शिका स्वयंअध्ययनाची कला

शिका स्वयंअध्ययनाची कला

आजच्या रेडिमेडच्या जमान्यात अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेतील यशही रेडिमेड हवे असते. सोपी संदर्भ पुस्तके, गाईड, दुसऱ्याच्या नोटस्‌ वापरून झटपट यश मिळावे, अशी अपेक्षा बाळगणारे अनेक आहेत. क्‍लासेसच्या विळख्यात सापडलेल्या विद्यार्थ्यांना जेव्हा स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याची वेळ येते तेव्हा त्यांच्या अध्ययनातील मर्यादा स्पष्ट जाणवतात. स्वयंअध्ययनाकडे केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम जर आपल्या भविष्यावर होणार असेल तर वेळीच जागे झालेले बरे.

विद्यार्जन करणाऱ्याला विद्यार्थी संबोधले जाते; पण आजचे अनेक विद्यार्थी हे ज्ञानार्थी होण्याऐवजी परीक्षार्थीच अधिक होत आहेत. केवळ गुण डोळ्यांसमोर ठेवून वर्षभराच्या अभ्यासाचे नियोजन करायचे, ज्या भागाला जास्त गुण मिळतात, त्याचाच मनापासून अभ्यास करायचा, बाकीकडे दुर्लक्ष करायचे. मिळालेल्या गुणांमध्ये रेडिमेड नोटस्‌, गाईड यांचाच सिंहाचा वाटा असतोच. शालेय परीक्षेत अशा तंत्रामुळे चांगले गुण मिळाले असतीलही; पण जेव्हा आकलनावर आधारित स्पर्धा परीक्षा देण्याची वेळ येते तेव्हा अनेकांचे पितळ उघडे पडते. त्याव्यतिरिक्त अशा घोकंपट्टी अभ्यास पद्धतीचा सर्वाधिक ताण मुलावर येतो, ज्यांना स्वयंअध्ययनाची नवी पद्धत स्वीकारता येत नाही, असे तरुण स्पर्धेतून आपोआपच बाहेर फेकले जातात. म्हणून स्पर्धा परीक्षेच्या आव्हानात्मक क्षेत्रात पाय ठेवण्याअगोदर मुलांनी स्वयंअध्ययनाचे कौशल्य शिकले पाहिजे.

स्वयंअध्ययन म्हणजे काय?
अभ्यासासाठी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःच विविध विषयांचा अभ्यास करणे, दुसऱ्याच्या नोटस्‌ अथवा बाजारपेठेतील रेडिमेड नोटस्‌ न हाताळता स्वतःच्या नोटस्‌ तयार करणे होय. या व्यतिरिक्त वार्षिक, सहामाही, मासिक व दैनंदिन अभ्यासाचे नियाजन करणे. आकलन, साठवण व वेळच्या वेळी उजळणी करून अभ्यासात रममाण होणे म्हणजे स्वयंअध्ययन पद्धतीचा वापर करणे होय. या पद्धतीमुळे तरुणाच्या सर्वांगीण उन्नतीच्या शक्‍यता बळावतात.

सुरुवातीला या पद्धतीसाठी वेळ लागत असला, तरी काही दिवसांनी याचे फायदेच अधिक वाट्याला येतात. आजकाल अनेक क्‍लासेसमुळे मुलांची स्वयंअध्ययनाची सवयच संपत चालली आहे. केवळ मार्कांच्या फूटपट्ट्या लावून आपण जगातील समृद्ध ज्ञान समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय. केवळ घोकंपट्टीच्या तंत्राने बोलके पोपट तयार होत असतीलही; पण या समाजाला चिंतनशील, अनुभवसंपन्न व ज्ञानी अधिकाऱ्याची गरज आहे. त्यासाठीच आयोगाकडून बदलण्यात आलेल्या अभ्यासक्रमात आकलनाला अन्यन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. या स्पर्धा परीक्षेत असाच विद्यार्थी स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकतो. ज्याच्याकडे एकलव्यासारखी तळमळ, स्वयंअध्ययनाची पद्धती आणि चिकाटी आहे.

माहिती आणि ज्ञानातील फरक  
स्वयंअध्ययनाची कला ज्ञात असणारी व या कलेचा व्यवहारात उपयोग करण्याची क्षमता बाळगणारी कोणतीही व्यक्ती माहितीचे ज्ञानात रूपांतर करू शकते. आजकाल जगभरात माहितीचा विस्फोट झाला आहे. जगातील कोणत्याही विषयाची माहिती आपण एका क्‍लिकवर मिळवू शकतो. याचा अर्थ आपण ज्ञानी आहोत असा होत नाही. कारण माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्यासाठी लागते स्वयंअध्ययनाची पद्धती व चिंतनशील वृत्ती. सद्यःस्थितीला या बाबीचा अभाव असल्यामुळेच उच्चविद्याविभूषित व्यक्तीही ज्ञानी असेलच हे सांगता येत नाही. ज्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे आहे, अशा तरुणांनी माहिती मिळवण्याचा ध्यास न धरता ज्ञान मिळवण्याचा अट्टहास धरला व त्यासाठी स्वतःची अशी स्वयंअध्ययनाची व चिंतनाची खास शैली तयार केल्यास परीक्षेचे दडपण उरणार नाही.

काय करावे?

 अभ्यासासाठी गाइड व इतर रेडिमेड साधन सामग्री न वापरता स्वतःच्या नोटस्‌ तयार करण्याचा संकल्प करा. मूळ व उपयुक्त संदर्भ पुस्तके वाचून नोटस्‌ तयार करा.
 अभ्यासाची एक विशिष्ट पद्धती असते. त्या पद्धतीचा अभ्यास करून स्वतःला उपयुक्त असणारी पद्धती अवलंबावी.
 स्वयंअध्ययनामध्ये आपण अनेकांचे सल्ले, मार्गदर्शन मिळवू शकता; पण अंतिमता आपण आपल्या पद्धतीचा वापर करावा.
 स्वयंअध्ययनामुळे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास नक्की होतो. फक्त आपला आपल्या अभ्यास पद्धतीवर, स्वतःच्या कष्टावर भरवसा पाहिजे.
 आपण केलेले अभ्यासाचे नियोजन, आपली पद्धती आपण तज्ज्ञांकडून तपासून घेऊ शकता. 
 या पद्धतीमुळे अभ्यासाचे ध्येय ठरवून ते वेळेत पूर्ण करता येते. स्वतःच स्वत:च्या शिक्षकाची भूमिका पार पाडून व निरंतन प्रयत्नाने यशाला खेचून आणता येते.

 r.s.khaire@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com