रसिकत्वाची ‘समृद्धी’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

तो राजहंस एक...

तो राजहंस एक...
‘शुभेच्छांची काव्यसुमने’ या माझ्या पहिल्या काव्यसंग्रहात प्रतिभावंत संगीतकार श्रीनिवास खळे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. माझे गुरू, ज्येष्ठ व्हायोलिनवादक रमाकांत परांजपे यांच्याकडून पत्ता मिळाल्याने त्या शुभेच्छा मी पाठवू शकले. माझी कविता आवडल्याचा खळे यांचा दूरध्वनी आल्यावर मला आश्‍चर्याचा धक्काच बसला. त्यांचं फोनवरचं प्रेमळ, आदबशीर बोलणं ऐकून आपण कधी ना कधी तरी त्यांना भेटू ही इच्छा मनात आकार घेऊ लागली. पुस्तकाचं काम होताच, खळे यांचा दूरध्वनी क्रमांक परांजपे यांच्याकडून घेतला. माझा दूरध्वनी सायंकाळी सहानंतर म्हणजे त्यांच्या योग्य शेड्युलमध्ये गेल्यानं त्यांनी तो घेतला आणि अत्यंत प्रेमानं बोलून पुस्तकाबद्दल आनंद दर्शवला.

मी भेटीची इच्छा अत्यंत तळमळीनं सांगितली आणि थोडा वेळ का होईना, आपल्याला भेटायचं आहे, हे सांगितल्यावर त्यांची तब्येत पूर्णतः बरी नसतानाही त्यांनी भेटीची परवानगी दिली, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा! संपूर्ण पत्ता खुणांसह सांगून बरोबर कोण आहे, मुंबईत नातेवाईक कोण आणि कुठं राहतात, याची त्यांनी आस्थेनं चौकशीही केली.
दोन आठवडे सातत्यानं दूरध्वनी केल्यावर भेटीचा दिवस आणि वेळ ठरली. खळे भेटणार म्हणून मी अक्षरशः हरखून गेले. त्यांनी इतका व्यवस्थित पत्ता आणि खुणा सांगितल्या होत्या, की घर सापडायला काहीच अडचण पडली नाही.

बेल वाजवल्यावर त्यांची मुलगी पुढे आली. तिनं तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का, बाबांनी तुम्हाला बोलावलं आहे का, असं विचारल्यावर मी ‘हो’ सांगताच तिनं सरांना आमच्या येण्याविषयी सांगितलं. ते विश्रांती घेत होते, तरी शाल सावरून बसले आणि आनंदानं होकार दिला. त्यांच्या परवानगीनंच आम्ही आत गेलो.

एवढ्या तपस्वी संगीतकाराला भेटायला जायचं म्हणजे थोडेसे टेन्शन होतंच; पण श्रवणभक्तीला प्राधान्य देण्याच्या तयारीनंच आत गेलो. त्यांची भेट हा शब्दातीत अनुभव होता. अत्यंत आपुलकीनं, सुहास्य वदनानं त्यांनी आमचं स्वागत केलं. थोड्या गप्पा झाल्यावर प्रेमानं त्यांनी माझं पुस्तक स्वीकारलं. पुस्तक पाहिलं आणि माझ्या पहिल्या प्रयत्नाला दाद दिली! परांजपे यांच्याकडं व्हायोलिन आणि सिंथेसायझर शिकत आहे, म्हटल्यावर त्यांनी रमाकांत परांजपे सरांच्या आठवणी सांगितल्या. संगीत आणि साहित्य हे कसे एकमेकांना पूरक आहेत, हे सांगितलं.

आमचं चहा- बिस्किटानं मनापासून स्वागत करून त्यांनी प्रेमभाव दाखवला. त्यांच्या तिन्ही भिंतींवर पारितोषिकं आणि पुरस्कार पाहून मन खूप भरून आलं. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी यांना एकत्र गायला लावणारे हे संगीतकार किती श्रेष्ठ आहेत, ते पटलं. त्यांच्या कर्तृत्वाचं श्रेय स्वतःकडं न घेता सरस्वतीच्या मूर्तीकडं बोट दाखवून ‘ही सरस्वती माझ्याकडून संगीतातलं काम करून घेते,’ असं विनयपूर्वक सांगितलं. ज्या विद्वान कलाकाराला सरस्वती विनयाचे अलंकार घालते, तीच व्यक्ती यशाची उंचच उंच शिखरं गाठते आणि त्यानंतरही सतत अथक काम करत राहते. त्यांचं या वयातही संगीतातलं काम चालूच होतं आणि तेही लता मंगेशकर यांसारख्या महान व्यक्तींबरोबर हे त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वाचं द्योतक आहे.

माझ्या सगळ्या प्रश्‍नांना त्यांनी आपुलकीनं सविस्तर उत्तरं दिली. फोटो, व्हिडिओ शूटिंगलाही परवानगी दिली. एवढंच काय, माझ्या मिस्टरांनाही जवळ प्रेमानं बोलावून त्यांच्याबरोबर फोटो घ्यायला सांगितलं. सर्वांशी प्रेमानं वागणारे, खरोखरीच माणुसकीचं शिखर गाठलेले हे महान कलाकार! आपल्या घरी सामान्यांतला सामान्य माणूस आला, तरी त्याचं मनापासून स्वागत करणारे दिलदार कलाकार पाहून मी खरोखरीच नतमस्तक झाले आणि त्यांचं चरणदर्शनही भक्तिभावानं घेतलं. स्वकर्तृत्व सांगण्यापेक्षा पत्नीची साथ किती मौल्यवान लाभली, हे त्यांनी आवर्जून सांगितलं. वेगवेगळ्या कर्तृत्ववान व्यक्तींबरोबरचे अनुभव ते इतक्‍या दिलखुलासपणे सांगत होते, की आपण पहिल्यांदाच भेटत आहोत, असं वाटतच नव्हतं. ते अजूनही बोलत राहिलं असतं; पण मला अचानक त्यांच्या रक्तवाहिन्यांच्या आजाराची जाणीव झाली आणि मी जाणीवपूर्वक उठले. आपल्यामुळं त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांचा प्रेमळ निरोप घेतला. तेव्हा त्यांनी ‘पुन्हा एकदा सवड काढून या’ असं सांगितल्यावर मन प्रेमानं, आदरभावानं भरून आलं. जायचं अंतर दूरचं होतं, म्हणून बाहेर गेल्यावरही परत पाणी पिण्यासाठी आत गेले. तेव्हा हे ऋषीतुल्य संगीतकार डोळ्यांतलं पाणी पुसत होते, हे पाहिल्यावर आश्‍चर्याचा धक्काच बसला. नंतर भेटीचा योग आला नाही. फोनवर मात्र आपुलकीनं बोल ऐकायचं भाग्य लाभलं.

ही रंगलेली भेट मनावर इतकी कोरली गेली आहे, की लिहिता-लिहिता तो सर्व पट माझ्या डोळ्यापुढं साकार झाला.
- मनीषा आवेकर

---------------------------------------------------------------------------------
माझे ‘कल्याण’कारी दिवस
सा    धारण १९९४-९५ मधील गोष्ट असावी. शिक्षणासाठी कल्याण इथं वसतिगृहात राहायचो. ग्रामीण संस्कृतीत वाढलेला मी, शहरातलं जीवन पाहून भारावून न जातो, तो नवलच. सुटीच्या दिवशी दिवस-दिवसभर गल्लोगल्ली, या चौकातून त्या चौकापर्यंत, या दुकानापासून त्या दुकानापर्यंत शहराची जादू पाहण्यासाठी भटकत असे. या शहरी जीवनाचं वेगळेपण मनात झिरपत होतं.

अशा या भटकण्यात एकदा ‘वसंत व्याख्यानमाले’चा बोर्ड वाचला. सहज उत्सुकता म्हणून शेजारच्या औषधाच्या दुकानदाराला विचारलं. त्यानं कर्णिक रोडचा पत्ता सांगितला. उन्हाळ्याचे दिवस... रस्ते धुळीनं भरलेले. चालून-चालून घामाघूम झालो. रात्रीचे नऊ वाजलेले. वसतिगृहावर जाऊन जेवून झोपायचे, असा बेत करून चालतानाच हा फलक दिसलेला. पत्ता शोधत व्याख्यानमालेच्या मंडपात पोचलो. बैठकीवर चार-पाच ज्येष्ठ नागरिक बसले होते. व्यासपीठ रिकामंच होते. चालून दमलो होतो. फॅनचा वारा येईल, हा हेतूनं बैठकीवर पुढंच बसलो. नऊ वाजता सुरू होणारं व्याख्यान दहा वाजता सुरू झालं. पहिलेच पुष्प ओवलं होतं कथालेखक वामन ओहाळ यांनी. अतिशय साध्या व्यक्तिमत्त्वाच्या वामनरावांनी ‘लांडोर’ नावाची कथा सांगितली. एका शेतकऱ्यानं पाळलेल्या या लांडोरीबाबत धाक निर्माण करून शेतकऱ्याच्या कर्जवसुलीसाठी आलेला सरकारी अधिकारी शेवटी लांडोरीच्या मासांचीच मागणी करतो, असं आशय सांगणारी ही आगळीवेगळी कथा आजही माझ्या कानांत आणि मनात रुंजी घालते. पावणेदोन तास श्रोते अविचलत ऐकत होते. दाणे टिपणारी लांडोर, नाचणारी लांडोर, मोराच्या प्रतीक्षेत असणारी लांडोर अशी हुबेहूब चित्रं शब्दांच्या मनोऱ्यांद्वारे निर्माण करणाऱ्या ओहाळांचं कथन लाजवाबच होतं. वाईट नजरेच्या सरकारी अधिकाऱ्याचं खलनायकत्व इतकं टोकाला जातं, की ती कथा ऐकतानाही माझ्या हातांच्या मुठी वळल्या, मी दात खाऊ लागलो, इतकं कथन प्रभावी होतं.
आयुष्यात पहिल्यांदाच एका लेखकानं लिहिलेली कथा स्वतः त्यांच्या तोंडून ऐकत होतो. हा अनुभव फार रोमांचकारी होता. त्यानंतर ओहाळ यांनी कथेच्या निर्मितीची प्रक्रिया सांगितली. त्यातलं त्यांचं अनुभवविश्‍व उलगडून ते समारोपाकडं वळले...

मागं वळून बघितलं, तर सारा मंडप श्रोत्यांनी भरून गेला होता. साहित्यसमृद्धीनं मी भरून पावलो होतो. मंडपातून बाहेर पडलो ते उद्यापासून व्याख्यानमाला संपेपर्यंत रोज येण्याचा निश्‍चय करूनच! पोटातली भूक मनाच्या भरल्या गाभाऱ्यामुळे जाणवली नाही; पण साहित्याची भूक आहे हे पहिल्यांदाच जाणवलं.

याच कल्याणमधली आणखी एक आठवण. वनवासी कल्याण विभागानं आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत प्राचार्य राम शेवाळकर यांनी पुष्प गुंफलं. मध्येच दिवे गेले. प्राचार्य शेवाळकर बोलतच राहिले. ‘वक्ता दर्शनीय नसतो, वक्ता श्रवणीय असतो’ या त्यांच्या एका वाक्‍यानं सारा सभामंडप चिडीचूप झाला. प्राचार्य सलग अडीच तास बोलले. नंतर दिवे आल्याचंही काही जणांना समजलं नसावं. किती तरी कार्यक्रमांनी मन प्रसन्न केलं. मन कधी निराशेकडं वळतं, तेव्हा या आठवणी मनाला उत्साह देतात. याच दिवसांनी माझ्या जीवनाचं ‘कल्याण’ झालं.
- यशवंत सुरोशे, मु. महाज, पो. धसई, ता. मुरबाड, जि. ठाणे.

---------------------------------------------------------------------------------
एका नाटकाचा ‘प्रयोग’

गोव्यातलं निसर्गाच्या कुशीतलं एक छोटंसं गाव - ब्रह्माकरमळी! माझं माहेर. शहरातून खेड्यात राहायला गेलेलं आमचं कुटुंब! वीज नाही, रस्ते नाहीत, नळ नाही, बस-सेवा एकदम कमी; पण तरीही सगळे मजेत राहत होतो. तिघी बहिणी- त्यामुळं मैत्रिणींची उणीव भासत नव्हती.
गावात ब्रह्मदेवाचं देऊळ आहे. दर वर्षी देवळात ‘ब्रह्मोत्सव’ असायचा याच दिवसात. सकाळी रुद्रपठण आणि सायंकाळी हौशी कलाकारांची नाटकं होत असत. चाळीस वर्षांपूर्वी नाटकांत कामं स्त्रिया करत नसत. क्वचित एखादी स्त्री कलाकार काम करायची. तिला ‘नटी’ म्हणत असत. अशा काळात एक भन्नाट विचार माझ्या आईच्या मनात आला. पुरुषपात्रविरहित एकांकिका करण्याचा! गावातल्या बालवाडी शिक्षिका यशश्री आणि आम्ही नाटक करायचे ठरवले. ‘पोकळ प्रतिष्ठा’ असं नाटकाचं नाव होतं. सामाजिक नाटक होतं, त्यामुळे वेशभूषा-नेपथ्य याची चिंता नव्हतीच. चिंता होती काम कोण-कोण करणार. माझी बहीण दहावीला. तिचा अभ्यास महत्त्वाचा होता. सगळी कामं आटोपून, शाळा संपवून तालमीना वेळ देणं हेच मोठं काम होतं. नाटकाचे संवाद ही पण एक मोठी चिंताच होती. कारण मराठी नाटकात कोकणी सूर येऊ शकत होते.
या गडबडीत आमच्या मातीच्या घराच्या खोल्या वाढवण्याचं काम सुरू होतं. तिथंच आमच्या तालमी सुरू झाल्या. एक दिवस वादळी वारे आणि जोरात पाऊस येऊन आमच्या नाटकाच्या पुस्तकाची दोन पानं खरोखरच ‘मातीत’ गेली. फक्त मला आणि माझी बहीण विभा हिला नाटक पाठ होतं म्हणून बजावलो!

आमच्या नाटकाची बातमी सगळ्या गावात वादळी वाऱ्यासारखी पसरली. ‘बायल्यांचं नाटक? दादले ना?’ अशी चर्चा सुरू झाली. कार्यक्रमाचे व्यवस्थापक नाटकाची तयारी पाहण्यासाठी आले, पण त्यांना फारशी काही तयारीच दिसली नाही. ते चक्रावूनच गेले. आम्ही कोणालाही पत्ताच लागू दिला नाही, नाटक काय आहे त्याचा.
प्रत्यक्षात नाटकाचा दिवस उजाडला. पात्रपरिचय करून देण्याआधी स्टेजचा पडदा सरकवून मी पाहिलं! इतके प्रेक्षक यापूर्वी कोणीच पाहिले नसतील.

‘बायल्यांचं नाटक कशे आसता काय?’ हीच मनःस्थिती सर्वांची! एका परीनं हा इतिहासच होता, त्या पंचक्रोशीत. पडदा वर गेल्यावर लोक हरखून गेले होते, आमचं नाटक पाहून. नाटकात माझ्या आईनं साकारलेली तथाकथित ‘प्रतिष्ठित स्त्री’ आणि तिला विरोध करणारी मी यांचा वितंड-वाद पाहून टाळ्या पडत होत्या. त्यातच माझी आत्या एका प्रवेशात आपला संवादच विसरली. बिचारी येरझाऱ्या घालत ‘‘सांग मगो मेऽले पुढां काय तां,’’ असं म्हणत होती. प्रेक्षकांना चूक जाणवली नाही, पण खरी गंमत अशी होती, की प्रॉम्प्टर संवाद सांगायचं विसरून नाटकच पाहत बसली होती आतमध्ये! बहिणीनं मदत केली नसती, तर कठीणच होतं. शेवटच्या प्रवेशात माझ्या आईनं हातावर चहा सांडला, अशी ओरडाओरड सुरू केली, तेव्हा माझा छोटा भाऊ ‘‘आईला बाऊ झाला,’’ म्हणून जोरात रडू लागला होता.

... दशावतार आणि एखादंच स्त्री पात्र भाडेतत्त्वावर आणण्याच्या काळात आमचं हे नाटक खूप रंगलं! आयोजकांनी आम्हा सर्वांचं भरभरून कौतुक केले. किती तरी दिवस या ‘प्रयोगाचीच’ चर्चा चालू होती!
- सुषमा घाणेकर,  पुणे.
---------------------------------------------------------------------------------

Web Title: readers participation