रसिकत्वाची ‘समृद्धी’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

‘राम होऊनी राम गा रे’

‘राम होऊनी राम गा रे’
साधारणतः पंचवीस वर्षांपूर्वीचा हा प्रसंग. साताऱ्यातल्या समर्थ सदन या वास्तूत दर वर्षी साताऱ्यातले प्रसिद्ध चित्रपटनिर्माते आणि करसल्लागार अरुण गोडबोले पंडित प्रभाकर कारेकर यांच्या गायनाची मैफील आयोजित करायचे. ही मैफील दर वर्षी सप्टेंबर महिन्यात न चुकता समर्थ सदनमध्ये व्हायची. सलग तीस-पस्तीस वर्षं हा उपक्रम सुरू होता. अतिशय शांत आणि पवित्र वातावरण असलेली समर्थ सेवा मंडळाची ही वास्तू साताऱ्यातल्या लोकांसाठी श्रद्धेचं ठिकाण आहे. तिथं असलेल्या समर्थ रामदासस्वामींच्या प्रसन्न मूर्तीच्या दर्शनानं मन तृप्त होतं. अशा वातावरणात अभंग, भक्तिसंगीत, नाट्यपदं आणि तीसुद्धा पंडितजींच्या आवाजात ऐकणं म्हणजे मोठी मेजवानीच असायची.

महाविद्यालयात शिक्षण घेत असताना देवेंद्र पुरंदरे या मित्रासोबत एके वर्षी या मैफलीला जाण्याचा योग आला. अनेक वर्षं झाली; पण ते सूर अजूनही कानात गुंजत आहेत. कोणत्याही प्रकारचा बडेजाव न करता अतिशय साध्या पद्धतीनं कार्यक्रमाची सुरवात झाली. प्रास्ताविक वगैरे झालं आणि त्यानंतर पंडितजींनी गायला सुरवात केली. रागदारीच्या सादरीकरणानं त्यांनी उपस्थितांची मनं जिंकून घेतली. त्यानंतर अभंग आणि भक्तिगीतांचं सादरीकरण सुरू झालं. पंडितजींचा अनुनासिक आणि मधाळ स्वर, त्याला हार्मोनिअम आणि तबल्यावर तेवढ्याच ताकदीची साथ यामुळे मैफील एका वेगळ्याच उंचीवर पोचली. एका विशिष्ट क्षणी त्यांनी ‘राम होऊनी राम गा रे’ हे भक्तिगीत गायला सुरवात केली आणि सर्व जण रोमांचित झाले. ‘राम होउनी राम गा रे - रामासी शरण निघा रे’ हे त्यांचे भावपूर्ण शब्द समर्थ सदनात अक्षरशः भरून गेले आणि सर्व उपस्थित लोक भक्तिभावात डुंबून गेले. श्रोत्यांसाठी ते फक्त  गाणं नव्हतं, तर रामरायाला संपूर्ण जीवन वाहिलेल्या समर्थ रामदासस्वामींच्या साक्षीनं हा अभंग ऐकणं म्हणजे दुग्धशर्करा योग होता. त्या मैफलीत पंडितजींनी वेगवेगळी भक्तिगीतं आणि नाट्यगीतं गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. मैफल संपली, श्रोते बाहेर पडले; पण त्यांच्या मनात ‘राम होऊनी राम गा रे’ हेच गीत रेंगाळत होतं.
त्यानंतर नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झाल्यानंतर ज्या ज्या वेळी समर्थ सदनमध्ये जाण्याचा मला योग आला, त्या त्या वेळी तेथे प्रवेश केल्याबरोबर ‘राम होऊनी राम गा रे’ हेच गाणं कानामध्ये ऐकू येतं. त्याचप्रमाणं आकाशवाणीवर भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात ज्या ज्या वेळी हे गाणं कानी पडतं, तेव्हा समर्थ सदनमधल्या त्या मैफिलीची आठवण होते. एखादी भक्तिपूर्ण रचना उत्कट भावनेनं सादर केली, तर ती श्रोत्यांसाठी आयुष्यभरासाठी आठवण ठरू शकते, याचंच हे मूर्तिमंत उदाहरण.
- डॉ. वीरेंद्र ताटके, पुणे

-----------------------------------------------------------------------------------------
सर्वथा आवडी...‘दूर्वांची जुडी’

आजही माणिक वर्मांच्या आवाजातलं ‘निघाले आज तिकडच्या घरी’ हे गाणं ऐकलं, की मला ‘वाहतो ही दूर्वांची जुडी’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची आणि नाटकातल्या प्रेमळ ‘ताई’ची भूमिका करणाऱ्या, आजच्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांची आठवण येते. सांगली इथल्या भावे नाट्य मंदिरामध्ये १९ जून १९६४ रोजी बघितलेला हा पहिला प्रयोग अजूनही डोळ्यांसमोर उभा राहतो. बाळ कोल्हटकरांचं हे नाटक. ‘निघाले आज तिकडच्या घरी’ हे गाणं त्यात रेकॉर्डवर वाजवलं होतं. भालचंद्र पेंढारकर यांच्या उपस्थितीत नाट्यमंदिर या संस्थेनं हे नाटक सादर केलं होतं.
पहिला प्रयोग हाउसफुल झालच; शिवाय लोकाग्रहास्तव झालेले नंतरचे दोन्हीही प्रयोग हाऊसफुल गेले.

वाईच्या देवधर कुटुंबातल्या बहीण-भावाची आणि प्रतिष्ठित वकील असलेल्या त्यांच्या वडिलांची ही गोष्ट. इंग्रजी चौथीपर्यंत हुशार आणि कवीमनाच्या आईवेगळ्या थोरल्या भावाची- सुभाषची भूमिका स्वतः बाळ कोल्हटकर यांनी, तर थोरल्या भावाचे सगळे गुन्हे पाठीशी घालणाऱ्या ताईची भूमिका आशा काळे यांनी केली होती. सुभाषला नादी लावून बिघडवणाऱ्या, जुगारी अशा रंगरावाची भूमिका शंतनूराव राणे यांनी केली होती. ‘लाइफमध्ये अँबिशन पाहिजे’ असं म्हणणारा आणि सरकारी परीक्षा देत साध्या कारकुनापासून ‘टेंपररी मामलेदार’ या पदापर्यंत पोचलेला, सुभाषचा लहानपणापासूनचा मित्र बाळू आपटे हे पात्र रंगवलं होतं गणेश सोळंकी यांनी. ताईचं लग्न होऊन ती सासरी जायला निघतेवेळी सगळ्यांचा निरोप घेत घेत, डोळ्यांत पाणी आलेल्या भावासमोर येते तेव्हा,
येते भाऊ, विसर आजवर जे काही बोलले
नव्हते आई तरीही थोडी, रागावून वागले
थकले आपुले बाबा आता, एकच चिंता उरी
निघाले आज तिकडच्या घरी

हे गीताचं शेवटचं कडवं रेकॉर्डवर वाजत असतं. तो प्रसंग आजही डोळ्यांसमोर उभा राहतो.
हे नाटक लिहिण्यासाठी बाळ कोल्हटकर यांना, त्यांचे स्नेही चारुदत्त सरपोतदार यांनी ‘पूना गेस्ट हाऊस’मध्ये स्वतंत्र खोली राहायला दिली होती. या गाजलेल्या नाटकाला यंदा पन्नास वर्षं पूर्ण झाली. मात्र, पहिल्या प्रयोगाचं मनातलं स्थान पक्कं आहे.
- सुभाष कौलगेकर, पुणे

-----------------------------------------------------------------------------------------
एकच ‘तारा’ समोर आणिक...  

फोनची घंटा वाजते आणि आपल्या कानावर शब्द पडतात- ‘हॅलो, मी ताराबाई मोडक बोलतेय.’ पडदा सरकतो. साधी पांढरी साडी, शांत चेहऱ्याची व्यक्ती आपल्यासमोर येते आणि आपण त्यांच्या बोलण्यात गुंगून जातो. जणू काही प्रत्यक्ष ते सगळं अनुभवतोय असं होतं. आपणच रंगमंचावर वावरतोय हे जाणवू लागतं. जवळ जवळ अडीच तास ताराबाई मोडकांचं आयुष्य आपल्या पुढं जणू उभं राहतं.

...कुंदाताई वर्तक यांनी सादर केलेला हा कार्यक्रम. त्याचं नावच ‘मी ताराबाई मोडक बोलतेय.’ पुण्यातल्या टिळक स्मारक मंदिरात ३१ ऑगस्ट २०१४ रोजी हा कार्यक्रम बघितला होता. त्या कार्यक्रमानं मी भारावून गेले होते. आजही त्याची आठवण पक्की आहे. रंगमंचावर अखंड अडीच तास एकटीनं सादरीकरण सोपं नाही. त्या त्या प्रसंगातून प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर प्रत्येक घटना कुंदाताईंनी जशीच्या तशी साकारली. त्यांनीच या कार्यक्रमाचं लेखन आणि सादरीकरण केलं होतं. १९८८ पासून नूतन बाल शिक्षण संघाच्या चिटणीसपदी असणाऱ्या आणि संस्थेच्या आधारस्तंभाच्याही पलीकडच्या या कुंदाताई.

लहानग्या लेकीच्या भवितव्याचा विचार करून घर सोडून लांब नोकरीवर ‘कोसबाड’ला रुजू झालेली आई म्हणजे ताराबाई. तिथंच गिजुभाईंनी दिलेल्या प्रोत्साहनानं बाल विकास क्षेत्रात चिंतन-प्रयोगशीलता करण्याच्या विचारानं त्या कार्यात उडी घेतली. बरोबर अनुताई वाघ होत्याच. आदिवासींमध्ये शिक्षणाची ही गंगा पोचवण्याच्या कामाला सुरवातच मुळी त्यांच्या वस्त्यांवर-पाड्यांवर जाऊन त्यांना शिकायला प्रवृत्त करण्यापासून होती. आदिवासी मुलांना स्वच्छतेचे, शिकण्याचे धडे देणं सोपं काम नव्हतं. सुखसोयींपासून लांब जंगलात जाणं, कष्टाचं, श्रमाचं आयुष्य स्वीकारणं धाडसाचंच. ताराबाईंनी ते धाडस केलं. शिक्षणाचा पाया मुळाक्षरं गिरवण्यापूर्वीच मानसिकदृष्ट्या सर्वतोपरी तयार केला, तरच पिढी व्यवस्थित होऊ शकते, असं त्यांचं मत होतं. अडीच ते सहा वयोगटाच्या सूक्ष्म रूपातल्या ऊर्जेचा योग्य तो वापर अभ्यासाद्वारे करून अमलात आणला. या सगळ्याचं फळ म्हणजे बालवाडी- ‘नूतन बाल शिक्षण संघ.’

कुंदाताईंनी हा सगळा प्रवास डोळ्यांसमोर उभा केला. बहात्तराव्या वयात या बहुआयामी व्यक्तित्त्वानं ताराबाईंच्या विशाल, शब्दातीत कार्याचा आलेख मांडला. तो इतका प्रत्ययकारी होता, की मी आजतागायत भारावलेली आहे.
- ज्योती काळे, पुणे
-----------------------------------------------------------------------------------------

Web Title: readers participation

फोटो गॅलरी