वाचकसहभाग: रसिकत्वाची ‘समृद्धी’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 डिसेंबर 2016

या मैफलीवर ‘शतदा प्रेम करावे’

या मैफलीवर ‘शतदा प्रेम करावे’
नारायणगावच्या एलआयसी ऑफिसवरच्या गॅलरीत एका अनोख्या कोजागरीची रंगलेली रात्र मनात अजूनही दरवळतेय. आठवणीनंच आनंदफुलं फुलविणाऱ्या या रात्रीनं मनाचा कोपरा सदैव भरलेला आहे. ‘‘रात्री नऊ वाजता मंगेश पाडगावकरांची कवितांची मैफल आहे,’’ असा संतोष सोमवंशीचा फोन आला. मी त्याला पुनःपुन्हा विचारून खात्री केली. बरोबर नऊ वाजता या मैफलीचं अनौपचारिक प्रास्ताविक होऊन कार्यक्रम सुरू झाला. सुरवात ‘सांग, सांग भोलानाथ’ या कवितेनं झाली. लहान मुलाच्या निरागसतेनं भोलानाथचा जीवनानुभव देऊन कविता संपली. एक ७५ वर्षांचा चिरतरुण सात-आठ वर्षांचा बालक झाला. चष्म्याआडून लुकलुकणारे डोळे अजून आठवतात. ‘जिप्सी’ची मुशाफिरी, ‘सलाम’चा आगळा आविष्कार, नंतर ऐन तारुण्यातला बहर अनुभवायला लावणारी ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ ही कविता. ती नजाकतता, तो प्रेमाचा मिस्कीलपणा सगळं त्यांच्या कवितेतून साकार होत होतं. हळूहळू चंद्रप्रकाशानं वातावरण उजळून निघालं. त्या धुंद चांदण्यात पन्नास-साठ लोक अक्षरशः धुंदावलेले होते. शब्दोत्सव रंगत चालला होता. बरोबर दहा वाजता ‘शुक्रतारा मंद वारा’ या कवितेचं वाचन सरांनी सुरू केलं. शब्दलडी हळुवार उलगडणाऱ्या संगीतकार यशवंत देवांच्या चालीतला अरुण दातेंचा आवाज मनःप्रांगणात घुमू लागला. त्या भारावलेल्या वातावरणाचा आनंदोत्सव शब्दांत मांडताच येणार नाही. सरांचा आवाज, चंद्राचं चांदणं आणि आम्ही भारावलेले निःशब्द श्रोते. भातुकलीचा खेळ खेळताना डाव अर्धा राहिल्याची हुरहूर, श्रावणात अखंड धारांनी बरसणारा घननीळ... किती तरी कविता त्या वातावरणात धुंदावल्या. सर अखंड कविता वाचन करत होते. आम्ही फक्त शब्द सरोवरात चिंब भिजत होतो. या मैफलीत कोणतीच औपचारिकता नव्हती. रंगमंच नाही. स्पीकर नाही. इमारतीची गच्ची, आकाश मंडप- त्यात लक्षावधी नक्षत्रदीपांचा धुंद प्रकाश, पूर्ण चंद्रबिंबांनी धुंदावलेली रात्र, तो खुला रंगमंच काय, काय वर्णू? ‘सांगा कसं जगायचं’ सांगत सरांनी एक जगण्याचं तत्त्वज्ञान हळुवार उलगडलं. ‘दिवस तुझे हे फुलायचे’मध्ये सरांनी झोपाळ्यावाचून झुलायला शिकवलं. नात्यांची वीण उलगडता-उलगडता ‘दोन दिवसांची रंगत संगत’ म्हणत मिस्कीलीनं ‘तुमचं आमचं सेम असतं’ सांगून आम्हाला त्यांच्या पातळीवर नेलं. आम्ही तितके महान नसताना काही क्षण खरोखरच भाग्यवान ठरलो. या मैफलीचा कळसाध्याय ‘अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी’ हे भावगीत. किती गीतं मनाच्या कोंदणात आता या क्षणीसुद्धा रुंजी घालत आहेत.

जीवनात येणाऱ्या प्रत्येक कोजागिरीला एक अनामिक गोडी मनाच्या कुपीत ओतप्रोत भरून राहिली आहे. कधीही न विसरणारी.
- सौ. सुरेखा भालेराव, नारायणगाव, जि. पुणे.

---------------------------------------------------------------------
प्रभाकर पणशीकरांच्या अभिनयाचं गारूड
साधारणतः तीस वर्षांपूर्वीचा हा प्रसंग आहे. विद्यार्थीदशेत असताना दशावतार, क्‍लबची नाटकं आणि भारुडातली नाट्यं पाहण्याचा छंद जडला; पण प्रत्यक्ष नाट्यगृहांत जाऊन नाटक पाहण्याचा कधी योग आला नव्हता. वर्तमानपत्रातल्या नाटकांच्या जाहिरातींतले कलाकार आणि त्यांची रंगभूषा पाहून नाट्यगृहात जाऊन नाटक पाहण्याचा मोह होत होता; पण योग काही केल्या येत नव्हता. बारावीचं वर्ष होतं. दादरला क्‍लास लावला होता. शिवाजी नाट्यमंदिरासमोरून रोज जाणं-येणं होई. रसिकांची गर्दी आणि त्यांच्या तोंडून नाटकांची रसभरीत वर्णनं, मतं कानावर पडत. मराठी रंगभूमीवर त्या वेळी ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकाचे प्रयोग प्रचंड गर्दी खेचत होते. नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकरांचा औरंगजेब ज्याच्या-त्याच्या तोंडी झाला होता.

एक दिवस खिशातल्या साठवलेल्या पैशांचा विचार करून सर्वांत शेवटच्या रांगेतलं स्वस्तातील तिकीट खरेदी केलं. तिकीट दाखवून नाट्यगृहाच्या जादुई नगरीत पाऊल टाकलं... गार हवा, मंद प्रकाशात समोर मखमली पडदा नजरेस पडला. तिसरी घंटा झाली. निवेदकाच्या आवाजानं स्वागत केलं. अगरबत्ती, धुपाचा सुवास सभोवती दरवळत होता. पडदा उघडला. औरंगजेबाच्या दरबाराचा पहिला प्रसंग सुरू झाला. ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण माझ्यासमोर साकार झाला. लांबलचक शुभ्र दाढी लावलेले औरंगजेबाच्या भूमिकेतले प्रभाकरपंत रंगमंचावर प्रवेश करते झाले. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. औरंगजेब खर्जाच्या आवाजात असदखानांसोबत बोलू लागला. ‘‘मौलवीजी, बादशाही तख्ताविरुद्ध बंड पुकारणाऱ्या शहजाद्याशी... याने की शहजादा अकबराशी आम्ही काही दगाबाजी केली तर कुराण शरीफप्रमाणे तो गुन्हा तर होणार नाही ना?’’

पुढचे तीन तास एका जादुई वातावरणात कसा ओढला गेलो, ते कळलंच नाही. वसंत कानेटकराचं लेखन, पुरुषोत्तम दारव्हेकराचं दिग्दर्शन आणि फिरता रंगमंच... उत्तम कलाकारांच्या अप्रतिम अभिनयानं माझ्या मनावर जे गारुड केलं, ते आजपर्यंत आहे तसंच आहे. विशेषतः प्रभाकरपंतांचा औरंगजेब कायमचा लक्षात राहिला... पहिलंच नाटक मी असं पाहिलं होतं की, त्यानं माझ्यातल्या कलाकाराच्या प्रतिभेला जाग आणली... किती तरी दिवस मी ‘इथे ओशाळला मृत्यू’नं अगदी झपाटून गेलो. नाटक पाहण्याचा छंदच जडला...आणि मोठ्या महाविद्यालयात गेल्यावर मीही नाटकाच्या दुनियेत अभिनय आणि लेखन करण्यासाठी ओढला गेलो हे माझं मलाच कळले नाही.
प्रभाकर पणशीकर एक चतुरस्र अभिनेते होते. त्यांची देहबोली, आवाज आणि सफाईदार अभिनय आजही डीव्हीडीच्या रूपात मी संग्रही ठेवला आहे.

नाटकाच्या अखेरीस औरंगजेबच्या क्रूर यातनांनी संभाजी महाराजांचा मृत्यू होतो. ही बातमी असदखान औरंगजेबाला देतो तेव्हा औरंगजेबाचा आधी त्यावर विश्‍वास बसत नाही... पण त्यानंतर तो हताश होतो आणि चिडून, उद्वेगानं म्हणतो, ‘‘क्‍या कहते हो? असद...अखेरीस ताठ मानेनं मरून जिंकला तो! हार मात्र आमच्या तकदिरीमध्ये आली...’’ या वाक्‍यानंतर औरंगजेब हताशपणे खाली कोसळतो... गुडघे टेकवून तो असदला म्हणतो, ‘‘असद, जी मिट्टी असले पहाडी राजे निर्माण करते, ती मिट्टी आम्हाला कदापि जिंकता येणार नाही... ऐकून ठेवा असद... या दख्खनच्या मिट्टीतच आमची कबर खोदून ठेवली आहे...’’
आणि औरंगजेब नमाज पढू लागतो... पडदा पडतो...
- प्रा. प्रकाश मोरे, भोलावडे, ता. भोर, जि. पुणे

---------------------------------------------------------------------
एक ‘चतुरंगी’ आठवण
आपल्या आयुष्यातल्या काही आठवणी, कालातीत आठवणी बनून राहतात. त्या घडतातही अचानक... पण आयुष्यभर सुखद अनुभवांचा ठेवा बनून राहतात. मुंबईमध्ये निरनिराळी संमेलनं दर वर्षी भरत असतात आणि रसिकांना समृद्ध करत असतात. गुणीदास संमेलन, लेखिका संमेलन, महानगर साहित्य संमेलन आणि चतुरंग रंगसंमेलन अशी ही संमेलनं.

माझी ही आठवण आहे ती १९९१ मधली. तो डिसेंबर महिना होता. याच सुमारास चतुरंगचं ‘रंगसंमेलन’ भरायचं. त्या वर्षीचं ते चौथं किंवा पाचवं संमेलन असावं. त्या वर्षी हे ‘रंगसंमेलन’ रूपारेल महाविद्यालयात चार दिवस भरणार होतं. या संमेलनाला बरेच मान्यवरही उपस्थित राहणार होते. सर्व रसिकांना ती एक पर्वणीच होती. त्या वेळेस ‘चतुरंग’ संस्थेविषयी मला फारशी माहिती नव्हती. मला लहानपणापासूनच स्वाक्षरी गोळा करण्याचा छंद होता म्हणून ‘रंगसंमेलना’ला जायचंच, असं ठरवून तिकीट काढायला गेले; पण ती संपली होती. मी खूपच निराश झाले.

अखेर ‘रंगसंमेलना’चा दिवस उजाडला. माझं मन काही मला स्वस्थ बसू देत नव्हतं. मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी मी आतुर होते. शेवटी धीर करून ‘रुपारेल’मध्ये जाऊन धडकले. ‘रुपारेल’च्या प्रांगणाच्या कडेलाच मला नाना पाटेकर आणि अन्य मान्यवर गप्पा मारत उभे असल्याचं दिसलं. मी स्वाक्षरी घेण्यासाठी पुढे गेले. नानाजींनी सही दिली. ती देताना माझं नाव विचारलं, त्यानंतर त्यांनी ‘‘या रंगसंमेलनासाठी आलात का,’’ म्हणून विचारलं. या त्यांच्या प्रश्‍नावर मी अगदी सविस्तर उत्तर दिलं. आणि काय आश्‍चर्य!... नाना पाटेकर यांनी स्वतःकडचा अतिविशिष्ट व्यक्तींसाठीचा म्हणजे व्हीआयपी पास मला देऊन टाकला. शिवाय असंही सांगितलं, की कोणी कुठंही तुम्हाला अडवलं किंवा विचारलं तर माझं नाव सांगा. नाना पाटेकर यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव किती आहे, याची जाणीव मला आणखी एका घटनेनं दिली. त्यांनी पास दिला आणि म्हणाले, ‘‘तुमचं घर जवळ असेल तर घरच्यांना सांगून या किंवा फोन करा.’’ त्या वेळी मोबाईलचा जमाना नव्हता आणि जवळ पीसीओही नव्हता; पण घर जवळच असल्यानं मी घरी जाऊन सांगून आले.

संपूर्ण चारही दिवस मी दुसऱ्या रांगेत बसून सगळ्या कार्यक्रमांचा आनंद घेतला. तसंच व्हीआयपी कक्षात सर्व मान्यवरांबरोबर अल्पोपाहार करण्याची मला संधीही मिळाली. ही घटना आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कारण, या ‘रंगसंमेलना’नंतर मला अशा कार्यक्रमांना जाण्याची आवड निर्माण झाली. विविध क्षेत्रांमधल्या मान्यवरांचे विचार ऐकता आले. या विचारांमुळे माझ्या जाणिवा प्रगल्भ झाल्या. आयुष्यात खूप अनुभव, संचितरूपात जमा झाले. यानंतर मी ‘चतुरंग’च्या ‘रंगसंमेलना’ची कायमचीच रसिक होऊन गेले. आपले लाडके पु. ल. देशपांडे, विजया मेहता, गुलजार, प्रा. शिवाजीराव भोसले, झाकीर हुसेन, कलापिनी कोमकली, सत्यदेव दुबे, पंडित जसराज असे अनेक दिग्गज मान्यवर, विचारवंत यांना ऐकणं, पाहणं, अनुभवणं यांनी माझं जीवन समृद्ध होऊन गेलं.
- निरूता भाटवडेकर, दादर, मुंबई

Web Title: readers participation