रसिकत्वाची ‘समृद्धी’

रसिकत्वाची ‘समृद्धी’

मनःपटलावर कोरला गेलेला ‘रानकवी’
पुणे जिल्ह्यातल्या वालचंदनगरला असताना, कळायला लागल्यापासूनच खूप चांगले सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळाले. प्रा. शिवाजीराव भोसले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अशा मान्यवरांच्या भाषणांचे सप्ताह वर्षातून किमान दोनदा तरी असायचे. शिवाय वर्षभर काही ना काही दर्जेदार कार्यक्रम चालू असायचेच. या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा मी आस्वाद घेतलाय. पण, आता मला एका वेगळ्याच कार्यक्रमाची आठवण येतेय.

बहुधा सन १९८१ असावं! माझ्या आठवणीनुसार, क्‍लबहाउसमध्ये संध्याकाळी ग. वा. बेहरे, ह. मो. मराठे या साहित्यिकांच्या भाषणांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वक्‍त्यांची भाषणं झाल्यावर आयोजकांनी ‘रानकवी यशवंत तांदळे’ यांना आमंत्रित केलं. त्यापूर्वी कधीही मी त्यांचं नाव ऐकलं नव्हतं किंवा त्यांच्या कविताही ऐकल्या नव्हत्या.

उत्सुकतेनं पाहिलं, तर श्रोत्यांच्या गर्दीतून एक धिप्पाड माणूस धोतर-सदरा, डोक्‍याला मुंडासं, हातात काठी आणि खांद्यावर घोंगडं, अशा धनगरी वेशात आला आणि चक्क माईकसमोर येऊन उभा राहिला. त्यानं थेट कविता ऐकवायला सुरवात केली आणि बघता-बघता फड जिंकला. त्यांच्या शब्दांना आणि सादरीकरणाला जमलेले सगळे रसिक श्रोते उत्स्फूर्तपणे दाद देत होते. सुमारे तासभर त्यांनी रानातल्या, गावाकडच्या, मातीतल्या कविता मोठ्या जोशात ऐकवल्या. त्या तासाभरात हातात वही घेऊन त्यांनी कविता वाचल्याचं मी पाहिलं नाही. सगळ्या कविता मुखोद्‌गत!
रानकवी तांदळे फार शिकलेले नसावेत, म्हणजे मला नीट माहिती नाही, माझा तसा अंदाज आहे. त्यांच्या कवितांचा बाज बघून, मला त्या वेळी ते ‘बहिणाबाईंच्या’ जवळचे वाटले. बेहरे आणि मराठे हे लेखकद्वय मोठ्या कौतुकानं या कवीच्या कवितींना मनापासून दाद देत होते. ‘रानकवीं’नी सादर केलेल्या कविता किती कसदार होत्या किंवा त्या कवितांचं साहित्यिक मूल्य काय होतं-याचा विचार मी त्या वेळी केला नाही. मी फक्त त्यांच्या कवितांचा आस्वाद घेतला. एक अविस्मरणीय काव्यवाचनाचा आनंद माझ्या खाती जमा झाला. आज इतक्‍या वर्षांनी देखील त्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमाची आठवण आहे. त्या कार्यक्रमानंतर ‘रानकवी’ कधीही कुठंही भेटले नाहीत. ना कधी कुठं त्यांच्याविषयी वाचनात आलं, ना कधी त्यांच्या काव्यासंदर्भात कुठे चर्चा ऐकायला मिळाली. काहीही असो, पण माझ्या मनःपटलावर मात्र ‘रानकवी’ आणि त्यांचा तो कार्यक्रम कायमचा कोरला गेला.

थोडंसं गंमत म्हणून सांगतो- त्या रात्री मला सासुरवाडीचं जेवणाचं आमंत्रण होतं. सगळे जण जेवणासाठी माझी वाट पाहत बसले होते. पण हा ‘रानकवीं’चा कार्यक्रम असा काही रंगला, की सोडून जाऊच शकलो नाही. कार्यक्रम पूर्ण झाल्यावरच मी जेवायला गेलो. आणि काही काळापुरती साऱ्यांची नाराजी ओढवून घेतली. असो! अगदी खरं सांगायचं तर, या कार्यक्रमानंतर माझी साहित्याविषयीची गोडी वृद्धिंगत झाली.
- शहाजी कांबळे, तानाजीनगर, चिंचवड.

प्राचार्यांच्या भाषणाचं अनोखं गारुड
मी सातारा जिल्ह्यातल्या कऱ्हाड इथं शिकायला होते. तेव्हा शरद ऋतुत नवरात्रीमध्ये शारदीय व्याख्यानमाला तिथे होत असत. नऊ दिवस नऊ वेगवेगळे विषय आणि वेगवेगळे वक्ते यांची भाषणे म्हणजे एक पर्वणीच असे. एक दिवस अचानक मला प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे भाषण ऐकण्याचा योग आला. तोपर्यंत मी फक्त एक उत्तम वक्ता म्हणून त्यांचं नाव ऐकलं होतं. पण त्यांना पाहण्याचा किंवा त्यांचं भाषण ऐकण्याचा योग त्या दिवशी पहिल्यांदाच आला. प्राचार्य भोसले शिवाजी महाराजांवर बोलणार होते. सभागृह अगदी तुडुंब भरलं होतं. काही रसिक श्रोते तर बाहेर पण उभे राहिले होते. अगदी ठरलेल्या वेळेवर सर व्यासपीठावर आले. त्यांची ती सावली, शांतचित्त, धीरगंभीर मूर्ती पाहून सभागृहात एकदम शांतता पसरली. त्यांनी भाषणाची सुरवात इतकी छान केली, की तो आवाज अजून माझ्या कानात घुमतोय. प्राचार्य म्हणाले, ‘‘मी आज ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहे, तिच्यात आणि माझ्यात फक्त नामसाधर्म्य आहे, बाकी काहीही साधर्म्य नाही.’’ हे वाक्‍य ते इतक्‍या मिश्‍कीलपणे म्हणाले, की लगेचच सभागृहात हास्याची लकेर उमटली. त्यानंतर अगदी त्यांच्या शेवटच्या वाक्‍यापर्यंत त्यांनी श्रोत्यांना ताब्यात घेऊन टाकलं.
शिवाजी महाराजांनी केलेल्या लढाया, त्यांनी जिकलेले किल्ले, सनावळ्या अशा गोष्टींच्या तपशिलात न जाता प्राचार्यांनी महाराजांचं कर्तृत्व, मातृभक्ती, धर्मनिरपेक्षता, स्रीदाक्षिण्य, गनिमी कावा, गुणग्राहकता, त्यांची निर्णयक्षमता, त्यांचं प्रजेवर असलेलं अपार प्रेम याविषयी इतके उत्तम मुद्दे मांडले, की सगळे श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले. प्राचार्यांची खासियत म्हणजे त्यांची ओघवती वाणी; तसंच त्यांचं नर्मविनोदी बोलणं! त्यांच्या भाषणामध्ये अखंडपणे त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे मिश्‍कील हास्य दिसत होते. एखाद्या मोत्याच्या माळेतून मोती घरंगळावेत, तसे त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडत होते. शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व किती उत्तुंग होतं आणि आपण त्यांच्या कोणकोणत्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत, हे त्यांनी आमच्या सर्वांच्या मनावर अतिशय उत्तमरीत्या ठसवलं. माझ्या मनावर तर त्यांच्या भाषणानं इतके गारुड केलं, की ‘प्राचार्य आपल्या गावात किंवा नात्यात असते तर किती बहार आली असती! आपण त्यांच्याशी अधूनमधून का होईना बोलू शकलो असतो,’ असा विचार त्या क्षणी माझ्या मनात आला. काय योगायोग पाहा, नेमकी मी लग्न होऊन फलटणला आले, तेव्हा आमच्याच कॉलनीत आमच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर प्राचार्यांचा बंगला आहे, मला असं कळलं. अगदी आमच्या कॉलनीला ‘विवेकानंदनगर’ हे नाव पण त्यांनीच दिलं आहे, हेसुद्धा मला नंतर कळलं. स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद हे त्यांचे आदर्श होते. लग्नानंतर घराजवळ त्यांना पाहिलं, तेव्हा माझी अवस्था ‘अजि मी ब्रह्म पाहिले’ अशीच झाली होती. त्यांच्या भाषणाबद्दल मी त्यांचं कौतुक केले, तेव्हा त्यांनी अतिशय नम्रपणे त्याला हसून दाद दिली होती. त्यानंतर फलटणमध्ये मी त्यांची बरीच भाषणं ऐकली आणि प्रत्येक वेळी नव्यानं भारावून गेले. खरोखरंच त्यांच्या भाषणांनी, पुस्तकांनी, त्यांच्या चरित्रानं; तसेच ‘सकाळ’मध्ये त्यांनी लिहिलेल्या ललित लेखांनी माझं आयुष्य अगदी व्यापून गेलं आहे. प्राचार्य आता आपल्यात नाहीत. परंतु, त्यांच्या ओघवत्या आणि रसाळ वाणीनं केलेलं गारूड केवळ माझ्यावरच नव्हे, तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या श्रोत्यांवर अजूनही कायम आहे.
- सुमेधा कुलकर्णी, फलटण, जि. सातारा.

‘बाप’च भेटला तेव्हा...
नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट. त्या वेळेस मी पाचव्या इयत्तेत नगर जिल्ह्यातल्या पाथर्डीमध्ये शिकत होतो. शाळेपासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर हिंद वसतिगृह होतं. तिथं आम्ही विद्यार्थी राहत असायचो.

शाळेच्या दुसऱ्या दिवशी सरांनी आम्हाला पुस्तकं वाटली. ती पुस्तकं घेतल्यावर मी वर्गात येऊन पुस्तकं चाळत बसलो. ‘बालभारती’चं पुस्तक चाळत असताना त्यामध्ये ‘बाप’ ही इंद्रजित भालेराव यांची कविता मला सापडली. ती कविता मला खूपच भावली. प्रत्येक वेळेस मराठीचं पुस्तक वाचण्याची सुरवात ‘बाप’ या कवितेनंच करायला लागलो. तो कवीही मला मोठा वाटायला लागला. या कवीला प्रत्यक्ष भेटावसं वाटायला लागलं.

एकदा वसतिगृहाच्या प्रांगणात सायंकाळची प्रार्थना चालू असताना चार व्यक्ती आम्हा विद्यार्थ्यांच्या समोर येऊन उभ्या राहिल्या. सरांनी त्यांना बसण्यासाठी खुर्च्या पाठवल्या आणि ते सगळे पाहुणे आम्हा मुलांसमोर बसले. सरांनी त्यातल्या एकांची ओळख करून दिली, तेव्हा मला आश्‍चर्याचा धक्काच बसला. कारण आम्हा विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी प्रत्यक्ष ‘बाप’ कवितेचे कवी इंद्रजित भालेराव आले होते. दुसरीकडं कार्यक्रमाला जात असताना ते मुद्दामहून आमच्या वसतिगृहाकडं वळले होते. त्यांना पाहून माझ्या आनंदाला पारावारच उरला नाही. माझं स्वप्न पूर्ण झालं होतं.
भालेराव यांनी मुक्तपणे आमच्याशी संवाद साधला. ‘बाप’ कविता त्यांनाच म्हणून दाखविण्याचे मला भाग्य मिळालं होतं. त्यांनी पण माझं कौतुक केले. नंतर ‘बाप’ कविता त्यांनी त्यांच्या चालीत म्हणून दाखवली. सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसत होता.

कित्येकदा अभ्यासक्रम बदलला, तरी ‘बाप’ कविता का बदलत नाही, असा प्रश्‍न इतर साहित्यिकांनी भालेराव यांना केला. त्या वेळेस भालेराव यांनी जे उत्तर दिले, त्यावर सगळ्या मुलांमध्ये हशा पिकू लागला. ते म्हणाले, ‘‘बाप कधी बदलतो का?’’
वसंतामध्ये कोकिळेच्या गाण्यांची मैफल रंगावी तसा तो क्षण रंगला होता. त्या दिवसापासून मला साहित्याची आवड निर्माण झाली. मी स्वतः कविता करू लागलो. इंद्रजित भालेराव यांनी आम्हांबरोबर घातलेला एक तास इतक्‍या वर्षांनंतरही मला कालचाच वाटतो.
- सतीश घुले , मु. काटेवाडी,
पो. खरवंडी (कासार), ता. पाथर्डी, जि. नगर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com