रसिकत्वाची ‘समृद्धी’

रसिकत्वाची ‘समृद्धी’

बाबूजींच्या वत्सल स्नेहानं तृप्त झालं आयुष्य
जो रसिकत्वाच्या ‘समृद्धी’विषयीचा अनुभव आहे तो विख्यात दिवंगत संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजींविषयीचा.
लहानपणापासूनच मी बाबूजींच्या गाण्यांची चाहती होते. श्रीरामपूरजवळच्या डहाणूकर साखर कारखान्याच्या छोट्याशा वसाहतीत माझा जन्म झाला व बालपणही तिथंच गेलं. गाणी ऐकण्यासाठीचं त्यावेळचं एकमेव माध्यम म्हणजे रेडिओ; पण तेव्हा आमच्याकडं तोही नसल्यानं शेजाऱ्यांकडं मैत्रिणींकडं जाऊन मी गाणी ऐकायची. बाबूजी व गजानन वाटवे हे माझे आवडते गायक. अनेक गाणी मी वह्यांमध्ये लिहून ठेवायची मला सवय होती.

गाणी ऐकण्याची आणि गाणं शिकण्याची माझी आवड पाहून वडिलांनी पतपेढीचं कर्ज काढून माझ्यासाठी रेडिओ आणला. ही गोष्ट सन १९५५-५६ मधली. तेव्हा दर शनिवारी सकाळी साडेआठ वाजता रेडिओवर गीतरामायण  प्रसारित होत असे. मी ऐकतानाच ते वहीत टिपून घ्यायची व नंतर चाल लक्षात ठेवून गाण्याचा प्रयत्न करायची. कारण, तिथं शिकवणारं कुणी नव्हतं. एकदा गणेशोत्सवात बाबूजींच्या गीतरामायणाचा कार्यक्रम होणार असल्याचं समजलं. मला अतिशय आनंद झाला. बाबूजींच्या तोंडून प्रत्यक्षात गीतरामायण ऐकून कान-मन तृप्त झालं. मध्यंतरात माझ्या मैत्रिणीच्या आईनं - लीलाताई जोशी यांनी - हाक मारून मला बोलावलं व मला घेऊन त्या स्टेजच्या मागच्या बाजूला गेल्या. तिथं बाबूजी होते. त्यांना लीलाताई म्हणाल्या ः ‘‘अरे राम, (सुधीर फडके अर्थात बाबूजींचं मूळ नाव. लीलाताई त्यांची बालमैत्रीण होत्या) ही आमच्या ज्योतीची मैत्रीण. तिला गाण्याची आवड आहे. तिचा गळा गोड आहे. तुझ्या गाण्यांची चाहती आहे.’’ बाबूजींना खाली वाकून नमस्कार केला. त्यांनी माझं नाव विचारलं. मी म्हटलं ः ‘‘आशा प्रधान’’ त्यावर हसून ते म्हणाले होते ः ‘‘काय गोड नाव आहे गं तुझं. गाणं शीक. नाव मिळव संगीतात!’’ योगायोग किती गमतीदार असतात पाहा...त्यानंतर १९६४ ला मी पुण्याला सीपीएड अभ्यासक्रमासाठी आले. टिळक रस्त्यावरच्या ‘शिंदे स्पोर्टस’च्या मालकांशी - सुप्रसिद्ध खेळाडू दत्ता शिंदे यांच्याशी- माझा परिचयोत्तर विवाह झाला. तेव्हा समजलं की ‘शिंदे स्पोर्टस’ हे दुकान ज्या इमारतीत आहे, ती ‘चित्रकुटी’ इमारत बाबूजींची आहे. त्यांना भेटायची इच्छा मी व्यक्त केली, तेव्हा यजमान म्हणाले ः ‘‘बाबूजींचा ब्लॉक वर आहे. ते नेहमी मुंबईला राहातात. इथं काही कारणांनी अधूनमधून येतात. आल्यावर ओळख करून देईन.’’ एक दिवस बाबूजी आल्यावर यजमानांनी ओळख करून दिली. श्रीरामपूरला गणेशोत्सवात आपली भेट झाली होती, हे या वेळी आनंदाच्या भरात त्यांना सांगायचं राहूनच गेलं. मग पुढं बाबूजी आणि त्यांच्या पत्नी विख्यात गायिका ललिताबाई यांच्याशी कौटुंबिक संबंध निर्माण झाले. ‘ते घरमालक व आम्ही भाडेकरू’ असं आम्हाला कधी जाणवलंच नाही. पुण्याला आल्यावर रिक्षा/गाडीतून उतरल्यावर वर आपल्या घरी ब्लॉकमध्ये जाण्यापूर्वी बाबूजी आमच्या दुकानात येत व आमची आपुलकीनं विचारपूस करूनच जात असत.

पुण्यात बाबूजींशी ओळख झाल्यापासून सतत वाटायचं की त्यांच्याकडून गाणं शिकावं; पण ती संधी म्हणा, योग म्हणा कधी आलाच नाही. संसार, घर-मुलं यातच मी गुरफुटून गेले; पण पुण्यातले त्यांचे असंख्य कार्यक्रम अगदी मनसोक्तपणे ऐकले. सध्या मी ७४ व्या वर्षी मी सुगम संगीत शिकत आहे!
१९८६ मध्ये ‘शिंदे स्पोर्टस’चा रौप्यमहोत्सव झाला. त्या वेळी बाबूजी-ललिताबाईंच्या हस्ते दुकानात श्रीसत्यनारायणाची पूजा केली. त्या वेळी ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चित्रपटाच्या कामात अतिशय व्यग्र असत. असं असूनही केवळ आमच्यावरच्या प्रेमाखातर खास पूजेसाठी दोघंही मुंबईहून आले होते. एवढंच नव्हे; तर माझ्यासाठी साडी व यजमानांसाठी शर्ट-पॅंट पीस घेऊन आले होते.

२२ जुलै २००२ रोजी आम्ही दोघं धाकट्या मुलाकडं -अजितकडं- कॅनडाला निघालो होतो. नेमके त्याच वेळी बाबूजींची पुण्यात भेट झाली. आम्ही सहा महिन्यांसाठी कॅनडाला जात असल्याचं ऐकून त्यांनी आम्हा दोघांना जवळ घेतलं. खांद्यावर हात ठेवून म्हणाले ः ‘‘मुलाकडं आनंदानं राहून परत या.’’ ‘सावरकर’ चित्रपट पूर्ण झाल्यामुळं बाबूजी अतिशय समाधानी होते, तरी शरीरानं थकत चाललेले होते. दरवर्षी २५ जुलैला त्यांच्या वाढदिवशी सकाळीच फोन करून मी त्यांना शुभेच्छा द्यायची. मी त्यांना त्या दिवशी म्हणाले ः ‘‘या वर्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आत्ताच देते.’’ त्यावर ते पटकन म्हणाले होते ः ‘‘ ‘सावरकर’ चित्रपट पूर्ण झाला आहे. आता कसली चिंता, कसली इच्छा नाही. खूप थकलोय मी. तुम्ही कॅनडाहून येईपर्यंत काय होईल ‘राम’ जाणे!’’ आमचे डोळे भरून आले. कॅनडाला जाताना बाबूजींच्या मराठी गाण्यांची कॅसेट मी बरोबर नेली होती. तिथं गेल्यावर त्यांच्या वाढदिवशी ती लावली तर गाणं लागलं ः ‘अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती.’ मी गाणं लगेच बंद केलं. ता. २९ जुलैला माझ्या भाच्यानं कळवलं ः ‘बाबूजी गेले’ बातमी ऐकून आम्हाला अश्रू अनावर झाले. बाबूजींनी म्हटल्याप्रमाणे पुण्यातली ती त्यांची आणि आमची शेवटचीच भेट ठरली.

बाबूजी आणि ललिताबाई हे दोघंही आज हयात नाहीत; पण ४५ वर्षे ललिताबाईंचा व ३७ वर्षं बाबूजींचा आम्हाला लाभलेला सहवास, आठवणी आजही ताज्या आहेत. गोड गळा लाभलेल्या ललिताबाईंनी स्वतःच्या संसारासाठी केलेला गाण्याचा त्याग माझ्या डोळ्यांसमोर होता. त्यामुळं मला गाणं शिकायला मिळालं नाही तरी, अपघातानं का होईना, यशस्वी उद्योजिका झाल्याचं समाधान मला मिळालं. बाबूजी-ललिताबाई मला अगदी त्यांच्या घरच्यासारखं- मुलगीप्रमाणं वा बहिणीप्रमाणं- वागवत असत. त्यांचे पुत्र, सुप्रसिद्ध गायक-संगीतकार श्रीधर फडके हेदेखील मला मावशी अशीच हाक मारतात.

बाबूजींच्या पुण्यातल्या इमारतीत असलेल्या दुकानात क्रीडासाहित्यविक्रेती म्हणून मला आयुष्य घालवावं लागेल याची पुसटशीही कल्पना मला श्रीरामपूरमधल्या त्यांच्या त्या पहिल्या भेटीत आली नव्हती. योगायोग हे अनेकदा कल्पनातीत आणि सुंदर असतात, ते असे!
- आशा शिंदे, पुणे.

पंडितजींचं ते पहिलंच अन्‌ अखेरचंही दर्शन...
मनाच्या कुपीत आपण अनेक भल्या-बुऱ्या आठवणी जपून ठेवलेल्या असतात. त्यातलीच ही एक छानशी आठवण.
आमच्या घरात माझा दादा, माझा भाचा असे सगळेच जण संगीतप्रेमी. पुण्याला महाविद्यालयात शिकत असताना न चुकता दादा आणि त्याचे मित्र ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ला हजेरी लावत असत. त्यांच्या तोंडून महोत्सवाचं, गायकांचं वर्णन ऐकायला मिळायचं. शेवटच्या दिवशी पंडित भीमसेन जोशी यांचं गाणं सकाळी सहा वाजता सुरू होऊन नऊ वाजता संपायचं. श्रोते-रसिक त्यात इतके रंगून जात, की ‘कार्यक्रम संपला’ असं अखेर जाहीर करावं लागायचं तेव्हा रसिक उठायचे, असं ते वर्णन असे. ते ऐकून, महोत्सवातल्या कार्यक्रमांविषयी वाचून ‘आपणही एकदा भीमसेन जोशी यांचं गाणं ऐकायला जावं,’ असं वाटायचं; पण पाचोऱ्याहून खास त्यासाठी जाणं कधीच जमलं नाही. निवासाचाही प्रश्‍न होता.

मात्र, ‘नामाचा गजर’, ‘एरी माई आज’, ‘इंद्रायणी काठी’, ‘कान्होबा तुझी घोंगडी’ ही पंडितजींची भजनं-अभंग, त्यांच्या ठुमऱ्या, राग तोडी अन्‌ ‘जो भजे हरी को सदा’ ही भैरवी ऐकून ऐकून जवळजवळ पाठच झालेली होती. त्यांचा तो पहाडी, धबधब्यासारखा आवाज सीडीतून कानावर सतत पडत असे.

अखेर २०१० मध्ये ‘सवाई’ला जाण्याचा योग आला. महोत्सवाला गेलो अन्‌ थोड्याच वेळात उद्‌घोषणा झाली ः ‘पंडित भीमसेन जोशी रंगमंचावर येत आहेत...’ प्रकृतिअस्वास्थ्यामुळं त्यांना चाकांच्या खुर्चीवरून मंचावर आणण्यात आलं होतं. त्यांचं आगमन होताच मंडपातले श्रोते उठून उभे राहिले. नंतर पंडितजी शांतपणे म्हणाले ः ‘हा महोत्सव सुरू ठेवा.’ त्यांचे ते दोन शब्द कानावर पडले. प्रत्यक्षात त्यांचं पद्य ऐकायला नाही मिळालं; पण निदान गद्य तरी कानावर पडलं. त्यांना पाहून डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. ‘स्वरभास्करा’चं दर्शन झालं अन्‌ त्याक्षणी कृतकृत्यतेची भावना मनात दाटून आली. मन भरून आलं. त्यानंतर काहीच दिवसांनी २४ जानेवारी २०११ रोजी बातमी कळली ः ‘पंडित भीमसेन जोशी यांचं निधन.’ झालेलं ते त्याचं पहिलंच अन्‌ अखेरचंच प्रत्यक्ष दर्शन...दीर्घ काळ स्मरणात राहणारं....
- सुधा जोशी, पाचोरा, (जि. जळगाव)

मनाला चिंब करून गेला तो अलौकिक मेघमल्हार
सन १९८२ चा शरद ऋतू. एक-दोन दिवसांपूर्वीच घरोघरी नवरात्राची घटस्थापना झालेली. त्या वेळी सार्वजनिक सणांचा सवंग, दिखाऊ बाजार झालेला नव्हता...तेव्हा रस्तोरस्ती, गल्लोगल्ली ध्वनिप्रदूषण करणारे डीजे, लाउडस्पीकर लागलेले नसतं! लहानपणापासूनच संगीतप्रेमी...कानसेन. विशेषतः अभिजात शास्त्रीय संगीताची चाहती. दरवर्षीच्या सवाई गंधर्व महोत्सवाला आणि इतर खासगी मैफलींनाही आवर्जून हजेरी लावत असे.

पंडित जसराज यांच्या सायंकालीन रागाच्या मैफलीची जाहिरात एकदा वृत्तपत्रात पाहिली. सोबतीची चाचपणी केली तर नेमकंच घरी-दारी किंवा मित्र-मैत्रिणींपैकी कुणीच रिकामं नव्हतं. म्हटलं, एकटंच जावं. प्रत्यक्ष मैफलीत पोचल्यावर सुरांचीच तर संगत असते! पुण्यातल्या त्या मैफलीला भरपूर गर्दी होती.

सुरवातीपासूनच जसराजजींचा आवाज छान लागला होता. डोळे मिटून गाणं ऐकताना वाटत होतं, की जसराजजी माझ्या एकटीसाठीच गात आहेत! ज्यांनी ज्यांनी डोळे मिटून गाणं ऐकलं असणार, त्या प्रत्येकाला त्या दिवशी तसंच वाटलं असणार...मध्यंतरानंतर राग मुलतानी सुरू होता. तेवढ्यात अचानक बाहेरून ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट ऐकू येऊ लागला. हस्त नक्षत्राचं ते वादळ कार्यक्रमस्थळाला बाहेरून झोडपून काढत होतं. त्यातच अचानक वीजही गेली.
मात्र, अंधाराचं वास्तव पंचेद्रियांनी सहज स्वीकारलं; कारण जसराजजींचं गाणं थांबलंच नव्हतं. अंधाराचं दाट पटल ओलांडून जवारीदार तंबोऱ्यांचा संततनाद येत होता. तबल्याची लयकारी सुरूच होती आणि त्या सगळ्यामधून तरंगत येणारी जसराजजींची स्वरबरसात! एखाद्या सोन्याच्या मुशीमधून कशीदाकामासाठी शुद्ध सोन्याची बारीक तार काढावी, तसा तो स्वर रोमांचित करत होता.

अशी केवळ दोन-पाच मिनिटंच गेली असतील. लगेच जनरेटर सुरू होऊन ध्वनिवर्धक ‘जिवंत’ झाले. श्रोते अद्याप अंधारातच होते; पण पंडितजींचं स्वरगारुड अंधाराचा कानाकोपरा व्यापूनही दशांगुळं उरत होतं. मुलतानी संपला आणि जसराजजींच्या तोंडून प्रश्‍न उमटला ः
‘‘अब क्‍या गाऊँ?’’
त्या अंधारातूनच कुणीतरी उत्तरलं ः ‘‘अब मेघमल्हार गाइए।’’
त्यावर ते म्हणाले ः ‘‘क्‍या मेघमल्हार गाऊँ? उमडघुमडकर घटा छाई है। बादल गरज रहे हैं...बरस रहे हैं। चलो, मेघमल्हारही सही ।’’
‘मेघमल्हार’चं विलंबित संपून द्रुत सुरू होईपर्यंत कधीतरी वीज आली, तेव्हा हॉलमधल्या कित्येक डोळ्यांमधून मेघमल्हार बरसत होते! भैरवी होऊन गाणं संपलं तेव्हा सुमारे साडेआठ-पावणेनऊ झाले होते. पावसाचं थैमान थोडं उणावलं होतं; पण थांबलं नव्हतं. कर्वे रस्त्यावर असंख्य रिक्षा उपलब्ध होत्या. घरी पोचायला फारतर १५ मिनिटं पुरली असती; पण त्या अंधारातल्या ‘मेघमल्हारा’चं एवढं गारुड होतं मनावर, की वाटलं या क्षणी आपण एकटंच असावं. रिक्षासाठीही एका वाक्‍याचासुद्धा संवाद नको. रिमझिमत्या पावसात सचैल भिजत घरी पोचायला साडेनऊ झाले. ते सुरेल नखशिखान्त भिजणं इतकं हवहवंसं होतं, की हे सगळं लिहितानाही ते रोमांचित करून गेलं!
- कालिंदी पराडकर,
भिगवण रोड, जळोची-बारामती (जि. पुणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com