संकटांवर जिद्दीनं मात करण्याची कहाणी

book review
book review

चित्रकार आई व उद्योगपती वडील यांच्या पोटी जन्मलेल्या एका सुशिक्षित, खानदानी, ऐश्‍वर्यसंपन्न मुलीची कथा जया जोग यांच्या "शून्य उत्तराची बेरीज' या पुस्तकात वाचायला मिळते. उराशी बाळगलेल्या प्रत्येक सुखस्वप्नांची राखरांगोळी होत असताना जिद्दीनं उभी राहून आशावाद आणि महत्त्वाकांक्षा यांच्या बळावर स्वत:ची नवी वाट निर्माण करणाऱ्या जयलक्ष्मी या धैर्यवान मुलीचं मनोज्ञ दर्शन या पुस्तकात होतं.

कथानकाची सुरवात टेनिसच्या एका अटीतटीनं चाललेल्या सामन्यानं होते. त्यातही अगदी शेवटचा पॉइंट. त्याच्यावर कोणाची हार, कोणाची जीत हे ठरणार असतं. कथानायिका जयलक्ष्मी हा सामना जिंकण्यासाठी सर्व शक्ती एकवटून पूर्ण एकाग्रतेनं सिद्ध झालेली असते. या क्षणाचाच विचार करून जसजशी गोष्ट उलगडत जाते, तसतसा हा कसोटीचा क्षण पुन:पुन्हा डोकावतो. टेनिस सामन्याच्या या शेवटच्या पॉइंटनं कथेची सुरवात होते आणि शेवटही या पॉइंटनंच होतो. मानसशास्त्र आणि टेनिस यात गती असलेली जयलक्ष्मी स्वत:ची ओळख निर्माण करते. संपूर्ण आयुष्य वादळमय असल्यानं तिच्यामधल्या जिद्दीचं दर्शन आपल्याला पुन्हा:पुन्हा होताना दिसतं. तिच्या वडिलांना अपघाताने आलेलं कुरूपपण, त्यांनी त्याबद्दल बाळगलेला न्यूनगंड आणि त्यावर सुंदर बायकोचा घडवलेला अपघात यामुळं जयलक्ष्मीला काहीसं पोरकेपण येतं. पुन्हा वडिलांना वाटलेला पश्‍चाताप आणि दुसरीकडं जिवलग मित्र आणि त्याच्या पत्नीच्या आधारानं जयलक्ष्मी, तिच्या वडिलांचं सावरलेपण पाहता आता "आलबेल' परिस्थिती वाटते, तोच पुन्हा घटस्फोट अशा अनेक अडचणींनी भरलेलं तिचं जीवन. त्यानंतर स्किझोफ्रेनिया रोग्यांसाठी काम करताना महत्त्वाचा रिसर्च वाचण्यासाठी परदेश दौरा करायचा असं ठरतं; पण तिथंही तिच्या तोंडचा घास काढून तिची मोठी फसवणूक होते. अशा वेळी पुन्हा टेनिसवर लक्ष केंद्रित करून ती नावाप्रमाणं "जयलक्ष्मी' आहे, हे सिद्ध करून दाखवण्याचा विचार करते. प्रत्येक वळणावर नवीन संकट उभं राहतं. त्यामुळं आयुष्याच्या बेरजेचं गणित मांडलं, तर ते शून्य उत्तर येतंय, तर ते एक नंतरच्या कुठल्यातरी अंकापुढंच लावणार हा निश्‍चय आणि त्यासाठीची दुर्दम्य जिद्द, महत्त्वाकांक्षा यांच्या जोरावर मिळालेलं फळ म्हणजे बेरजेचं उत्तरच होय.

टेनिस सामन्याच्या अटीतटीच्या निर्णायक क्षणाचं वर्णन, फ्लॅशबॅक तंत्रानं उलडणारी कथा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य. फ्लॅशबॅकमध्ये कुठंही जोडकाम वाटत नाही. कथानकाच्या अनुषंगानं हा क्षण सहजपणे वर तरंगत येतो आणि नंतर कथेचं बोट धरून फ्लॅशबॅक पुन्हा अलगदपणे सुरू होतो. जोग यांनी कादंबरी लिहिण्याचा केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. विषय मांडणी कुठंही न रेंगाळता प्रवाही मांडली गेली आहे. काही ठिकाणी विस्ताराला वाव असूनही थोडक्‍यात आणि नेमकेपणानं मांडल्यामुळं वाचक खिळून राहतो. लेखिकेनं याआधी संगीत आणि सतार यांच्याविषयी पुस्तकं लिहिली आहेत. मात्र, या पुस्तकात टेनिस आणि मानसशास्त्र याविषयीही असलेलं लेखितेचं ज्ञान अचंबित करून जाते. "मनोव्यापाराचा खेळ' हा मध्यवर्ती धागा पकडून समाजातल्या अनेक प्रातिनिधिक अनुभवांची जोड देऊन एकसंध झालेलं शब्दचित्रण म्हणजे "शून्य उत्तराची बेरीज.'

पुस्तकाचं नाव : शून्य उत्तराची बेरीज
लेखिका : जया जोग
प्रकाशन : उन्मेष प्रकाशन, पुणे (020-24336219)
पृष्ठं : 136, मूल्य : 150 रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com