरे, हाच आहे खेळ. तुम्ही खेळा खेळ. तोपर्यंत तयार होईल भेळ,’’ असं आईनं म्हणताच आवंढा गिळत शंतनू म्हणाला ः ‘‘ऊफ्‌... पण लवकर करा हो भेळ. नका लावू वेळ.’’
‘‘भेळ तयार होईपर्यंत आपण आपल्याला आवडणाऱ्या पदार्थांबद्दल बोलू या. बोलताना ते डोळ्यासमोर आणू या. आणि मग कल्पनेनंच खाऊ या. चला...पहिला पदार्थ कोण खाणार...?’’ अन्वयचं वाक्‍य पूर्ण होण्याआधीच वेदांगीनं हात वर केला.
‘‘म...मला आवडणारा पदार्थ जरा वेगळा आहे...’’
‘‘वेगळा म्हणजे? खायचाच पदार्थ आहे ना?’’
‘‘हो तर. मला चुलीवर केलेली आणि निखाऱ्यांवर फुगवलेली ज्वारीची लुसलुशीत भाकरी आवडते. भाकरीचे दोन पापुद्रे सुटले पाहिजेत. वरचा पातळ पापुद्रा उघडला की गरम वाफेचा भपकारा आला पाहिजे. मग आतल्या जाड भागावर नुकत्याच काढलेल्या ताज्या लोण्याचा गोळा पसरायचा. लोणीही विरघळवत सगळीकडं पसरायचं. हे करताना मध्येच बोटंही चाटायची. हा भाकरीचा पाया लोण्यानं दबदबला की त्यावर हलकेच मीठ आणि त्यावर नुकतीच खलबत्त्यात कुटलेली ताजी मिरी पसरायची. मग त्यावर मगाशी काढलेला तो पातळ पापुद्रा ठेवायचा. त्यावरही हलकेच लोण्याचा एक थर द्यायचा. त्यावर चवीपुरतं शेंदेलोण, काळं मीठ आणि उरलेलं मिरीकूट पसरायचं. ही झाली मस्त ‘बटर पेपर’ भाकरी.’’
‘‘व्वा, व्वा! यामध्ये आणखीही कॉबिनेशन्स करता येतील की...?’’
‘‘कोणती?’’
‘‘उन्हाळ्यात आई ताजं लोणचं करते. गरम भाकरीचा पापुद्रा उघडून तिथं लोणी न लावता ताज्या लोणच्याचा चमचमीत खार आणि फोडणीचं तेल यांचा गालिचा पसरत न्यायचा. मग वरचा पापुद्रा त्यावर ठेवायचा. यावर लोणच्यातल्या कैरीच्या ताज्या करकरीत फोडी बारीक करून पसरायच्या आणि मध्ये मात्र फोडणीच्या मिरचीचा खार गंधाचे पट्टे लावतात तसा लावायचा. आणि भाकरीची गुंडाळी करून, एक चावा मारायचा...’’
‘‘आणि...अहाहा...! भाकरीच्या स्वादात मुरलेला लोणच्याचा घट्ट खार आणि वर तरंगणारा फोडणीच्या मिरचीचा पातळ खार आणि दाताखाली येणाऱ्या मसालेदार कैरीच्या करकरीत फोडी यांचं तोंडात आगमन होताच डोळे बंद करून अंगातल्या ‘आनंदझिणझिण्या’ अनुभवताना बहार येईल.’’
‘‘हे ऐकताना तर आता माझ्या तोंडातून नळ सुटतो की काय, असं मला वाटू लागलंय! पण तरीही मला आणखी एक आयडिया सुचतेय. सांगू का?’’
‘‘विचारतेस काय? सांग लवकर.’’
‘‘आमच्याकडं गरम भाकरी खाण्याची पद्धत वेगळीच आहे.’’
‘‘ॲ? वेगळीच म्हणजे? तुम्ही भाकरी गरमच खाता की फ्रीजमध्ये ठेवून?’’
‘‘ए भंकस करू नका हं. मी सीरिअसली सांगत्येय.’’
‘‘तू सांग गं.’’
‘‘गरम भाकरीचा वरचा पापुद्रा काढायचा. मग खालच्या जाड भागावर लसणाची फोडणी दिलेलं तेल ओतून ते मुरवायचं. त्यावर मीठ आणि तिखट मसाला चोळायचा. त्यावर खलबत्त्यात कुटलेली शेंगदाण्याची चटणी पसरायची. बारीक चिरलेला कांदा आणि तिखट शेव चुरून त्यावर पसरायची. मग त्यावर तो पातळ पापुद्रा ठेवायचा. त्यावर फोडणीतलं उरलेलं तेल, तळलेल्या लसणाचा आणि तळलेल्या डबल मिरी पापडाचा चुरा पसरायचा. यावर काही पुदिन्याची पानं पसरून त्यावर चवीपुरतं काळं मीठ शिंपडायचं. मग त्याचा रोल करायचा...की झाली तयार मसाला भाकरी...’’
‘‘आता पुढं काही सांगूच नकोस. हे सगळं ऐकून ऐकून मला ते समोर दिसू लागलं आहे आणि खरं सांगायचं तर आता माझी जीभ खवळली आहे. आता...’’
‘‘अगं, आता तुझी खवळलेली जीभ शांत करण्यासाठी तूच एक पदार्थ सांग ना... ही आयडिया कशी आहे...?’’

‘‘आता तुम्ही सगळ्यांनी चमचमीत मसालेदार पदार्थ सांगितलेच आहेत; पण मी तुम्हाला एका अफलातून डेझर्ट पदार्थाची गोड गंमत सांगतो. एक अविश्वसनीय गरम गरम गोड गुळगुळीत गंमत’’ असं शंतनूनं म्हणताच सगळे त्याच्याकडं पाहू लागले.
‘‘तुम्हाला माहीतच आहे, की गेल्या वर्षी मी ऑस्ट्रेलियाला माझ्या काकांकडं गेलो होतो. तिथं मी काही अद्भुत गोष्टी पाहिल्या. जशी आपल्याकडं संगीतात घराणी आहेत तशी तिथं चॉकलेटमध्ये आहेत! जशी प्रत्येक संगीतघराण्याची शाळा वेगळी, त्यांच्या पद्धती आणि त्याचा लहजाही वेगळा. अगदी तसंच तिथं लिंड (स्वीस), बुलियन (बेल्जियम), सॅन-चिरो (स्पॅनिश) आणि मॅक्‍स ब्रीनर (इस्राइल) ही चॉकलेटची मुख्य घराणी आणि त्यांचे प्रत्येकाचे तिथं स्वतंत्र कॅफे आहेत. प्रत्येक चॉकलेट-घराण्याची व त्यांच्या कॅफेची खासियत भन्नाट वेगळी आहे. मला सांगताना आनंद होतो, की सगळ्या चॉकलेटी घराण्यांच्या चिजा मी घोळवून घोळवून चघळल्या, खाल्ल्या व प्यायल्या आहेत! मी काकाबरोबर कॅफेत खूप वेळा ‘चॉकलेट जेवून’ बाहेर पडलो आहे. यातली फक्त एकच गोष्ट आज सांगतो.
सिडनीला डार्लिंग हार्बर इथं नयनरम्य समुद्राच्या काठी लिंड आहेत. या कॅफेत जिकडं पाहावं तिकडं फक्त चॉकलेट आणि चॉकलेटच. लोक चॉकलेट खात असतात, चॉकलेट पीत असतात, चघळत असतात, चोखत असतात, चॉकलेटमध्ये काहीतरी बुडवत असतात किंवा बशीतलं चॉकलेट चक्क चाटत असतात. इतकंच काय, आपली चॉकलेटनं माखलेली बोटंही मोठ्या कौतुकानं चोखत असतात.
आणि यातलं काहीही न करणारे, आपल्या ऑर्डरची वाट पाहत अस्वस्थपणे उसासे सोडत, ओठावरून जीभ फिरवत उभे असतात.
या लिंड चॉकलेटच्या निरनिराळ्या अवस्थांमधल्या वेगवेगळ्या पदार्थांचे वास असे काही दरवळत असतात, की आपले पाय जमिनीवरून सुटले आहेत आणि या गोड, मधाळ, चॉकलेटी वासाबरोबर आपण या कॅफेत तरंगत आहोत, असं मला वाटू लागलं होतं.

या ठिकाणी चॉकलेट व चॉकलेटशी संबंधित अशा ४० गोष्टी मिळतात. यात व्हॅनिला आईस्क्रीमसोबत मिळणारा चॉकलेट लाव्हा केक अप्रतिम असतो. हा गरम चॉकलेट केक जेव्हा आपण हळुवारपणे कापतो, तेव्हा त्यातून गरमागरम लिंड चॉकलेटचा लाव्हा लुटूलुटू बाहेर येतो. अहाहा! वातावरणातला चॉकलेटचा मऊसर गोड गुळगुळीत वास आपल्याला वेढून टाकत असतो. त्याच वेळी उबदार लुसलुशीत चॉकलेट केक, गरम मधुर सुवासिक लिंड चॉकलेट व थंडगार क्रिस्पी आईस्क्रीम एकत्रितपणे खाता अतीव आनंदाच्या लहरी शरीरात सरसरत जिरत जातात. तिथंच कोपऱ्यात चॉकलेटचा एक छोटासा धबधबा आहे. बाजूलाच ठेवलेली काडी घ्यायची. त्या धबधब्यात सावकाश फिरवायची आणि अलगद बाहेर काढायची आणि मग त्या काडीवरच्या चॉकलेटच्या गालिच्यावरून हलेकच जीभ फिरवायची. अहाहा! बहुधा यालाच स्वर्गीय आनंद म्हणत असावेत.’’  
नेहा आणि अन्वय हात वर करत म्हणाले ः ‘‘आता बास म्हणजे बासच’’
पार्थ स्टाईलमध्ये म्हणाला ः ‘‘आता माझी सटकली...’’
एकदम सगळे ओरडले ः ‘‘भेळ...भेळ...भेळ...आता आणखी किती वेळ?’’
हातात भेळेचं पातेलं घेऊन अन्वयचे बाबा पळतच आले. पाठोपाठ चटण्यांची भांडी आणि बशा-चमचे घेऊन आई आली.
भेळेचा पहिला बकाणा भरताच शंतनूला जोरदार ठसका लागला. पाणी पिऊन शांत होत शंतनूनं विचारलं ः ‘‘आता खेळायचं कधी?’’
आई हसतच म्हणाली ः ‘‘अरे, तुम्हाला कळलंच नाही का, की एकाच खेळात तुम्ही तीन खेळ खेळलात ते?’’
‘‘कसं काय?’’
‘‘पहिला खेळ होता रेसिपीचा. तुम्ही किती नवीन रेसिपीज्‌ शोधल्यात आणि एकमेकांकडून ऐकल्यात.’’
‘‘दुसरा खेळ होता विशेषणांचा! हे तुमच्या लक्षात आलं का? चमचमीत, करकरीत, मधाळ, क्रिस्पी अशी सुमारे २० पेक्षा जास्त विशेषणं तुम्ही सहजी वापरलीत. हो की नाही?’’
‘‘आणि खेळाचा तिसरा भाग...’’
आईला थांबवत शंतनू म्हणाला ः ‘‘थांब मी सांगतो. मला खाण्याची आवड आहे हे तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे; पण चवीनं कसं खावं आणि ‘चवीनं कसं पाहावं’ हे मला आजच कळलं. कारण इतक्‍या बारकाईनं मी त्या पदार्थांकडं आणि त्यांच्या ‘चवीकडं’ पाहिलंच नव्हतं.’’
‘‘तिसरा भाग म्हणजे, आज आम्हाला नकळत पदार्थ ‘पाहण्याची चव’ कळली.’’
‘‘आणि मला सगळ्यात आधी चटकदार ‘पाहण्याची चव’ कळली. हो की नाही?’’
आता हे कोण बोललं असेल हे तुम्ही ओळखलंच असेल म्हणा.

पालकांसाठी गृहपाठ ः

  •   एखादी गोष्ट पाहताना तीमधले बारीकसारीक बारकावे कसे पाहावेत, याबाबत मुलांशी सहज गप्पा मारा.
  •   मुलांशी गप्पा मारताना तुमची ऐकण्याची क्षमता वाढवा. गप्पा मारणं म्हणजे उपदेश करणं, सल्ले देणं नव्हे, हे कायम लक्षात ठेवा.
  •   गप्पा मारताना किंवा आपल्या मनातले विचार आपल्याच शब्दात मांडताना जर मुलं चुकली, गडबडली तर त्यांच्यावर न खेकसता त्यांना सुधारण्याची संधी वारंवार द्या.
  •   कधी कधी मुलांशी ‘निरुद्देश गप्पांचा खेळ’ खेळा. यामुळं शब्दसंपत्ती वाढणं, तणावरहीत वातावरणामुळं मोकळ्या विचारांना वाव मिळणं शक्‍य होतं.
  •   एखाद्या दिवशी तर फक्त ‘विशेषणांचा खेळ’ही खेळता येईल.
  •   ‘कल्पक पालकांसाठी कुठलीच गोष्ट निरर्थक नसते’ ही चिनी म्हण नेहमीच लक्षात ठेवा!
Web Title: rajiv tambe's article in saptarang