रेल्वे जेव्हा मार्ग चुकते....

रेल्वे जेव्हा मार्ग चुकते....

झुक झुक झुक झुक आगीनगाडी.

धुरांच्या रेषा हवेत काढी... 

रस्ता सोडून भटकूया.

वेगळ्या वाटेने जावूया.. 

झुक झुक झुक आगीन गाडी..धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहू या..मामाच्या गावाला जावू या..लहानपणी ऐकलेलं गीत..गीत ऐकताच एका लयीन मामाच्या गावाकडे जाण्यासाठी हळूवारपणे जाणारी रेल्वे आणि पळती झाडे हे मनमोहक दृष्य सामोरे येतं..असाच काहीसा उत्साह दिल्लीहून घरच्या ओढीने येणाऱ्या दीड हजाराहून अधिक शेतकऱ्यांना होता. रेल्वेही मार्ग चुकू शकते ही कल्पना ही कोणाच्या स्वप्नात नव्हती. 

सकाळी जागे होवू पर्यत महाराष्ट्राच्या जवळ जावू या कल्पनेने आंदोलन करुन थकलेल्या चेहऱ्यांनी रेल्वेच्या धडधडीतही लवकरच विश्रांती घेणे पसंत केले. मात्र सकाळच्या गोंधळानेच जाग आलेल्या शेतकऱ्यांना नेमके काय झाले समजले नाही. रेल्वे वाट चुकून दुसरीकडे आली आहे. हे वाक्‍य जेवढे हास्यास्पद होते. तेवढं चिंताजनक ही. एकीकडे वेळ होत असल्याचा संताप. आणि आपण रात्रभर किती धोकादायक मार्गावरुन प्रवास केला याची चिंता. उसाला पाणी पाजताना पाट फुटल्यानंतर जसे पाणी कुठेही पळते. तशीच अवस्था रेल्वेची झालेली. रेल्वे सुटली खरी पण जायचे कुठल्या मार्गाने हेच चालकाला माहित नाही. आणि याच अवस्थेत सुसाट वेगाने रेल्वे धावते हे चित्रच घाम फोडणारे. 

स्थानकामागून स्थानके येत रहातात आणि कोणत्याही नियोजनाशिवाय हिरवा दिवा लागतो. आणि रेल्वे मार्गाक्रमण करीत रहाते. जर शेतकऱ्यांच्या लक्षात वेळीच ही गोष्ट आली नसती. तर पुढे काय घडले असते याची कल्पनाच केलेली बरी?..पण कुठे तरी पुण्य केल्यानेच पंधराशे शेतकरी बालंन बाल बचावले. परिस्थिती लक्षात आल्यानंतर नेहमीप्रमाणे निष्टूरपणे वागणाऱ्या रेल्वे प्रशासनाचा तोरा दिसलाच.

गिरे तो टांग उपर या उक्तीप्रमाणे इतकी मोठी चूक होवूनही तुम्हीच मार्ग चुकला आहात? तुम्ही इकडे कुठे आला आहात, असे अधिकाऱ्यांच्या विधानाला उत्तर काय द्यायचे हाच मोठा प्रश्‍न?..या अधिकाऱ्यांना कोल्हापूरी स्टाइलने शेतकऱ्यांनी रेल्वे काय आम्ही चालवत आणली अशा भाषेत उत्तर दिल्याने अधिकारी वरमले असले तरी इतक्‍या मोठ्या चुकीबाबत जरा सुद्धा दिलगिरी नसणे म्हणजे मुजोरपणाची हद्दच झाली. इतका मोठा घोळ होवूनही अधिकारी पातळीवर ही बाब गांभिर्याने घेतली गेली नाही. जो पर्यंत दुर्घटना घडत नाही, तो पर्यंत चलता है चलने दे अशी ही भावना शेतकऱ्यांना संतप्त नसती केली तर नवल होते. 

आंदोलनाचा अनुभव असलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार रेल्वे वरही उपसले. त्याच वेळी प्रशासनही जागे झाले. दोन तासाच्या नाट्यमय घडामोडीनंतर रेल्वे निघाली. तरीही ती कोणत्या मार्गाने जाणार आहे. किती वेळ थांबणार आहे. याची पुसटशी कल्पना ही शेतकऱ्यांना नव्हती. बातमीसाठी दिवसभरात मी दोन ते तीन वेळा शेतकऱ्यांना फोन केले. त्यांच्याशी संवाद साधताना कोल्हापूरपर्यंत सुखरुप पोचू दे इतकीच प्रार्थना शेतकऱ्यांची होती. वाट चुकलेल्या वासरासारखी शेतकऱ्यांची अवस्था होती. घरातून सातत्यान येणारे फोन, एक दोन तासाने मार्ग बरोबर आहे का याची खात्री करा, येणाऱ्या सुचना रेल्वे प्रशासनाच्या ढिम्मपणाची साक्ष देणाऱ्या होत्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com