टिंब टिंब सोडवासोडवी (राजीव तांबे)

राजीव तांबे me@rajivtambe.com
रविवार, 30 एप्रिल 2017

 

पालवी म्हणाली ः ‘‘तुम्ही गुड फ्रायडेची तारीख आणि वार शोधला आहे आणि एप्रिल महिन्यात किती दिवस असतात, हे तर तुम्हाला माहीतच आहे. म्हणजेच गुड फ्रायडे आणि एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस या दोहोंमध्ये ‘टिंब टिंब’ दिवसांचं अंतर आहे, तो दिवस म्हणजे ‘टिंब टिंब’ वार आहे.’’

 

 

पालवी म्हणाली ः ‘‘तुम्ही गुड फ्रायडेची तारीख आणि वार शोधला आहे आणि एप्रिल महिन्यात किती दिवस असतात, हे तर तुम्हाला माहीतच आहे. म्हणजेच गुड फ्रायडे आणि एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस या दोहोंमध्ये ‘टिंब टिंब’ दिवसांचं अंतर आहे, तो दिवस म्हणजे ‘टिंब टिंब’ वार आहे.’’

 

आज एप्रिल महिन्यातला शेवटचा रविवार असल्यानं नेहाच्या घरी मुलांचा धुमाकूळ चालला होता. आज सकाळी सकाळीच अन्वय, वेदांगी, पार्थ, शंतनू आणि पालवी असे सगळे जमले होते.
आज सगळ्यांनी मिळून नेहाचं घर आवरायचं, असं ठरलं होतं; पण नेहाचे कपड्याचे खण, पुस्तकांचं कपाट आणि अभ्यासाच्या वह्या, पुस्तकांचा पसारा आवरता आवरता या मुलांच्या नाकी नऊ आले. सगळे घामानं भिजले. केस अस्ताव्यस्त झाले आणि धुळीनं शिंका देऊन बेजार झाले. आता पुढच्या वेळी नीट प्लॅनिंग करूनच अशी कामं करायची, असं ठरवून सगळे पंख्याखाली आडवे पडले.

‘‘खूप काम झालं बाबा...’’ असं शंतनूनं म्हणताच बाबा म्हणाले ः ‘‘हो हो. तुम्ही तर अगदी वाघाची शिकार करून आल्यासारखे दमला आहात.’’
‘‘बाबा, मी खरंच शिकार करणार होतो; पण शिकार पळायला लागली आणि तिच्या दुप्पट वेगानं हे सगळे शिकारी सैरभैर पळू लागले. त्यामुळं शिकार हातची निसटली आणि कॉटखाली जाऊन लपली ना...’’
‘‘ओहो. म्हणून तो मगाशी आरडाओरडा आणि किंचाळणं सुरू होतं वाटतं? छोटासा वाघ आला होता का?’’
‘‘अहो, वाघ आला असता तर मी त्याला खांद्यावरच घेतला असता की; पण कपाटातून तुरतुरत आलं झुरळू आणि शिकारी लागले पळू पळू.’’
‘‘पळून पळून दमलेल्या शूर शिकाऱ्यांनो, जरा बाहेरच्या खोलीत या. गरमागरम पकोडे आणि कॅलेंडर-कोडे तुमची वाट पाहत आहे.’’
सगळे शिकारी बाहेरच्या खोलीत आले.
थोड्याच वेळात पकोडे संपले आणि कॅलेंडर-कोडं उरलं.
‘‘आज आपण कॅलेंडर-कोड्याचा खेळ खेळणार आहोत. भिंतीवर सगळ्यांना एप्रिलचं कॅलेंडर दिसत आहे. हे कॅलेंडर पाहून तुम्ही कोडं तर सोडवायचं आहेच; पण या एप्रिल महिन्यावर आधारित नवीन कोडीपण तयार करायची आहेत.’’
‘‘बाबा, तुम्ही बोललात ते काहीसुद्धा कळलं नाही.’’
‘‘कळेल. आपण दोन गट करू या. अन्वय, नेहा आणि पार्थ एका गटात. वेदांगी, पालवी आणि शंतून दुसऱ्या गटात. आता मी तुम्हाला दोन कोडी घालतो म्हणजे आपोआपच तुम्हाला कळेल की...’’

‘‘सांगा सांगा लवकर..’’ एक शिकारीण ओरडली.
‘‘आता मी सांगतो ते लिहून घ्या. मी जेव्हा ‘टिंब टिंब’ म्हणेन तेव्हा ती गाळलेली जागा तुम्ही शोधायची आहे.
असं समजा, की आज शनिवार, १ एप्रिल आहे. आजपासून तिसऱ्या दिवशी रामनवमी आहे. म्हणजेच रामनवी ‘टिंब टिंब’ वारी ‘टिंब टिंब’ तारखेला आहे.’’
‘‘पार्थ टुणकन उडी मारून उठला आणि म्हणाला ः ‘‘मला कळलंय. रामनवमी मंगळवारी ४ तारखेला आहे.’’
‘‘अं.. आम्ही न लिहून चालेल का? कारण लिहिताना खाली बघावं लागतं आणि उत्तर शोधण्यासाठी भिंतीवर पाहावं लागतं. आणि जे लिहीत नाहीत ते उड्या मारत उत्तरं सांगतात..’’
‘‘आलं लक्षात. चालेल न लिहून.’’
‘‘बाबा, आता सांगाच, हे उत्तर मीच ओळखणार.’’
‘‘तुम्हाला माहीतच आहे, की रामनवमी आणि हनुमानजयंती नेहमी एकाच वारी येतात. कारण या दोहोंमध्ये सात दिवसांचं अंतर आहे. म्हणजेच हनुमानजयंती ‘टिंब टिंब’ वारी ‘टिंब टिंब’ तारखेला आहे.’’
‘‘मी सांगतो...मी सांगते...नाही नाही, मीच’’ अशी गडबड सुरू झाल्यावर बाबा म्हणाले ः ‘‘आता उत्तर कुणीच सांगायचं नाही. आता एका गटानं प्रश्‍न विचारायचा आणि दुसऱ्या गटानं त्याचं उत्तर लिहायचं. पाहू या कोण जिंकतंय?’’
सगळेच म्हणाले ः ‘‘ओके बोके पक्के, काम शंभर टक्के.’’
अन्वयनं विचारलं ः ‘‘हनुमानजयंतीच्या दोन दिवस आधी महावीरजयंती आहे. हनुमानजयंतीची तारीख आणि वार तर आपण शोधलाच आहे. म्हणजेच महावीरजयंती ‘टिंब टिंब’ वारी ‘टिंब टिंब’ तारखेला आहे.’’

वेदांगीनं उत्तर लिहिलं.
पालवी म्हणाली ः ‘‘महावीरजयंतीच्या दोन दिवस आधी किंवा रामनवमीनंतर दोन दिवसांनी जागतिक आरोग्यदिन आहे. तेव्हा जागतिक आरोग्यदिन ‘टिंब टिंब’ वारी ‘टिंब टिंब’ तारखेला आहे, हे तुम्ही ओळखलं असेलच.’’
अन्वयनं उत्तर लिहिताच नेहा म्हणाली ः ‘‘जागतिक आरोग्यदिन आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरजयंती या एकाच वारी आहेत. कारण, या दोन्हींमध्ये फक्त सात दिवसांचं अंतर आहे आणि गंमत म्हणजे, त्याच दिवशी गुड फ्रायडेपण आहे. म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरजयंती ‘टिंब टिंब’ तारखेला ‘टिंब टिंब’ वारी आहे, हे तुम्हाला कळलंच आहे.’’

पालवीनं उत्तर लिहिलं आणि शंतनूनं विचारलं ः ‘‘गुड फ्रायडेनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारला ईस्टर संडे म्हणतात. म्हणजेच ईस्टर संडे ‘टिंब टिंब’ तारखेला आहे.’’
नेहानं उत्तर लिहिलं आणि पार्थनं विचारलं ः ‘‘साडेतीन मुहूर्तांपैकी एक ‘अर्धा मुहूर्त’ म्हणजे अक्षय्य तृतीया. ही अक्षय्य तृतीया या एप्रिल महिन्यात आहे. ज्या वारी जागतिक आरोग्यदिन आहे, त्याच वारी अक्षय्य तृतीया आहे; पण या दोघांमध्ये २१ दिवसांचं अंतर आहे. आता तुम्हाला अक्षय तृतीया कोणत्या वारी आहे, हे तर समजलंच आहे; तरीपण समजलं नसलं तर आणखी एक सोपा क्‍लू देतो. गुड फ्रायडे आणि अक्षय तृतीया या दोहोंमध्ये १४ दिवसांचं अंतर आहे. म्हणजेच अक्षय तृतीया ‘टिंब टिंब’ वारी ‘टिंब टिंब’ तारखेला आहे.’’

‘‘व्वा...फारच छान’’ असं म्हणत शंतनूनं चार वेळा कॅलेंडरकडं बघत उत्तर लिहिलं आणि वेदांगीनं विचारलं ः ‘‘जरासं मोठं कोडं तयार केलं आहे हं. या इंग्लिश महिन्यात दोन मराठी महिने लपलेले आहेत. हनुमानजयंती चैत्र पौर्णिमेला असते, हे तुम्हाला माहीतच आहे. हनुमानजयंती कधी आहे, हे तर आपण शोधून काढंलच आहे. चैत्र अमावास्या हा चैत्रातला शेवटचा दिवस. चैत्र पौर्णिमेनंतर बरोबर १५ दिवसांनी चैत्र अमावास्या येते. म्हणजेच चैत्र अमावास्या ‘टिंब टिंब’ तारखेला आहे. चैत्र महिना संपल्यानंतर वैशाख महिना सुरू होतो.

म्हणजेच वैशाख महिन्याची सुरवात ‘टिंब टिंब’ वारी ‘टिंब टिंब’ तारखेला होते.’’
अन्वय म्हणाला ः ‘‘लई भारी.’’ नेहानं विचारलं ः ‘‘एप्रिल महिन्यात छत्रपती शिवाजीमहाराज यांची पुण्यतिथी आणि महात्मा जोतीराव फुले यांची जयंती एकाच दिवशी आहे. आणि गंमत म्हणजे, त्याच दिवशी हनुमानजयंतीपण आहे. तुम्ही चैत्र पौर्णिमा आणि अक्षय तृतीया या दोहोंची तारीख आणि वार ओळखला आहे. म्हणजेच फुलेजयंती आणि अक्षय तृतीया या दोहोंमध्ये ‘टिंब टिंब’ दिवसांचं अंतर आहे.’’
वेदांगी बोटानं कॅलेंडरवरचे दिवस मोजत म्हणाली ः ‘‘एकदम फंडू का झंडू.’’
पालवी म्हणाली ः ‘‘तुम्ही गुड फ्रायडेची तारीख आणि वार शोधला आहे आणि एप्रिल महिन्यात किती दिवस असतात, हे तर तुम्हाला माहीतच आहे. म्हणजेच गुड फ्रायडे आणि एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस या दोहोंमध्ये ‘टिंब टिंब’ दिवसांचं अंतर आहे, तो दिवस म्हणजे ‘टिंब टिंब’ वार आहे.’’

हाताची बोटं मोजत पार्थ उत्तर लिहीत असतानाच बाबा म्हणाले ः ‘‘बस्स बस्स. आता शेवटचं एकच कोडं मी घालणार आहे आणि त्यासाठी हे भिंतीवरचं कॅलेंडर जमिनीवर ठेवावं लागणार आहे.’’ त्याक्षणी शंतनूनं उडी मारून कॅलेंडरचा ताबा घेतला. अन्वय आणि पार्थ कॅलेंडरवर झडप घालणारच होते, तेव्हा बाबा म्हणाले ः ‘‘तुमच्या गटासाठी वेगळं कॅलेंडर टेबलावर ठेवलं आहे.’’
आता कोडं ऐका ः २०१७ या वर्षातल्या फक्त ५ महिन्यांतच ५ रविवार येतात, तर बाकी ७ महिन्यात ४ रविवार येतात.
५ रविवार असणारे महिने ः एक ः जानेवारी
दोन ः ‘टिंब टिंब’
तीन ः ‘टिंब टिंब’
चार ः ‘टिंब टिंब’
पाच ः ‘टिंब टिंब’

आता एका मिनिटात ओळखा हे उरलेले चार महिने. आणि हो, हे चार महिने कॅलेंडरमधून ओढून काढू नका बरं.’’

कॅलेंडरची पानं फसाफस, खसाखस पुढं-मागं करताना महिन्यांची ओढाताण करताना बिचारे अनेक महिने खिळखिळे झाले, काही महिने जायबंदी झाले, तर काही जखमी आणि कागदबंबाळ झाले!
सगळ्या जणांनी ‘त्या ४ महिन्यांच्या’ नावांचा कल्ला सुरू केला, तेव्हा दोन्ही हात वर करत शंतनू म्हणाला ः ‘‘मी आणखी एक गोष्ट ओळखली आहे...आणखी एक गोष्ट...’’

हे ऐकताच सगळे एकदम गप्प झाले आणि भुवया उंचावत डोळे मोठे करून ऐकू लागले.
शंतनूनं उभं राहून ऐटीत विचारलं ः ‘‘जर चौथ्या महिन्यात ५ रविवार आले, तर ‘त्या पाचव्या रविवारी’ काय करतात ते माहीत आहे का तुम्हाला?’’
सगळे म्हणाले ः  ‘‘आँ...आँ...आँ...अँ...अँ...अँ...’’
‘‘तुला माहीत असेल तर सांग ना, कशाला भाव खातोस?’’
‘‘ऐका तर मग. जर चौथ्या महिन्यात ५ रविवार आले तर ‘त्या पाचव्या रविवारी’ मुलांना सकाळी घरी बोलावून चमचमीत आणि झणझणीत मिसळ-पाव देतात. मुलांना मिसळ तिखट लागली असेल, असं समजून त्यांना नंतर खायला आंबाबर्फी देतात. आणि मग मुलांनी शांत होण्यासाठी त्यांना थंडगार, सुमधुर असा मॅंगो मिल्कशेक देतात. हो किनई, आई?’’ मिसळीची तयारी करत असताना आईनं विचारलं ः ‘‘कमालच आहे तुझी. तुला कसं काय कळलं?’’
‘‘अगं, भिंतीवरचं कॅलेंडर पाहत असताना मी जरासं भिंतीतून आतपण डोकावून पाहिलं. चला...चला, आता सुरवात करू या. चांगल्या कामाला उशीर नको.’’
रसमशीत मिसळीचा घाईघाईत पहिला बकाणा भरून कुणाला ठसका लागला असेल, हे तर तुम्ही ओळखलंच असेल.


पालकांसाठी गृहपाठ ः

  •   खरं म्हणजे हा खेळ कुठल्याही महिन्यासाठी खेळता येईल. या खेळामुळं मुलं कॅलेंडर काळजीपूर्वक पाहायला तर शिकतातच; पण त्याच वेळी मराठी आणि इंग्लिश महिन्यांचा वेगळ्या प्रकारे शोध घ्यायलाही मुलांना शिकवा.
  •   इंग्लिश तारखेप्रमाणेच चतुर्थी, पंचमी, सप्तमी, पौर्णिमा, अमावास्या याप्रमाणेसुद्धा खेळाचं नियोजन करा.
  •   कॅलेंडरचा पुढचा भाग म्हणजे पंचांग. पंचांग कसं पाहतात, हे तुमच्या ओळखीत कुणाला माहीत असेल, तर त्याची मुलांना ओळख करून द्या.
  •   खेळ फक्त विशिष्ट महिन्यापुरता मर्यादित न ठेवता खेळासाठी संपूर्ण कॅलेंडरचा उपयोग करा. म्हणजे अधिक चुरस निर्माण होईल.
  •   वेगवेगळ्या धर्मांचे सण आणि उत्सव, इतकंच मर्यादित लक्ष्य ठेवूनही या खेळाची आखणी करता येईल.
  •   ‘कॅलेंडर म्हणजे वर्तमानात राहून भविष्यात डोकावणं’ या चिनी म्हणीचा अर्थ समजून घेऊन तुमच्या खेळांची आखणी करा!

 

Web Title: rajiv tambe's article in saptarang