अशी करा दीप अमावस्येची पूजा!

संतोष शेणई
बुधवार, 31 जुलै 2019

दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌|
 गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥

आषाढमासाच्या अखेरच्या दिवशी दीप उजळून सभोवतालचा काळोख नष्ट करायचा असतो. हा दिवस भाग्योदय घडवणारा. घरात अखंड लक्ष्मीचा वास घडवून आणणारा. भाग्योदय तेव्हाच होतो, जेव्हा देहही सक्षम असतो. पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि संप्रेरकांचे संतुलन करवण्यासाठी संस्कृतीने करून दिलेली आठवण म्हणजे दीप अमावास्या.

Related image

दीप पूजनाची तयारी कशी कराल?

दीपपूजनाची जागा स्वच्छ करून घ्यावी. घरातील दिव्यांवरची धूळ निघून जावी यासाठी आधीच ते धुवून घ्यावेत. संध्याकाळी दिवे दूध पाण्याने धुऊन स्वच्छ करावेत. मग पाटावर वस्त्र पसरून त्यावर दिवे ठेवावेत. गूळ घातलेल्या उकडलेल्या कणकेचे गोड दिवे उजळावेत. त्यांची मनोभावे पूजा करावी. श्रावण-भाद्रपदातील अनेक सणांत पत्रीचे महत्त्व आहे. या पत्रीचे महत्त्व दीप अमावास्येपासूनच सुरू होते. आघाडा, दूर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करावी. पुरणाच्या धिंडाचा गोडाचा नैवेद्य अर्पण करावा. दूर्वा ही वंश वृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे ते ही अर्पण करून प्रार्थना करावी. आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करावे. नैवेद्य दाखवत असताना दिव्याची प्रार्थना करावी.

 दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌|
 गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥

‘हे दिव्या, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस.
माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’

त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकवावी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rituals for Deep Amavasya