हमारे अपने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rare items preserved by three generations history memory

बैठकीच्या खोलीत आल्यावर माझ्या लक्षात आलं की, गेल्या तीन पिढ्यांनी जपून ठेवलेल्या दुर्मिळ वस्तू आणि त्यातून दिसणारं वैभव पाहून ते काहीसे दबून-दडपून गेलेत

हमारे अपने

प्रशस्त जागा आणि पूर्वीचं देखण बांधकाम असलेलं आमचं वडिलार्जित घर आहे. ते व्यवस्थित ठेवण्याच्या आमच्या प्रयत्नामुळे, आम्ही श्रीमंत आहोत, असा गैरसमज होतो. ‘कुत्र्यापासून सावधान’ ही पाटी गेटवर लावावी लागली आहे; पण तिला इलाज नाही.

पुढं काय होईल याची कल्पना नसल्यानं संकोच करत त्यांनी बेल वाजवली. मनातली भीती अनाठायी होती हे लक्षात येताच त्यांचं त्यांना आश्चर्य वाटलं. बैठकीच्या खोलीत आल्यावर माझ्या लक्षात आलं की, गेल्या तीन पिढ्यांनी जपून ठेवलेल्या दुर्मिळ वस्तू आणि त्यातून दिसणारं वैभव पाहून ते काहीसे दबून-दडपून गेलेत.

खरं सांगायचं तर, मोठ्या घरात अगदी योगायोगानं जन्म घेतल्याच्या बदल्यात एवढ्या गोष्टी आपल्याला आपोआप मिळाल्या आहेत, या जाणिवेनं माझं मन ओशाळतं अशा वेळी.काही वेळ जाताच ते स्थिरावले आणि मग बोलते झाले. ‘‘इथल्या तरुण मंडळाचे आम्ही कार्यकर्ते,’’ ते म्हणाले.

‘तरुण मंडळ’ म्हणजे गणेशोत्सव आला की, वर्गणी गोळा करून डॉल्बीचा अखंड गोंगाट करणारी टोळी असा माझा समज असल्यामुळे मी थोडा अस्वस्थ झालो. मंडळाचा अध्यक्ष म्हणाला : ‘‘उद्या प्रजासत्ताकदिनाला आपल्या चौकात तुमच्या हस्ते ध्वजवंदन करायचंय. याल का?’’ प्रसंगातली गंमत लक्षात येताच मला हसू आलं. मन भूतकाळात गेलं.

पन्नास वर्षांपूर्वी एक तरुण अधिकारी म्हणून मी रिझर्व्ह बँकेत रुजू झालो. देशाचं आर्थिक धोरण ठरवणं हेच आपलं ध्येय असा ठाम विश्वास आणि उद्दामपणा मनात भरलेला! ठरवलं तसं काहीच झालं नाही; पण आयुष्यानं एक गोष्ट शिकवली : महाकाळोखात लोटले जाण्यापूर्वी आपण एक जरी पणती लावू शकलो तरी आयुष्य वाया नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी ध्वजवंदनाला गेलो. मोजून दहा-बारा तरुण जमलेले. ध्वजवंदनानंतर जायला निघालो इतक्यात ‘भाषण’ असा एकसुरात आवाज आला. क्षणभर काही सुचेना. ‘उदार लोकशाही’, ‘लोकनियुक्त संस्थांचा जबाबदार, सुसंस्कृत कारभार’,

‘स्वच्छ नागरी प्रशासन’, ‘बहुसंख्याकांची अल्पसख्याकांविषयीची जबाबदारी’, ‘विविधतेचा आदर आणि जपणूक’, ‘विविध धर्म, पंथ आणि जाती यांतून आकाराला येणारं भारतीयत्व’ हे सगळे मुद्दे सावर्जनिक चर्चेत असताना मी काय बोलणार?

तरी पण ‘बोला’ म्हटल्यावर मी - जुना एकसुरी ग्रामोफोन वाजावा तसं - गतकाळातील नेत्यांबद्दल, विसरल्या गेलेल्या जुन्या आदर्शांबद्दल थोडं बोललो. त्यांना त्यातलं काय कळलं कुणास ठाऊक. अस्वस्थ होऊन घरी परतलो.

आश्चर्य म्हणजे, काही दिवसांनी ते तरुण पुन्हा आले. ‘‘शिवजयंती जवळ आलीय. कशी साजरी करू, तुम्ही सांगा,’’ म्हणाले. ‘‘तुम्ही स्वतः काहीतरी विचार केला असेल ना? तुमच्या कल्पना सांगा,’’ मी म्हणालो.

ते सांगायला लागले : ‘‘लोक जमावेत म्हणून मर्दानी खेळ, मग शिवाजीमहाराजांवर व्याख्यान, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार, गाणी, आणि ...’’ त्यांना नाराज न करता मी म्हणालो : ‘‘इतर मंडळं जे करतात त्यात आणि तुमच्यात फरक काय?’’

‘‘फरक म्हणजे या वर्षी आम्ही पंधरा लाख रुपये जमवणार आहोत.’’ ‘‘आणि, त्याचं काय करणार?’’ मी विचारलं. ‘‘गणपतीचा मुकुट हिऱ्या-माणकांनी सजवणार. आपल्या गावात पहिल्यांदाच. लोक लांबून बघायला येतील.’’

यात ‘आध्यात्मिक’ भाग किती, असं विचारणार होतो; पण वेळीच स्वतःला आवरलं. कसंय, श्रद्धा आणि धार्मिक विधींच्या बाबतीत लोक हळवे असतात. म्हणून तसं न म्हणता थोडं मोघमपणे विचारलं : ‘‘तुम्ही मंडळ कशासाठी स्थापन केलंय?’’

‘‘समाजाच्या उपयोगी पडण्यासाठी.’’ ‘‘छान. मग मला सांगा, आपल्या भागातल्या लोकांना सध्या कोणता प्रश्न जास्त भेडसावतोय?’’ ‘‘कचऱ्याचा,’’ एका सुरात ते म्हणाले. ‘‘बरोबर. आणि झोपडपट्टीतल्या लोकांचं काय?’’ कुणीतरी म्हणालं : ‘‘शिक्षण. तिथल्या अंगणवाडीतल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळत नाहीय. काहीतरी करायला पाहिजे.’’

‘‘मग त्यासाठी पैसे गोळा करायला काय हरकत आहे?’’ मी सुचवलं. ‘‘ते होणार नाही,’’ ते म्हणाले : ‘‘लोक देवासाठी पैसे देतील; पण जे काम सरकारचं आहे त्यासाठी नाही देणार.’’ मग अगदी सावधपणे पुढचा प्रश्न मनात जुळवत मी विचारलं : ‘‘समजा, गणपतीसाठी गोळा केलेल्या वर्गणीतली काही रक्कम अंगणवाडीला दिली तर गणपतीबाप्पाचा कोप होईल काय?

आपल्या रोजच्या आयुष्यात काही मोठं सत्कार्य, सत्कृत्य केलं तर अधिक समाधान मिळतं, म्हणतात.’’ ‘‘ते असू दे. कचऱ्याचं काय?’’ मूळ मुद्द्यावर येऊन एकानं अचानक विचारलं. ‘‘त्यात काय...पत्रकारांना बोलावू आणि महापालिकेचा ढिसाळ कारभार जगासमोर मांडू. तुम्हाला काय वाटतं?’’

सगळेजण माझ्याकडे पाहू लागले. नागरी सेवेच्या क्षेत्रात सेवा केलेली असल्यानं पालिकेचे अधिकारी कोणत्या अडचणीच्या परिस्थितीत काम करतात याची मला कल्पना होती, म्हणून मी त्यांना म्हटलं : ‘‘बाबांनो, टीकात्मक दृष्टिकोन ठेवला तर अधिकाऱ्यांच्या मनात आपल्या मागणीबद्दल आस्था निर्माण होण्याची शक्यता कमी होईल.

नुसती टीका करून प्रश्न सुटत नसतात. त्यापेक्षा आपण महापालिकेच्या आयुक्तांना भेटलो तर, आणि ‘आमच्या भागाची पाहणी करायला आणि तिथले प्रश्न समजून घ्यायला याल का,’ असं विचारलं तर ते एखाद्या वेळेस ऐकतील.

त्यांच्याबरोबर चहापान करू आणि पालिकाकर्मचाऱ्यांवर टीका न करता, आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी आपण त्यांना मदत करायची ठरवलीय, असं सांगू. त्यांना ते पटलं आणि आयुक्तांनीदेखील अनौपचारिक भेट देण्याचं मान्य केलं.

माझ्यापेक्षा अधिक जाणकार मित्र मला सांगतात, ‘तरूण मंडळी सामाजिक बदलाचं आणि आर्थिक विकासाचं माध्यम असली तरी त्यांच्यातल्या अंगभूत शक्तीला वळण देणं हेच मोठं आव्हान आहे.’

ते असंही सांगतात, ‘शाळा-कॉलेजांत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी कुशल कामगारांचं प्रमाण मात्र घसरतच चाललेलं आहे. म्हणून, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न भविष्यातल्या धोरणांमध्येसुद्धा कळीचा मुद्दा राहील. यासाठी शिक्षणाचा स्तर उंचावला पाहिजे आणि कौशल्यविकासावर भर दिला गेला पाहिजे.’

पण हे होणार कधी?

अध्ययनरजेवरती कोल्हापूरला असताना राजेश नावाच्या विद्यार्थ्याबरोबर घालवलेला काळ मला आठवतो. राजेश तिशीतला; पण विद्यार्थ्यापेक्षा तो प्राध्यापकच वाटायचा. केस पांढरे झालेले, डोळ्यांच्या खाली सुरकुत्या पडलेल्या. सतत तेरा वर्षं तो शिकतच होता. बीए, बीएड, एमए (राज्यशास्त्र), एमए (इतिहास) अशा पदव्या त्यानं मिळवल्या.

‘आपण योग्य संधीची वाट पाहत असलेले बेरोजगार आहोत’ असं खूप काळ शिकत असलेल्या इतर विद्यार्थ्यांप्रमाणं तोही म्हणायचा. कुठंतरी कायमस्वरूपी नोकरी मिळावी म्हणून त्यानं पुष्कळ धडपड केली; पण पदरी निराशाच. सरकारी नोकरी मिळवायला आपले काही लागेबांधे नाहीत असं तो म्हणायचा.

अध्ययनरजा संपवून मी रिझर्व्ह बँकेत परतलो; पण राजेशशी संपर्क होता. नंतर १९९८ मध्ये कळलं की, गावाजवळच्या नदीत पोहत असताना तो बुडून मरण पावला. आश्चर्य वाटलं. कारण, तो पट्टीचा पोहणारा होता. कधी कधी भले भले हरतात; कारण, प्रयत्न करत राहण्याची त्यांची चिकाटी कमी पडते.

याला काहीच उपाय नाही का?

बेरोजगार तरुणांच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत : ‘काम मिळवायचं सोडून ते वेगवेगळ्या राजकीय पुढाऱ्यांच्या मागं लागतात...कमी कष्टात त्यांना जास्त पैसा हवाय...धार्मिक उत्सवांच्या नावाखाली ते खंडणी गोळा करतात... कार्यक्रमांचं निमित्त करून ते ध्वनिप्रदूषण करतात...

नशापान करून रात्री-अपरात्री धिंगाणा घालतात, वगैरे...’ हे सगळं असलं तरी त्यांच्या बाजूनं बोलण्यासारखं काहीतरी आहे; कारण, त्यांचं अपयश, त्यांचं भरकटत जाणं हे कुठं तरी आपल्या अपयशाशी, त्यांच्या प्रश्नांत आपण लक्ष न घालण्याशी संबंधित आहे. समाजाविषयी कर्तव्य निभावण्यात आपणच कुठं तरी कमी पडलोय का?

आपण कर भरतो आणि नागरिक म्हणून आपली किमान जबाबदारी पार पडतो यात शंका नाही; पण त्याच्या पलीकडे एका स्वतंत्र देशात राहायला मिळाल्याची परतफेड म्हणून आपण काय करतो? आपल्या मुलांना आपण शिकवतो, घडवतो; पण निरनिराळ्या ‘कट्ट्यां’वर आणि ‘मंडळां’त आयुष्यातला बहुमूल्य वेळ घालवणाऱ्या पोरांच्या बाबतीत आपण काही करतो का? आजवर मी तरी काही केलेलं नाही आणि याची मला लाज वाटते.

गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी एक गीत गायलं होतं: ‘चालताना तुमच्या सोबत कुणी नसेल तर एकटेच चालत राहा.’ म्हणून आता एवढ्यातच मी इथल्या तरुण मंडळाचा मी सदस्य होणार आहे. तिथल्या गप्पा ऐकण्यासाठी नव्हे; गरजेनुसार मार्गदर्शन करण्यासाठी.

गेलं दीड दशक ग्रामीण भागात काम करत असताना घेतलेला माझा अनुभव खोटा नसेल तर, खात्री आहे की, वयाचा अडसर दूर झाल्यावर, ते तरुण त्यांच्या आयुष्यातल्या कळीच्या मुद्द्यांविषयी माझ्याशी नक्कीच मोकळेपणानं बोलतील.

तुम्हाला सांगतो, त्यांच्यातला उद्धटपणा हा एक मुखवटा आहे. आपण आपले समर्थ आहोत, हे दाखवायचा तो एक प्रयत्न आहे; पण तो मुखवटा फाडून आत डोकावलं तर दिसेल की, कुणीतरी साथ द्यावी म्हणून ते आक्रोश करताहेत. त्यांना कुणाचा तरी व्यावहारिक सल्ला हवाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, अजूनही आशा संपलेली नाही असा विश्वास हवाय.

माझे सासरे ज्येष्ठ सनदी अधिकारी होते; पण आयुष्याच्या शेवटच्या काळात जवळच्या कोळ्यांच्या वस्तीत जाताना, मार्गदर्शन करताना, लोकांना आधार देताना मी त्यांना पाहिलंय. मला वाटायचं, ते वेडे आदर्शवादी आहेत; पण त्याचंच बरोबर होतं.

नुसती भाषणं देऊन सामाजिक बदल घडत नसतो. काही तरी विधायक कार्य करण्याची आपली जबाबदारी लोकांना जाणवते तेव्हा तो घडतो. ते किती असामान्य होते हे आता माझ्या लक्षात येतंय. त्यांच्या जवळपासही पोहोचण्याची माझी पात्रता नाही...तरी प्रयत्न करायला काय हरकत आहे?

मुद्दा हा की, अवघड परिस्थितीत आशा सोडून देणं आणि तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणं ही न परवडणारी गोष्ट आहे. आज लक्ष दिलं नाही तर भविष्यात अनेक प्रकारच्या सामाजिक हिंसाचाराला तोंड द्यावं लागेल.

टॅग्स :saptarang