इलाहाबाद की ‘छप्पन छुरी’ (श्रीमंत माने)

requiem in raga janki book appreciation by Shrimant Mane
requiem in raga janki book appreciation by Shrimant Mane

इंग्लिश भाषेत वेगवेगळ्या विषयांवरची असंख्य पुस्तकं सातत्यानं प्रकाशित होत असतात. पुस्तकांच्या दुनियेतला तो एक अथांग महासागरच. त्या त्या महिन्यात किंवा त्याच्या आसपासच्या काळात गाजलेल्या, चर्चिल्या गेलेल्या लक्षवेधक पुस्तकांचं ललितबंधाच्या शैलीत परिचय करून देणारं हे मासिक सदर. 

अशी दंतकथा आहे, की अकबराच्या नवरत्नांपैकी एक असलेला भारतीय संगीताचा पितामह तानसेन मरण पावला तेव्हा बिलासखान या त्याच्या मुलानं पित्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी त्याच्या पार्थिवासमोर तोडी रागात एक शोकगीत गायिलं. त्यातली आर्तता इतकी ओतप्रोत होती की मृत तानसेनाचा हात आशीर्वादासाठी उंचावला गेला!

ही अशी शोकगीतं गाण्याची प्रथा बहुतेक सगळ्या धर्मांमध्ये आहे. मुस्लिमांमध्ये तिला ‘फातिहा’ म्हणतात, तर ख्रिश्‍चनांमध्ये ‘रेक्‍वियम’. 

विसाव्या शतकाच्या प्रारंभी जेव्हा भारताच्या कानाकोपऱ्यात ब्रिटिश राजवट होती आणि त्या आमदानीतही छोटी-मोठी संस्थानं, त्यांच्यावर राज्य करणारे नवाब, राजे-महाराजे, सरदार-मनसबदार, ब्रिटिश सैन्याधिकारी, मुलकी अधिकारी, शिपायांपासून गावकोतवालापर्यंतच्या बड्या असामी आदींच्या आश्रयानं गायन, वादन, नृत्य, संगीत अशा कला बहरल्या होत्या. आपापल्या भागांतल्या कलासंस्कृतींचा वारसा गायक, संगीतकार, कवी, नृत्यांगनांकडून पुढं नेला जात होता. सन १८८० ते १९३४ अशा उण्यापुऱ्या साडेपाच दशकांचं आयुष्य वाट्याला आलेली जानकीबाई इलाहाबादी ही अशाच नामवंत कलावंतिणींपैकी एक. बनारस, अलाहाबाद, लखनौ ही अवध प्रांतांतली शहरं सामावणाऱ्या अवधी संस्कृतीत गायनाचा वारसा वृद्धिंगत करणारी प्रसिद्ध गायिका. कधी तिचा सुंदर चेहरा विद्रूप करण्याच्या हेतूनं, तर कधी व्यावसायिक ईर्ष्येपोटी तिच्यावर अनेक हल्ले झाले. जानकीबाईच्या मते हल्ल्यांची संख्या होती छपन्न व त्यासाठी वापरले गेले होते चाकू. त्यामुळं ही महान गायिका इतिहासात ‘छपन्न छुरी’ म्हणून ओळखली गेली. तिचा जो अंतिम विसावा, तो ‘छपन्न छुरी की मजार’. नीलम सरण गौर यांनी ‘दीवान-ए-जानकी’ या जानकीबाईच्या आत्मचरित्राचा आधार घेऊन ‘रेक्‍वियम इन रागा जानकी’ ही बहुपेडी कादंबरी गुंफली आहे. 

जानकीच्या आयुष्यात अनेक वळणं आली. ती जन्मानं हिंदू. धर्मांतरानंतर शिया मुस्लिम, ज्याच्याशी निकाह केला तो येऊन-जाऊन राहणारा, पिता परागंदा झालेला अन्‌ दत्तकपुत्रही त्याच वाटेनं गेलेला. मातेनं तिची घेतली तशीच काळजी मुलगा घर सोडून गेल्यानंतर पोरवयीन सुनेची घेणारी जानकी. भावंडं, सून अशा अनेकांचे अकाली मृत्यू वाट्याला आलेली ट्रॅजिडी क्‍वीन, शापित व शोकात्म नायिका-गायिका. 

दूधदुभत्याचा व्यवसाय करताना बनारसमध्ये मिठाईचं छोटे दुकान चालवणारा अहीर समाजातला पहेलवान शिवबलक राम आणि मानकी या दांपत्याच्या पोटी जन्मलेली नाकीडोळी छान अशी जानकी. बालपणी लेकीला मानकीनं गाण्याची शिकवणी लावली होती. काशी, पराग, महादई व बेनीप्रसाद ही तिची भावंडं. आत्महत्येसाठी अस्सी घाटावरून गंगेत उडी घेतल्यानंतर शिवबलकनं वाचवलेली व आश्रयासाठी घरी आणलेली लक्ष्मी किंवा लछमिया. तिच्यात गुंतलेला शिवबलकचा जीव. मिठाईच्या दुकानावर लक्ष्मी व जानकी. तिथे खरेदीच्यावेळी लक्ष्मीला ‘शेर’ व जानकीला ‘छटाक’ म्हणून छेडछाड करणारा रघुनंदन दुबे नावाचा रंगीला पोलिस जमादार. त्याची लहानग्या जानकीवर नजर. त्याच्या पाशात अडकलेली लक्ष्मी. जानकीनं दोघांना नको त्या अवस्थेत पाहिल्यामुळं दुबेनं चाकूनं तिच्या चेहऱ्यावर केलेला जीवघेणा हल्ला. या हल्ल्यासाठी लक्ष्मीला जबाबदार ठरवून संतापलेली मानकी. इस्पितळात शुद्धीवर आल्यानंतर जानकीनं उचारलेले शब्द व त्याच वेळी लक्ष्मीचं पलायन. तिच्या शोधात शिवबलकची धावाधाव. अखेर पत्नी व मुलीला सोडून परागंदा होणं. एक दिवस नवरा घरी येईलच म्हणून आशेवर जगणारी मानकी. जानकी व बेनीप्रसाद वगळता तीन अपत्यांचा देवीच्या साथीत झालेला मृत्यू. मानकीच्या त्या विमनस्क अवस्थेचा फायदा घेणारी मैत्रीण पार्वती. घर व दुकान देणेकऱ्यांसाठी सोडून दोन मुलांना घेऊन बनारस सोडणारी, पार्वतीवर विसंबून अलाहाबादला आलेली आणि प्रत्यक्षात मुलीसह एका कोठीवर विकली गेलेली मानकी. मानकीचं सोनं-नाणं, किडुकमिडुक घेऊन पार्वती गायब. 

इतकी वर्षं सामान्य गृहिणी बनून हलवायाचा संसार चालवणारी, दैवी गळा लाभलेल्या लेकीला अवतीभवतीच्या वासनांध नजरांपासून सांभाळणारी मानकी नसीबन बाईच्या कोठीवर अगतिक अवस्थेत पुन्हा साज-श्रृंगार करायला लागते. गिऱ्हाइकांची मर्जी सांभाळते. त्याच वेळी मुलीला या घाणीत पडावं लागू नये म्हणून नट्टापट्टा करू देत नाही. गाणंही गुणगुणू देत नाही. तरीही एक दिवस नको ते घडतं. कोठीची मालकीण नथ उतरली गेली म्हणून खूश होते; पण मानकी तिला समजावते की शरीराशिवाय जानकीकडं जे आहे त्यातून अख्ख्या कोठीचं पोट भरू शकतं. जानकीचं गाणं पुन्हा सुरू होतं. उस्ताद हस्सू खानसारखे दिग्गज वस्ताद तिला शिकवायला येतात. उर्दू, पर्शियन, हिंदी व इंग्लिशसाठी शिकवणी लावली जाते. ‘जानकीबाई इलाहाबादी’ या नावानं हिंदुस्थानी संगीतातली एक अलौकिक गायिका जन्माला येते. हा काळ संगीतामधल्या संक्रमणाचा. हार्मोनिअम, तंबोरा किंवा तानपुरा, तबला किंवा ढोलक या परंपरागत वाद्यांची जागा रेकॉर्डिंग, एचएमव्ही व जीटीएलच्या तबकड्यांनी घेण्याचा. या स्थित्यंतराचा पहिला आविष्कार म्हणजे अलाहाबादची जानकीबाई व कोलकत्याची गौहर जान. व्यंग्यकाव्यासाठी प्रसिद्ध असलेले उर्दू कवी अकबर इलाहाबादी हे दोघींचे समकालीन. रागदारी व लयकारी असं संगीत व काव्य या दोहोंचं कसब असणारी जानकीबाई उजवी. रेवा संस्थानातल्या दरबारी गायनानं तिच्या कारकीर्दीचा सुवर्णकाळ सुरू होतो. इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज याच्या भारत दौऱ्याच्या वेळी गौहर व जानकी मैफल सजवतात. दोघींना शंभर सुवर्णमुद्रांचा नजराणा मिळतो. 

जानकीबाईच्या आयुष्याचा उत्तरार्ध नात्यांच्या व भावनांच्या गुंतागुंतीचा. अब्दुल हक नावाच्या वकिलाशी तिचा निकाह, अब्दुल अजीज हा दत्तकपुत्र. त्याला गांजाचं व्यसन. चाँदनी ही जेमतेम चौदा वर्षांची नितांत देखणी बहू. महेशचंद व्यास नावाचा वकिलीच्या अभ्यासक्रमाऐवजी घरच्यांना कळू न देता जानकीबाईकडं संगीत शिकणारा लाडका शिष्य. अखेरच्या दिवसांत कायदेशीर सल्लागार म्हणून आधार देणारे हशमत उल्लाह हे वकील आणि प्रचंड लोकप्रियता, धनदौलत असूनही एकाकी जग सोडून गेलेली जानकी. आपल्या दफनविधीच्या वेळी अब्दुल हक पार्थिवाला स्पर्श करणार नाहीत, याचं वचन महेशचंद व्यासकडून घेणारी करारी स्त्री. 

नीलम सरण गौर यांच्या या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातल्या हिंदुस्थानी संगीताचा वृत्तान्त त्या परिभाषेत पानापानावर झिरपतो. मैफलीतल्या शगुन-नेक, चीज, आलाप, गट, जोड, झाला किंवा नोंकझोंक व बंदिशींचा गोतावळा, तसंच खयाल, ध्रुपद, टप्पा, ठुमरीचे स्वर भेटीला येतात. तोडी व इतर राग-रागिण्या जागोजागी थुईथुई नाचत राहतात. सोहनी, परज, जोगिया, भैरव, मल्हार, भीमपलास अशा विविध रागांचे उल्लेख येतात. संगीताची विविध घराणी, त्यातले मुर्शीद, शागीर्द भेटतात. नथ, झुमके, पैंजणापासून ते चुनरिया व किनखाबापर्यंतचे दागदागिने, वेशभूषा नजरेस पडतात. मलई, पुरी, पेढा, जिलेबीपासून ते पानसुपारी, रूहआफ्जा व ब्रिटिशांनी नव्यानंच भारतात आणलेल्या चहाचा आस्वाद कादंबरीत आहे. कलंदर कलावंत व बिलंदर रसिक यांचा एकमेकांचा रंजक पाठलागही आहे. इतकंच कशाला संगीतमय वातावरणात मूँहजली, माटीमिल्ली अशा शेलक्‍या शिव्यांनाही स्थान आहे. पहिलं महायुद्ध, महात्मा गांधींची खिलाफत चळवळ, असहकार आंदोलन, टोपीवाल्यांच्या विरोधात देशभरात राग, जानकीबाईनं राजा पंचम जॉर्जनं दिलेल्या सुवर्णमुद्रा मोतीलाल नेहरूंना पाठवणं, तवायफ-गणिकांकडून महात्मा गांधीजींनी मदत नाकारणं, अशी स्वातंत्र्यलढ्याची मैफलही गौर यांनी कादंबरीत टिपली आहे. 

गौहर जान एकदा जानकीबाईला सांगते ः ‘आपल्यासारख्या व्यासायिक गायिकांचं आयुष्य म्हणजे एक रागच असतो. प्रत्येकीचा वेगवेगळा...दुसऱ्या कुणाहीसारखा नसलेला!’ नोट्‌स व स्केलची चौकट कायम ठेवून वळणं घेणारी आयुष्यं. म्हणून कादंबरीचं नाव, ‘राग जानकी व मृतात्म्याला शांतीसाठी त्याचं गायन.’ ...आणि कादंबरीच्या शेवटी हशमत उल्लाह वकीलसाहेब वृद्ध जानकीबाईला थोडे मिश्‍किलीत सुनावतात ः ‘हे विशाल जग म्हणजे तुझी मैफल नाही. तू तिथं रसिकांच्या हृदयावर राज्य करतेस... छळतेसही. बाह्य जगात मात्र तुला छळायला लोक टपून बसले आहेत...’ 

‘द हिंदू लिट फॉर लाइफ’ पुरस्कार 
‘रेक्‍वियम इन रागा जानकी’ या कादंबरीत नीलम सरण गौर यांनी जानकीच्या गानकथेच्या अनुषंगानं उत्तर भारतातल्या संगीताचा थोर वारसा शब्दबद्ध केला आहे. त्या अलाहाबाद विद्यापीठात इंग्लिशच्या प्राध्यापिका होत्या. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगभर नावाजल्या गेलेल्या, इंग्लिशमधल्या लघुकथांमध्ये व कादंबऱ्यांमध्ये भारतीयत्व प्रतिबिंबित करणाऱ्या महत्त्वाच्या भारतीय लेखिका. औपचारिकतेच्या चौकटीत अडकलेले पाश्‍चात्य रीती-रिवाज, ते कथित उंची जगणं यांपासून दूर अशा उत्तर भारतातल्या छोट्या खेड्यांमधलं कलात्मक जगणं हा त्यांच्या लेखनकृतींचा (‘ग्रे पीजन अँड आदर स्टोरीज्‌’, ‘स्पीकिंग ऑफ ६२’,‘विंटर कम्पॅनिअन्स अँड आदर स्टोरीज्‌,’ ‘सिकंदर चौक पार्क’, ‘साँग विदाउट एंड अँड आदर स्टोरीज्‌’ ) केंद्रबिंदू. 

गेल्या रविवारी, १३ जानेवारीला, चेन्नई इथं ‘द हिंदू लिट फॉर लाइफ’ या साहित्यमहोत्सवात ‘फिक्‍शन’ या प्रकारात सन २०१८ चा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार नीलम सरण गौर यांना, तर ‘नॉनफिक्‍शन’ म्हणजेच कथेतर प्रकाराचा पुरस्कार बंगाली सामाजिक कार्यकर्ते मनोरंजन ब्यापारी यांच्या शिप्रा मुखर्जी यांनी इंग्लिशमध्ये भाषांतरित केलेल्या ‘इंटरॉगेशन ऑफ माय चांडाल लाइफ’ या पुस्तकाला मिळाला आहे.

श्रीमंत माने
'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा
https://www.esakal.com/saptarang

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com