हिंदू आणि ख्रिस्तींमधला साहित्यिक दुवा

कोकणीतले कथाकार- कादंबरीकार आणि चरित्रकार दामोदर मावझो याना २०२२ वर्षासाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कोकणी साहित्याच्या छोट्याशा विश्वांत हर्षोल्हासाची लाट पसरणे स्वाभाविक आहे.
karmelin book
karmelin booksakal

- राजू नायक saptrang@esakal.com

कोकणीतले कथाकार- कादंबरीकार आणि चरित्रकार दामोदर मावझो याना २०२२ वर्षासाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कोकणी साहित्याच्या छोट्याशा विश्वांत हर्षोल्हासाची लाट पसरणे स्वाभाविक आहे. कोकणी ही भाषाच नव्हे या दुराग्रहाशी झुंजतानाच कसदार साहित्यनिर्मितीचे आव्हान यशस्वीपणानं पेलणाऱ्या दुसऱ्या पिढीचे ते प्रतिनिधी आहेत. म्हणूनच त्यांचा पुरस्कार हा कोकणी सारस्वतांना आपलाच पुरस्कार वाटतो. आपली अर्धीअधिक लेखनशक्ती कोकणीची वकिली करण्यासाठी घालवलेले प्रखर गांधीवादी रवींद्र केळेकर यांना पंधरा वर्षांपूर्वी साहित्यविश्वातला हा मानाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला होता आणि अवघ्या कोकणी जगांत आनंदाचे भरते आले होते. आता मावझो यांच्यामुळे पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो आहे.

मावझो यांच्यातल्या लेखकाला कोकणी रक्तात मुरलेल्या समावेशकतेच्या तत्त्वाचे अहोरात्र भान असते. कोकणी भाषेच्या चळवळीला धर्मनिरपेक्षतेचा लोभस असा आयाम आहे आणि चळवळ भरात असताना तो जाणीवपूर्वक जपण्यात आला. ही प्रेरणा मावझो आपल्या साहित्यिक संचारात घेऊन वावरताहेत. दक्षिणायन या वैचारिक चळवळीला हल्लीच्या काळात मावझो यानी दिलेल्या योगदानाचे मोल अनन्यसाधारणाच म्हणावे लागेल. विशेषतः उजव्या वैचारिक अतिरेकाने उचल खाल्ल्यानंतर विवेकवादी विचारवंतांचे जे हत्यासत्र झाले, त्याच्या विरोधात बेडरपणे उभ्या राहिलेल्या साहित्यिकांत मावझो अग्रस्थानी राहिले आहेत. गणेश देवींसारख्या विवेकनिष्ठ सारस्वताच्या खांद्याला खांदा लावून कोकणीचा हा पुत्र वावरतो, याचा अभिमान अर्थातच गोव्यातील विचारविश्वाला आहे. साहित्य आणि राजकारण आज पृथक राहू शकत नाही. सध्या देशातील सत्तेवर मांड असलेल्यांच्या अनुनयाची नसली तरी त्याना एका अंतरावर ठेवून नमस्कार करण्याची प्रवृत्ती साहित्यविश्वात बोकाळते आहे. त्याना खडे बोल सुनावणारे अवघेच दिसताहेत. त्यात मावझो यांचा समावेश आहे. याचे मोल अर्थातच त्याना द्यावे लागलेय, यापुढेही द्यावे लागेल. पण ते आपल्या धारणांशी ठाम आहेत.

मावझो यांची साहित्यसंपदा विस्तृत म्हणण्यासारखी नाही. त्यानी मोजकेच लिहिले, पण त्या मोजक्याच्या निर्मितीमागे उत्कृष्ट साहित्यिक मूल्ये असतील याची खबरदारी घेतली. `कार्मेलिन’ ही त्यांची कादंबरी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार देऊन गेली. मावझो राहातात दक्षिण गोव्यांत, ख्रिस्तीबहुल वस्तींत. आखातात जावून सुबत्ता प्राप्त करण्याची स्वप्ने तिथला समाज आजही पाहातो. श्रम विकण्यासाठी जाणाऱ्या पुरुषांच्या जोडीनं महिलाही तेथे जात असतात आणि अनेकदां तिथल्या पुरुषप्रधान व्यवस्थेची शिकार बनत असतात. आखाती पैशांच्या चकचकाटांतही हे न्यून लपत नाही पण नाइलाजाने, मुर्दाडपणाने त्याचा स्वीकार करत मिरवणारी प्रवृत्तीही आहे. मावझोंची कार्मेलिन याच प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व करते. तिला धीटपणे चितारण्याचे मावझोंचे कसब मान्य करावेंच लागेल. त्यांच्या इतर कथा- कादंबऱ्यांत ख्रिस्ती समाजातले वास्तव अशीच तिखट झोंबरी अनुभूती देत येते. त्या समाजाच्या सामूहिक आणि कौटुंबिक मनोव्यापारातले पदर ते अलवारपणे उलगडतात. गोव्यातील कोकणी समाजाचे हिंदू आणि ख्रिस्ती असे दोन भाग मानले तर मावझो या दोन्हीना जोडणारा दुवा आहेत.

कार्मेलिन आली आणि कोकणी साहित्याने कूस पालटली असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही. मावझोंच्या या कादंबरीचा उल्लेख कोकणी साहित्याचा इतिहास लिहिताना मैलाचा दगड म्हणून केला जाईल. तिचे अनेक भारतीय भाषांतून झालेले अनुवाद तिच्या कथाबीजाचे वैश्विक अनुबंध दाखवतात. तीक्ष्ण निरीक्षणक्षमता आणि लयदार भाषा ही मावझो यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये. ओघवत्या शैलींत ते आपले कथानक उलगडतात. वर उल्लेख केल्याप्रमाणे धिटाई आहे पण बटबटीत अतिरेक नाही. गावरान जगाचे पदर तपासताना त्यांची लेखणी तोल सोडत नाही. वाचकाची विचारसमृद्धी अभिप्रेत असलेले हे लेखन. कोकणी साहित्याच्या दालनात नित्य नवी भर पडत असते पण काळाच्या कसोटीवर टिकून राहण्याची क्षमता असलेले लेखन विरळ होत चालले आहे. मोजकेच लिहिले तरी चालेल पण त्याचा स्तर उच्च असावा, असे व्रत घेऊन चालणारे दामोदर मावझो यांच्या साहित्याचा गौरव त्यांचा आदर्श मानणाऱ्यांच्या प्रेरणांना नवी ऊर्जा देईल, अशी आशा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com