अनावर (रवींद्र गुरव)

रवींद्र गुरव
रविवार, 18 मार्च 2018

त्याला वाटलं, फाटलेल्या संसाराला टाके घालता घालता आईचं जिणं पार विरून विरून गेलंय. तरी कधी बिचारीची तक्रार नाही. रक्ताचं पाणी करून का जगतीय ती? कुणासाठी? माझं अन्‌ बाचं नशीब तिनं कपाळावर गोंदवून घेतलंय. आमच्यासाठीच जगतीय ना ती...? प्रकाशचं विचारचक्र थांबायला तयार नव्हतं...

त्याला वाटलं, फाटलेल्या संसाराला टाके घालता घालता आईचं जिणं पार विरून विरून गेलंय. तरी कधी बिचारीची तक्रार नाही. रक्ताचं पाणी करून का जगतीय ती? कुणासाठी? माझं अन्‌ बाचं नशीब तिनं कपाळावर गोंदवून घेतलंय. आमच्यासाठीच जगतीय ना ती...? प्रकाशचं विचारचक्र थांबायला तयार नव्हतं...

सूर्य डोक्‍यावर आलेला. उन्हं भणभणतेली. रस्ता तव्यागत तापलेला. उन्हाच्या तडाख्यानं माणसं करपून निघालेली. काळवंडलेली. घामानं न्हाऊन निघालेली. बाजाराचा दिवस. उन्हातही रस्ता गजबजलेला. कुणी बाजार करत होतं, तर कुणी बाजार करून स्टॅंडकडं निघालं होतं. नुकतंच कॉलेज सुटलेलं. कॉलेजची पोरं-पोरी हसत-खिदळत स्टॅंडकडं निघालेली. उन्हापासून वाचण्यासाठी प्रत्येकजण झपझप पावलं टाकत होता.

प्रकाश रस्त्यावर आला. गर्दीतनं चालू लागला. आज त्याला उशीर झाला होता. वर्गातली सगळी पोरं पुढं गेली होती. तो मात्र पाय मोजून टाकत होता. पायात बळ नसल्यागत. उन्हानं सगळं अंग घामेजून गेलं होतं. घशाला कोरड पडली होती. एसटीनं गावी लवकर जावं, असं त्याला वाटत नव्हतं. डोक्‍यात विचारांचं वादळं उठलं होतं. मन सैरभैर होतं. रस्त्यावरच्या गर्दीचा गोंगाट त्याच्या कानांवर पडत नव्हता. तो स्वतःच्याच तंद्रीत चालला होता. विचारांच्या वावटळीत हरवलेला...
""आरं, ऐऽ, मरायचं हाय का काय तुला? आमचीच गाडी दिसली व्हय रं तुला मरायला? तसा चांगला ईद्वानच दिसतुयास की...बिनभाड्याच्या खोलीत न्हितास बघ आज मला!''

जीप ड्रायव्हरच्या आवाजानं प्रकाश काचबारला. भानावर आला. जीप त्याच्या पुढ्यात उभी होती. विचारांच्या तंद्रीत तो रस्त्याच्या मधोमध आला होता. ड्रायव्हरची बडबड अजून सुरूच होती. एव्हाना बरीच गर्दी जमली होती. प्रकाश थांबला नाही. खाली मान घालून चालू लागला. गर्दी त्याच्याकडं बघून हसत होती. पुन्हा त्याचे पाय अडखळू लागले.

""बिरेक लावला नसता तर पॉर जाग्यावर मेलं आस्तं बघा आज!'' गर्दीतली म्हातारी म्हणाली. ते ऐकून प्रकाशचं डोकं भणभणायला लागलं.
त्याला वाटलं, आपण मेलो असतो तरी काय फरक पडला असता? गरिबाचं जगणं-मरणं दोन्ही सारखंच. किड्या-मुंगीसारखं जगायचं आन्‌ कुत्र्यागत रस्त्यावर मरून जायचं. गरिबानं स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठीच जगायचं असतं. आपण गरिबाघरी जन्मलो, यात आपला काय गुन्हा? आई कधी कधी म्हणते ः "ज्येच्या त्येच्या कर्माची फळं असत्यात, बाबा. नशिबाचं भोग भोगावंच लागत्यात.'
...जन्माला यायच्या आधीच कसलं कर्म केलं होतं मी? नशिबाचे भोग गरिबाच्याच मागं बरे लागतात! माझंही घर आज संकटांच्या वाळवीनं पोखरलंय. हा कुणाच्या नशिबाचा भोग? माझ्या आईच्या की माझ्या दारुड्या बापाच्या नशिबाचा, जो बाप भगाटल्यापासून रात्रीपर्यंत दारूत आपलं नशीब शोधतोय!
अशा विचारांच्या चक्रातच प्रकाश स्टॅंडवर आला.

स्टॅंड माणसांनी गजबजून गेलं होतं. स्टॅंडच्या त्या मोठ्या आवारात एका बाजूला पुस्तकविक्रीचा स्टॉल होता. डाव्या बाजूला चहा-न्याहारीचं कॅंटीन. खाकी कपड्यातल्या ड्रायव्हर-कंडक्‍टरांची ये-जा सुरू होती. प्रवासी कॅंटीनमध्ये शिरत होते-बाहेर पडत होते. स्टॅंडच्या भिंती जाहिरातींनी रंगलेल्या..."स्वच्छता राखा', "थुंकू नका' असं जागोजागी लिहिलेलं. कोपऱ्यात पिण्याच्या पाण्याचा हौद. त्याच्यासमोरच्या बाकड्यांवर कॉलेजची पोरं-पोरी बसलेली. पोरं पोरींच्याकडं बघून खिदळत होती. काहीजण पेपर वाचण्यात मग्न होते. स्टॅंडशेजारच्या वडापच्या गाड्यांचे ड्रायव्हर "चला कोलापूर; चला, कोण हाय का कोलापूर?' असं ओरडत होते.

प्रकाश जिथं बसलेला होतो, तिथं एक लहान पोर रडत होतं. एक म्हातारा भीक मागत होता. स्टॅंडवर एकच कलकलाट चाललेला होता. आधीच प्रकाशचं डोकं बधीर झालेलं. मन जखमेगत ठसठसतेलं. त्याला या सगळ्याचा उबग आला. तो उठून रिकाम्या एसटीत जाऊन बसला. एखाद्या अंधाऱ्या गुहेत कुणी गूढ जप करत बसावा, तसा...
प्रकाश घराजवळ आला. घामानं त्याचं अंग ओलंकिच्च झालं होतं. उन्हातनं आल्यानं घशाला कोरड पडली होती. आई दाराला कुलूप लावून शेतात रोजगारावर गेली होती नेहमीप्रमाणे. त्याला वाटलं, कुलूप घातलं काय अन्‌ न घातलं काय...आपल्या घरात काय मिळणार कुणाला? चेपलेली भांडी, ठिगळं लावलेले कपडे आणि रिकाम्या कणगीशिवाय घरात आहेच काय? तो असा विचार करत उंबऱ्यावर टेकला. दारात मांडवाखाली म्हैस पाय पसरून बसली होती. तिच्या पाठीमागच्या बाजूवर बसून एक कावळा तिचं शेपूट टोकरत होता. ती डोळे मिटून शांतपणे रवंथ करत होती. प्रकाशला वाटलं, आपणही असेच डोळे मिटून जीवन जगतोय...मेल्यागत. गरिबी नावाचा कावळा आपल्याला टोकरत आहे...तो आपल्याला टोकरत आहे आणि आपण काहीही करू शकत नाही. या विचारासरशी त्यानं दगड उचलून म्हशीवरच्या कावळ्याला मारला. कावळा उडाला. म्हैसही त्याच्या चाहुलीनं अंग झाडत उठली. तिचं खपाटी गेलेलं पोट बघून त्याला आपल्या बाचा राग आला. आई भगटायलाच रोजगारावर गेलेली. बा मात्र म्हशीला चारा न टाकताच गायब झालेला. दारूनं त्याला पुरतं यरगटलेलं. प्रकाशनं कवळाभर वैरण म्हशीच्या पुढ्यात टाकली. आयुष्यभराची भूक लागल्यागत म्हैस वैरणीवर तुटून पडली. त्यानं दार उघडलं. त्यासरशी काळ्याकुरुंद बोक्‍यानं खुराड्याजवळनं भिंतीवर उडी घेतली. प्रकाशनं काठी हुडकेपर्यंत बोका पसारही झाला. त्यानं वैतागून शिवी हासडली. कसेतरी चार घास पोटात ढकलून प्रकाश पुन्हा बाहेर आला. त्याचं मन थाऱ्यावर नव्हतं. आपण काय करत आहोत, तेच त्याला कळेनासं झालं होतं. "उद्या जेवल्याबरोबर शेतात ये' असं आईनं त्याला कालच बजावून सांगितलेलं होतं. तो मात्र ढिम्मपणे बसून राहिला. त्याचं मन काचबारलेलं, कावरंबावरं झालेलं होतं. त्याला काहीच करावसं वाटत नव्हतं... "डायवरनं बिरेक लावला नसता तर पॉर जाग्यावं मेलं आस्तं बगा... बाची दारू, आईची तडफड, कर्म, नियती, दैव, मरण...प्रकाशच्या डोक्‍यात नुसतं गिरमिट फिरालतं.

त्याला वाटलं, कशाला जगायचं आपण? आईसाठी? ती बिचारी राबून कधीच मेलीय. बाला तर दारूनंच संपवलंय. माझंही पुढं कधीतरी लग्न होईल. कर्जाचा फास गळ्याभोवती आवळत जाईल. आई-बा, बायको-पोरं जिवंतपणीच मरून जातील. या सगळ्यासाठीच जगायचं का आपण? त्याचं डोकं सणकू लागलं. जगायचं की मरायचं, याचा गुंता त्याच्या डोक्‍यात आता वाढत चालला होता...

संध्याकाळी आई शेतातनं परत आली. तिनं विचारलंच ः ""परकास, आरं शेतात का रं आला न्हाईस?''
तो काहीच बोलत नाही, असं बघून ती रागानंच म्हणाली ः ""अश्‍यानं पोटाला खाशिला बगा तुमी. त्यो तुजा बाप तिकडं गावभर उकिरडं फुकतोय. तूबी तसंच कर. म्हंजी मला कुटंतरी निघून जायाला बरं...''
तरीही त्याला तसंच मख्ख चेहऱ्यानं बसलेला बघून ती प्रकाशच्या जवळ येत म्हणाली ः ""काय बरंबीरं वाटत न्हाई, व्हय रं? असा घुम्यावानी बसलास ते. जा, म्हशीला भरडा आण.''
प्रकाशनं भरडा आणला. म्हशीच्या पुढ्यात ठेवला. म्हशीच्या धारेसाठी तांब्या आन्‌ किटली आणून दिली. आई धार काढू लागली. पोराचा गळाठलेला अवतार बघून त्याचं काहीतरी बिनसलंय, हे तिनं ओळखलं.
""आसं करून कसं चालंल पोरा? एकानं थारा सोडला म्हून काय समद्यांनीच तसं करून चालतंय व्हय? अश्‍यानं जगाया व्हायचं न्हाई बाबा. नशिबाचं भोग भोगावंच लागल्यात. सटवीचा लिखावा कोन पुसटनार हाय व्हय?''
आईचं तत्त्वज्ञान ऐकायला प्रकाश तिथं थांबलाच नाही. नियती, कर्म, दैव हे सगळं त्याला विषारी सापागत वाटालतं. या सगळ्यापासून तो दूर जाऊ बघत होता. शेवटी त्यानं ठरवलं ः आपण किड्या-मुंगीसारखं जगायचं नाही. त्याच विचारांच्या तंद्री तो शेजारच्या गावी गेला. त्यानं ठाम निर्णय घेतला होता. शेती सेवाकेंद्रातून विषारी औषध घेऊन तो माघारी वळला. रात्री घरी आला.

आई-बा गाढ झोपलेले. तो मात्र जागाच राहिला. काही विशिष्ट हेतूनं. शिवाय, विचारांची वावटळ त्याला झोपू देतही नव्हती. मनाचा हिय्या करून त्यानं तांब्याभर पाण्यात ते विषारी औषध ओतलं. त्याला आईची तीव्र आठवण आली. त्याचे डोळे पाझरू लागले. आपल्यामागं आईचं काय होईल, या विचारानं त्याच्या उरात दाटून आलं. त्याला वाटलं, फाटलेल्या संसाराला टाके घालता घालता तिचं जिणं पार विरून विरून गेलंय. तरी कधी बिचारीची तक्रार नाही. तिला कधी मरावंसं वाटलं नसंल का? तरीही ती रक्ताचं पाणी करून का जगतीय? कुणासाठी? माझं अन्‌ बाचं नशीब तिनं कपाळावर गोंदवून घेतलंय. आमच्यासाठीच जगतीय ना ती? घरासाठी पणतीसारखी जळत राहतीय ती... आन्‌ मी मात्र मरायचं ठरवलंय...सगळ्यापासनं पळायला लागलोय मी. त्याला गलबलून आलं. डोळे पाझरतच होते. त्याचं अंग शहारलं. त्याला आता सगळं अनावर होत होतं. तरीही...तरीही हातातला तांब्या त्यानं दूर भिरकावून दिला...
""व्हय रं परकास, कसला आवाज आला?'' आईनं अंथरुणातूनच विचारलं. भिरकावलेल्या तांब्याच्या आवाजानं तिला जाग आली होती.
""काय न्हाई, आई. खुरुड्याजवळ बोका आला व्हता'' ""मुडदा बशीव की रं त्येचा. रातीचीच झडप घातली व्हय रं त्यानं?'' ""आई झोप तू. बोका पळालाय. आता त्यो कधीच यायाचा न्हाई!'' असं म्हणत त्यानं दिवा लावला आणि काही कळायच्या आतच तो आईच्या कुशीत शिरून मनमोकळं रडू लागला...ती बिचारी मात्र गोंधळून गेली. पोराला असं एकाएकी काय झालं, तिला काहीच कळेना.
प्रकाश आईच्या कुशीत गाढ झोपी गेला. ती मात्र त्याच्या केसांतून हात फिरवत, पहाट होण्याची वाट बघत अंथरुणावर उघड्या डोळ्यांनी पडून राहिली...

Web Title: ravindra gurav write article in saptarang