रश्मी आणि उद्धव ठाकरेंची पहिली भेट कोणी घडवली तर....

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या राजकीय यशामध्ये त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या राजकीय प्रवासात उद्धव ठाकरे यांनी अनेक चढ-उतार अनुभवले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या राजकीय यशामध्ये त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या राजकीय प्रवासात उद्धव ठाकरे यांनी अनेक चढ-उतार अनुभवले. शिवसेनेची धुरा हाती घेतल्यापासून उद्धव ठाकरे यांनी अनेक कसोटीचे क्षण अनुभवले. नारायण राणे यांचे बंड असो, किंवा मराठीच्या मुद्दावरुन मनसेने सुरु केलेला झंझावात, या सर्व कठीण काळात उद्धव ठाकरे यांना पत्नी रश्मी यांनी खंबीर साथ दिली.

रश्मी ठाकरे यांचा जन्म डोंबिवलीत एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. लग्नाआधीचे त्यांचे आडनाव पाटणकर आहे. 80च्या दशकात डोंबिवलीच्या वझे-केळकर कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली. त्यांचे वडिल माधव पाटणकर यांचा कौटुंबिक व्यवसाय आहे. 1987 साली रश्मी ठाकरे एलआयसीमध्ये नोकरीवर रुजू झाल्या. कंत्राटी स्वरुपाची ही नोकरी होती. 'एलआयसीमध्ये नोकरी करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहिण जयवंती ठाकरे यांच्याबरोबर मैत्री झाली. जयवंती यांनी रश्मी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणली. उद्धव ठाकरे त्यावेळी राजकारणात फारसे सक्रीय नव्हते. ते फोटोग्राफी करायचे. त्यांनी एक अॅड एजन्सी सुद्धा सुरु केली होती. या ओळखीचे रुपांतर पुढे मैत्रीत झाले. नंतर 13 डिसेंबर 1989 रोजी दोघे विवाहबद्ध झाले.' अशी माहिती एका मित्राने दिली.

उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सावलीप्रमाणे असणाऱ्या रश्‍मी ठाकरे यांनी यावेळच्या सत्तासमीकरणात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या त्या ‘मॉंसाहेब-२’ म्हणून ओळखल्या जात आहेत. मूळच्या डोंबिविलीच्या असलेल्या पाटणकर यांची महाविद्यालयीन काळात उद्धव ठाकरे यांची भेट झाली. दोघेही ‘जे. जे. आर्ट स्कूल’चे विद्यार्थी. तिथेच त्यांचे प्रेम जुळले आणि विवाहही झाला. पाटणकरांच्या ठाकरे झाल्यावर रश्‍मी यांनी सुरुवातीच्या काळात ‘मातोश्री’ची आणि अर्थात सासरे बाळासाहेब यांची कार्यपद्धती समजून घेतली आणि त्याप्रमाणे शांतपणे पावले उचलत नवऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यास सुरुवात केली. आता त्यांच्याकडे केवळ ‘मिसेस मुख्यमंत्री’ म्हणून पाहता येणार नाही तर त्या एका आमदाराच्या मातोश्रीही आहेत. आदित्यला सुरुवातीपासून राजकारण आणण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याच्या पहिल्यावहिल्या आमदारकीच्या निवडणुकीत प्रचाराची मोठी धुरा त्यांनी सांभाळली. राजकीय क्षेत्रातील अचूक जाण आणि माहिती ठेवणाऱ्या रश्‍मी ठाकरे या यशस्वी उद्योजिकाही आहेत. ‘सामवेद रिअल प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘सहयोग डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या दोन मोठ्या फर्मच्या त्या संचालक आहेत. याशिवाय इलोरिया सोलर, हिबिकस फूड आणि कोमो स्टॉक्‍स अँड प्रॉपर्टीज या तीन कंपन्यात त्या आदित्य यांच्यासह सहसंचालकही आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत ‘मिसेस मुख्यमंत्री’ म्हणून ठसठशीत नाव कायम चर्चेत असते ते शालिनीताई पाटील यांचे यानंतर दीर्घ काळानंतर चर्चेत नाव आले ते अमृता फडणवीस यांचे. अर्थात यापैकी शालिनीताई यांचे नाव राजकीय वारसदार म्हणून जास्त चर्चेत होते. त्यामुळे आगामी काळात रश्‍मी ठाकरे राजकीय वारसदार म्हणून भूमिका बजावणार की पडद्यामागे राहून पतीच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. आदित्य याच्या राजकीय कारकिर्दीसाठी तरी त्या ‘मॉंसाहेब-२’ म्हणून धुरा सांभाळतील अशी शक्‍यता जास्त व्यक्त होत आहे.

रश्मी ठाकरे... शिवसेनेच्या महिन्याभराच्या सत्तासंघर्षात ‘माँसाहेब-२’ म्हणून समोर येतायंत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची ओळख माँसाहेब म्हणून शिवसैनिकांसह अवघ्या महाराष्ट्राला आहे. पण आता मातोश्रीत रश्मी ठाकरेंच्या रूपानं ‘माँसाहेब-२’ अवतरल्यात आहेत, असं म्हटले तर वावगं होणार नाही.

रश्मी ठाकरे.. उद्धव ठाकरेंच्या अर्धांगिनी.. उद्धव यांच्या रणनीतीकार.. त्यांच्या मार्गदर्शक.. त्यांच्या खंद्या समर्थक.. असं म्हटलं जातं की वर्षा बंगल्याची महत्त्वाकांक्षा उद्धव यांनी बाळगली ती रश्मी ठाकरेंच्या आग्रहावरनंच. ग्राऊंड लेव्हलला पक्षात काय परिस्थिती आहे याचा लेखाजोखाच रश्मी ठाकरे ठेवतात.

भाजपमागे शिवसेनेची फरफट होतेय, आता पुरे.. ही तळागाळातल्या शिवसैनिकांची भावना रश्मी ठाकरेंच्या माध्यमातून मातोश्रीपर्यंत पोचल्याचं बोललं जातं. केवळ भाजपशी दोन हात कऱण्याबाबत नाही, तर पक्षांतर्गत होणाऱ्या बारीक-सारीक हालचालींवर रश्मी ठाकरेंची नजर असते. कोणतीही नकारात्मकता उद्धव ठाकरेंपर्यंत त्या पोचू देत नाहीत. म्हणूनच शिवसैनिकांसाठी रश्मी ठाकरे माँ-साहेब ठरतायत.
बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना उत्तराधिकारी घोषित करावं यामागेही रश्मी ठाकरेच असल्याचं बोललं जातं. राज ठाकरे जेव्हा शिवसेना सोडून गेले तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे खंबीरपणे उभ्या राहिल्या. शिवसेना महिला आघाडीची धुरा सांभाळण्याचा अनुभव असलेल्या रश्मी ठाकरे नीता अंबानींपासून ते ऐश्वर्या राय-बच्चन कुणासोबतही अगदी सहजपणे मिसळतात.

रश्मी ठाकरेंना गझल गायनाचीही आवड आहे. मुलगा आदित्य व तेजसच्या प्रत्येक गोष्टीत त्या सहभागी असतात. त्यांना प्रोत्साहन देतात. राजकारणात जरी त्या प्रत्यक्षपणे सहभागी होत नसल्या तरी शिवसेना महिला आघाडीच्या त्या अध्यक्षा होत्या हे लक्षात घेण्यासारखे आहे. भाजपविरोधात शिवसेनेनं जी ठाम भूमिका घेतली त्यात रश्मी ठाकरेंचा पूर्वानुभव कामी आल्याचीही चर्चा आहे. शिवसेनेच्या मुख्य रणनीतीकार असल्या तरीही पडद्याआड राहणंच रश्मी ठाकरे पसंत करतात. म्हणूनच पडद्यामागून सूत्र चालवणाऱ्या रश्मी ठाकरे भविष्यात कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rashmi thackeray behind uddhav thackerays success