बोर (रंजना कराळे)

ranjana karale
ranjana karale

छकुली निशाच्या कुशीत विसावली. मायेची ऊब मिळताच तिचा थकवा नाहीसा झाला. निशा तिला थोपटत होती. ती विचार करत होती ः "खुट्ट आवाजाला घाबरणारी, सरांनी रागावल्यावर डोळे गच्च मिटून घेणारी, साधा कुत्रा दिसल्यावर लगेच पळणारी माझी छकुली. कसं होणार बाई हिचं?' समोरच्या खिडकीकडून पलीकडच्या छोटेखानी बागेकडं ती पाहत होती. घराला अगदी खेटून असणारं पारिजातकाचं अन्‌ बोरीचं झाड. बोरीचं झाड मुद्दाम लावलेलं. छकुलीला बोरं आवडतात म्हणून आणि आणखीही काही मनाच्या कोपऱ्यात दडलेलं. विचारांचं मोरपीस अलगदपणे भूतकाळात घिरट्या घालू लागलं. बालपण, सुटीतलं आजोळपण काहीबाही...

छकुली धावतच फाटक लोटून घरात शिरली. धापा टाकत तिनं दप्तर खुर्चीत भिरकावलं अन्‌ सोफ्याच्या खुर्चीवर अंग टाकून दिलं. पोर घामानं थबथबलेली. आवाज ऐकून स्वयंपाकघरातून निशा हॉलमध्ये डोकावली.
"काय गं छकुली, काय हे बेटा?'' निशा पदराला हात पुसत तिच्याकडं पाहत म्हणाली.
"काही नाही गं आई, मला तू पाणी दे बघू आधी.'' निशानं तिला पाणी आणून दिलं अन्‌ तिच्याजवळ बसली. पाणी प्यायल्यावर छकुली थोडी शांत झाली. मग आईकडं बघत म्हणाली ः ""अगं, तो देशपांडे काकांचा कुत्रा आहे नं? ते अंगावर धावून आलं बघ माझ्या. मग सुटले धावत अन कशीबशी आले घरी.'' छकुली निशाच्या कुशीत विसावली. मायेची उब मिळताच तिचा थकवा नाहीसा झाला. निशा तिला थोपटत होती. ती विचार करत होती ः "खुट्ट आवाजाला घाबरणारी, सरांनी रागावल्यावर डोळे गच्च मिटून घेणारी, साधा कुत्रा दिसल्यावर लगेच पळणारी माझी छकुली. कसं होणार बाई हिचं?' समोरच्या खिडकीकडून पलीकडच्या छोटेखानी बागेकडं ती पाहत होती. घराला अगदी खेटून असणारं पारिजातकाचं अन्‌ बोरीचं झाड. बोरीचं झाड मुद्दाम लावलेलं. छकुलीला बोरं आवडतात म्हणून आणि आणखीही काही मनाच्या कोपऱ्यात दडलेलं. विचारांचं मोरपीस अलगदपणे भूतकाळात घिरट्या घालू लागलं. बालपण, सुटीतलं आजोळपण काहीबाही...
***

पेपर संपले अन्‌ मामाच्या गावी जाण्याचे वेध लागले. खेड नावाचं छोटंसं गाव छोट्या निशाला खुणवत होतं आणि तिचं मन अधीर होत होतं आजोळी जायला. मग बाबांनी रेल्वेत बसवून दिलं. ""नीट जा हं,'' म्हणत तेही नजरेआड झाले. फलाटावरची थांबलेली रेल्वे कधी सुरू होतेय आणि मी मामा-मामी, आजी-आजोबा अन्‌ शिरू, कुंदाजवळ पोचतेय असं निशाला होत होतं. आईनं भरलेली कापडी पिशवी सांभाळत ती खिडकीतून बाहेर पाहत होती. गाडी सुरू झाली अन्‌ मग "पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया,' असं गुणगुणताना खेड कधी आलं तिला कळलंच नाही. पिशवी घेऊन ती उतरली. एखाद्या नंदनवनात पाऊल ठेवल्यासारखं तिला वाटू लागलं. इकडंतिकडं बघत तिनं आपले दोन्ही हात पसरवले आणि लांब श्‍वास घेतला. जणू सारं आजोळ तिला कवेत घ्यायचं होतं. ती खुदकन्‌ हसली.

""अगं पोरीऽऽ...'' या आवाजानं तिची तंद्री भंगली. बघते तो काय! आजोबा एका हातानं धोतर सावरत काठी टेकत तिच्याकडंच येत होते. त्यांना पाहिल्यावर निशा आनंदून गेली. वाऱ्यासारखं पळत जाऊन तिनं आजोबांना मिठी मारली. त्यांनाही विलक्षण भरून आलं. प्रेमाची, जिव्हाळ्याची ही मिठी म्हणजे जणू संजीवनच त्यांच्यासाठी. तिच्या कपाळावर हात फिरवत ते म्हणाले ः ""चल पोरी चल. बैलगाडीत बस. अरे हरी, चल बाबा घे बैल जुंपून. माझी हिरकणी आली बघ.''
""व्हय व्हय धनी.. चला बाईसाब...'' हरीही मोठ्या उत्साहानं बैल जुंपू लागला. झुणूकझुणूक वाजत बैलगाडी जात असताना ती परत गुणगुणत होती. ""माझ्या मामाची रंगीत गाडी गं. तिला खिलाऱ्या बैलाची जोडीऽऽ...'' गाव आलं. ती बघत होती. आजी घाईघाईनं घरातून बाहेर आली. नातीला पाहून तिचा हर्ष गगनात मावेनासा झाला होता.

मामा-मामी आणि शिरू-कुंदा या मामेभावंडांच्या सहवासात निशा रमून गेली. खेडच्या वातावरणात मायेचा सुगंध होता. आकाशही तिला ठेंगणं वाटत होते. गावाभोवतीची पर्वतराजी आणि दऱ्याखोऱ्या तिला खुणावत होत्या. रात्ररात्र व्हायची; पण गप्पा, गाणी, जोक्‍स संपायचे नाहीत. सगळा आसमंत त्या हास्याच्या खळखळाटानं व्यापून जात असे. अन्‌ मग लगेच मामी हाळी द्यायची ः ""अरे बाळांनो, या रे जेवायला.'' हातपाय धुवून सगळी जेवायला बसायची. मामीच्या हातचं ते जेवण... अहाहा! तिच्या पोटात गुदगुल्याच व्हायच्या. मामीच्या हाताला चवच भारी.
सकाळी भूपाळीचा सूर कानावर आल्यावर सर्व उठायचे. घरच्या म्हशीच्या दुधाच्या, जायफळ-वेलचीच्या सुगंधी चहाच्या वाटपाचं काम निशाकडंच. ती खूपच खूष व्हायची. मग मामीची कामाची लगबग. मुलांच्या आंघोळीसाठी वाडीत जायची तयारी. विहिरीवरचा पंप सुरू करून शिरू, कुंदा आणि निशा त्या थंडगार पाण्याच्या फवाऱ्यांचा आनंद घेत असत. नाचत काय, एकमेकांच्या अंगावर पाणी काय उडवत... सगळं जगावेगळं. मग हरी बळेच पंप बंद करायचा. ""जा रं मुलांनो, घरी जा बाबांनो. मोठ्या वहिनी वाट बघत बसल्यात बघा.'' मग घरी जाऊन यथेच्छ भोजनावर ताव मारायचा. दुपार झाली, की पुन्हा वाडी.
अशीच एकदा फिरताफिरता निशा शिरूला म्हणाली ः ""शिरूदादा, हे कसलं झाड आहे रे?''
""हे होय?... ही तर बोर आहे. माहीत नाही तुला, वेडी,'' शिरू मिश्‍कीलपणे म्हणाला. निशा न्याहळत होती. बोरं टपोरी होती; पण काटा टोचल्याशिवाय बोरं खायला मिळत नव्हती हे मात्र खरं.
""आई गं! ए, कुंदा बघ मला काटा टोचलाय...'' निशाच्या बोटातून निघणारं रक्त पाहून कुंदाच विव्हळली.
""अयाई, निशू, थांब. बोटांनी तुझी जखम दाबून धरते. रक्त येणं बंद होईल,'' असं कुंदा म्हणाली. तिनं तसं केलं आणि खरंच ते बंद झालं. निशा विचार करत होती ः "हे काटे म्हणजे आत्मरक्षणच आहे. त्या काट्यांना घाबरून बोरांना कुणी हात लावत नव्हतं. ढालच आहे की ही एक प्रकारची. वा वा! निसर्गराजा तुझी कमालच की रे.'
***

बघता बघता पंधरा दिवस लोटले. निशाला परत जावंसंच वाटेना; पण जायचं तर होतंच. मामींनी दिलेले छान नवीन कपडे तिनं घातले, तर आजीनं शुद्ध तुपाच्या लाडवाचा डबा दिला. निशानं तो पिशवीत नीट ठेवला. ओलावलेल्या सर्वांच्या नजरा बघून तिचेही डोळे पाण्यानं डबडबले. आजोबांनी दिलेला खाऊ खिशात ठेवून ती बैलगाडीत बसली. शिरू आणि कुंदाही तिच्यासोबत स्टेशनपर्यंत निघाले.
घरी पोचल्यावर निशाला करमतच नव्हतं. तिला राहून आठवत होती ती बोर. काय विलक्षण झाड आहे. झाड काटेरी; पण बोरं मात्र खायला किती गोड!
***

""आई... आई,'' छकुलीच्या हाकांनी निशा भानावर आली. बागेत लावलेली ती बोर तिच्याकडं बघून जणू हसत होतं.
""छकुली चल बेटा, खाऊन घे काहीतरी अन्‌ जा वैदेहीकडं. तिनं बोलावलंय तुला.'' छकुली गेल्यावर दार लावून निशा सोफ्यावर बसली आणि पेपर चाळायला लागली. रोज येत असलेल्या बातम्या तिला विचार करायला भाग पाडत होत्या. तिच्या मनात काहूर माजत होतं. आतून घुसमटायला होत होतं. मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या तिला आतून ओरबाडून टाकत असत. तीही एका मुलीची आईच नं? ती विचार करत राही ः "काय आहे हे सारं? कुणीही स्त्री सुरक्षित नाही का, असं हे? किती काळ हे चालणार असं? काहीच का उपाय नाही यावर? नेत्यांची निरनिराळी विधानं, त्यांची अलिप्तता. काहीच का सोयरसुतक नाही कुणाला? त्यांच्या घरी असं झालं तर?'
दुपारी चार वाजता छकुली परतणार होती. मात्र, ती अजून आली नव्हती. निशा खिडकीतून वाट बघत होती. मनात विचारांनी थैमान घातलं होतं. डोक्‍यात शूळ उठत होते. फोन करून बघते तो फोनही कुणी उचलत नव्हतं. "काय करू,' असा विचार निशा करायला लागली. छकुलीचे बाबाही अजून परतले नव्हते. त्यांना फोनही लागत नव्हता. कुठली तरी अनामिक भीती तिला स्वस्थ बसू देत नव्हती. "कुठं गेली असेल बरं ही? काही झालं नसेल ना...,' अशा विचारांनी तिच्या पोटात धस्स झालं. सहा वाजायला आले. मन गलबलून येत होतं. छाती धडधडायला लागली. असा उशीर छकुली कधी करत नाही. सांगितल्याशिवाय ती कधी कुठं जात नाही. जिवाची ती भयंकर घालमेल, तिच्या मनात प्रचंड कोलाहल निर्माण करत होती. आता काय?
पायात घाईघाईत चप्पल अडकवून निशा गाडी घेऊन निघाली. रस्त्यात असीम भेटला. म्हणाला ः ""काकू, छकुली मला हॉस्पिटलमध्ये दिसली.''
"हॉस्पिटलमध्ये?'' तिच्या पोटात कालवाकालव सुरू झाली. ""का? ती तर बरी होती सकाळी. मग कशाला?''
रस्ता क्रॉस करताना रस्त्याच्या कडेला बोरीचं एक झाड तिला दिसलं. तिच्या भावनांना तिला बांध घालता येत नव्हता; पण बोर बघून तिचं मन स्थिर झालं. ती आश्‍वस्त झाली. काटेरी बोर; पण केवढी कणखर, आत्मनिर्भर.
नुकत्याच पार पडलेल्या उन्हाळी शिबिरात छकुलीनं घेतलेलं ज्युदो-कराटेचं प्रशिक्षण तिला आठवलं. रस्त्याच्या शेवटी हॉस्पिटल होतं. थोडा धीर आला होता. पदर कमरेला गुंडाळून ती आत शिरली. बघते तो काय? हॉलच्या कोपऱ्यातील कॉटवर छकुली दिसली. आपली छकुली... निशाला धीर धरवला नाही. ती धावत सुटली. निशानं छकुलीला जवळ घेतलं. डोळे अश्रूंनी थबथबले. ""काय हे आई? अग मला काही झालेलं नाहीये. बघ माझ्याकडं. या आजींना भेट,'' छकुली म्हणाली.
आतापर्यंत निशाचं कुठं लक्षच नव्हतं. आता तिनं आजीकडं बघितलं. आजीच्या कपाळावरची पट्टी बघून ती स्तब्ध झाली. नर्स त्यांच्याकडं येत म्हणाली ः ""खूप नशीबवान आहात काकू तुम्ही. हिच्यासारखी मुलगी तुम्हाला मिळाली. रस्ता क्रॉस करतेवेळी या आजींना एका रिक्षानं धडक दिली. तो तर पळून गेला; पण ही तुमची झाशीची राणी! तिनं या आजींना रिक्षात टाकून इथं आणलं. नाहीतर आजींचं काय झालं असतं कुणास ठाऊक.''
अनिमिष नेत्रांनी निशा छकुलीकडं पाहत होती. आतापर्यंत आपला हात न सोडणारी घाबरट छकुली हीच ती...? तिला आनंदाचं भरतं आलं. छकुलीला उराशी कवटाळून तिनं तिचे असंख्य पापे घेतले. दोघी मायलेकी अश्रूंनी न्हाऊन निघत होत्या. बागेतली बोर खऱ्या अर्थानं आज हसत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com