जगणं कलेशी एकरूप झालं पाहिजे... (रमाकांत गायकवाड)

रमाकांत गायकवाड
रविवार, 23 सप्टेंबर 2018

गायनकलेबद्दल जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला वाटतं की कुठलीही कला "असरदार' होण्यासाठी, परिणामकारक होण्यासाठी त्या कलाकाराला स्वतःचं जीवन त्या कलेशी पूर्णपणे एकरूप करावं लागतं. जीवनातला प्रत्येक प्रसंग त्याला कलात्मकतेनं पाहता यायला हवा, तेव्हाच त्या कलेतली नित्यनूतनता आणि प्रभावीपण टिकून राहील.

गायनकलेबद्दल जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला वाटतं की कुठलीही कला "असरदार' होण्यासाठी, परिणामकारक होण्यासाठी त्या कलाकाराला स्वतःचं जीवन त्या कलेशी पूर्णपणे एकरूप करावं लागतं. जीवनातला प्रत्येक प्रसंग त्याला कलात्मकतेनं पाहता यायला हवा, तेव्हाच त्या कलेतली नित्यनूतनता आणि प्रभावीपण टिकून राहील.

असं म्हणतात की कला ही नैसर्गिक असते, ती शिकवून येत नाही तर ती अंगीच असावी लागते. कलेचं बाळकडू म्हणा वा गर्भसंस्कार म्हणा, मला माझ्या आई-बाबांकडूनच मिळाले. माझे वडील गायक सूर्यकांत गायकवाड आणि आई संगीता गायकवाड यांच्या संस्कारांत मला संगीत उमगलं...आणि तीच जमापुंजी माझ्या परीनं पुढं नेण्याची नजरही मिळाली...माझ्या बाबांचं गाण्याचं शिक्षण मारुतीराव दोंदेकर (उस्ताद रजबअली खॉं, उस्ताद बडे गुलाम अली खॉं आणि उस्ताद अमीर खॉं अशा मातब्बर गायकांचे दोंदेकर हे शागीर्द होते) यांच्याकडं झालं. दोंदेकर गुरुजींकडून बाबांना पतियाळा घराण्याचा स्वच्छ, खुला आवाज, सरगम, रागाची सौंदर्यपूर्ण बढत याचबरोबर किराणा घराण्याचा हळुवारपणा, रागाचा संथ विस्तार, बंदिशीच्या शब्दांची बोल-आलापी अशा अनेक गोष्टींचं मार्गदर्शन सलग बारा वर्षं मिळालं. माझ्या लहानपणची आठवण बाबा मला आवर्जून सांगतात. ती मला इथं सांगावीशी वाटते ः माझ्या बारशाचा कार्यक्रम होता. त्या वेळी गुरुजींच्या गाण्याची मैफल आम्ही आयोजिली होती. त्या वेळी ते आमच्या घरी आले असताना बाबांनी मला गुरुजींच्या हातावर अलगदपणे ठेवलं. त्याच वेळी स्वयंपाकघरातून भांड्याचा आवाज झाला आणि मी नेमका त्याच सुरात "सा' लावला. ते पाहून गुरुजी चमकले आणि आनंदानं म्हणालेः ""सूर्यकांत, अरे हा तर गवैया वाटतोय! हे पोरगं तुझं नाव काढेल बघ!'
थोडक्‍यात काय तर, संगीताची कास मी पाळण्यात असल्यापासूनच धरली होती.
मला लहानपणापासूनच बाबांचा सततचा रियाज बघणं-ऐकणं, मोठमोठ्या दिग्गज कलाकारांच्या रेकॉर्डस ऐकणं आणि आई-बाबांसोबत वेगवेगळ्या कलाकारांच्या संगीतकार्यक्रमांना जाणं हे नित्याचं होतं. त्यामुळं खूप कमी वयात, म्हणजे अगदी माझ्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच माझ्या "गायना'ला सुरवात झाली. बाबा स्टेजवर गायला सांगायचे, त्यामुळं "स्टेज फ्राइट' काय असतं हे मला ठाऊकच नव्हतं; पण त्या अजाणत्या वयातसुद्धा गाणं म्हणजे मनाला एक आनंद देणारी गोष्ट आहे, हे मला उमगलं होतं.

त्या वयात मी भजन, भावगीत, नाट्यगीत, गझल असे वेगवगळे प्रकार गायचो आणि दरम्यान बाबांनी मला राग "यमन'ची तालीम द्यायला सुरवात केली होती. नंतर पुढं आवाज फुटल्यानंतर बाबांनी माझ्या शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाकडं गांभीर्यानं लक्ष दिलं.
तिथून पुढची दहा वर्षं "यमन', "तोडी' आणि "बागेश्री' या रागांचा रियाज त्यांनी माझ्याकडून करवून घेतला. पहाटे अगदी साडेतीन-चार ते सकाळी आठ वाजेपर्यंत रियाज चालायचा. असा हा नऊ-दहा वर्षांचा माझा आणि रियाजाचा सिलसिला आजही सुरू आहे आणि असाच सुरू राहील...

गाण्याच्या संस्कारांमध्ये "ऐकणं' ही खूप मोठी प्रक्रिया आहे. प्रक्रिया अशासाठी की " सुननाही आधा सीखना है।' असं म्हणतात. तानसेन बनण्याआधी उत्तम प्रतीचा कानसेन असणं खूप महत्त्वाचं आहे. "गाणं कसं ऐकावं' हे बाबांनी मला आधी शिकवलं. उस्ताद अमीर खॉं यांची रागाची संथ; पण तितकीच गूढ बढत आणि रागाचा पुनःपुन्हा नव्यानं विचार कसा होऊ शकतो याकडं बाबांनी माझं लक्ष वेधलं. याशिवाय, उस्ताद बडे गुलाम अली खॉं आणि सलामत-नजाकत अली यांचं चैतन्यमयी, उत्स्फूर्त आणि प्रचंड तयारी असलेलं गाणं मला बाबांनी आधी नीट ऐकायला शिकवलं. मग त्यानुसार एकेका रागाला धरून बंदिश, आलाप, तान, सरगम यांचा त्या रागभावाशी असणारा संबंध आणि त्यांचं प्रत्यक्ष सादरीकरणात असणारं योग्य प्रमाण अशा सर्व विषयांवर तासन्‌तास चर्चा आणि रियाज चाले...अजूनही चालतो. शास्त्रीय संगीताबरोबरच पतियाळा घराण्याचं वैशिष्ट्य असणारी पंजाबी अंगाची ठुमरी, तसंच मेहदी हसन, हुसेन बक्ष, गुलाम अली आदी मोठमोठ्या गझलगायकांच्या गझलगायकीचा अभ्यासही करता आला. बाबा नेहमी स्वतः तबला साथीला घेऊन मला शिकवायचे, त्यामुळं लयही पक्की होत गेली. अशा प्रकारे मला बाबांकडून पतियाळा आणि किराणा या घराण्यांची तालीम मिळत गेली.

त्या वेळी शास्त्रीय संगीताच्या जवळपास सगळ्या स्पर्धांमध्ये मी भाग घेऊन आशीर्वाद आणि अनुभव मिळवत होतो. संगीतरसिक, परीक्षक आणि समवयस्क स्पर्धक कलाकार या सगळ्यांना माझं नाव हळूहळू परिचित होत होतं. कमी वेळेत आपलं गाणं रसिकांसमोर प्रभावीपणे कसं गाता येईल, परीक्षकांची नजर, माझ्या गाण्याबद्दलची रसिकांची अपेक्षा अशा अनेक गोष्टींचा या स्पर्धांमधून मी बारकाईनं अभ्यास केला. शालेय अभ्यासातली माझी उत्तम गती आणि गुण बघून मी विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचं ठरवलं. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्सला पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजात प्रवेश घेऊन चांगल्या गुणांनी पासही झालो.

सन 2003 मध्ये न्यूयॉर्कमधल्या "वेदिक हेरिटेज' आणि "पंडित जसराज स्कूल ऑफ म्युझिक' यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ख्यालगायन स्पर्धेत माझी संपूर्ण भारतातून निवड झाली आणि मला दिग्गज कलाकारांसोबत अमेरिकेचा दौरा करण्याची सुवर्णसंधी मिळाली. जसराजजी, आरती अंकलीकर-टिकेकर, उस्ताद शाहीद परवेझ, माधवी मुद्गल आणि विजय घाटे अशा सगळ्या कलाकारांसोबत मला तो अमेरिकादौरा करण्याचं भाग्य लाभलं. त्या वेळी जसराजजींनी मला खूप प्रोत्साहन दिलं, आशीर्वाद दिले, माझं कौतुक केलं. माझ्या आई-वडिलांना ते म्हणाले ः""आप के घर में हिरा पैदा हुआ है। इस लडके का गला रियाज मॉंगता है। डॉक्‍टर-इंजिनिअर कोई भी बन सकता है, पर एक कलाकार बनना ये बहोत बडी बात है। आप इस को खूब रियाज करवाईये। ये आगे जा के बडा गायक बनेगा।'
हा दौरा माझ्या आयुष्यातला "टर्निंग पॉईंट' ठरला अस मी म्हणेन. आता आपलं आयुष्य आपण शास्त्रीय संगीताच्या सेवेतच व्यतीत करायचं, असं मी त्यानंतर ठरवलं.

त्यानंतर मी डॉ. सतीश कौशिक यांच्याकडं अनेक वर्षं किराणा घराण्याची तालीम घेतली. बानूबाईंच्या किराणा घराण्याचं गाणं त्यांना पंडित सदाशिवबुवा जाधव यांकडून मिळालं, त्यातून किराणा घराणा गायकीची अनेक रूपं मला उलगडली. नवीन ढंगाच्या अनेक बंदिशी, अनमोल रागविचार मिळाला. त्यात भर, म्हणजे मला जगदीश प्रसादजी यांचंही खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालं. ते अधूनमधून पुण्यात यायचे, त्या वेळी मला त्यांना भेटता आलं. आवाजाची फेक, पतियाळा घराणं व त्याची नागमोडी वळणाची गायकी आणि अप्रतिम ठुमरीगायकी यांचा विस्तार याबाबतचा खूप सुंदर विचार मला त्यांच्याकडून मिळाला.
आता गेल्या वर्षापासून मी पंडित नयन घोष यांच्याकडं गाण्याचं मार्गदर्शन घेत आहे. गाताना लागणारी शारीरिक ठेवण, जुन्या उस्ताद आणि पंडित कलाकारांच्या दुर्मिळ बंदिशी आणि रागविचार यांबाबतचा अनमोल पारंपरिक ठेवा मला त्यांच्याकडून मिळत आहे.

गायनकलेबद्दल जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला वाटतं की कुठलीही कला "असरदार' होण्यासाठी, परिणामकारक होण्यासाठी त्या कलाकाराला स्वतःचं जीवन त्या कलेशी पूर्णपणे एकरूप करावं लागतं. जीवनातला प्रत्येक प्रसंग त्याला कलात्मकतेनं पाहता यायला हवा, तेव्हाच त्या कलेतली नित्यनूतनता आणि प्रभावीपण टिकून राहील. हा प्रवास न संपणारा; पण तितकाच आनंददायी आणि जीवन समृद्ध करणारा आहे. संगीताचा एक नम्र विद्यार्थी बनून ज्याला जितकं या कलेतून आत्मसात करता येईल तितकी ही कला त्याला पुढं नेईल. माझ्या मते संगीतकलेचं अंतिम ध्येय आहे ते म्हणजे शांती...शांतपणाचा अनुभव! कलेच्या सादरीकरणातून माणसाला आत्मानंदाची अनुभूती यायला हवी. यासाठी कलाकारानंही सखोल अध्ययन करणं आणि कलेवर, गुरूंवर, तसेच परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे.
संगीतरसिकांच्या प्रेमामुळं मला देशात, तसेच देशाबाहेरही अनेक महोत्सवांमध्ये माझी कला सादर करण्याची संधी मिळत असते, हे माझं भाग्यच!

पुण्यातल्या सवाई गंधर्व-भीमसेन संगीतमहोत्सवात, मुंबईतल्या महोत्सवांत, तसंच गोवा, दिल्ली, बंगाल, कर्नाटक आदी राज्यांतल्या संगीतमहोत्सवांत, तसंच भारताबाहेर वेदिक हेरिटेज न्यूयॉर्क संगीतमहोत्सवात व अमेरिकेतली इतर राज्यं, रूमानिया अशा अनेक ठिकाणी गाण्याची संधी मला मिळाली. याशिवाय, अनेक टीव्ही-वाहिन्या, रेडिओ याही माध्यमांतून मला माझी गानकला सादर करता आली.
असंख्य मान्यवरांचे आणि मोठ्या कलाकारांचे आशीर्वाद आणि पाठबळ मला वेळोवेळी मिळालं आहे. पुण्यात मला सवाई गंधर्व महोत्सवात सादरीकरणाची संधी मिळाली, तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. त्या वेळी माझ्या गाण्यानंतर मिळालेला "वन्स मोर...वन्स मोर' अजूनही कानात घुमतोय! त्या गाण्यानंतर मी संपूर्ण मांडवाला एक फेरी मारली आणि रसिकांचे आशीर्वाद घेतले.

या संगीतकलेमुळं माझ्या या आजवरच्या छोट्याशा संगीतप्रवासात अनेक माणसं जोडली गेली...त्यांचं प्रेमरूपी पाठबळ मिळालं आणि ते असंच मिळत राहण्यासाठी परमेश्वरानं माझ्याकडून संगीतसेवा करून घ्यावी आणि त्या कलेचा सगळ्यांना निस्सीम आनंद मिळावा हीच इच्छा...प्रार्थना!

Web Title: ramakant gaikwad write article in saptarang